व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विश्‍वास—आपल्याला बळ देणारा गुण

विश्‍वास—आपल्याला बळ देणारा गुण

विश्‍वास या गुणामध्ये जबरदस्त ताकद असते. उदाहरणार्थ, सैतान यहोवासोबत असलेलं आपलं नातं तोडू पाहतो, पण विश्‍वासामुळे आपण “त्या दुष्टाचे सर्व जळते बाण विझवू” शकतो. (इफिस. ६:१६) विश्‍वासामुळे आपल्याला डोंगरासारख्या मोठ्या समस्यांचा सामना करता येईल. येशूने त्याच्या शिष्यांना म्हटलं: “जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्‍वास असला, तर तुम्ही या डोंगराला ‘इथून तिथे जा’ असं म्हणाल आणि तो जाईल.” (मत्त. १७:२०) विश्‍वासामुळे यहोवासोबत असलेलं आपलं नातं मजबूत होऊ शकतं हे आपल्याला माहीत आहे. यामुळे आपण स्वतःला पुढे दिलेले प्रश्‍न विचारू शकतो: विश्‍वास म्हणजे काय? सत्याबद्दल असलेल्या आपल्या मनोवृत्तीचा आपल्या विश्‍वासावर कसा परिणाम होतो? आपण आपला विश्‍वास कसा मजबूत करू शकतो? आणि आपण कोणावर विश्‍वास ठेवला पाहिजे?—रोम. ४:३.

विश्‍वास म्हणजे काय?

विश्‍वास म्हणजे फक्‍त सत्यावर भरवसा ठेवणं किंवा ते मान्य करणं इतकंच नाही. कारण “दुरात्मेसुद्धा [देव अस्तित्वात आहे] असे मानतात आणि थरथर कापतात.” (याको. २:१९) मग विश्‍वास म्हणजे नेमकं काय?

आपल्याला भरवसा आहे की रात्र आणि दिवस नेहमी होणार, त्याचप्रमाणे बायबलमध्ये दिलेले देवाचे शब्द नक्कीच खरे ठरतील अशी खातरी आपण बाळगतो

बायबल आपल्याला विश्‍वासाच्या दोन पैलूंबद्दल सांगतं. पहिला म्हणजे, “विश्‍वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा” आहे. (इब्री ११:१क) जर आपल्यात विश्‍वास असेल तर आपण पक्का भरवसा ठेवू शकतो की यहोवा सांगत असलेल्या सर्व गोष्टी खऱ्‍या आहेत आणि त्या नक्कीच पूर्ण होतील. उदाहरणार्थ, यहोवाने इस्राएली लोकांना म्हटलं: “दिवस व रात्र यांविषयी जो माझा करार तो तुमच्याने मोडवेल, म्हणजे दिवसाचा व रात्रीचा जो नित्यक्रम तो नाहीसा होईल, तरच माझा सेवक दावीद याजशी केलेला माझा करार” मोडेल. (यिर्म. ३३:२०, २१) तुम्हाला कधी अशी भीती वाटली का, की सूर्य कधीच उगवणार आणि मावळणार नाही, म्हणजेच रात्र आणि दिवस कधीच होणार नाही? नक्कीच नाही! जर तुम्हाला अशी पक्की खातरी आहे की सूर्य दररोज उगवेल आणि मावळेल, तर मग निर्माणकर्त्याने सांगितलेल्या गोष्टी पूर्ण होणार यावर तुम्ही शंका घ्याल का? मुळीच नाही.—यश. ५५:१०, ११; मत्त. ५:१८.

दुसरा पैलू म्हणजे, विश्‍वास हा “न पाहिलेल्या खऱ्‍या गोष्टींचा खातरीलायक पुरावा आहे.” बायबल सांगतं की विश्‍वास हा आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्‍या पण खऱ्‍या असलेल्या गोष्टींचा “खातरीलायक पुरावा” आहे. (इब्री ११:१ख) पण ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्यावर आपण कसा काय भरवसा ठेवू शकतो? हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू या. समजा एका लहान मुलाने तुम्हाला विचारलं की ‘हवा तर दिसत नाही, मग तुम्हाला कसं माहीत की ती आहे?’ खरंतर आपण वारा कधी पाहिलेला नसतो. पण तरी आपण त्या लहान मुलाला वारा अस्तित्वात असल्याचे काही पुरावे देऊ शकतो. जसं की आपण श्‍वास घेतो, झाडांची पानं हलतात असं आपण त्याला सांगू शकतो. त्या मुलाला जेव्हा वारा अस्तित्वात असल्याची खातरी पटते, तेव्हा त्याला समजतं की दिसत नसलेल्या गोष्टी अस्तित्वात असणं शक्य आहे. त्याच प्रकारे, विश्‍वास हा ठोस पुराव्यांवर आधारलेला असतो.—रोम. १:२०.

विश्‍वासासाठी योग्य मनोवृत्ती गरजेची आहे

विश्‍वास हा पुराव्यांवर आधारलेला आहे आणि विश्‍वास असण्यासाठी “सत्याचे अचूक ज्ञान” असणं गरजेचं आहे. (१ तीम. २:४) पण ज्ञान असणंच पुरेसं नाही. प्रेषित पौलने म्हटलं की एक व्यक्‍ती “अंतःकरणात विश्‍वास” बाळगते. (रोम. १०:१०) एका व्यक्‍तीने फक्‍त सत्यावर विश्‍वास ठेवणं पुरेसं नाही तर त्याच्याबद्दल कदर बाळगणंही गरजेचं आहे. असं केल्यामुळेच ती व्यक्‍ती विश्‍वासानुसार कार्य करण्यासाठी प्रेरित होईल, म्हणजेच देवाच्या इच्छेप्रमाणे जगेल. (याको. २:२०) ज्या व्यक्‍तीला सत्याबद्दल मनापासून कदर नसते ती अगदी ठोस पुराव्यांनाही नाकारते, कारण तिला तिचे विश्‍वास बदलायचे नसतात किंवा तिला तिच्या मनाप्रमाणे वागायचं असतं. (२ पेत्र ३:३, ४; यहू. १८) म्हणून बायबलच्या काळात ज्या लोकांनी चमत्कार बघितले त्या सर्वांनीच विश्‍वास विकसित केला असं नाही. (गण. १४:११; योहा. १२:३७) देवाचा पवित्र आत्मा फक्‍त अशा लोकांना विश्‍वास विकसित करण्यासाठी मदत करतो ज्यांना खऱ्‍या गोष्टींवर प्रेम आहे.—गलती. ५:२२; २ थेस्सलनी. २:१०, ११.

दावीदने मजबूत विश्‍वास कसा विकसित केला?

मजबूत विश्‍वास विकसित करणाऱ्‍यांमध्ये दावीद राजाचं एक चांगलं उदाहरण आहे. (इब्री ११:३२, ३३) पण दावीदच्या कुटुंबातल्या सर्वांचाच विश्‍वास मजबूत होता असं नाही. उदाहरणार्थ, दावीदचा सर्वात मोठा भाऊ अलीयाब याचा विचार करा. गल्याथने जेव्हा इस्राएली लोकांना आव्हान दिलं तेव्हा दावीद खूप चिंतित झाला. दावीदच्या अशा वागण्यावरून अलीयाब त्याला रागावला. असं करण्याद्वारे त्याने यहोवावर विश्‍वास नसल्याचं दाखवून दिलं. (१ शमु. १७:२६-२८) विश्‍वास हा गुण आपल्यात जन्मतःच नसतो किंवा तो आपल्याला वारशाने मिळत नाही, तर तो आपल्याला विकसित करावा लागतो. यावरून स्पष्टच होतं की दावीदचं यहोवासोबत एक वैयक्‍तिक नातं असल्यामुळे तो विश्‍वास हा गुण विकसित करू शकला.

दावीद इतका मजबूत विश्‍वास कसा विकसित करू शकला हे आपल्याला स्तोत्र २७ मधून कळतं. (वचन १) दावीदने आपल्या अनुभवांवर आणि यहोवा त्याच्या शत्रूंसोबत कसा वागला यावर मनन केलं. (वचनं २, ३) त्याने यहोवाच्या उपासना करण्याच्या व्यवस्थेचा मनापासून आदर केला. (वचन ४) दावीदने इतर उपासकांसोबत मिळून निवासमंडपात यहोवाची उपासना केली. (वचन ६) त्याने प्रत्येक वेळी मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली. (वचनं ७, ८) दावीदला यहोवाच्या मार्गांबद्दल शिकून घेण्याची इच्छा होती. (वचन ११) विश्‍वास हा गुण दावीदसाठी खूप महत्त्वाचा होता म्हणून त्याने म्हटलं की “माझ्यात विश्‍वास नसता तर मी कुठे असतो?”—वचन १३, NW.

आपण विश्‍वास कसा मजबूत करू शकतो?

स्तोत्र २७ मध्ये सांगितल्यानुसार जर तुम्ही दावीदच्या मनोवृत्तीचं आणि चांगल्या सवयींचं अनुकरण केलं तर तुमच्यातही त्याच्यासारखा विश्‍वास उत्पन्‍न होईल. विश्‍वास हा अचूक ज्ञानावर आधारित असतो. तुम्ही जितकं जास्त बायबल आणि बायबल आधारित प्रकाशनांचा अभ्यास कराल तितकं जास्त तुम्हाला पवित्र आत्म्याच्या फळाचा हा पैलू विकसित करणं सोपं जाईल. (स्तो. १:२, ३) वैयक्‍तिक अभ्यास करताना मनन करण्यासाठी वेळ काढा. आपण मनन करण्यासाठी वेळ काढला तर यहोवाबद्दल आपल्या मनात असलेली कदर वाढेल. तुमच्या मनात यहोवाबद्दल असलेली कदर जसजशी वाढत जाईल तसतसं तुमचा विश्‍वास कार्यांतून दाखवण्याची तुमची इच्छा वाढत जाईल. यामुळे तुम्ही मंडळीच्या सभांमध्ये यहोवाची उपासना कराल आणि इतरांना तुमच्या आशेबद्दल सांगाल. (इब्री १०:२३-२५) तसंच, आपण सतत “प्रार्थना” करून आणि “धीर” धरून विश्‍वास असल्याचं दाखवू शकतो. (लूक १८:१-८) म्हणून, यहोवाला “प्रार्थना करत राहा” आणि “त्याला तुमची काळजी आहे” असा भरवसा बाळगा. (१ थेस्सलनी. ५:१७; १ पेत्र ५:७) विश्‍वास आपल्याला योग्य गोष्टी करण्यासाठी प्रेरित करतो आणि आपण जेव्हा योग्य गोष्टी करतो तेव्हा आपला विश्‍वास आणखी भक्कम होतो.—याको. २:२२.

येशूवर विश्‍वास ठेवा

येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने त्याच्या शिष्यांना म्हटलं: “देवावर विश्‍वास ठेवा आणि माझ्यावरही विश्‍वास ठेवा.” (योहा. १४:१) म्हणून आपण फक्‍त यहोवावर नाही तर येशूवरही विश्‍वास ठेवला पाहिजे. आपण येशूवर कसा विश्‍वास ठेवू शकतो? हे आपण तीन मार्गांनी करू शकतो.

येशूवर विश्‍वास ठेवण्याचा काय अर्थ होतो?

पहिला मार्ग म्हणजे, खंडणीला देवाकडून मिळालेली वैयक्‍तिक भेट समजणं. प्रेषित पौलने म्हटलं: “मी सध्या जगत आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्‍वासानेच जगत आहे, ज्याने माझ्यावर प्रेम केले आणि स्वतःला माझ्यासाठी अर्पण केले.” (गलती. २:२०) आपण जेव्हा येशूवर विश्‍वास ठेवतो तेव्हा आपल्याला खातरी पटते की खंडणी ‘माझ्यासाठी’ देण्यात आली आहे, खंडणीच्या आधारावर आपल्या पापांची माफी मिळते, आपल्याला सर्वकाळाच्या जीवनाची आशा मिळते आणि यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्याचा ठोस पुरावा मिळतो. (रोम. ८:३२, ३८, ३९; इफिस. १:७) खरंच, यामुळे आपल्याला नकारात्मक भावनांपासून दूर राहायला मदत होईल.—२ थेस्सलनी. २:१६, १७.

दुसरा मार्ग म्हणजे, येशूच्या बलिदानाच्या आधारावर यहोवाला प्रार्थना करून त्याच्यासोबत एक चांगलं नातं तयार करणं. खंडणीमुळे आपण यहोवासमोर “धैर्याने जाऊ, ज्यामुळे आपल्याला योग्य वेळी साहाय्य करण्यासाठी दया व अपार कृपा मिळेल.” (इब्री ४:१५, १६; १०:१९-२२) प्रार्थना केल्यामुळे मोहाचा प्रतिकार करण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होईल.—लूक २२:४०.

तिसरा मार्ग म्हणजे, येशूच्या आज्ञा पाळणं. प्रेषित योहानने लिहिलं: “जो पुत्रावर विश्‍वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन मिळतं; जो पुत्राच्या आज्ञा मोडतो त्याला जीवन मिळणार नाही, तर देवाचा क्रोध त्याच्यावर कायम राहील.” (योहा. ३:३६) हे लक्षात घ्या, की आज्ञा मोडणं हे विश्‍वास ठेवण्याच्या विरोधात आहे असं योहानने सांगितलं. म्हणून तुम्ही येशूच्या आज्ञांचं पालन केल्यावर तुमचा त्याच्यावर विश्‍वास असल्याचं दाखवता. तुम्ही येशूच्या शिकवणी आणि आज्ञा यांनुसार वागता तेव्हा तुम्ही “ख्रिस्ताचा नियम” पाळत असता. (गलती. ६:२) “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” यांच्याद्वारे येशू आपल्याला आध्यात्मिक अन्‍न पुरवतो. त्यांचं मार्गदर्शन स्वीकारल्यानेही तुम्ही येशूच्या आज्ञांचं पालन करता. (मत्त. २४:४५) येशूच्या आज्ञांचं पालन केल्यामुळे तुम्हाला वादळासारख्या समस्यांना तोंड देणं सोपं जाईल.—लूक ६:४७, ४८.

“तुम्ही आपला परमपवित्र विश्‍वास मजबूत करा”

एकदा एका माणसाने येशूला विनंती केली: “मला विश्‍वास आहे! तो आणखी दृढ करायला मला साहाय्य करा!” (मार्क ९:२४) त्या माणसाकडे विश्‍वास होता पण त्याने नम्रपणे कबूल केलं की त्याला आणखी विश्‍वासाची गरज आहे. या माणसाप्रमाणे आपल्यालाही जीवनात कधी न्‌ कधी जास्त विश्‍वासाची गरज पडेल. म्हणून आपल्याला आताच आपला विश्‍वास मजबूत करण्याची गरज आहे. आधी सांगितल्याप्रमाणे, बायबल वाचन आणि त्यावर मनन करून आपला विश्‍वास मजबूत होतो. यामुळे आपल्या मनात यहोवाबद्दल कदर वाढत जाईल. तसंच, भाऊबहिणींसोबत मिळून यहोवाची उपासना केल्याने, इतरांना आपल्या आशेबद्दल सांगितल्याने आणि सतत प्रार्थना केल्याने आपला विश्‍वास वाढत जाईल. त्यासोबतच, आपण आपला विश्‍वास मजबूत केला तर आपल्याला सर्वात मोठा आशीर्वाद मिळेल. बायबल याबद्दल म्हणतं: “माझ्या प्रिय बांधवांनो तुम्ही मात्र आपला परमपवित्र विश्‍वास मजबूत करा . . . देवाच्या प्रेमात टिकून राहा.”—यहू. २०, २१.