२९ एप्रिल २०२२
युक्रेन
रिपोर्ट #७ | युक्रेनमध्ये चालू असलेल्या संकटाच्या वेळी बंधुप्रेम दिसून आलं
२,१०,००० पेक्षा जास्त जण स्मारकविधीला उपस्थित राहिले
आम्हाला हे सांगायला खूप आनंद होतोय, की यहोवाच्या मदतीमुळे आणि आशीर्वादामुळे युक्रेनमधले भाऊबहीण स्मारकविधीला उपस्थित राहू शकले. पश्चिम युक्रेनमधल्या अनेक राज्यसभागृहांमध्ये शरणार्थी म्हणून राहत असलेल्या भाऊबहिणींसाठी त्या राज्यसभागृहांमध्ये स्मारकविधीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. भावांनी लहान-लहान गटांमध्ये स्मारकविधीचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि ज्यांना प्रत्यक्षात उपस्थित राहणं शक्य नव्हतं त्यांच्यासाठी व्हिडिओ कॉन्फरंसची व्यवस्था करण्यात आली होती.
स्मारकविधीच्या दिवशी देशातल्या बऱ्याचशा भागांमध्ये दिवसातून अनेकवेळा धोक्याची सूचना देणारे सायरन वाजत होते. पण संध्याकाळ झाली तसे ते बंद झाले. डोनेट्स्क प्रांतातल्या ड्रुझकिवका शहरात राहणाऱ्या सेरहीने म्हटलं: “आम्ही प्रार्थना करत होतो की बाँम्बहल्ल्यांमुळे स्मारकविधीच्या कार्यक्रमात कोणताही अडथळा येऊ नये. आणि कार्यक्रमाच्या थोड्यावेळाआधी बाँम्बहल्ले थांबले आणि सायरनही वाजायचे थांबले.”
कीव्ह शहराजवळ असलेल्या नेमिशाइव इथे काही वयस्कर आणि आजारी भाऊबहीण आहेत. युद्ध सुरू असल्यामुळे एक महिन्यापेक्षा जास्त काळासाठी त्यांना कोणत्याही सभेला हजर राहता आलं नव्हतं. पण स्मारकविधीला उपस्थित राहता यावं यासाठी ते यहोवाकडे प्रार्थना करत होते. या भाऊबहिणींना स्मारकविधीला उपस्थित राहता यावं यासाठी विटाली नावाच्या एका वडीलांनी सर्व व्यवस्था केली. हे वडील म्हणतात: “लाईट नव्हती. म्हणून आम्ही टॉर्चच्या लाईटीत स्मारकविधी पाळला. थंडी होती आणि हिटर नव्हते. गाणी म्हणण्यासाठी म्युझिक नव्हतं. म्हणून माझ्या मुलीने व्हॉयलिनवर संगीत वाजवलं आणि आम्ही गीतं म्हटली.”
ओलेक्सांद्रे नावाचे मंडळीतले एक वडील म्हणतात: “स्मारकविधीची आमंत्रण पत्रिका देण्याच्या मोहिमेच्या काळात आम्ही कोणालाही पत्र लिहून साक्षकार्य करू शकलो नाही. कारण क्षेत्रात घरांवर बाँम्बहल्ले झाले होते आणि लोक घरं सोडून पळाले होते. म्हणून आम्ही आमच्या ओळखीच्या लोकांना, तळघरात आमच्यासोबत लपून बसलेल्यांना आणि आमच्यासोबत पळून आलेल्या लोकांना स्मारकविधीचं आमंत्रण दिलं. त्यांपैकी कित्येकांनी तर यहोवाच्या साक्षीदारांकडून याआधी कधीच ऐकलं नव्हतं. आमंत्रण दिलेल्यांपैकी अनेकजण आमच्यासोबत स्मारकविधीला आले.”
युक्रेनमधल्या सर्वच मंडळ्यांकडून अजून आम्हाला रिपोर्ट मिळाले नसले, तरी जवळपास २,१०,००० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते असं दिसून येतं.
स्मारकविधीबद्दल बोलताना युक्रेनमधला एक भाऊ म्हणतो: “जमिनीवर असलेलं लाईटहाऊस जसं जहाजावरच्या लोकांना या गोष्टीची खातरी देतं की किनारा आता खूप जवळ आहे. तसंच, स्मारकविधीमुळे मला खातरी मिळते की यहोवाचा मोठा दिवस फार जवळ आहे. आणि यावर्षीच्या स्मारकविधीमुळे माझी ही खातरी तर आणखी पक्की झाली आहे.”
२१ एप्रिल २०२२ पर्यंत युक्रेनमधून खालील माहिती मिळाली आहे. स्थानिक भावांकडून मिळालेली ही माहिती पक्की आहे. पण हे आकडे कदाचित जास्त असू शकतात, कारण देशाच्या प्रत्येक ठिकाणातल्या भाऊबहिणींशी संपर्क करणं कठीण आहे.
आपल्या भाऊबहिणींवर काय परिणाम झाला?
३५ प्रचारकांचा मृत्यू झाला
६० प्रचारक जखमी झाले
४३,७९२ प्रचारकांना आपलं घर सोडून पळावं लागलं आणि इतर सुरक्षित ठिकाणी जावं लागलं
३७४ घरं उद्ध्वस्त झाली
३४७ घरांचं मोठं नुकसान झालं
८७४ घरांचं थोडंफार नुकसान झालं
१ राज्यसभागृह उद्ध्वस्त झालं
१० राज्यसभागृहांचं मोठं नुकसान झालं
२७ राज्यसभागृहांचं थोडंफार नुकसान झालं
मदतकार्य
२७ विपत्कालीन मदतकार्य समित्या (DRC) बांधवांची मदत करत आहेत
या समित्यांनी ४४,९७१ प्रचारकांची सुरक्षित ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे
१९,९६१ प्रचारकांना इतर देशात जावं लागलं आणि तिथले बांधव त्यांची मदत करत आहेत