व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तो थकलेल्याला शक्‍ती देतो”

“तो थकलेल्याला शक्‍ती देतो”

२०१८ सालासाठी आपलं वार्षिक वचन: “जे यहोवाची प्रतीक्षा करतात ते आपली शक्‍ती नवी करतील.”—यश. ४०:३१. पं.र.भा.

गीत क्रमांक: २३, ५१

१. आपल्याला कोणत्या काही समस्यांचा सामना करावा लागतो? यहोवाला त्याच्या विश्‍वासू सेवकांबद्दल का आनंद होतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

या व्यवस्थेत जीवन जगणं कठीण आहे. उदाहरणार्थ, आपले बरेचसे बंधूभगिनी गंभीर आजारांचा सामना करत आहेत. तसंच, काही जण जे स्वतः वृद्ध झाले आहेत, त्यांना आपल्या वयस्क नातेवाइकांची काळजी घ्यावी लागत आहे. इतरही काही बंधूभगिनी आहेत, ज्यांना कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आम्हाला हेदेखील माहीत आहे, की तुमच्यापैकी अनेक जण वर दिलेल्या एका किंवा अनेक समस्यांचा एकाच वेळी सामना करत आहात. यात बराचसा वेळ, ताकद आणि पैसा खर्च होतो. पण यहोवा तुमची मदत करेल अशी तुम्हाला पक्की खात्री आहे. भविष्यात परिस्थिती सुधारेल यावरही तुमचा भरवसा आहे कारण तसं अभिवचन त्याने दिलं आहे. तुमचा हा विश्‍वास पाहून त्याला नक्कीच आनंद होत असेल!

२. यशया ४०:२९ या वचनातून आपल्याला कसं प्रोत्साहन मिळतं, पण आपल्याकडून कोणती गंभीर चूक होण्याची शक्यता आहे?

समस्यांचा सामना करणं खूपच कठीण आहे, असं तुम्हाला कधीकधी वाटतं का? पण फक्‍त तुम्हालाच समस्यांचा सामना करावा लागतो, असं नाही. प्राचीन काळात देवाच्या काही विश्‍वासू सेवकांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. (१ राजे १९:४; ईयो. ७:७) पण सहन करण्यासाठी त्यांना कुठून मदत मिळाली? यहोवावर विसंबून राहिल्यामुळे त्यांना सहन करण्याची शक्‍ती मिळाली. बायबल म्हणतं की देव “थकलेल्याला शक्‍ती देतो.” (यश. ४०:२९, पं.र.भा.) पण दुःखाची गोष्ट म्हणजे, आज देवाच्या काही विश्‍वासू सेवकांना वाटतं, की यहोवाची ‘सेवा थोड्या वेळासाठी थांबवणं’ हा जीवनातल्या दबावांचा सामना करण्याचा उत्तम मार्ग आहे. यहोवाची सेवा करणं आशीर्वाद नाही तर ओझं आहे, असं त्यांना वाटतं. त्यामुळे बायबलचं वाचन करणं, सभेला आणि प्रचाराला जाणं ते सोडून देतात. आणि त्यांनी असं करावं हीच तर सैतानाची इच्छा आहे.

३. (क) आपल्याला निर्बल करण्याच्या सैतानाच्या प्रयत्नांना आपण कसं रोखू शकतो? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

यहोवाच्या सेवकांनी निर्बल असावं, असं सैतानाला वाटतं. यहोवाच्या सेवेत व्यस्त राहिल्यामुळे आपण शक्‍तिशाली बनू, हे त्याला माहीत आहे. म्हणून तुम्ही शारीरिक आणि भावनिक रीत्या खचून जाता, तेव्हा यहोवापासून दूर जाऊ नका. उलट, त्याच्या जवळ जा. कारण “तो तुम्हाला दृढ करेल, तुम्हाला बळ देईल.” (१ पेत्र ५:१०; याको. ४:८) या लेखात आपण पाहणार आहोत, की यहोवाकडे आपल्याला शक्‍ती देण्याची क्षमता आहे हे समजण्यासाठी यशया ४०:२६-३१ ही वचनं, आपली कशी मदत करतात. तसंच, यहोवाची सेवा कमी करायला भाग पाडतील, अशा दोन परिस्थितींवरही आपण त्यानंतर चर्चा करू. त्यासोबतच आपण हेसुद्धा पाहू, की बायबलची तत्त्वं लागू केल्यामुळे आपल्याला टिकून राहायला कशी मदत होते.

जे यहोवाची प्रतीक्षा करतात ते आपली शक्‍ती नवी करतील

४. यशया ४०:२६ या वचनातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

यशया ४०:२६ वाचा. या विश्‍वात किती तारे आहेत, हे आजवर कोणीही मोजू शकलं नाही. वैज्ञानिकांच्या मते फक्‍त आपल्या आकाशगंगेतच जवळजवळ ४० हजार कोटी इतके तारे असावेत. पण तरीही यहोवाने प्रत्येक ताऱ्‍याला नाव दिलं आहे. यावरून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं? जर तो निर्जीव ताऱ्‍यांमध्ये वैयक्‍तिक आस्था दाखवतो, तर विचार करा त्याला तुमच्याबद्दल कसं वाटत असेल! यहोवाची सेवा केलीच पाहिजे म्हणून नाही, तर तुमचं त्याच्यावर प्रेम असल्यामुळे तुम्ही त्याची सेवा करता. (स्तो. १९:१, ३, १४) आपल्या प्रिय पित्याला तुमच्याबद्दल सर्वकाही माहीत आहे. बायबल म्हणतं, की त्याने “तुमच्या डोक्यावरचे सगळे केससुद्धा मोजलेले आहेत.” (मत्त. १०:३०) यहोवाने आपली “दैन्यावस्था पाहिली आहे” आणि आपल्या “जिवावरील संकटे” तो जाणतो ही गोष्ट आपल्याला माहीत असावी अशी त्याची इच्छा आहे. (स्तो. ३१:७) यावरून हे स्पष्टच आहे, की यहोवा तुमच्या सर्व समस्या जाणतो आणि त्या सहन करण्यासाठी तो प्रत्येकाला हवी असलेली शक्‍ती देतो.

५. यहोवा आपल्याला शक्‍ती पुरवू शकतो, हे आपण खात्रीने का म्हणू शकतो?

यशया ४०:२८ वाचा. यहोवा शक्‍तींचा स्त्रोत आहे. उदाहरणार्थ, सुर्याला तो किती उर्जा देतो याचा जरा विचार करा. विज्ञानाबद्दल लिहिणारे डेवीड बोडानीस म्हणतात, की अब्जावधी अणू बॉम्बच्या विस्फोटामुळे जेवढी उर्जा उत्पन्‍न होऊ शकते, तेवढी उर्जा प्रत्येक सेकंदाला सूर्य निर्माण करत असतो. दुसऱ्‍या एका संशोधकाने असं गणित मांडलं, की सूर्य एका सेकंदाला इतकी उर्जा उत्पन्‍न करतो की ती संपूर्ण जगातल्या लोकांना २,००,००० वर्षांसाठी पुरू शकते! यहोवा जर सुर्याला इतकी उर्जा देऊ शकतो, तर आपल्या समस्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्‍ती पुरवू शकत नाही का? नक्कीच पुरवू शकतो!

६. कोणत्या अर्थाने येशूचं जू वाहायला सोपं आहे आणि याचा आपल्यावर काय परिणाम होतो?

यशया ४०:२९ वाचा. यहोवाची सेवा केल्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळतो. येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं: “माझं जू आपल्या खांद्यावर घ्या.” त्याने पुढे म्हटलं: “तुमच्या जिवाला विश्रांती मिळेल. कारण माझं जू वाहायला सोपं व माझं ओझं हलकं आहे.” (मत्त. ११:२८-३०) ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे! कधीकधी आपल्याला प्रचाराला किंवा सभेला जाताना खूप थकल्यासारखं वाटतं. पण तिथून परत आल्यावर आपल्याला कसं वाटतं? आपला सगळा थकवा कुठल्या कुठे निघून गेलेला असतो आणि आपल्या समस्यांचा सामना करण्यासाठी आपण तयार असतो. खरंच, येशूचं जू वाहायला सोपं आहे!

७. मत्तय ११:२८-३० या वचनांची सत्यता पटवून देणारा अनुभव सांगा.

एका बहिणीच्या अनुभवाकडे लक्ष द्या. ती खूप वर्षांपासून आजारी आहे. तिला थकवा येतो, नैराश्‍य येतं आणि तिचं डोकंही खूप दुखतं. त्यामुळे सभांना जाणं तिला कधीकधी खूप कठीण वाटतं. पण एक दिवस मात्र ती खूप मेहनत घेऊन सभेला गेली. ती म्हणते: “सभेत निराशा याविषयावर भाषण देण्यात आलं. आपुलकीने आणि सहानुभूतीने दिलेल्या त्या भाषणामुळे माझे डोळे पाणावले. मला सभेला उपस्थित राहिलंच पाहिजे याची जाणीव मला झाली.” त्यादिवशी तिने सभेला उपस्थित राहण्यासाठी जी मेहनत घेतली, त्याबद्दल ती खूप खूश होती!

८, ९. “जेव्हा मी दुर्बळ असतो, तेव्हाच सामर्थ्यशाली होतो,” असं जेव्हा पौलने म्हटलं तेव्हा त्याचा काय अर्थ होता?

यशया ४०:३० वाचा. आपल्यात बरीच कौशल्यं असली, तरी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या शक्‍तीला मर्यादा आहे. प्रेषित पौलला बऱ्‍याच गोष्टी करणं शक्य होतं. पण त्याला ज्या गोष्टी करण्याची इच्छा होती, त्या सर्वच गोष्टी तो करू शकत नव्हता. त्याला याबद्दल कसं वाटलं हे जेव्हा त्याने यहोवाला सांगितलं, तेव्हा यहोवाने त्याला म्हटलं: “दुर्बलतेतच माझं सामर्थ्य परिपूर्ण होतं.” यहोवाने पौलला जे म्हटलं ते त्याला समजलं. म्हणूनच तो म्हणू शकला: “जेव्हा मी दुर्बळ असतो, तेव्हाच सामर्थ्यशाली होतो.” (२ करिंथ. १२:७-१०) पण, त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता?

पौलला जाणीव झाली, की तो स्वतःच्या बळावर सर्वकाही करू शकत नाही. त्याच्यापेक्षा जास्त शक्‍तिशाली असलेल्या व्यक्‍तीकडून मदत घेणं त्याला गरजेचं होतं. पौल कमजोर पडल्यावर देवाचा पवित्र आत्मा त्याला शक्‍ती देऊ शकत होता. इतकंच नाही, तर स्वतःच्या बळावर साध्य करू शकत नाही, अशा गोष्टी मिळवायलाही देवाचा आत्मा त्याला मदत करू शकत होता. आपल्याबाबतीतही हेच खरं आहे. यहोवा आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देतो, तेव्हा आपण शक्‍तिशाली बनतो!

१०. समस्येत टिकून राहण्यासाठी यहोवाने दावीदची मदत कशी केली?

१० देवाच्या पवित्र आत्म्याकडून शक्‍ती मिळाल्याचा अनुभव स्तोत्रकर्त्या दावीदला बऱ्‍याचदा आला होता. त्याने असं गीत गायलं: “तुझ्या साहाय्याने मी फौजेवर चाल करून धावत जातो, माझ्या देवाच्या साहाय्याने मी तट उडून जातो.” (स्तो. १८:२९) ज्या प्रकारे एखादी उंच भिंत ओलांडणं अशक्य असतं. त्या प्रकारेच कधीकधी आपल्यासमोर आलेल्या मोठ्या समस्या स्वतःहून सोडवणं आपल्याला अशक्य वाटू शकतं. म्हणून आपल्याला यहोवाची मदत लागते.

११. आपल्या समस्यांचा सामना करण्यासाठी पवित्र आत्मा कशी मदत करतो?

११ यशया ४०:३१ वाचा. * गरुड फक्‍त स्वतःच्या ताकदीवर हवेत उडत राहू शकत नाही. तर उष्ण हवेच्या शक्‍तीमुळे, तो आकाशात वर जातो. यामुळे दूरपर्यंत प्रवास करणं आणि आपली शक्‍ती वाचवणं त्याला शक्य होतं. म्हणून जेव्हा तुमच्यासमोर खूप मोठी समस्या येते, तेव्हा गरुडाचा विचार करा. यहोवाने “सहायक, अर्थात पवित्र आत्मा” याद्वारे तुम्हाला शक्‍ती द्यावी अशी विनवणी त्याच्याकडे करा. (योहा. १४:२६) दिवसातल्या २४ तासांमध्ये कधीही आपण यहोवाकडे त्याचा पवित्र आत्मा मागू शकतो. खासकरून, मंडळीतल्या एखाद्या बांधवाशी किंवा बहिणीशी मतभेद झाल्यावर आपल्याला यहोवाच्या मदतीची गरज पडू शकते. पण असे मतभेद का होतात?

यहोवाने योसेफची साथ सोडली नाही आणि तो तुम्हालाही सोडणार नाही (परिच्छेद १३ पाहा)

१२, १३. (क) ख्रिस्ती बांधवांमध्ये कधीकधी मतभेद का होतात? (ख) योसेफच्या जीवनात ज्या गोष्टी घडल्या त्यावरून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायलं मिळतं?

१२ आपण सर्व अपरिपूर्ण आहोत आणि त्यामुळे आपल्यात मतभेद होतात. कधीकधी आपल्याला दुसऱ्‍यांच्या वागण्या-बोलण्यामुळे किंवा दुसऱ्‍यांना आपल्यामुळे चीड येऊ शकते. ही आपल्यासाठी एक कठीण परीक्षा असू शकते. पण यामुळे यहोवाला एकनिष्ठ राहण्याची एक संधी आपल्याला मिळते. ती कशी? बंधुभगिनींसोबत एकत्र मिळून काम करायला आपण शिकतो. ते अपरिपूर्ण असले तरीही यहोवाचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि म्हणून आपलंसुद्धा त्यांच्यावर प्रेम असलं पाहिजे.

१३ यहोवा त्याच्या सेवकांवर येत असलेल्या परीक्षा थांबवत नाही. हे आपल्याला योसेफच्या जीवनात जे घडलं त्यावरून कळतं. योसेफ तरुण असताना त्याचे सावत्र भाऊ त्याच्यावर जळायचे. त्यांनी त्याला गुलाम म्हणून विकलं आणि त्याला इजिप्तला नेण्यात आलं. (उत्प. ३७:२८) यहोवा हे सर्व पाहत होता आणि त्याच्या मित्राला, विश्‍वासू सेवक योसेफला जी वाईट वागणूक मिळत होती, त्याबद्दल त्याला नक्कीच दुःख झालं असेल. असं असलं तरी, जे काही घडत होतं ते होण्यापासून यहोवाने थांबवलं नाही. पुढे, पोटीफरच्या पत्नीचा बलात्कार करण्याचा आरोप योसेफवर लावण्यात आला आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. पण तेव्हासुद्धा यहोवाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. मग याचा अर्थ देवाने योसेफला सोडून दिलं होतं का? नाही. बायबल म्हणतं: “परमेश्‍वर योसेफाबरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्‍वर यशस्वी करी.”—उत्प. ३९:२१-२३.

१४. राग सोडून दिल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात?

१४ दावीदच्या उदाहरणाचाही विचार करा. दावीदला जी वाईट वागणूक दिली तशी वागणूक कदाचितच कोणाला मिळाली असावी. पण देवाच्या या मित्राने, म्हणजे दावीदने मनात राग बाळगला नाही. त्याने लिहिलं: “राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर; जळफळू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ति होते.” (स्तो. ३७:८) सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्याला यहोवाचं अनुकरण करायचं आहे आणि त्यामुळे आपण राग “सोडून” दिला पाहिजे. “आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही,” तर आम्हाला क्षमा केली आहे. (स्तो. १०३:१०) राग सोडून देण्याचे इतर व्यावहारिक फायदेसुद्धा आहेत. उदाहरणार्थ, राग बाळगल्यामुळे उच्च रक्‍तदाब आणि श्‍वसन समस्या होऊ शकतात. तसंच, यकृत आणि स्वादुपिंड (पॅनक्रिया) या अवयवांनासुद्धा हानी होऊ शकते. त्यासोबतच, पचन क्रियाच्या समस्या उद्‌भवू शकतात. शिवाय जेव्हा आपल्याला राग येतो, तेव्हा आपण नीट विचार करू शकत नाही. आपण कदाचित असं काही बोलून जाऊ किंवा करू ज्यामुळे इतर जण दुखावले जातील आणि यामुळे आपल्याला दीर्घ काळासाठी नैराश्‍य येऊ शकतं. म्हणून आपण शांत राहिलेलंच उत्तम! बायबल म्हणतं: “शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे.” (नीति. १४:३०) मग इतरांनी आपल्या भावना दुखावल्या तर आपण काय करू शकतो आणि आपल्या बांधवासोबत शांती प्रस्थापित कशी करू शकतो? बायबलमध्ये दिलेल्या सुज्ञ सल्ल्याचं पालन करण्याद्वारे आपण असं करू शकतो.

आपण आपल्या बांधवांकडून दुखावले जातो तेव्हा . . .

१५, १६. आपल्याला कोणी दुखावल्यावर आपण काय केलं पाहिजे?

१५ इफिसकर ४:२६ वाचा. यहोवाची सेवा न करणाऱ्‍यांकडून आपण दुखावले जातो, तेव्हा आपल्याला त्याचं आश्‍चर्य वाटत नाही. पण एक ख्रिस्ती बांधव किंवा बहीण अथवा कुटुंबातले सदस्य आपल्याला दुःख होईल असं काहीतरी बोलतात किंवा करतात, तेव्हा आपल्याला खूप जास्त दुःख होतं. मग अशा वेळी जे घडलं ते आपल्याला सहजासहजी विसरणं कठीण जातं. मग त्याबद्दल आपण वर्षानुवर्षं आपल्या मनात राग बाळगत राहणार का? की लवकरात लवकर मतभेद सोडवण्यासाठी बायबलमधला सुज्ञ सल्ला स्वीकारणार? आपण त्या व्यक्‍तीशी बोलण्यासाठी जितका जास्त वेळ लावू, तितकं तिच्यासोबत शांती प्रस्थापित करणं आपल्याला कठीण जाईल.

१६ आपल्या बांधवाने आपल्याला दुखावलं आहे आणि तो विचार आपल्या मनातून जातच नसेल तर काय? शांती प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? पहिली गोष्ट, आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो. तुम्हाला त्या बांधवासोबत चांगला संवाद साधता यावा, यासाठी यहोवाकडे याचना करा. तुमचा बांधवसुद्धा यहोवाचा मित्र आहे, हे लक्षात असू द्या. (स्तो. २५:१४) देवाचं त्याच्यावर प्रेम आहे. यहोवा त्याच्या मित्रांशी दयाळूपणे वागतो आणि आपणही त्यांच्याशी तसंच वागावं अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. (नीति. १५:२३; मत्त. ७:१२; कलस्सै. ४:६) दुसरी गोष्ट, तुम्ही त्या बांधवाशी काय बोलणार आहात त्याचा काळजीपूर्वक विचार करा. असं गृहित धरू नका की आपल्याला दुखावण्याची त्याची इच्छा होती. कदाचित त्याच्याकडून चूक झाली असेल किंवा तुमचा गैरसमज झाला असेल. समस्येसाठी काही अंशी आपण जबाबदार आहोत हे कबूल करा. तुम्ही कदाचित चर्चेची सुरुवात असं म्हणून करू शकता: “कदाचित मीच जास्त मनाला लावून घेतली ती गोष्ट. पण काल जेव्हा तू माझ्याशी बोललास तेव्हा मला वाटलं की . . . ” या चर्चेमुळे तुमच्यात आणि बांधवात शांती प्रस्थापित झाली नाही, तरी प्रयत्न करण्याचं सोडू नका. आपल्या बांधवासाठी प्रार्थना करा. यहोवाने त्याला आशीर्वादित करावं आणि आपल्याला त्याच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत व्हावी यासाठी यहोवाकडे विनंती करा. तुमचा बांधव जो यहोवाचा एक मित्र आहे, त्याच्यासोबत तुम्ही शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहात, हे यहोवा पाहतो याची खात्री तुम्ही बाळगू शकता.

गतकाळातल्या गोष्टींमुळे दोषीपणाची भावना येते तेव्हा . . .

१७. यहोवा त्याच्यासोबत बिघडलेला नातेसंबंध सुधारण्यासाठी आपल्याला कशी मदत करतो आणि आपण त्याची मदत का स्वीकारावी?

१७ गंभीर पाप केल्यामुळे आता आपण यहोवाच्या सेवेच्या लायक नाही, असं काहींना वाटतं. दोषीपणाच्या भावनेमुळे आपली शांती, आनंद आणि शक्‍ती हिरावून जाते. दावीद राजाला दोषीपणाच्या भावनेशी लढावं लागलं आणि त्याने म्हटलं: “मी गप्प राहिलो होतो, तेव्हा सतत कण्हण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली; कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता.” पण आनंदाची गोष्ट म्हणजे, यहोवा त्याच्या सेवकांकडून जी अपेक्षा करतो ते करण्याचं धैर्य दावीदकडे होतं. “मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले” आणि “तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली,” असं त्याने म्हटलं. (स्तो. ३२:३-५) जर तुमच्या हातून गंभीर पाप झालं असेल, तर यहोवा तुम्हाला क्षमा करायला तयार आहे. त्याच्यासोबत बिघडलेला नातेसंबंध पुन्हा सुधारण्यासाठी तुम्हाला मदत करण्याची त्याची इच्छा आहे. पण यासाठी मंडळीतल्या वडिलांद्वारे तो जी मदत पुरवतो ती तुम्ही स्वीकारली पाहिजे. (नीति. २४:१६; याको. ५:१३-१५) म्हणून जास्त वेळ थांबून राहू नका! तुमचं सर्वकाळाचं जीवन त्यावर अवलंबून आहे. पण समजा पापाची माफी मिळाल्याच्या बऱ्‍याच काळानंतरही तुम्हाला दोषी असल्यासारखं वाटत असेल, तर तुम्ही काय करू शकता?

१८. आपण यहोवाच्या सेवेच्या लायक नाही असं समजणाऱ्‍यांना पौलच्या उदाहरणावरून कशी मदत मिळेल?

१८ पौलदेखील गतकाळात त्याच्या हातून घडलेल्या पापांबद्दल विचार करून कधीकधी निराश व्हायचा. त्याने म्हटलं: “प्रेषितांमध्ये माझी योग्यता सगळ्यात कमी आहे; इतकेच काय, तर प्रेषित म्हणवून घेण्याचीसुद्धा माझी लायकी नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला.” असं असलं तरी, पौलने पुढे म्हटलं: “मी जो काही आहे, तो देवाच्या अपार कृपेमुळेच आहे.(१ करिंथ. १५:९, १०) पौल अपरिपूर्ण आहे, हे यहोवाला माहीत होतं. पण तरीही यहोवाने त्याला स्वीकारलं होतं आणि ही गोष्ट त्याला माहीत असावी, याची यहोवाने खात्री करून घेतली. झालेल्या चुकीबद्दल तुम्हाला मनापासून दुःख आहे आणि त्याबद्दल तुम्ही यहोवाशी व गरज असल्यास वडिलांशीदेखील बोलला आहात, तर यहोवा तुम्हाला नक्की माफ करेल. यहोवाने तुम्हाला क्षमा केली आहे, याची खात्री बाळगा आणि ती स्वीकारा!—यश. ५५:६, ७.

१९. २०१८ सालचं वार्षिक वचन काय आहे आणि ते योग्य का आहे?

१९ जसजसं आपण या व्यवस्थेच्या अंताच्या आणखी जवळ जात आहोत, तसतसं समस्या वाढतील अशी अपेक्षा आपण करू शकतो. पण आपण लक्षात ठेवू शकतो, की यहोवाच असा आहे, जो “थकलेल्याला शक्‍ती देतो व अशक्‍ताचे बल वाढवतो.” तो तुम्हाला त्याची सेवा विश्‍वासूपणे करत राहण्यासाठी जे गरजेचं आहे ते पुरवतो. (यश. ४०:२९, पं.र.भा.; स्तो. ५५:२२; ६८:१९) २०१८ सालादरम्यान आपण जेव्हा जेव्हा राज्य सभागृहात हजर राहू आणि वार्षिक वचन पाहू, तेव्हा तेव्हा आपल्याला या महत्त्वपूर्ण सत्याची आठवण होत राहील, की “जे यहोवाची प्रतीक्षा करतात ते आपली शक्‍ती नवी करतील.”यश. ४०:३१, पं.र.भा.

^ परि. 11 यशया ४०:३१ (पं.र.भा.): “परंतु जे यहोवाची प्रतीक्षा करतात ते आपली शक्‍ती नवी करतील; ते गरुडासारखे पंखांनी वर जातील, ते धावतील तरी दमणार नाहीत; ते चालतील तरी थकणार नाहीत.”