व्हिडिओ पाहण्यासाठी

तरुण लोक विचारतात

डेटिंग—भाग २: डेटिंग करताना कायकाय होऊ शकतं?

डेटिंग—भाग २: डेटिंग करताना कायकाय होऊ शकतं?

 कदाचित तुम्हाला एक व्यक्‍ती आवडते आणि तुमचं जुळेल का हे पाहायला तुम्ही डेटिंग करायचं ठरवता. मग डेटिंग करत असताना कायकाय होऊ शकतं?

या लेखात

 मनमोकळी चर्चा होऊ शकते

 तुम्ही दोघं एकमेकांबरोबर जितका वेळ घालवाल तितकं तुम्हाला दोघांना एकमेकांबद्दल बरंच काही कळेल. तुम्ही ज्या व्यक्‍तीसोबत डेटिंग करताय ती वेगवेगळ्या परिस्थितींत कशी वागते-बोलते ते बघून तुम्हाला तिच्याबद्दल काही गोष्टी कळतील.

 असं असलं तरी, काही गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला एकमेकांशी मनमोकळेपणे बोलावं लागेल. पण तसं करत असताना, भावनांच्या आहारी जाऊन त्या व्यक्‍तीच्या बाबतीत मत बनवू नका.

 तुम्ही खाली दिलेल्या विषयांवरही बोललं पाहिजे:

  •   पैसा. तुमच्यावर एखादं कर्ज आहे का? तुम्ही विचार न करता खर्च करता का? लग्न झाल्यावर तुम्ही आणि तुमचा जोडीदार पैशांच्या बाबतीत निर्णय कसे घ्याल?

  •   आरोग्य. तुमचं आरोग्य चांगलंय का? पूर्वी तुम्हाला एखादा गंभीर आजार झाला होता का?

  •   ध्येयं. तुम्हाला पुढे काय करायचंय? तुमची आणि तुम्ही ज्याच्यासोबत डेटिंग करताय त्याची ध्येयं सारखीच आहेत का? लग्न झाल्यावर जर तुम्हाला तुमची ध्येयं गाठता आली नाहीत तरीही तुम्ही आनंदाने संसार कराल का?

  •   कुटुंब. तुम्हाला सध्या काही कौटुंबिक जबाबदाऱ्‍या आहेत का? भविष्यात तुमच्यावर अशी एखादी जबाबदारी येऊ शकते असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला मुलं हवीत का? आणि हवी तर किती हवीत?

 अशा विषयांवर बोलत असताना जे आहे ते बोला आणि प्रामाणिक असा. समोरच्या व्यक्‍तीवर चांगली छाप पाडण्यासाठी गोष्टी लपवू नका किंवा अर्धवट माहिती देऊ नका.—इब्री लोकांना १३:१८.

 यावर विचार करा: तुम्ही ज्या व्यक्‍तीसोबत डेटिंग करताय तिच्याबद्दल तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे? तिला तुमच्याबद्दल काय माहीत असलं पाहिजे? आत्तापासूनच जे आहे ते बोलल्यामुळे लग्न झाल्यानंतर तुम्हाला प्रामाणिकपणे एकमेकांशी बोलायला कशी मदत होईल?

 पवित्र शास्त्रातलं तत्त्व: ‘एकमेकांशी खरं बोला.’—इफिसकर ४:२५.

 “कदाचित मुलीला वाटेल, ‘सहा महिन्यांत आमचं लग्न ठरेल.’ पण मुलाला तसं काही वाटणार नाही. त्याला कदाचित वाटेल की एक वर्षभर लागेल. असं झालं तर मुलगी गोंधळात पडू शकते आणि तिला वाईट वाटू शकतं. कारण तिने अपेक्षा केली असते की सगळं काही लवकर होईल. असं होऊ नये म्हणून दोघांनाही एकमेकांच्या मनातलं माहीत असलं पाहिजे.”—ॲरियाना, लग्न होऊन एक वर्ष.

 वेगवेगळी मतं असू शकतात

 आपल्या संस्कृतीचा आणि आपल्याला ज्या प्रकारे वाढवण्यात आलंय त्याचा आपल्या दृष्टिकोनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत तुमच्या दोघांचं एकमत होईलच असा विचार करू नका. कारण हाताची सगळी बोटं सारखी नसतात.

 यावर विचार करा: कधीकधी छोट्याछोट्या गोष्टींच्या बाबतीत तुमचं एकमत होणार नाही. अशा वेळी, बायबलचं तत्त्व मोडत नसेल तर तुमच्यातली शांती टिकवून ठेवायला तुम्ही दोघंही तडजोड करायला तयार असता का?

 पवित्र शास्त्रातलं तत्त्व: “तुमचा समजूतदारपणा . . . कळून येऊ द्या.”—फिलिप्पैकर ४:५.

 “तुम्हाला तुमची जोडी कितीही ‘परफेक्ट’ वाटत असली, तरी तुम्हाला एकमेकांच्या काही गोष्टी पटणार नाही. हे खरंय की तुमचं एकमेकांशी जुळणं महत्त्वाचं आहे. पण मतभेद झाल्यावर तुम्ही कसं वागता, हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे.”—मॅथ्यू, लग्न होऊन पाच वर्षं.

 तणाव होऊ शकतो

 यात काहीच शंका नाही की डेटिंग करताना तुमचा बराच वेळ जाईल आणि त्यामुळे तुम्हाला कदाचित काही प्रमाणात तणावाचाही सामना करावा लागेल. मग कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला मदत होईल?

 काही मर्यादा ठरवा. डेटिंगमध्ये इतकं गुंतून जाऊ नका की तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्‍यांचं आणि मित्रमैत्रिणींचं भानच राहणार नाही. लग्न होऊन पाच वर्षं झालेली अलाना म्हणते: “लग्न झाल्यावरही तुम्हाला तुमच्या मित्रांची गरज लागेल. आणि त्यांना तुमची. त्यामुळे तुम्ही आता डेटिंग सुरू केलीये, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.”

 लक्षात असू द्या, लग्न झाल्यावर तुम्हाला एकाच गोष्टीवर नाही तर बऱ्‍याच गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल. म्हणजेच सगळ्या बाबतीत समतोल राखावा लागेल. मग आत्तापासूनच त्या गोष्टी का करू नये?

 यावर विचार करा: तुम्ही ज्या व्यक्‍तीसोबत डेटिंग करताय तिने तुमचंच ऐकलं पाहिजे किंवा तुम्हाला हवा तितका वेळ दिलाच पाहिजे अशी तुम्ही तिच्याकडून मागणी करता का? तुम्ही जिच्यासोबत डेटिंग करताय ती व्यक्‍ती तुमच्याकडून अशी मागणी करते का? डेटिंग करताना तुम्हाला दोघांनाही तणाव होऊ नये, म्हणून तुम्ही दोघंही समजूतदारपणा कसा दाखवू शकता?

 पवित्र शास्त्रातलं तत्त्व: “प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते; . . . प्रत्येक कामासाठी एक वेळ असते.”—उपदेशक ३:१.

 “डेटिंग करणारी जोडपी सोबत वेळ घालवायला जर फक्‍त करमणूक करत राहिली, तर लग्नानंतर त्यांना कदाचित धक्का बसू शकतो. त्यामुळे त्यांनी रोजची कामंही सोबत केली पाहिजेत. जसं की, बाजारात जाणं, घरातली कामं करणं आणि सोबत मिळून उपासना करणं. यामुळे त्यांना त्यांच्या विवाहासाठी एक मजबूत पाया रचता येईल.”—डॅनियल, लग्न होऊन दोन वर्षं.

 लक्षात असू द्या, डेटिंग फक्‍त काही काळासाठीच असते. त्यामुळे तुम्हाला एक निर्णय घेता येतो; एकतर लग्न करायचा किंवा डेटिंग थांबवायचा. हा निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत याबद्दल भाग ३ मध्ये सांगण्यात आलंय.