यहोवाच्या न्यायीपणाचं आणि दयाळूपणाचं अनुकरण करा
“तुम्ही खरा न्याय करा, व एकमेकांस प्रेम व करुणा दाखवा.”—जख. ७:९.
१, २. (क) देवाचं नियमशास्त्र येशूला प्रिय होतं हे कसं दिसून येतं? (ख) शास्त्री आणि परूशी चुकीच्या पद्धतीने नियमशास्त्र कसं लागू करायचे?
देवाने मोशेद्वारे दिलेलं नियमशास्त्र येशूला प्रिय होतं, याचं आपल्याला आश्चर्य वाटत नाही. कारण, हे नियमशास्त्र येशूसाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तीकडून, त्याच्या स्वर्गीय पित्याकडून होतं. यहोवाकडून असलेल्या या नियमशास्त्रावर येशूचं किती प्रेम असेल हे स्तोत्र ४०:८ मध्ये आधीच सांगण्यात आलं होतं. त्यात म्हटलं आहे: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.” येशूने आपल्या वागण्या-बोलण्यातून दाखवून दिलं, की देवाचं नियमशास्त्र परिपूर्ण आणि लाभदायक आहे. तसंच, त्याने नियमशास्त्र पूर्णही केलं.—मत्त. ५:१७-१९.
२ शास्त्री आणि परूशी चुकीच्या पद्धतीनं नियमशास्त्र लागू करत आहेत हे पाहून येशूला नक्कीच दुःख झालं असेल. खरंतर, नियमशास्त्राचं पालन करणं कठीण आहे असं ते दाखवत होते. म्हणूनच येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही पुदिना, बडिशेप आणि जिरे यांचा दशांश देता, पण नियमशास्त्रातल्या जास्त महत्त्वाच्या गोष्टी, म्हणजेच न्याय, दया आणि विश्वासूपणा यांकडे तुम्ही दुर्लक्ष केलं आहे.” (मत्त. २३:२३) शास्त्री व परूशी नियमशास्त्रातल्या छोट्या-छोट्या गोष्टींचं अचूक पालन करत होते. पण महत्त्वाच्या गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष करत होते. नियम का दिले आहेत ही गोष्ट परूशी लोक समजून घेत नव्हते. ते स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजायचे. पण येशू मात्र त्यांच्यासारखा नव्हता. नियमशास्त्र का देण्यात आलं आहे आणि त्यातल्या प्रत्येक नियमातून यहोवाचे गुण कसे दिसून येतात हे त्याला माहीत होतं.
३. आपण या लेखात काय पाहणार आहोत?
३ मोशेचं नियमशास्त्र आज ख्रिश्चनांना लागू होत नाही. (रोम. ७:६) मग तरीही यहोवाने ते बायबलमध्ये का राहू दिलं आहे? कारण त्याची इच्छा आहे, की आपण “जास्त महत्त्वाच्या गोष्टी” म्हणजेच, या नियमांमागे जी तत्त्वं आहेत ती माहीत करून घ्यावीत. जसं की, शरणपुरांच्या व्यवस्थेवरून आपल्याला शिकायला मिळणारी तत्त्वं. शरणपुरात पळून जाणाऱ्या व्यक्तीनं कोणती पावलं उचलणं गरजेचं होतं हे आपण मागच्या लेखात पाहिलं, आणि त्यापासून काही महत्त्वाचे धडेसुद्धा आपण शिकलो. या लेखात आपण हे पाहणार आहोत, की शरणपुरांच्या व्यवस्थेवरून यहोवाबद्दल आणि त्याच्या गुणांचं अनुकरण करण्याबद्दल आपल्याला काय शिकता येईल. या लेखात आपण पुढील तीन प्रश्नांची उत्तरं पाहू: यहोवा दयाळू आहे हे शरणपुरांच्या व्यवस्थेवरून कसं दिसून येतं? जीवनाबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे? आणि या व्यवस्थेवरून यहोवाचा परिपूर्ण न्याय कसा दिसून येतो? या प्रश्नांची उत्तरं मिळवताना यहोवाचं अनुकरण कसं करता येईल याकडे लक्ष द्या.—इफिसकर ५:१ वाचा.
शरणपुरांच्या व्यवस्थेवरून यहोवाची दया दिसून येते
४, ५. (क) शरणपुरापर्यंत सहज पोहचता यावं म्हणून कोणती व्यवस्था करण्यात आली होती आणि का? (ख) या व्यवस्थेवरून यहोवाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं?
४ पळून जाणाऱ्या व्यक्तीला सहज पोहचता येईल अशा अंतरावर यहोवाने सहा शरणपुरांची व्यवस्था केली होती. यार्देन नदीच्या एका बाजूला तीन आणि दुसऱ्या बाजूला तीन अशी सहा नगरं निवडण्यासाठी यहोवाने सांगितलं होतं. ते का? कारण, त्यामुळे पळून जाणाऱ्या व्यक्तीला त्या शहरात लवकर व सहजपणे पोहचता येणार होतं. (गण. ३५:११-१४) शरणपुरांकडे जाणारे रस्ते सुव्यवस्थित होते. (अनु. १९:३) तसंच, पळून येणाऱ्या व्यक्तीला शरणपुर लगेच मिळावं म्हणून यहुदी लोक रस्त्यांवर काही पाट्यासुद्धा लावायचे. इस्राएलमध्ये असलेल्या शरणपुरांच्या व्यवस्थेमुळे, अजाणतेत खून केलेल्या एखाद्या इस्राएली व्यक्तीला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी परदेशात पळून जाण्याची गरज नव्हती. आणि यामुळे त्या व्यक्तीचा तिथल्या खोट्या दैवतांची उपासना करण्याच्या मोहापासून बचाव व्हायचा.
५ जरा विचार करा: खुनी व्यक्तीला मुत्युदंडाची शिक्षा देण्याची आज्ञा यहोवाने दिली होती. पण अजाणतेत जर एखाद्याच्या हातून कोणाचा खून झाला, तर त्या व्यक्तीला दया व करूणा दाखवली जाईल आणि तिचं संरक्षण होईल याचीही काळजी त्याने घेतली होती. एका बायबल विद्वानाने असं म्हटलं: “सगळं काही अगदी साध्या-सोप्या आणि स्पष्ट भाषेत सांगितलं होतं.” खरंच, यहोवा “अतिशय दयाळू” आहे; तो शिक्षा देण्याची संधी पाहणाऱ्या क्रूर न्यायाधीशासारखा नाही.—इफिस. २:४.
६. परूशी लोक यहोवाच्या दयेचं अनुकरण करायचे का? उदाहरण देऊन स्पष्ट करा.
६ परूशी लोक मात्र इतरांना दया दाखवायचे नाहीत. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने एकच चूक तीनपेक्षा जास्त वेळा केली, तर यहुदी रिवाजानुसार परूशी लोक त्या व्यक्तीला क्षमा करत नव्हते. त्यांची मनोवृत्ती किती चुकीची आहे हे दाखवण्यासाठी येशूने प्रार्थना करणाऱ्या जकातदाराचं आणि एका परूशाचं उदाहरण दिलं. प्रार्थनेत तो परूशी म्हणतो: “हे देवा, इतर लोक लुबाडणारे, अनीतिमान आणि व्यभिचारी आहेत. पण, मी त्यांच्यासारखा, किंवा या जकातदारासारखाही नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो.” या उदाहरणातून येशूला काय सांगायचं होतं? हेच की, परूशी लोक “इतरांना अगदीच तुच्छ लेखायचे” आणि त्यांना दया दाखवण्याची गरज नाही असं त्यांना वाटायचं.—७, ८. (क) तुम्ही यहोवाच्या दयेचं अनुकरण कसं करू शकता? (ख) क्षमा करण्यासाठी नम्र असणं गरजेचं का आहे?
७ परूश्यांचं नाही, तर यहोवाचं अनुकरण करा. दया व करूणा दाखवा. (कलस्सैकर ३:१३ वाचा.) इतरांना तुमची क्षमा मागणं सोपं जाईल असं वागा. (लूक १७:३, ४) स्वतःला विचारा: ‘इतरांनी मला अनेकदा नाराज केलं किंवा दुखावलं, तरी मी त्यांना लगेच माफ करतो का? त्यांच्याशी पुन्हा शांतीनं वागण्यासाठी मी लगेच तयार असतो का?
८ इतरांना क्षमा करण्यासाठी आपण नम्र असणं गरजेचं आहे. परूशी लोक असा विचार करायचे, की ते इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेत, आणि त्यामुळे ते क्षमा करायला तयार नसायचे. पण ख्रिश्चनांनी नम्रपणे “इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ” समजलं पाहिजे आणि त्यांना मनापासून माफ केलं पाहिजे. (फिलिप्पै. २:३) आपण स्वतःला विचारू शकतो: ‘नम्रता दाखवण्याच्या बाबतीत मी यहोवाचं अनुकरण करत आहे का?’ आपण नम्र असलो तर इतरांना आपल्याकडे क्षमा मागताना दडपण येणार नाही, आणि त्यांना क्षमा करणं आपल्यालाही सोपं जाईल. आपण दया दाखवण्यात तत्पर आणि राग दाखवण्यात धीमे असलं पाहिजे.—उप. ७:८, ९.
जीवनाबद्दल आदर दाखवा, म्हणजे “हत्येचा दोष” तुमच्यावर येणार नाही
९. जीवन पवित्र आहे हे समजण्यास यहोवाने इस्राएली लोकांना कशी मदत केली?
९ निर्दोष रक्त सांडल्यामुळे लागणाऱ्या हत्येच्या दोषापासून इस्राएली व्यक्तींचं संरक्षण व्हावं, हेसुद्धा शरणपुरांची व्यवस्था करण्यामागचं एक मुख्य कारण होतं. (अनु. १९:१०) यहोवाच्या नजरेत जीवन अमूल्य आहे आणि खून करणाऱ्यांचा तो द्वेष करतो. (नीति. ६:१६, १७) तो न्यायी व पवित्र असल्यामुळे खुनाकडे दुर्लक्ष करू शकत नाही; मग तो खून अजाणतेत झाला असला तरीही. अजाणतेत खून केलेल्या व्यक्तीला दया दाखवली जाऊ शकत होती, पण त्यासाठी तिने आधी वडिलांना स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं. खून अजाणतेत झाला आहे, असं जर वडिलांना आढळून आलं, तर पळून येणारी व्यक्ती शरणपुरात राहू शकत होती. पण त्या व्यक्तीला महायाजकाचा मृत्यू होईपर्यंत त्या नगरातच राहावं लागायचं. त्यासाठी तिला कदाचित आयुष्यभरसुद्धा शरणपुरात राहावं लागू शकत होतं. या व्यवस्थेमुळे, देवाच्या नजरेत जीवन पवित्र आहे ही गोष्ट सर्व इस्राएली लोकांना समजण्यास मदत झाली. इतरांच्या प्राणांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी होईल तितकी काळजी घ्यायची होती. असं करण्याद्वारे ते आपल्या जीवनदात्याला आदर दाखवू शकत होते.
१०. शास्त्री आणि परूशी यांना लोकांच्या जीवाची काळजी नव्हती हे येशूने कसं दाखवून दिलं?
१० यहोवाला इतरांच्या जीवनाबद्दल जशी काळजी होती, तशी शास्त्री आणि परूशी लोकांना नव्हती. त्यांना उद्देशून येशू म्हणाला: “तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली आहे. तुम्ही स्वतः आत गेला नाहीत, आणि ज्यांना जायचं आहे त्यांनाही तुम्ही लूक ११:५२) येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? लोकांना देवाचं वचन समजावून सांगणं आणि सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी त्यांची मदत करणं, हे काम शास्त्री आणि परूशी लोकांनी करायला हवं होतं. पण, ते मात्र ‘जीवनाचा अधिपती’ असलेल्या येशूचं अनुकरण करण्यापासून लोकांना अडवत होते. (प्रे. कार्ये ३:१५) असं करण्याद्वारे ते खरंतर लोकांना नाशाकडे नेत होते. शास्त्री आणि परूशी गर्विष्ठ आणि स्वार्थी होते, आणि लोकांच्या जीवाबद्दल त्यांना थोडीही कदर नव्हती. खरंच, किती निर्दयी व क्रूर होते ते!
जाऊ देत नाही!” (११. (क) जीवनाबद्दल आपला दृष्टिकोन यहोवासारखाच आहे हे प्रेषित पौलने कसं दाखवलं? (ख) आवेशानं प्रचारकार्य करण्याच्या बाबतीत पौलच्या मनोवृत्तीचं अनुकरण आपण कसं करू शकतो?
११ आपण यहोवाचं अनुकरण कसं करू शकतो, आणि शास्त्री व परूशी लोकांसारखं बनण्याचं कसं टाळू शकतो? जीवनाचा आदर करण्याद्वारे आणि ते मौल्यवान समजण्याद्वारे आपण असं करू शकतो. प्रेषित पौलनेसुद्धा हेच केलं. त्याने जास्तीत जास्त लोकांना राज्याचा संदेश सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच तो म्हणू शकला, की “मी सर्व लोकांच्या रक्ताविषयी निर्दोष आहे.” (प्रेषितांची कार्ये २०:२६, २७ वाचा.) यहोवानं आज्ञा दिली होती म्हणून किंवा स्वतःला दोषापासून मुक्त करावं म्हणून पौलने प्रचारकार्य केलं का? नाही. पौलचं लोकांवर मनापासून प्रेम होतं म्हणून त्याने प्रचारकार्य केलं. त्याच्या नजरेत लोकांचं जीवन अमूल्य होतं आणि त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळावं असं त्याला वाटत होतं. (१ करिंथ. ९:१९-२३) जीवनाकडे पाहण्याचा आपलाही दृष्टिकोन यहोवासारखाच असला पाहिजे. यहोवाची इच्छा आहे, की सर्वांनी पश्चात्ताप करावा म्हणजे त्यांना जीवन मिळेल. (२ पेत्र ३:९) यहोवाचं अनुकरण करण्यासाठी आपलं लोकांवर प्रेम असलं पाहिजे. आपण दयाळू असलो, तर प्रचारकार्यात आवेशानं सहभाग घेऊ आणि त्यामुळे आपल्याला नक्कीच आनंद मिळेल.
१२. देवाच्या लोकांसाठी सुरक्षिततेचे नियम इतके महत्त्वाचे का आहेत?
१२ जीवनाच्या बाबतीत यहोवासारखा दृष्टिकोन ठेवण्यासाठी आपण सुरक्षिततेबद्दल योग्य मनोवृत्ती बाळगली पाहिजे. काम करताना आणि गाडी चालवताना आपण सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. आपल्या उपासनेच्या ठिकाणांचं बांधकाम करताना, त्यांची दुरुस्ती करताना किंवा प्रवास करत असतानाही आपण काळजी घेतली पाहिजे. लोकांचं जीवन, आरोग्य आणि सुरक्षितता या गोष्टी, वेळ किंवा पैसा यांपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. यहोवा देव नेहमी योग्य तेच करतो, आणि आपल्यालाही त्याच्यासारखं होण्याची इच्छा आहे. खासकरून मंडळीतल्या वडिलांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेबद्दल दक्ष असलं पाहिजे. (नीति. २२:३) मंडळीच्या वडिलांनी जर तुम्हाला सुरक्षिततेच्या नियमांची किंवा तत्त्वांची आठवण करून दिली, तर त्यांचं ऐका. (गलती. ६:१) जीवनाप्रती यहोवासारखा दृष्टिकोन बाळगा म्हणजे “हत्येचा दोष” तुमच्यावर येणार नाही.
“न्याय या नियमांनुसार करावा”
१३, १४. इस्राएलमधले वडील यहोवाच्या न्यायीपणाचं अनुकरण कसं करू शकत होते?
१३ इस्राएलमधल्या वडिलांनी आपल्या न्यायीपणाचं अनुकरण करावं अशी आज्ञा यहोवाने त्यांना दिली होती. सर्वात आधी वडिलांनी वस्तुस्थिती लक्षात घ्यायची होती. मग खुनी व्यक्तीला दया दाखवावी की नाही, हे ठरवताना त्या व्यक्तीचा हेतू, मनोवृत्ती, आणि तिची पूर्वीची वागणूक लक्षात घेणं गरजेचं होतं. खुनी व्यक्तीचा मृत मनुष्यावर राग होता का, किंवा त्याला खरोखरच मारून टाकण्याचा तिचा हेतू होता का, या गोष्टींचा वडिलांनी शोध घ्यायचा होता. (गणना ३५:२०-२४ वाचा.) खून केलेल्या व्यक्तीने जाणूनबुजून खून केला आहे हे सिद्ध करण्यासाठी कमीतकमी दोन साक्षीदारांची गरज होती.—गण. ३५:३०.
१४ नेमकं काय घडलं होतं हे शोधून काढल्यानंतर वडिलांनी त्या व्यक्तीच्या केवळ कृत्याचाच नाही, तर त्या व्यक्तीचाही विचार करायचा होता. गुन्ह्याकडे फक्त वरवर न पाहता, नक्की गुन्हा का घडला आहे हे पाहण्यासाठी त्यांना समजबुद्धीची गरज होती. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यहोवासारखी समजबुद्धी, दया आणि करूणा दाखवण्यासाठी वडिलांना त्याच्या पवित्र आत्म्याची गरज होती.—निर्ग. ३४:६, ७.
१५. पापी लोकांकडे पाहण्याचा येशूचा दृष्टिकोन परूश्यांपेक्षा वेगळा कसा होता?
१५ परूशी लोक न्याय करताना दया दाखवत नव्हते. एखाद्या व्यक्तीने कोणता गुन्हा केला आहे त्याकडेच ते फक्त पाहायचे; ती व्यक्ती मुळात कशी आहे हे ते पाहायचे नाहीत. काही परूश्यांनी येशूला मत्तयच्या घरी जेवणासाठी आलेलं पाहून त्याच्या शिष्यांना म्हटलं: “तुमचा गुरू जकातदारांसोबत आणि पापी लोकांसोबत बसून कसा काय जेवतो?” यावर येशूने त्यांना उत्तर दिलं: “वैद्याची गरज निरोगी लोकांना नाही, तर आजारी मत्त. ९:९-१३) इथे येशू पापी लोकांची बाजू घेऊन बोलत होता का? नाही. खरंतर, त्यांनी पश्चात्ताप करावा अशी त्याची इच्छा होती आणि तेच तो शिकवायचाही. (मत्त. ४:१७) येशूला माहीत होतं, की पापी आणि जकातदार लोक मत्तयच्या घरी फक्त जेवायला आले नाहीत, तर त्यांच्यापैकी काहींची स्वतःला बदलण्याची इच्छाही आहे. खरंतर “त्यांच्यापैकी बरेच जण त्याचे शिष्य बनले होते.” (मार्क २:१५) पण दुःखाची गोष्ट म्हणजे, लोकांबद्दल असलेला परूश्यांचा दृष्टिकोन येशूसारखा नव्हता. लोक बदलू शकतात यावर परूश्यांचा विश्वास नव्हता. लोक पापी आहेत आणि त्यांना कोणतीही आशा नाही असं ते समजायचे. खरंच, लोकांकडे यहोवा ज्या न्यायीपणाच्या व दयेच्या नजरेनं पाहायचा त्यापेक्षा परूश्यांचा दृष्टिकोन किती वेगळा होता!
लोकांना असते. तर आता जा आणि ‘मला यज्ञ नको, दया हवी,’ याचा काय अर्थ होतो हे शिका. कारण मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना बोलवायला आलो आहे.” (१६. न्यायिक समितीने काय करणं गरजेचं आहे?
१६ यहोवाला “न्याय प्रिय” आहे आणि मंडळीतल्या वडिलांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे. (स्तो. ३७:२८) सर्वात आधी, पाप खरंच घडलं आहे का याची मंडळीतल्या वडिलांनी पूर्ण चौकशी करणं गरजेचं आहे. पाप जर खरंच घडलं असेल, तर त्याविषयी काय केलं पाहिजे हे ठरवताना त्यांनी बायबलमधली तत्त्वं आणि मार्गदर्शन लक्षात घेतलं पाहिजे. (अनु. १३:१२-१४) न्यायिक समितीमध्ये असलेल्या वडिलांनी, गंभीर गुन्हा केलेल्या व्यक्तीचा पश्चात्ताप खरा आहे की नाही याचं काळजीपूर्वक परीक्षण करणं गरजेचं आहे. असं करणं नेहमीच सोपं नसतं. पश्चात्ताप करण्यात, पाप केलेली व्यक्ती आपल्या पापाकडे कोणत्या दृष्टीनं पाहते आणि तिच्या मनात नक्की काय आहे हे समाविष्ट आहे. (प्रकटी. ३:३) आणि दया मिळवण्यासाठी पापी व्यक्तीने पश्चात्ताप करणं खूप आवश्यक आहे. *
१७, १८. एखाद्याने खरा पश्चात्ताप केला आहे हे वडील कसं ओळखू शकतात? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)
१७ एखादी व्यक्ती काय विचार करते हे यहोवा आणि येशूला माहीत असतं, कारण ते हृदय पाहू शकतात. पण मंडळीतले वडील असं करू शकत नाहीत. तुम्ही मंडळीत वडील म्हणून सेवा करत असाल, तर एखाद्याने मनापासून पश्चात्ताप केला आहे, हे तुम्ही कसं ओळखू शकता? सर्वात आधी बुद्धी आणि समंजसपणासाठी प्रार्थना करा. (१ राजे ३:९) दुसरी गोष्ट म्हणजे, ‘देवाच्या इच्छेनुसार असलेलं दुःख’ आणि ‘जगातल्या लोकांसारखं दुःख’ यातला फरक समजण्यासाठी, देवाच्या वचनाचा आणि विश्वासू दासाकडून मिळालेल्या मदतीचा वापर करा. (२ करिंथ. ७:१०, ११) बायबलमध्ये, पश्चात्ताप केलेल्या व्यक्तींची आणि पश्चात्ताप न केलेल्या व्यक्तींची काही उदाहरणं दिली आहेत, त्यांचा अभ्यास करा. त्यांच्या भावना काय होत्या, त्यांचे विचार काय होते, ते तसं का वागले याचं परीक्षण करा.
१८ तिसरी गोष्ट म्हणजे, एखाद्या व्यक्तीने केलेल्या केवळ पापाचा विचार करू नका, तर त्या व्यक्तीचाही विचार करा. ती अशी का वागली? तिने अमुक एक निर्णय का घेतला? तिच्यापुढे कोणती आव्हानं होती आणि तिच्या मर्यादा काय आहेत? अशा सगळ्या गोष्टींचा विचार करा. बायबलमध्ये सांगण्यात आलं आहे, की मंडळीचे मस्तक असलेला येशू पुढे काय करेल. त्यात म्हटलं आहे: “तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही. कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही, तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करेल, पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करेल.” (यश. ११:३, ४) वडिलांनो, मंडळीची काळजी घ्यावी म्हणून येशूने तुम्हाला नेमलं आहे. त्यामुळे योग्य न्याय करण्यासाठी आणि दया दाखवण्यासाठी तो नक्कीच तुम्हाला मदत करेल. (मत्त. १८:१८-२०) आज असे काळजी घेणारे वडील आपल्या मंडळीत आहेत, याबद्दल आपण खरंच किती कृतज्ञ आहोत! इतरांसोबत न्यायानं आणि दयेनं वागण्यासाठीही ते आपल्याला मदत करतात.
१९. शरणपुरांच्या व्यवस्थेवरून शिकलेल्या कोणत्या गोष्टी तुम्ही लागू कराल?
१९ मोशेचे नियमशास्त्र हे “ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप” आहे. ते आपल्याला यहोवाविषयी आणि त्याच्या तत्त्वांविषयी शिकवते. (रोम. २:२०) उदाहरणार्थ, नियमशास्त्रात सांगितलेली शरणपुरांची व्यवस्था वडिलांना “खरा न्याय” करायला शिकवते. तसंच, ती व्यवस्था आपल्या सर्वांनाच “प्रेम व करुणा” दाखवायला शिकवते. (जख. ७:९) आज आपण नियमशास्त्राच्या अधीन नाही. असं असलं, तरी यहोवा बदललेला नाही आणि न्याय व दया दाखवणं त्याच्यासाठी आजही तितकंच महत्त्वाचं आहे. अशा देवाची उपासना करणं खरंतर एक मोठा बहुमान आहे. तेव्हा, त्याच्या सुंदर गुणांचं आपण नेहमी अनुकरण करू आणि त्याचा आश्रय घेऊ!
^ परि. 16 १५ सप्टेंबर २००६ टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकातला “वाचकांचे प्रश्न” हा लेख पाहा.