व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इतिहासाच्या खजिन्यातून

अल्हॅझेन

अल्हॅझेन

तुम्ही कदाचित अबू अली अल-हसन इब्न अल-हैथम यांच्याबद्दल ऐकलं नसावं. पाश्‍चात्य देशात त्यांना अल्हॅझेन या नावाने ओळखलं जातं. अल-हसन या त्यांच्या अरबी नावाचं अल्हॅझेन हे लॅटिन स्वरूप आहे. पण तुम्ही जरी त्यांना ओळखत नसाल, तरी त्यांच्या कामगिरीमुळे तुम्हाला फायदा होत आहे यात काहीच शंका नाही. अल्हॅझेन यांना “विज्ञानाच्या इतिहासातल्या महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली व्यक्‍तींपैकी एक असल्याचं” मानलं जातं.

जवळपास इ.स. ९६५ साली, बसरा इथे अल्हॅझेन यांचा जन्म झाला. बसरा हे ठिकाण आज इराकमध्ये आहे. खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, औषध, संगीत, प्रकाशशास्त्र, भौतिकशास्त्र आणि कविता या विषयांमध्ये त्यांना आवड होती. पण त्यांनी केलेल्या कोणत्या खास कामासाठी आपण त्यांचे आभार मानले पाहिजे?

नाईल नदीवर धरण

अल्हॅझेन यांच्याबद्दल खूप वर्षांपासून एक कहाणी प्रसिद्ध आहे. ही कहाणी नाईल नदीच्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्याच्या त्यांच्या योजनेबद्दलची आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे १९०२ मध्ये आस्वान इथे नाईल नदीवर धरण बांधण्यात आलं, याच्या १,००० वर्षांआधीच अल्हॅझेन यांनी याबद्दल विचार केला होता.

त्याचं झालं असं, की नाईल नदीवर धरण बांधून इजिप्तमधले पूर-दुष्काळाचे चक्र थांबवायचे अशी महत्त्वाकांक्षी योजना अल्हॅझेन यांची होती. कायरोचा शासक म्हणजे खलीफा अल-हाकिम याला जेव्हा याबद्दल कळलं, तेव्हा त्याने अल्हॅझेन यांना धरण बांधण्यासाठी इजिप्तला बोलवलं. पण जेव्हा अल्हॅझेन यांनी प्रत्यक्ष ती नदी पाहिली, तेव्हा त्यांना जाणवलं की हा प्रकल्प बांधणं खरंतर आपल्याला शक्य नाही. पण आपण माघार घेतली तर अस्थिर मनाचा हा कुप्रसिद्ध शासक आपल्याला शिक्षा करणार याची भीती अल्हॅझेन यांना होती. त्यामुळे त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी वेड्याचे सोंग घेतले. पुढे १०२१ मध्ये खलीफाचा मृत्यू झाला तोपर्यंत म्हणजे जवळपास ११ वर्षं, अल्हॅझेन यांनी वेड्याचे सोंग घेतले. या सबंध काळादरम्यान अल्हॅझेन नजरकैदेत होते आणि त्यांच्याकडे बराच फावला वेळ होता. तो वेळ त्यांनी आपल्या आवडीच्या विषयांवर अभ्यास करण्यासाठी घालवला.

बुक ऑफ ऑपटिक्स

शेवटी अल्हॅझेन यांची सुटका झाली. तोपर्यंत त्यांनी बुक ऑफ ऑपटिक्स या सात खंडांच्या पुस्तकाचा बहुतेक भाग लिहून पूर्ण केला होता. या पुस्तकाला आज “भौतिकशास्त्राच्या इतिहासातल्या पुस्तकांपैकी एक अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक” असल्याचं मानलं जातं. या पुस्तकात त्यांनी अनेक विषयांवर केलेल्या प्रयोगांची माहिती दिली आहे. जसं की, प्रकाशाचा गुणधर्म, प्रकाशाचं त्याच्या रंगात होणारं विभाजन, आरशावर पडल्यावर प्रकाशाचं परावर्तित होणं आणि एका माध्यमातून दुसऱ्‍या माध्यमात जाताना प्रकाशाचं वळण घेणं. तसंच, त्यांनी डोळ्यांची रचना आणि कार्यपद्धती याविषयावरही अभ्यास केला.

१३ व्या शतकापर्यंत अल्हॅझेन यांच्या अरबी पुस्तकाचं लॅटिनमध्ये भाषांतर करण्यात आलं. त्यानंतर कित्येक शतकांपर्यंत युरोपच्या विद्वानांनी त्यांच्या लिखाणाला एक महत्त्वपूर्ण पुस्तक म्हणून मानलं आणि अनेक वेळा त्याचा आधार घेतला. भिंगाच्या गुणधर्माबद्दल अल्हॅझेन यांच्या लिखाणामुळे युरोपमधल्या चष्मा बनवणाऱ्‍यांना खूप मदत झाली. त्याचा आधार घेऊन त्यांनी एकासमोर एक अशी भिंग धरून दुर्बीण आणि सूक्ष्मदर्शिका यांचा शोध लावला.

कॅमेरा ऑब्स्‌क्युरा

नोंद केलेला पहिला कॅमेरा ऑब्सक्युरा अल्हॅझेन यांनी बनवला. त्यांनी बनवलेल्या कॅमेरा ऑब्स्‌क्युराच्या तत्त्वांवर आजची फोटोग्राफी आधारलेली आहे. त्यांच्या या प्रयोगात एका “काळोख्या खोलीचा” समावेश होता. त्या खोलीत एका बारीक भोकातून प्रकाश आत यायचा आणि यामुळे बाहेर असलेला देखावा खोलीच्या आतल्या भिंतीवर उलटा दिसायचा.

अल्हॅझेन यांनी बनवलेला कॅमेरा ऑब्सक्युरा. हा जगातला पहिला कॅमेरा ऑब्सक्युरा असावा

१९ व्या शतकात या कॅमेरा ऑब्स्‌क्युरामध्ये फोटोग्राफिक प्लेट्‌स लावण्यात आल्या. त्यामुळे चित्र कायमस्वरूपी टिपून घ्यायला मदत झाली. आणि शोध लागला तो कॅमेराचा. कॅमेरा ऑब्स्‌क्युराच्या तत्त्वांवरच आधुनिक कॅमेरे चालतात. आणि खरंतर आपल्या डोळ्यांची कार्यपद्धतीही त्याच तत्त्वांवर आधारलेली आहे. *

वैज्ञानिक पद्धत

अल्हॅझेन यांच्या कामाची उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, नैसर्गिक प्रक्रियांचे दक्षतेने आणि व्यवस्थित रीतीने केलेले संशोधन. त्या काळात अशा पद्धतीने काम करणारं कोणीच नव्हतं. सर्वात आधी सिद्धांताचा प्रयोग करून परीक्षण करणाऱ्‍यांपैकी एक अल्हॅझेन होते. प्रख्यात किंवा मान्य असलेली गोष्ट पुराव्यांवर आधारित नसायची, तेव्हा त्या गोष्टींबाबत प्रश्‍न विचारायला अल्हॅझेन घाबरले नाहीत.

आधुनिक विज्ञान म्हणजे काय हे जर थोडक्यात समजवायचं असेल, तर असं म्हणता येईल: “तुम्ही जो विश्‍वास करता, तो सिद्ध करून दाखवा!” काही जण अल्हॅझेन यांना “आधुनिक विज्ञानाच्या पद्धतींचे पिता म्हणतात.” आणि याच गोष्टीसाठी आपण त्यांचे खूप आभार मानले पाहिजेत. ▪

^ परि. 13 कॅमेरा ऑब्स्‌क्युरा आणि डोळ्यांमधलं साम्य पाश्‍चात्य लोकांना समजलं नव्हतं. मग १७ व्या शतकात योहानेस केप्लर यांनी त्याबद्दल समजावलं.