अभ्यास लेख ४३
फक्त यहोवाचीच उपासना करा!
“तू केवळ तुझा देव यहोवा याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच पवित्र सेवा कर.”—मत्त. ४:१०.
गीत ७ ख्रिस्ती समर्पण
सारांश *
१. आपण फक्त यहोवाचीच उपासना का केली पाहिजे?
यहोवाने आपल्याला घडवलं आहे आणि जीवन दिलं आहे म्हणून आपण फक्त त्याचीच उपासना केली पाहिजे. (प्रकटी. ४:११) हे जरी खरं असलं तरी एक धोका आहे. आपल्या मनात यहोवाबद्दल प्रेम आणि आदर असला तरी आपण फक्त त्याचीच उपासना करण्यापासून चुकू शकतो. हे कसं होऊ शकतं हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. पण सर्वात आधी आपण पाहू या की फक्त यहोवाचीच उपासना करण्याचा काय अर्थ होतो.
२. मत्तय ४:१० या वचनानुसार फक्त यहोवाचीच उपासना करण्यात काय सामील आहे?
२ बायबलनुसार यहोवाला समर्पित असणं म्हणजे त्याच्याबद्दल मनात सखोल प्रेम असणं. आणि यहोवावर मनापासून प्रेम करणं म्हणजे फक्त त्याचीच उपासना करणं. यामुळे आपण कोणत्याही व्यक्तीला किंवा गोष्टीला यहोवाची जागा घेऊ देणार नाही.—मत्तय ४:१० वाचा.
३. यहोवावर असलेलं आपलं प्रेम आंधळं नाही असं का म्हणता येईल?
३ यहोवावर असलेलं आपलं प्रेम आंधळं नाही. असं का? कारण आपण यहोवाबद्दल अनेक गोष्टी शिकून घेतल्या आहेत. त्याचे सुंदर गुण आपल्याला खूप आवडतात. यहोवाला कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या नाही हे आपल्याला माहीत आहे आणि त्यांबद्दल आपल्यालाही त्याच्यासारखंच वाटतं. यहोवाचा मानवांसाठी असलेला उद्देश आपल्याला माहीत आहे आणि आपण त्याच्या स्तरांनुसार जीवन जगतो. त्याने आपल्याला त्याच्याशी मैत्री करण्याची संधी दिली आहे आणि हा आपल्यासाठी खूप मोठा बहुमान आहे. (स्तो. २५:१४) आपल्या सृष्टिकर्त्याबद्दल शिकत असलेल्या प्रत्येक गोष्टीमुळे आपण त्याच्या आणखी जवळ येतो.—याको. ४:८.
४. (क) आपलं यहोवावरचं प्रेम कमी व्हावं यासाठी सैतान कशाचा उपयोग करतो? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
४ सैतानाचं या जगाच्या व्यवस्थेवर नियंत्रण आहे. या जगातल्या गोष्टींचा वापर तो मानवांना फसवण्यासाठी करतो. ते कसं? मानवांच्या नैसर्गिक इच्छा आणि शारीरिक कमतरता यांना लक्षात ठेवून तो आपल्याला मोहात पाडण्याचा व भुलवण्याचा प्रयत्न करतो. (इफिस. २:१-३; १ योहा. ५:१९) त्याची इच्छा आहे की आपण इतर गोष्टींवर प्रेम करावं. आणि असं झालं तर आपल्याला फक्त यहोवाचीच उपासना करणं शक्य होणार नाही. कोणत्या दोन मार्गांनी तो असं करू शकतो याबद्दल आता आपण चर्चा करू या. पहिला मार्ग म्हणजे, तो आपल्याला पैसा आणि भौतिक गोष्टींच्या मागे लागण्यासाठी प्रवृत्त करतो आणि दुसरा म्हणजे, तो आपल्यावर चुकीचं मनोरंजन निवडण्याचा दबाव टाकतो.
पैशाच्या लोभापासून सावध राहा!
५. आपण पैशावर प्रेम करण्यापासून सावध का राहिलं पाहिजे?
५ आपल्या सर्वांनाच वाटतं की आपल्याजवळ पुरेसं अन्न, चांगले कपडे आणि राहायला चांगलं घर असावं. असं असलं तरी आपण पैशाच्या लोभापासून सावध राहण्याची गरज आहे. सैतानाच्या जगाचा भाग असणारे बरेच लोक “पैशावर प्रेम करणारे” आणि पैशामुळे ज्या गोष्टी विकत घेता येतात त्यावर प्रेम करणारे आहेत. (२ तीम. ३:२) येशूला माहीत होतं की त्याच्या शिष्यांनासुद्धा पैशावर प्रेम करण्याचा मोह होऊ शकतो. त्याने म्हटलं: “कोणीही दोन मालकांची सेवा करू शकत नाही; कारण तो एकतर एका मालकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्यावर प्रेम करेल; किंवा एका मालकाशी एकनिष्ठ राहून दुसऱ्याला तुच्छ लेखेल. तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.” (मत्त. ६:२४) एक व्यक्ती यहोवाची उपासना करण्यासोबतच आपला जास्त वेळ आणि ताकद श्रीमंत बनण्यात घालवत असेल, तर एका अर्थी ती दोन मालकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असेल. म्हणजेच, ती व्यक्ती ‘फक्त यहोवाचीच उपासना’ करत नसेल.
६. येशूने लावदिकीया मंडळीला म्हटलेल्या शब्दांवरून आपण काय शिकू शकतो?
६ पहिल्या शतकाच्या शेवटी-शेवटी लावदिकीया शहरातल्या मंडळीतले भाऊबहीण स्वतःबद्दल असं म्हणू लागले की “मी श्रीमंत आहे आणि मी धनसंपत्ती मिळवली आहे आणि मला कशाचीही गरज नाही.” पण यहोवाने आणि येशूने त्यांच्याबद्दल म्हटलं की “तू दुःखी, दयनीय, दरिद्री, आंधळा आणि उघडावाघडा आहेस.” ते श्रीमंत होते म्हणून येशूने त्यांना ताडन दिलं नाही, तर पैशावरच्या प्रेमामुळे यहोवासोबतचं त्यांचं नातं बिघडत चाललं होतं म्हणून त्यांना ताडन दिलं. (प्रकटी. ३:१४-१७) आपल्या मनात पैशाबद्दल प्रेम असल्याचं आपल्याला जाणवत असेल तर आपण लगेच आपली विचारसरणी सुधारली पाहिजे. (१ तीम. ६:७, ८) आपण जर असं केलं नाही तर आपण यहोवासोबतच इतर गोष्टींवरही प्रेम करू लागू आणि मग यहोवा आपली उपासना स्वीकारणार नाही. आपण “पूर्ण मनाने” फक्त यहोवाचीच उपासना करावी अशी अपेक्षा तो आपल्याकडून करतो. (मार्क १२:३०) पण पैसा आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचा कसा होऊ शकतो?
७-९. डेवीड नावाच्या वडिलांच्या अनुभवावरून आपल्याला काय शिकायला मिळतं?
७ अमेरिकेत राहणाऱ्या मंडळीतल्या एका वडिलाचा विचार करा. त्याचं नाव आहे डेवीड. तो म्हणतो की तो त्याच्या नोकरीच्या ठिकाणी खूप मेहनत घेतो. तो ज्या कंपनीत काम करत होता तिथेच त्याला प्रमोशनही मिळालं. तसंच, त्याच्या देशात तो आपल्या कामासाठी नावाजलेला होता. डेवीड म्हणतो, “एक वेळ अशी होती जेव्हा मला वाटायचं की माझ्यावर यहोवाचा आशीर्वाद असल्यामुळे मला एवढं यश मिळालं आहे.” पण असं खरंच होतं का?
८ डेवीडला लवकरच जाणीव झाली की त्याच्या कामामुळे यहोवासोबतचं त्याचं नातं धोक्यात येऊ लागलं आहे. तो म्हणतो, “मंडळीच्या सभांमध्ये, एवढंच काय तर प्रचारकार्यातसुद्धा मी माझ्या कामावरच्या समस्यांबद्दल विचार करायचो. हे खरं आहे की मी खूप पैसा कमवत होतो, पण यामुळे माझा ताण वाढत चालला होता आणि माझ्या वैवाहिक जीवनातही बऱ्याच समस्या निर्माण झाल्या होत्या.”
९ आपल्या जीवनात कोणती गोष्ट महत्त्वाची आहे हे डेवीडला ठरवायचं होतं. तो म्हणतो, “मग एक वेळ अशी आली की मी ठाम निर्णय घेतला की आता मी बिघडलेली परिस्थिती सुधारणार.” आपल्या नोकरीला तो जितका वेळ देत होता त्यात त्याने बदल करायचं ठरवलं. आणि म्हणून तो त्याच्या मालकाशी बोलला. त्याचा परिणाम असा झाला की डेवीडला कामावरून काढून टाकण्यात आलं. मग त्याने काय केलं? तो म्हणतो, “कामावरून काढून टाकण्याच्या दुसऱ्याच दिवशी मी नियमितपणे सहायक पायनियरिंग करण्यासाठी अर्ज भरला.” दररोजचा खर्च भागवण्यासाठी तो आणि त्याची पत्नी मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये साफसफाईचं काम करू लागले. याच्या काही काळानंतर डेवीडने आणि पुढे जाऊन त्याच्या पत्नीने रेग्युलर पायनियरिंग सुरू केली. या जोडप्याने मत्त. ६:३१-३३.
दररोजचा खर्च भागवण्यासाठी अशी नोकरी करायचं ठरवलं ज्याला लोक कमी दर्जाचं समजतात; पण ते काम त्यांच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं नव्हतं. त्यांना आता खूप कमी पगार मिळतो; त्यांना आता जितका पगार मिळतो त्याच्या दहापट पगार आधी मिळायचा. पण प्रत्येक महिन्याला त्यांच्या गरजा भागतील एवढे पैसे त्यांच्याकडे असतात. खरंतर त्यांना यहोवाला त्यांच्या जीवनात पहिलं स्थान द्यायचं आहे. त्यांना स्वतःच्या अनुभवातून शिकायला मिळालं की जे लोक राज्याशी संबंधित गोष्टींना जीवनात पहिलं स्थान देतात त्यांची यहोवा काळजी घेतो.—१०. आपण आपल्या मनाचं रक्षण कसं करू शकतो?
१० आपल्याकडे जास्त पैसे असो किंवा कमी, आपण आपल्या मनाचं रक्षण केलं पाहिजे. हे आपण कसं करू शकतो? भौतिक गोष्टींबद्दल प्रेम विकसित न करण्याद्वारे. यहोवाच्या सेवेपेक्षा तुमच्या नोकरीला किंवा कामाला महत्त्वाचं स्थान देऊ नका. तुमच्या बाबतीत हे घडत आहे हे तुम्हाला कसं कळू शकतं? स्वतःला पुढे दिलेले प्रश्न विचारा: ‘मी सभांमध्ये किंवा प्रचारात असताना सतत माझ्या कामाबद्दल विचार करतो का? भविष्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे असावेत या विचारामुळे मी सतत चिंता करत बसतो का? पैसा आणि भौतिक गोष्टींमुळे माझ्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होत आहेत का? यहोवाची सेवा जास्तीत जास्त करण्यासाठी मी कमी दर्जाचं समजलं जाणारं काम करायला तयार आहे का?’ (१ तीम. ६:९-१२) या प्रश्नांवर विचार करत असताना हे लक्षात असू द्या की यहोवा तुमच्यावर प्रेम करतो आणि जे फक्त त्याचीच उपासना करतात त्यांना तो पुढे दिलेलं अभिवचन देतो: “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.” आणि म्हणूनच प्रेषित पौलने म्हटलं, की “आपली जीवनशैली पैशाच्या लोभापासून मुक्त ठेवा.”—इब्री १३:५, ६.
मनोरंजनाची निवड काळजीपूर्वक करा
११. मनोरंजनाचा एका व्यक्तीवर काय परिणाम होऊ शकतो?
११ आपण जीवनाचा आनंद घ्यावा अशी यहोवाची इच्छा आहे आणि मनोरंजनातून आपल्याला तो आनंद मिळू शकतो. खरंतर, देवाचं वचन सांगतं की “मनुष्याने खावे, प्यावे आणि आपल्या श्रमात आपल्या जिवाला सुख भोगू द्यावे यापेक्षा त्याला काही उत्तम नाही.” (उप. २:२४, पं.र.भा.) पण जगातल्या बहुतेक मनोरंजनाचा आपल्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारच्या मनोरंजनामुळे लोकांचे नैतिक स्तर ढासळत चालले आहेत. तसंच, यामुळे देवाचं वचन ज्या गोष्टींची निंदा करतं त्या गोष्टी फक्त चालवून घेण्याचंच नाही, तर त्यांवर प्रेम करण्याचाही बढावा मिळतो.
१२. १ करिंथकर १०:२१, २२ या वचनांनुसार आपण मनोरंजनाची निवड काळजीपूर्वक का केली पाहिजे?
१२ आपल्याला फक्त यहोवाचीच उपासना करण्याची इच्छा आहे आणि यामुळे आपण “यहोवाच्या मेजावरून” आणि “दुरात्म्यांच्याही मेजावरून” जेवू शकत नाही. (१ करिंथकर १०:२१, २२ वाचा.) एखाद्यासोबत जेवणं हे सहसा त्याच्यासोबत असलेल्या मैत्रीचं चिन्ह असतं. आपण हिंसा, भूताटकी, लैंगिक अनैतिकता किंवा इतर चुकीच्या इच्छांना व मनोवृत्तीला बढावा देणारं मनोरंजन निवडलं, तर एका अर्थी आपण देवाच्या शत्रूंनी तयार केलेलं जेवण त्यांच्यासोबत खात असू. यामुळे आपलं स्वतःचं नुकसान तर होतंच पण यहोवासोबत असलेली आपली मैत्रीही धोक्यात येते.
१३-१४. याकोब १:१४, १५ या वचनांनुसार आपण ज्या प्रकारचं मनोरंजन निवडतो त्याबद्दल आपल्याला सावध राहणं का गरजेचं आहे? उदाहरण द्या.
१३ मनोरंजन हे काही बाबतीत खरोखरच्या जेवणासारखं कसं असू शकतं? आपण काय खाणार ते आपण स्वतः ठरवू शकतो. पण अन्न पोटात गेल्यानंतर शरीरात आपोआपच एक प्रक्रिया सुरू होते आणि त्यावर आपला ताबा नसतो. सेवन केलेलं अन्न आपल्या शरीराचा भाग बनतं. पौष्टिक अन्न खाल्ल्यामुळे आपली तब्येत चांगली राहू शकते पण अरबट-चरबट, जंक फूड खाल्ल्यामुळे आपली तब्येत खराब होऊ शकते. आपल्या शरीरावर याचे परिणाम कदाचित एका रात्रीत दिसून येणार नाहीत पण ते कालांतराने दिसून येतीलच.
१४ त्याच प्रकारे मनोरंजन निवडताना कोणत्या गोष्टी आपल्या मनात जाव्यात हे आपण ठरवू शकतो. पण त्यानंतर आपोआपच एक प्रक्रिया सुरू होते आणि तिचा आपल्या भावनांवर आणि विचारांवर परिणाम होतो. चांगल्या मनोरंजनामुळे आपल्याला तजेला मिळू शकतो पण हानिकारक मनोरंजनामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. (याकोब १:१४, १५ वाचा.) वाईट मनोरंजनाचे परिणाम कदाचित लगेच दिसणार नाहीत पण कालांतराने ते दिसून येतीलच. त्यामुळे बायबल आपल्याला सावध करतं की “फसू नका: देवाची थट्टा केली जाऊ शकत नाही. कारण एखादा मनुष्य जे काही पेरतो, त्याचीच तो कापणीही करेल; जो शरीरासाठी पेरणी करतो, तो आपल्या शरीरापासून नाशाच्या पिकाची कापणी करेल; पण, जो आत्म्यासाठी पेरणी करतो, तो आत्म्यापासून सर्वकाळाच्या जीवनाची कापणी करेल.” (गलती. ६:७, ८) खरंच, यहोवा ज्या गोष्टींचा द्वेष करतो त्या गोष्टी असलेल्या सर्व मनोरंजनाला नकार देणं खूप महत्त्वाचं आहे!—स्तो. ९७:१०.
१५. आपल्या आनंदासाठी यहोवाने आपल्याला कोणती भेट दिली आहे?
१५ बऱ्याचशा यहोवाच्या साक्षीदारांना इंटरनेटवर JW ब्रॉडकास्टिंगवरचे कार्यक्रम बघायला आवडतं. मॅरलीन नावाच्या एका बहिणीने म्हटलं: “JW ब्रॉडकास्टिंगमुळे मला सकारात्मक विचार करायला मदत मिळाली आहे आणि त्यातले सगळेच कार्यक्रम चांगले असल्यामुळे मी काय पाहावं आणि काय पाहू नये हे मला ठरवावं लागत नाही. मी जेव्हा एकटी असते किंवा निराश होते तेव्हा मी प्रोत्साहन देणारी भाषणं किंवा सकाळच्या उपासनेचे कार्यक्रम बघते. यामुळे मला यहोवाच्या आणि त्याच्या संघटनेच्या आणखी जवळ आल्यासारखं वाटतं. JW ब्रॉडकास्टिंगच्या तरतुदीमुळे माझं संपूर्ण जीवन बदललं आहे.” तुम्हीही यहोवाने दिलेल्या या भेटीतून फायदा मिळवत आहात का? प्रत्येक महिन्याच्या नवीन कार्यक्रमासोबतच आपण JW ब्रॉडकास्टिंगवर बरेचसे ऑडिओ आणि व्हिडिओही पाहू शकतो. तसंच, त्यात प्रोत्साहन देणारी गाणीसुद्धा आहेत आणि ती तुम्ही कधीही बघू शकता किंवा ऐकू शकता.
१६-१७. मनोरंजनासाठी आपण जितका वेळ देतो त्याबद्दल सावध असणं का गरजेचं आहे आणि हे आपण कसं करू शकतो?
१६ मनोरंजन करताना आपण काय बघतो आणि त्यासाठी किती वेळ देतो याविषयी आपण सावध असलं पाहिजे. आपण जर असं केलं नाही तर यहोवाच्या सेवेपेक्षा मनोरंजनात आपला जास्त वेळ जाईल. काहींना मनोरंजनासाठी एक मर्यादित वेळ ठरवणं कठीण जातं. अठरा वर्षांची अबीगेल याबद्दल म्हणते: “दिवसभराच्या कामानंतर टिव्ही बघितला की माझा थकवा निघून जातो. पण जर मी सावध नसले तर माझे कितीतरी तास टिव्ही बघण्यात वाया जाऊ शकतात.” सॅम्यूएल नावाचा एक बांधव म्हणतो: “कधी कधी मी इंटरनेटवर बरेच छोटे-छोटे व्हिडिओ बघतो. सुरुवात एका व्हिडिओने होते पण नंतर मला कळतच नाही की कधी व्हिडिओ बघण्यात माझे तीन-चार तास गेले.”
१७ मनोरंजनासाठी किती वेळ द्यावा हे आपण कसं ठरवू शकतो? याचा एक मार्ग म्हणजे मनोरंजनासाठी आपण किती वेळ देत आहोत हे तपासून पाहणं. मनोरंजनामागे प्रत्येक आठवडी आपला किती वेळ जातो याची नोंद करून ठेवणं फायद्याचं ठरेल. टिव्ही बघण्यात, इंटरनेट वापरण्यात आणि मोबाईलवर व्हिडिओ गेम्स खेळण्यात किती तास जातात हे आपण कॅलेंडरवर लिहून ठेवू शकतो. खूप जास्त वेळ
जात असल्याचं आपल्याला जाणवलं तर आपण एक आराखडा बनवू शकतो. सर्वात आधी महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ ठरवा आणि मग त्यानंतर काही वेळ मनोरंजनासाठी द्या. मग ठरवल्याप्रमाणे आपल्याला काम करता यावं यासाठी यहोवाला प्रार्थना करा. असं केल्यामुळे तुमच्याकडे वैयक्तिक बायबल अभ्यास, कौटुंबिक उपासना, मंडळीच्या सभा आणि प्रचारासाठी जास्त वेळ आणि शक्ती असेल. तसंच त्यानंतर तुम्ही मनोरंजनासाठीही काही वेळ दिला म्हणून तुमचं मन तुम्हाला खाणार नाही.फक्त यहोवाचीच उपासना करत राहा
१८-१९. आपण फक्त यहोवाचीच उपासना करतो हे आपण कसं दाखवून देऊ शकतो?
१८ प्रेषित पेत्रने सैतानाच्या जगाच्या अंताबद्दल आणि नवीन जगाबद्दल सांगितल्यानंतर असं म्हटलं की “प्रिय बांधवांनो, या गोष्टींची वाट पाहत असताना, तुम्ही त्याला शेवटी निष्कलंक, निर्दोष व शांतीत असल्याचे आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा.” (२ पेत्र ३:१४) आपण जेव्हा या सल्ल्याचं पालन करून नैतिक आणि आध्यात्मिक रीत्या शुद्ध राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो, तेव्हा आपण दाखवून देतो की आपण फक्त यहोवाचीच उपासना करत आहोत.
१९ आपण यहोवाऐवजी इतर गोष्टींना जीवनात पहिलं स्थान द्यावं यासाठी सैतान आणि त्याचं जग आपल्यावर सतत दबाव टाकत राहील. (लूक ४:१३) पण आपल्याला कितीही समस्यांचा सामना करावा लागला, तरी आपण कोणत्याही व्यक्तीला किंवा गोष्टीला यहोवाची जागा घेऊ देणार नाही. आपण यहोवाला त्याच्या हक्काची गोष्ट देण्याचा निर्धार केला पाहिजे. आणि ती गोष्ट म्हणजे फक्त त्याचीच उपासना करणं!
गीत ५१ यहोवाला जडून राहू!
^ परि. 5 आपण आपलं जीवन यहोवाची सेवा करण्यासाठी समर्पित केलं आहे. पण आपण फक्त त्याचीच उपासना करत आहोत का? आपण जे निर्णय घेतो त्यावरून हे कळून येईल. आपण फक्त यहोवाचीच उपासना करत आहोत का हे जाणून घेण्यासाठी पैसा आणि मनोरंजन यांबाबतीत आपण कुठले निर्णय घेतो यांवर चर्चा करू या.
^ परि. 53 चित्रांचं वर्णन: एका घाणेरड्या किचनमध्ये बनवलेलं जेवण जेवायची आपली कधीच इच्छा होणार नाही. तर मग हिंसा, भुताटकी आणि अनैतिक गोष्टींनी भरलेलं मनोरंजन बघण्याची आपल्याला इच्छा व्हावी का?