पालकांसाठी
५: संवाद
याचा काय अर्थ होतो?
तुम्ही आणि तुमची मुलं जेव्हा एकमेकांसोबत बोलून आपआपले विचार आणि भावना व्यक्त करता तेव्हा खऱ्या अर्थाने संवाद साधला जातो.
हे का महत्त्वाचं?
खासकरून किशोरवयीन किंवा तरुण मुलांसोबत संवाद साधणं कठीण जाऊ शकतं. काही वर्षांआधी तुम्ही सहज आपल्या मुलांच्या मनाचं दार उघडून आत जाऊ शकत होता. पण आता मात्र तुम्ही दाराबाहेरच उभे राहता. कधीकधी तर अनेकदा ठोठावूनही ते दार उघडत नाही. मुलांना तुमच्याशी बोलायची इच्छा नाही असं जरी वाटत असलं, तरी त्या वेळी तुम्ही त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे.
तुम्ही काय करू शकता?
तुमच्या मुलाला जेव्हा बोलावसं वाटतं तेव्हा तयार असा. तुम्हाला कदाचित रात्री उशीरा त्यांना वेळ द्यावा लागला तरी त्यांचं बोलणं ऐकून घ्या.
“तुम्हाला कदाचित असं बोलावसं वाटेल, ‘मी तुझ्यासोबत दिवसभर होतो आणि तुला आता सुचलं बोलायला!’ पण जर आपल्या मुलांना मन मोकळं करावसं वाटत असेल तर आपण तक्रार करूच शकत नाही. खरंतर आपल्या मुलांनी आपल्याशी मनमोकळेपणाने बोलावं हीच तर प्रत्येक पालकाची इच्छा असते. नाही का?”—लीना.
“मला माझी झोप खूप प्रिय आहे. पण माझ्या तरुण मुलांशी जे सर्वात चांगले संवाद झालेत, त्यातले बरेच मध्यरात्रीनंतर झाले होते.”—हेनरी.
बायबल तत्त्व: “प्रत्येकाने केवळ स्वतःचे नाही, तर दुसऱ्याचे हित पाहावे.”—१ करिंथकर १०:२४.
विचलित होऊ नका. एक पिता म्हणतो: “माझी मुलं माझ्याशी बोलतात तेव्हा मी ऐकत तर असतो, पण त्या वेळी माझ्या मनात बऱ्याच गोष्टी चाललेल्या असतात. आणि ही गोष्ट माझ्या मुलांच्या लक्षात येते. मी त्यांना फसवू शकत नाही!”
जर तुमच्याबाबतीतही हेच होत असेल तर तुमचं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी म्हणजे टीव्ही, मोबाईल बंद करा. तुमचं मूल तुमच्याशी काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे त्याकडे लक्ष द्या. तुम्हाला त्याचं बोलणं क्षुल्लक वाटत असलं, तरी तुम्ही त्याचं लक्षपूर्वक ऐका व त्याचं बोलणं खूप महत्त्वाचं आहे याची त्याला जाणीव करून द्या.
“मुलांच्या भावना आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत अशी खात्री त्यांना पटली पाहिजे. जर त्यांना तसं वाटलं नाही, तर ते आपल्या भावना मनातच दाबून ठेवतील किंवा दुसऱ्या कोणाकडे तरी मदतीसाठी पाहतील.”—मेरी.
“आपलं मूल चुकीचा विचार करतंय असं जरी वाटलं तरी लगेच चिडू नका.”—ॲन्थनी.
बायबल तत्त्व: “तुम्ही कशा प्रकारे ऐकता याकडे लक्ष द्या.”—लूक ८:१८.
संधी शोधा. कधीकधी मुलं आपल्या आईवडिलांशी समोरासमोर बसून नाही, तर सोबत मिळून काम करताना मनमोकळेपणाने बोलतात.
“आम्ही कारमध्ये प्रवास करतो तेव्हा आमचा संवाद खूप चांगला होतो. समोरासमोर बसण्याऐवजी बाजूला बसून बोलल्याने आमची चर्चा खूप चांगली होते.”—निकोल.
एकत्र जेवताना मनमोकळेपणाने बोलण्याची चांगली संधी मिळते.
“रात्री एकत्र जेवताना आम्ही सर्व जण दिवसभरातला सर्वात चांगला आणि वाईट अनुभव सांगतो. यामुळे आम्हाला एकमेकांच्या खूप जवळ असल्यासारखं वाटतं आणि समस्यांना तोंड देताना आपण एकटं नाही अशी खात्री आम्हा प्रत्येकाला मिळते.”—रॉबीन.
बायबल तत्त्व: “प्रत्येकाने ऐकण्यास उत्सुक व बोलण्यात संयमी असावे.”—याकोब १:१९.