पालकांसाठी
७: मूल्यं
याचा काय अर्थ होतो?
एक व्यक्ती या नात्याने तुम्ही स्वतःच्या जीवनात काही मूल्यं किंवा स्तर ठरवले असतील. उदाहरणार्थ, सर्व बाबतीत तुम्ही प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करता. आणि तुमच्या मुलांच्या मनातही हे मूल्य रुजावं आणि त्यांनीही प्रामाणिक असावं अशी तुमची इच्छा असेल.
मेहनती असणं, लोकांशी नीट वागणं आणि त्यांचा विचार करणं या महत्त्वाच्या गोष्टीही मुलांनी शिकाव्यात अशी तुमची इच्छा असेल. आणि असे गुण मोठं झाल्यावर नाही तर लहान असतानाच चांगल्या प्रकारे विकसित होतात.
बायबल तत्त्व: “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही.”—नीतिसूत्रे २२:६.
हे का महत्त्वाचं?
तंत्रज्ञानाच्या युगात नैतिक मूल्यं महत्त्वाची आहेत. “मोबाईलमुळे मुलं कोणत्याही वेळी अगदी सहजच वाईट गोष्टींच्या संपर्कात येऊ शकतात. आपली मुलं कदाचित आपल्या शेजारी बसूनच काहीतरी अनुचित पाहत असतील!” असं कॅरन म्हणते.
बायबल तत्त्व: “[प्रौढ लोकांनी] आपल्या समजशक्तीचा उपयोग करण्याद्वारे तिला चांगले व वाईट यांतला फरक ओळखण्यासाठी प्रशिक्षित केले आहे.”—इब्री लोकांना ५:१४.
इतरांचा विचार करणं महत्त्वाचं आहे. यात चांगल्या सवयींचा समावेश होतो. जसं की, ‘प्लीज’ आणि ‘थँक्यू’ म्हणणं. तसंच, इतरांची काळजी करण्याचाही यात समावेश होतो. ही गोष्ट दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. कारण आजकाल लोकांना माणसांऐवजी इलेक्ट्रॉनिक गोष्टीच जास्त आवडू लागल्या आहेत.
बायबल तत्त्व: “लोकांनी तुमच्याशी जसं वागावं असं तुम्हाला वाटतं तसंच तुम्हीही त्यांच्याशी वागा.”—लूक ६:३१.
तुम्ही काय करू शकता?
मुलांना तुमची नैतिक मूल्यं सांगा. उदाहरणार्थ, संशोधनातून दिसून आलं आहे की लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवणं चुकीचं आहे, असं ज्या तरुणांना स्पष्टपणे समजवण्यात येतं ते तरुण सहसा लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवण्याचं नाकारतात.
सल्ला: सध्या घडलेल्या एखाद्या प्रसंगाबद्दल मुलांना सांगून तुम्ही नैतिक मूल्यांबद्दल चर्चा सुरू करू शकता. जसं की, द्वेषामुळे गुन्हा घडल्याच्या बातमीचा उल्लेख करून तुम्ही म्हणू शकता: “किती वाईट ना! लोक रागामुळे कायकाय करतात. हे लोक असं का करतात? तुला काय वाटतं?”
“जर चांगलं आणि वाईट यांतला फरक मुलांना माहीत नसेल, तर योग्य निवड करणं मुलांना खूप कठीण जातं.”—ब्रॅन्डन.
मुलांना इतरांची काळजी करायला शिकवा. लहान मुलंसुद्धा ‘प्लीज’ आणि ‘थँक्यू’ म्हणायला शिकू शकतात. पॅरेन्टींग विथाउट बॉर्डर्स या पुस्तकात म्हटलं आहे: “मुलांना जेव्हा कळतं की आपण एकटं नाही, तर एका मोठ्या संस्थेचा जसं कुटुंब, शाळा, समाज यांचा भाग आहोत, तेव्हा ते फक्त स्वतःचा नाही तर इतरांच्या फायद्याचा विचार करायला तयार असतात.”
सल्ला: इतरांची सेवा करण्याचं महत्त्व मुलांनी शिकावं यासाठी त्यांना घरातली काही कामं नेमून द्या.
“आतापासून मुलांना काम करण्याची सवय लागली तर पुढे जाऊन जेव्हा ते वेगळे राहतील तेव्हा त्यांना कामाचं दडपण येणार नाही. जबाबदारी पूर्ण करण्याची त्यांना सवय असेल.”—तारा.