जीवन कथा
यहोवाने मला कधीच निराश केलं नाही!
अॅडाल्फ हिटलरने भाषण दिल्यानंतर त्याला फुलं देण्यासाठी ज्या चार मुलींना निवडण्यात आलं होतं, त्या मुलींपैकी मी एक होते. मला का निवडण्यात आलं होतं? कारण माझे बाबा नात्झी पार्टीच्या कार्यांत अगदी सक्रिय होते आणि ते त्यांच्या स्थानीय शाखेतल्या प्रमुखासाठी गाडी चालवायचे. माझी आई मात्र कॅथलिक धर्म काटेकोरपणे पाळायची आणि तिची इच्छा होती की मी नन बनावं. दोन्ही गोष्टींचा माझ्यावर जबरदस्त प्रभाव असूनही मी नात्झीची सदस्यही नाही बनले आणि ननही बनले नाही. असं का बरं, याचं कारण मी तुम्हाला सांगते.
ऑस्ट्रिया देशातल्या ग्रात्स या ठिकाणी मी लहानाची मोठी झाले. मी सात वर्षांची झाल्यावर मला धार्मिक प्रक्षिणासाठी एका शाळेत पाठवण्यात आलं. पण तिथे पाळक आणि नन यांच्यातलं अनैतिक आचरण बघून मी पूर्णपणे हादरून गेले. म्हणून मग एका वर्षांतच माझ्या आईने मला त्या शाळेतून काढलं.
नंतर मला बोर्डिंग स्कूलमध्ये घालण्यात आलं. ग्रात्समध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ले होत असल्यामुळे, एका रात्री माझे वडील मला सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी तिथे आले. आम्ही स्क्लॅडमीन या शहरात आश्रय घेतला. तिथे पोहोचल्यानतंर आम्ही एक पूल ओलांडला आणि तो लगेचच बॉम्बने उडवण्यात आला. दुसऱ्या वेळी तर मी आणि माझी आजी अंगणात होतो, तेव्हा काही विमानांतून आमच्यावर गोळीबार करण्यात आला. युद्ध संपेपर्यंत मला असं जाणवलं, की सरकारने आणि चर्चनेही आम्हाला सोडून दिलं होतं.
कधीही आपल्याला निराश करणार नाही अशा व्यक्तीबद्दल शिकणं
१९५० साली यहोवाच्या साक्षीदारांमधल्या एका बहिणीने माझ्या आईला बायबलबद्दल सांगायला सुरुवात केली. मी त्यांची चर्चा ऐकायचे आणि आईसोबत काही वेळा सभांनाही जायचे. आईला जेव्हा खात्री पटली, की यहोवाचे साक्षीदार सत्य शिकवत आहेत तेव्हा १९५२ साली तिने बाप्तिस्मा घेतला.
त्या वेळी तिथली स्थानीय मंडळी मला वयस्कर स्त्रियांचं मंडळ वाटायची. नंतर आम्ही एका अशा मंडळीला भेट दिली जिथे बरेच तरुण होते. तेव्हा माझा गैरसमज दूर झाला की मंडळी म्हणजे वयस्कर स्त्रियांचं मंडळ नव्हे! ग्रात्सला परतल्यावर मी सर्व सभांना जाऊ लागले आणि मला पूर्णपणे खात्री पटली की मी जे काही शिकत आहे तेच सत्य आहे. तसंच, यहोवा देव आपल्या सेवकांना कधीही निराश करत नाही हेदेखील मला कळून आलं. जेव्हा आपल्याला वाटतं की या कठीण परिस्थितीचा एकट्याने सामना करणं आपल्या हाताबाहेर आहे, तेव्हाही तो आपल्याला सोडत नाही.—स्तो. ३:५, ६.
इतरांना सत्य सांगण्याची माझी इच्छा होती आणि याची सुरुवात मी माझ्या भावंडांपासून केली. माझ्या मोठ्या चार बहिणी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करायच्या. त्यासाठी त्यांनी आधीच घर सोडलं होतं. पण त्या ज्या वेगवेगळ्या गावात नोकरी करायच्या तिथे जाऊन मी त्यांची भेट घेतली
आणि त्यांना बायबल अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. शेवटी, माझ्या सगळ्या भावंडांनी बायबल अभ्यास सुरू केला आणि ते यहोवाचे साक्षीदार बनले.घरोघरचं सेवाकार्य सुरू केल्याच्या दुसऱ्या आठवडी माझी भेट तिशीतल्या एका स्त्रीशी झाली आणि तिच्यासोबत मी बायबल अभ्यास सुरू केला. तिने बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती केली आणि नंतर तिच्या पतीने व दोन मुलांनीही बाप्तिस्मा घेतला. त्या बायबल अभ्यासामुळे माझ्या आध्यात्मिकतेवर खोलवर परिणाम झाला. कारण, माझा आतापर्यंत कुणीही पद्धतशीरपणे बायबल अभ्यास घेतला नव्हता. त्यामुळे मला प्रत्येक धड्याची चांगली तयारी करावी लागायची. म्हणजेच, आधी मी स्वतःला शिकवायचे आणि त्यानंतर मग माझ्या विद्यार्थ्याला मला शिकवता यायचं. असं केल्यामुळे सत्यासाठी माझी कदर वाढू लागली. १९५४ च्या एप्रिल महिन्यात यहोवाला समर्पण करून मी बाप्तिस्मा घेतला.
“छळ होतो, पण आम्हाला एकटे सोडले जात नाही”
१९५५ साली जर्मनी, फ्रान्स आणि इंग्लंड या देशांत झालेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांना मी उपस्थित राहिले होते. लंडनमध्ये असताना माझी भेट अॅल्बर्ट श्रोडर यांच्याशी झाली. ते बायबल स्कूल ऑफ गिलियडचे प्रशिक्षक होते आणि नंतर ते नियमन मंडळाचे सदस्य बनले. एकदा ब्रिटिश संग्रहालयाला भेट देताना, बांधव अॅल्बर्ट श्रोडर यांनी बायबलची काही हस्तलिखिते आम्हाला दाखवली. त्या हस्तलिखितांमध्ये इब्री भाषेत देवाचं नाव लिहिलेलं होतं आणि त्यांनी देवाच्या नावाचं महत्त्व आम्हाला समजावून सांगितलं. ते ऐकल्यावर माझं यहोवावरचं प्रेम अधिक प्रबळ झालं आणि सत्याची आवडही आणखी वाढली. देवाच्या वचनातून सत्य इतरांना सांगण्याचा माझा निश्चय आधीपेक्षा जास्त दृढ झाला.
मी १ जानेवारी १९५६ पासून पायनियर सेवा सुरू केली. त्याच्या चार महिन्यांनंतर ऑस्ट्रियामध्ये खास पायनियर सेवा करण्याचं मला निमंत्रण मिळालं. त्या वेळी मी मिसलबॅक या ठिकाणी सेवा करायला जाणार होते. पण तिथे एकही साक्षीदार नव्हता. तिथे मला एका आव्हानाला तोंड द्यावं लागलं. ते म्हणजे, माझ्यात आणि माझ्या पायनियर सोबतीमध्ये असलेला मोठा फरक. मी शहरात वाढले होते आणि ती गावात. मी जवळपास १९ वर्षांची होते तर ती २५ वर्षांची. सकाळी उशिरापर्यंत झोपून राहणं मला आवडायचं. पण तिला मात्र लवकर उठायला आवडायचं. मी रात्री उशिरापर्यंत जागी असायचे. पण तिला लवकर झोपायची सवय होती. असे फरक असूनही आम्ही बायबल तत्त्वांचं पालन करून आमच्या समस्या सोडवल्या आणि आनंदाने एकत्र पायनियर सेवा केली.
खरंतर, आम्हाला आणखीनही काही आव्हानांचा सामना करावा लागला. आम्हाला छळाचाही सामना करावा लागला, तरीही यहोवाने “आम्हाला एकटे सोडले” नाही. (२ करिंथ. ४:७-९) एकदा, जेव्हा आम्ही एका गावात प्रचार करत होतो तेव्हा तिथल्या लोकांनी आमच्यावर कुत्रे सोडले. त्या मोठ्या कुत्र्यांनी आम्हाला घेरलं आणि ते दात विचकून भुंकू लागले. आम्ही एकमेकींचे हात घट्ट धरले. मी तर मोठ्याने यहोवाला प्रार्थनाही केली की “यहोवा प्लीज, कुत्र्यांनी आमच्यावर हल्ला केला तर लगेच आम्हाला मरण येऊ दे.” जेव्हा ती सर्व कुत्री एका हाताच्या अंतरावर आली, तेव्हा ती अचानक तिथेच थांबली आणि आपली शेपटी हालवू लागली. मग ती सर्व तिथून निघून गेली. आम्हाला जाणवलं की यहोवानेच आम्हाला वाचवलं. त्यानंतर आम्ही गावात सगळ्यांना प्रचार केला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तिथल्या लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. कुत्र्यांनी आम्हाला काहीच इजा केली नाही आणि अशा भयानक अनुभवातून आम्ही वाचलो हे पाहून कदाचित त्या लोकांना आश्चर्य वाटलं असावं. नंतर, त्यातले काहीजण साक्षीदार बनले.
आमच्यासोबत आणखीन एक भयानक घटना घडली. एक दिवस आमचा घरमालक दारू पिऊन घरी आला आणि आम्हाला ठार मारण्याबद्दल बोलू लागला. आम्ही शेजाऱ्या-पाजाऱ्यांना त्रास देत आहोत असं त्याचं म्हणणं होतं. त्याच्या पत्नीने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तो मात्र ऐकेना. वरच्या खोलीतून आम्ही हे सर्व
ऐकत होतो. आम्ही लगेच आतून दरवाजाला खुर्च्या लावून ठेवल्या आणि आपआपल्या बॅगा भरू लागलो. जेव्हा आम्ही दरवाजा उघडला तेव्हा घरमालक समोरच हातात मोठा चाकू घेऊन उभा असलेला आम्हाला दिसला. म्हणून मग आम्ही सर्व सामनासोबत मागच्या दरवाजातून बाहेर पडलो आणि बागेच्या वाटेतून पळून गेलो. आम्ही पुन्हा कधीही त्या ठिकाणी पाय ठेवला नाही.मग आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो आणि एक खोली घेतली. आम्ही तिथे जवळपास एक वर्ष राहिलो. पण यामुळे आम्हाला आमच्या प्रचारकार्यात मदतच झाली. ती कशी? कारण ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहात होतो ते शहराच्या अगदी मधोमध होतं आणि त्या भागात काही बायबल विद्यार्थ्यांना अभ्यास करायची इच्छा होती. त्यानंतर त्या हॉटेलमधल्या खोलीत आम्ही पुस्तक अभ्यास आणि टेहळणी बुरूज अभ्यास दर आठवडी घ्यायला लागलो. तिथे जवळपास १५ जण एकत्र जमायचे.
मिसलबॅक या ठिकाणी आम्ही एका वर्षांपेक्षा जास्त काळ राहिलो. नंतर माझी ग्रात्सच्या दक्षिण-पूर्वेला असलेल्या फेल्टबॅक या शहरात नेमणूक करण्यात आली. इथे माझ्यासोबत नवीन पायनियर सोबती होती. पण या ठिकाणीसुद्धा मंडळी नव्हती. आम्ही एका लाकडी घराच्या दुसऱ्या मजल्यावर लहानशा खोलीत राहायचो. तिथे लाकडाच्या फटींतून वारा आत यायचा आणि आम्ही त्या फटी कागदाने भरायचो. तसंच, आम्हाला विहिरीतून पाणी आणावं लागायचं. पण आमचे हे सर्व परिश्रम व्यर्थ गेले नाहीत. कारण काही महिन्यातच तिथे एक गट सुरू झाला आणि काही वेळाने आम्ही ज्या कुटुंबासोबत बायबल अभ्यास करत होतो त्यातल्या ३० सदस्यांनी सत्य स्वीकारलं.
अशा अनुभवांमुळे यहोवाबद्दल माझी कदर वाढली कारण जे राज्याच्या कार्यांना प्रथम स्थान देतात अशांना यहोवा कधीच निराश करत नाही. मानव कदाचित काही कारणांमुळे मदत पुरवू शकत नाही, पण यहोवा मात्र आपल्याला नक्कीच मदत पुरवू शकतो आणि त्यासाठी तो नेहमी तयार असतो.—स्तो. १२१:१-३.
देव “धार्मिकतेच्या उजव्या हाताने” मदत पुरवतो
१९५८ साली, न्यूयॉर्क शहरात यांकी स्टेडियम व पोलो ग्राउंड्स या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अधिवेशन होणार होतं. तिथे उपस्थित राहण्यासाठी मी अर्ज दिला होता. पण तेव्हा मला गिलियड प्रशालेच्या ३२ व्या वर्गासाठी उपस्थित राहायला आवडेल का, असं ऑस्ट्रिया शाखेने विचारलं. इतका मोठा बहुमान मी कसं नाकारू शकत होते? मी लगेच होकार दिला!
गिलियडच्या वर्गात, माझी बसण्याची जागा मार्टिन पोएटझिंगर यांच्या शेजारी होती. या बांधवाने नात्झी यातना शिबीरातल्या भयानक अनुभवांना तोंड दिलं होतं. नंतर त्यांनी नियमन मंडळाचे सदस्य या नात्याने सेवा केली. वर्ग सुरू असताना ते हळू आवाजात मला विचारायचे: “एरीका, जर्मनमध्ये याचा काय अर्थ होतो?”
प्रशालेचा अभ्यासक्रम अर्धा संपल्यावर बंधू नेथन नॉर यांनी आमच्या नेमणुकांबद्दल घोषणा केली. माझी नेमणूक पॅराग्वे या देशात करण्यात आली. माझं वय कमी असल्यामुळे त्या देशात जाण्यासाठी मला माझ्या बाबांची परवानगी घेणं गरजेचं होतं. परवानगी मिळाल्यानंतर १९५९ च्या मार्च महिन्यात मी पॅराग्वे या देशात पोहोचले. तिथे मला नवीन सोबतीबरोबर असंसियन या ठिकाणी मिशनरी गृहात नेमण्यात आलं.
काही काळातच, माझी भेट वॉल्टर ब्राइट याच्याशी झाला. त्याने गिलियड प्रशालेच्या ३० व्या वर्गामधून प्रशिक्षण घेतलं होतं आणि तो मिशनरी म्हणून सेवा करत होता. नंतर आमचं लग्न झालं आणि सोबत मिळून जीवनाच्या अनेक आव्हानांना तोंड देण्याची आमची तयारी होती. जेव्हा आमच्यासमोर कठीण समस्या असायच्या तेव्हा आम्ही नेहमी यशया ४१:१० या वचनामध्ये यहोवाने दिलेलं अभिवचन वाचायचो, जिथे म्हटलं आहे: “तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो.” या वचनातून आम्हाला आश्वासन मिळालं, की जो पर्यंत आम्ही देवाला विश्वासू राहण्याचा आणि त्याच्या राज्याला प्रथम स्थान देण्याचा प्रयत्न करत राहू, तोपर्यंत यहोवा आम्हाला कधीच निराश करणार नाही.
काही काळातच आमची नेमणूक एका अशा ठिकाणी करण्यात आली जी ब्राझीलच्या सीमेजवळ होती. तिथल्या एका पाळकाने काही तरुणांना आमच्या मिशनरी गृहावर दगडफेक करण्यासाठी चिथवलं. आधीच आमचं मिशनरी गृह चांगल्या स्थितीत नव्हतं. नंतर वॉल्टरने पोलिसांच्या एका मुख्य अधिकाऱ्यासोबत बायबल अभ्यास सुरू केला. त्या पोलीस अधिकाऱ्याने एका आठवड्यापर्यंत आमच्या गृहावर पहारा देण्यासाठी पोलिसांना नेमलं. त्यानंतर आम्हाला पुढे कधीच असा त्रास झाला नाही. त्यानंतर काही काळाने, ब्राझीलच्या सीमेच्या पलीकडे आम्हाला राहण्यासाठी चांगले क्वाटर्स मिळाले. हे आमच्यासाठी फायदेकारक ठरलं. कारण यामुळे आम्ही ब्राझील आणि पॅराग्वे या दोन्ही ठिकाणी सभा चालवू शकत होतो. आम्हाला दुसरी नेमणूक मिळाली तेव्हा तिथे दोन लहान मंडळ्या स्थापित झाल्या होत्या.
यहोवा माझा सांभाळ करत आहे
माझ्या डॉक्टरने सांगितलं होतं की मला मुलं होणार नाहीत. पण, १९६२ साली जेव्हा मला कळलं, की मी गरोदर आहे तेव्हा आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. शेवटी आम्ही वॉल्टरच्या कुटुंबाजवळ, फ्लोरिडा देशाच्या हॉलीवूड या शहरात स्थायिक झालो. बरीच वर्षं वॉल्टर आणि मी पायनियर सेवा करू शकलो नाही. कारण आमच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. तरीसुद्धा, राज्याच्या कार्याला प्रथम स्थान देण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत राहिलो.—मत्त. ६:३३.
१९६२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात आम्ही जेव्हा फ्लोरिडा शहरात पोहोचलो तेव्हा आम्हाला तिथे एक आश्चर्याची गोष्ट पाहायला मिळाली. तिकडच्या स्थानिक लोकांना काळ्या आणि गोऱ्या बांधवांनी सभांसाठी एकत्र येणं आवडत नव्हतं. यामुळे बांधव वेगवेगळ्या सभा चालवायचे आणि त्यांचं प्रचार कार्याचं क्षेत्रसुद्धा वेगळं होतं. पण यहोवा अशा प्रकारच्या वर्णभेदाला मान्यता देत नाही म्हणून काही काळातच वेगवेगळ्या वर्णाचे बांधव एकत्र मिळून सभा चालवू लागले. या प्रयत्नाला यहोवाचा पाठिंबा आहे हे स्पष्टपणे दिसून आलं. कारण आज तिथे अनेक मंडळ्या स्थापित झाल्या आहेत.
दुःखाची गोष्ट म्हणजे, २०१५ साली मेंदूच्या कॅन्सरमुळे वॉल्टरचा मृत्यू झाला. आमचं लग्न होऊन ५५ वर्षं झाली होती. तो खूप चांगला पती होता. त्याचं यहोवावर खूप प्रेम होतं आणि बऱ्याच बांधवांना त्याने मदत केली होती. मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे जेव्हा त्याला पुन्हा जिवंत केलं जाईल आणि त्याचं आरोग्य चांगलं असेल.—प्रे. कार्ये २४:१५.
मी ४० पेक्षा जास्त वर्षं पूर्णवेळेची सेवा करू शकले, याबद्दल मी यहोवाची खूप आभारी आहे. तसंच सेवा करत असताना, मी आनंदी होते आणि बरेच आशीर्वादही मला मिळाले. उदाहरणार्थ, आमच्या १३६ बायबल विद्यार्थ्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या प्रत्येक प्रसंगी वॉल्टर आणि मी तिथे उपस्थित राहू शकलो. शिवाय काही कठीण प्रसंगांचाही आम्हाला सामना करावा लागला. पण या प्रसंगांना आम्ही कधीच आपला विश्वासू देव यहोवा याची सेवा सोडण्याचं कारण बनू दिलं नाही. याउलट, आम्ही यहोवाच्या अगदी जवळ गेलो कारण तो योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने आमच्या समस्या दूर करेल याची आम्हाला खातरी होती.—२ तीम. ४:१६, १७.
मला वॉल्टरची खूप आठवण येते, पण पायनियर सेवेमुळे मला स्वतःला सावरायला मदत होते. तसंच, यामुळे इतरांना शिकवायला आणि खासकरून मृत लोकांना पुन्हा जिवंत करण्याच्या आशेबद्दल त्यांना सांगायला मला खूप मदत होते. खरंच, यहोवाने अनेक मार्गांनी माझी साथ दिली आहे, त्याने मला कधीच निराश केलं नाही. त्याने अभिवचन दिल्यानुसार मला सांभाळलं आहे, त्याने मला शक्ती दिली आहे आणि “आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने” मला सावरलं आहे.—यश. ४१:१०.