वाचकांचे प्रश्न
स्तोत्र १४४:१२-१५ ही वचनं देवाच्या लोकांना लागू होतात, की ११व्या वचनात सांगितलेल्या परक्या किंवा दुष्ट विदेशी लोकांना लागू होतात?
मूळ हिब्रू भाषेत जशी वाक्यरचना दिली आहे त्याचा एकच अर्थ आहे असं म्हणता येणार नाही. योग्य अर्थ समजण्यासाठी पुढील गोष्टींमुळे आपल्याला मदत होईल:
या स्तोत्रातले बाकीचे शब्द पडताळून पाहा. १२ ते १४ वचनांत ज्या आशीर्वादांबद्दल सांगितलं आहे, ते दुष्टांच्या हातून सोडवून मुक्त कर अशी विनंती करणाऱ्या नीतिमान लोकांना लागू होतात (वचन ११). हीच गोष्ट आपल्याला १५ व्या वचनातही पाहायला मिळते. या वचनात “धन्य” हा शब्द एकाच प्रकारच्या लोकांसाठी दोनदा वापरण्यात आला आहे; म्हणजेच, “ज्या लोकांचा देव” यहोवा आहे त्यांच्यासाठी.
बायबलच्या इतर अहवालांत विश्वासू सेवकांसाठी जी अभिवचनं दिली आहेत त्याच्याशी ही समज जुळते. या स्तोत्रात दावीदने देवावर असलेला आपला विश्वास स्पष्टपणे व्यक्त केला आहे. इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूंपासून मुक्त केल्यावर देव आपल्या लोकांना आशीर्वाद देईल आणि समृद्ध करेल अशी त्याला खात्री होती. (लेवी. २६:९, १०; अनु. ७:१३; स्तो. १२८:१-६) उदाहरणार्थ, अनुवाद २८:४ मध्ये म्हटलं आहे: “तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे यांचे वत्स आशीर्वादित होतील.” दावीदच्या मुलाच्या, म्हणजे शलमोनच्या शासनकाळात संपूर्ण राष्ट्रामध्ये कधी नव्हे इतकी भरभराट आणि शांती होती. त्याच्या शासनकाळावरून आपल्याला हेही कळतं की मसीहाच्या राज्यात काय होईल.—१ राजे ४:२०, २१; स्तो. ७२:१-२०.
शेवटी असं म्हणता येईल, की स्तोत्र १४४ मधली समज यहोवाच्या सेवकांसाठी असलेल्या आशेला आणखी स्पष्ट करते. ती म्हणजे, देव दुष्ट लोकांचा नाश करेल आणि त्यानंतर तो नीतिमान लोकांसाठी कायम टिकणारी शांती प्रस्थापित करेल व त्यांना समृद्ध करेल.—स्तो. ३७:१०, ११.