येशूसारखं होण्याचा प्रयत्न करा
तो दयाळू होता
येशू परिपूर्ण होता. त्यामुळे इतर लोकांसारखी दुःखं आणि चिंता त्याच्या जीवनात नव्हत्या. तरीही त्याने लोकांची परिस्थिती समजून घेतली. त्यांना मदत करायला तो मागेपुढे पाहत नव्हता. इतकंच काय, तर तो त्यांच्या अपेक्षेपेक्षाही दोन पावलं पुढे जाऊन त्यांना मदत करायचा. दयाळू असल्यामुळेच तो इतरांना मदत करायला पुढे आला.
तो सगळ्यांशी मिळून-मिसळून राहायचा
लहानमोठे सगळे लोक त्याच्याकडे न घाबरता यायचे. कारण तो कोणीतरी मोठा आहे, असं तो त्यांना भासवायचा नाही. येशू सगळ्यांशी आपुलकीने वागायचा, त्यामुळे लोकही त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलायचे.
तो नेहमी प्रार्थना करायचा
येशू नेहमी आपल्या पित्याला प्रार्थना करायचा; मग तो एकटा असो किंवा चारचौघांत. तो फक्त जेवायच्या वेळेसच नाही, तर इतर वेळीही प्रार्थना करायचा. तो आपल्या पित्याचे आभार मानण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी मार्गदर्शनासाठीही प्रार्थना करायचा.
तो स्वार्थी नव्हता
येशू स्वतःच्या आरामाची किंवा सोयीची पर्वा न करता इतरांना मदत करायचा. त्याच्यात मीपणाची भावना नव्हती. त्याच्या या गुणाचंही आपण अनुकरण करू शकतो.
तो माफ करायला तयार असायचा
येशूने माफ करण्याबद्दल फक्त शिकवलं नाही, तर त्याने स्वतःसुद्धा त्याच्या शिष्यांना आणि इतरांना माफ केलं.
तो आवेशी होता
बायबलमध्ये अशी भविष्यवाणी करण्यात आली होती की बरेच यहुदी लोक मसीहाला स्वीकारणार नाहीत आणि त्याचे शत्रू त्याला ठार मारतील. येशूला हे सगळं माहीत असूनही इतरांना मदत करण्यात त्याने स्वतःला झोकून दिलं. त्याने जास्तीत जास्त लोकांना देवाबद्दलचं सत्य सांगितलं. येशूच्या उदाहरणातून आपण हे शिकतो की लोक आपलं ऐकत नसले किंवा आपला विरोध करत असले, तरी आपण आवेशाने देवाबद्दलचा संदेश त्यांना सांगितला पाहिजे.
तो नम्र होता
येशू कितीतरी बाबतींत इतर मानवांपेक्षा श्रेष्ठ होता. जसं की, त्याच्याकडे भरपूर ज्ञान होतं आणि तो बुद्धिमान होता. तसंच, परिपूर्ण असल्यामुळे इतरांपेक्षा त्याचं आरोग्य चांगलं होतं. इतकं सगळं असूनसुद्धा त्याने नम्रपणे इतरांची सेवा केली.
तो सहनशील होता
जेव्हा प्रेषित आणि इतर जण त्याने शिकवल्याप्रमाणे वागायला चुकले तेव्हा त्याने नेहमी सहनशीलता दाखवली. तो त्यांच्यावर रागवला नाही. उलट, त्यांना यहोवासोबत एक जवळचं नातं जोडता यावं, म्हणून त्याने त्यांना शिकवलेल्या गोष्टींची वारंवार आठवण करून दिली.