प्राचीन इस्राएलमधले लोक युद्ध लढले, मग आज आपण का नाही?
“फ्रान्स आणि इंग्लंडविरुद्ध तुम्ही लढायला तयार नसाल तर आताच्या आता मरायला तयार व्हा!” असं म्हणून एका नात्झी अधिकाऱ्याने यहोवाच्या साक्षीदारांच्या एका गटाला धमकावलं. जवळच शस्त्र घेतलेले नात्झी सैनिक उभे होते तरी आपल्या भावांपैकी एकही युद्धात भाग घ्यायला तयार झाला नाही. खरंच, त्यांच्या धैर्याला दाद द्यावी लागेल! यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपल्या सगळ्यांचाच युद्धाच्या बाबतीत असाच दृष्टीकोन आहे. या जगाच्या युद्धांमध्ये आपण कोणत्याही प्रकारे भाग घेत नाही. आपल्याला ठार मारायची धमकी दिली तरीसुद्धा जगाच्या कोणत्याही वादविवादांमध्ये आपण कोणाचीही बाजू घेत नाही.
स्वतःला ख्रिश्चन म्हणवणाऱ्या सगळ्यांनाच असं वाटत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं, की ख्रिश्चनांनीसुद्धा आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी युद्धात भाग घेतला पाहिजे. ते कदाचित असं म्हणतील: ‘प्राचीन इस्राएलमधले लोक हे देवाचे लोक होते तरी ते युद्ध लढले. मग आज ख्रिश्चन का नाही?’ तुम्ही या प्रश्नाचं काय उत्तर द्याल? तुम्हाला त्यांना हे समजावून सांगावं लागेल, की प्राचीन इस्राएलची जी परिस्थिती होती आणि आज देवाच्या लोकांची जी परिस्थिती आहे यात खूप मोठा फरक आहे. ते पाच फरक कोणते आहेत ते पाहू या.
१. देवाचे लोक एकाच राष्ट्राचा भाग होते
प्राचीन काळात यहोवाने एकाच राष्ट्राला आपले लोक म्हणून निवडलं होतं. ते राष्ट्र, इस्राएल राष्ट्र होतं. त्याने इस्राएली लोकांना “सर्व राष्ट्रांमधून माझी खास प्रजा” असं म्हटलं. (निर्ग. १९:५) त्याने या लोकांना राहण्यासाठी एक निश्चित क्षेत्र दिलं होतं. त्यामुळे जेव्हा यहोवा त्यांना इतर राष्ट्रांविरुद्ध लढण्याची आज्ञा द्यायचा, तेव्हा ते यहोवाच्या इतर उपासकांविरुद्ध लढत नव्हते. *
आज यहोवाचे खरे उपासक “सर्व राष्ट्रं, वंश, लोक आणि भाषा” यांतून आले आहेत. (प्रकटी. ७:९) आज देवाच्या लोकांनी जर युद्धात भाग घेतला तर त्यांना यहोवाच्या इतर उपासकांविरुद्ध लढावं लागेल किंवा त्यांना मारावं लागेल.
२. इस्राएली लोक यहोवाच्या आज्ञेवरून युद्ध लढायचे
प्राचीन काळात इस्राएली लोकांनी युद्ध का आणि केव्हा लढावं हे यहोवा ठरवायचा. उदाहरणार्थ, देवाने इस्राएली लोकांना लेवी. १८:२४, २५) इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात राहू लागल्यानंतर, दुष्ट शत्रूंपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी देवाने काही वेळा त्यांना युद्ध करायची परवानगी दिली होती. (२ शमु. ५:१७-२५) पण स्वतःच्या मनाने युद्ध करायचा निर्णय घ्यायची परवानगी यहोवाने त्यांना कधीच दिली नाही. आणि ज्या-ज्या वेळी त्यांनी असं केलं त्या-त्या वेळी त्यांना त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागले.—गण. १४:४१-४५; २ इति. ३५:२०-२४.
कनानी लोकांविरुद्ध लढायची आज्ञा दिली. त्याद्वारे देवाने आपला न्यायदंड त्यांच्यावर बजावला. कारण कनानी लोक भूतविद्या आणि घोर अनैतिक कामं करायचे तसंच मुलांचा बळी द्यायचे. देवाने इस्राएली लोकांना कनान देश द्यायचं वचन दिलं होतं. आणि म्हणून त्याने दुष्ट कनानी लोकांना तिथून घालवून देण्याची आज्ञा दिली होती. (आज यहोवा मानवांना एकमेकांविरुद्ध युद्ध करायची आज्ञा देत नाही. राष्ट्रं एकमेकांविरुद्ध देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही तर स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी लढतात. काही वेळा ते आपल्या देशाच्या सीमा वाढवण्यासाठी, आर्थिक फायद्यासाठी किंवा राजकीय मतभेदांमुळे एकमेकांशी लढतात. आणि काही जण देवाच्या नावाखाली धर्माचं रक्षण करण्यासाठी किंवा देवाच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी आपण युद्ध लढत आहोत असं म्हणतात. पण यहोवा आज नाही तर भविष्यात एका लढाईत म्हणजे हर्मगिदोनच्या युद्धामध्ये आपल्या शत्रूंचा नाश करेल आणि आपल्या खऱ्या उपासकांचं संरक्षण करेल. (प्रकटी. १६:१४, १६) या लढाईत देवाचे मानवी उपासक नाही तर त्याचं स्वर्गीय सैन्यं लढेल.—प्रकटी. १९:११-१५.
३. इस्राएली लोक यहोवावर विश्वास ठेवणाऱ्यांना दया दाखवायचे
प्राचीन काळात इस्राएली लोकांनी फक्त अशा लोकांना मारलं ज्यांना यहोवाने मृत्युदंडासाठी पात्र ठरवलं होतं. पण जे यहोवावर विश्वास ठेवायचे त्यांच्यावर इस्राएली सैन्य दया दाखवायचं. याची दोन उदाहरणं पाहू या. यहोवाने यरीहोचा नाश करायची आज्ञा दिली होती, पण राहाबने विश्वास ठेवल्यामुळे तिला आणि तिच्या कुटुंबाला मारण्यात आलं नाही. (यहो. २:९-१६; ६:१६, १७) नंतर गिबोनी लोकांनी जेव्हा देवाची भीती असल्याचं दाखवून दिलं, तेव्हा त्या संपूर्ण शहरावर दया करण्यात आली.—यहो. ९:३-९, १७-१९.
आज युद्ध लढणारे देश देवावर विश्वास ठेवणाऱ्यांना दया दाखवत नाहीत. तसंच, बऱ्याचदा या युद्धांमध्ये सर्वसामान्य नागरिकांनाही मारलं जातं.
४. युद्ध लढताना इस्राएली लोकांना देवाचे नियम पाळावे लागायचे
प्राचीन काळात इस्राएली लोकांना युद्ध लढताना देवाचे नियम पाळणं गरजेचं होतं. उदाहरणार्थ, काही वेळा देव इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूंसोबत “शांतीचा करार” करायला सांगायचा. (अनु. २०:१०) तसंच इस्राएली सैनिकांनी स्वतःला आणि त्यांच्या छावणीला स्वच्छ ठेवावं आणि नैतिक रीत्या शुद्ध राहावं अशी यहोवा अपेक्षा करायचा. (अनु. २३:९-१४) इस्राएलच्या आजूबाजूचे देश बऱ्याचदा एखाद्या राष्ट्राला हरवल्यानंतर तिथल्या स्त्रियांवर बलात्कार करायचे. पण यहोवाने इस्राएली लोकांना असं करण्याची मनाई केली होती. इतकंच काय तर एखाद्या शहरावर विजय मिळवल्यानंतर तिथून बंदी बनवून आणलेल्या स्त्रीसोबत लग्न करायचं असेल तर त्यांना एक महिना थांबावं लागायचं.—अनु. २१:१०-१३.
आज बऱ्याच देशांनी एकमेकांसोबत आंतरराष्ट्रीय करार केले आहेत आणि युद्ध करताना काही नियमांचं पालन करायचं ठरवलं आहे. हे नियम नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी बनवण्यात आले असले तरी दुःखाची गोष्ट म्हणजे, प्रत्यक्षात त्यांचं पालन केलं जात नाही.
५. यहोवा त्याच्या राष्ट्रासाठी लढला
प्राचीन काळात यहोवा इस्राएली लोकांच्या वतीने लढला आणि त्याने त्यांना कित्येक वेळा चमत्कारिक रितीने विजय मिळवून दिला. उदाहरणार्थ, यहोवाने इस्राएली लोकांना यरीहो शहरावर विजय मिळवायला कशी मदत केली याचा विचार करा. यहोवाने सांगितल्याप्रमाणे जेव्हा इस्राएली लोकांनी “रणशिंगांचा आवाज ऐकून घोषणा केली, त्याच वेळी शहराची भिंत कोसळून जमीनदोस्त झाली” आणि यामुळे शहरावर विजय मिळवणं त्यांना सोपं गेलं. (यहो. ६:२०) तसंच अमोरी लोकांविरुद्ध त्यांनी जी लढाई लढली त्याचाही विचार करा. “यहोवाने त्यांच्यावर मोठमोठ्या गारांचा पाऊस पाडला . . . . खरंतर इस्राएली सैनिकांनी तलवारीने जितक्या लोकांना मारून टाकलं, त्यापेक्षा कितीतरी जास्त लोक गारांमुळे मारले गेले.”—यहो. १०:६-११.
आज यहोवा जगातल्या कोणत्याही राष्ट्राच्या वतीने लढत नाही. त्याच्या राज्याचा राजा येशू आहे आणि हे राज्य “या जगाचं नाही.” (योहा. १८:३६) पण याउलट, सैतानाचा जगातल्या सगळ्या मानवी सरकारांवर अधिकार आहे. जगात जी भयंकर युद्धं होतात त्यावरून दिसतं की तो किती भयानक आणि क्रूर आहे.—लूक ४:५, ६; १ योहा. ५:१९.
खरे ख्रिस्ती शांतिप्रिय आहेत
तर आतापर्यंत आपण पाहिलं, की आज आपली परिस्थिती प्राचीन इस्राएलपेक्षा खूप वेगळी आहे. पण फक्त परिस्थिती वेगळी असल्यामुळे आपण युद्धात भाग घेत नाही, असं नाही. तर याची आणखीही काही कारणं आहेत. उदाहरणार्थ, देवाने सांगितलं होतं, की शेवटच्या दिवसात त्याचे लोक ‘युद्ध करायला शिकणार नाहीत.’ आणि त्यामुळे साहजिकच त्यात भागही घेणार नाहीत. (यश. २:२-४) तसंच येशूने हे सांगितलं होतं, की त्याचे शिष्य या ‘जगाचा भाग नसतील’ आणि जगाच्या वादविवादांमध्ये कोणाचीही बाजू घेणार नाहीत.—योहा. १५:१९.
येशूने आपल्या अनुयायांना याच्या आणखी एक पाऊल पुढे जायला सांगितलं. ज्या प्रवृत्तींमुळे इतरांबद्दल मनात द्वेष किंवा राग निर्माण होतो किंवा युद्धं होतात, अशा प्रवृत्तींपासूनसुद्धा त्याने त्याच्या शिष्यांना दूर राहायला सांगितलं. (मत्त. ५:२१, २२) शिवाय त्याने आपल्या अनुयायांना शांतिप्रिय व्हायला म्हणजेच “शांती ठिकवून ठेवायचा प्रयत्न” करायला आणि आपल्या शत्रूंवरही प्रेम करायला सांगितलं.—मत्त. ५:९, ४४.
पण वैयक्तिक रीत्या आपल्याबद्दल काय? साहजिकच आपल्याला कोणत्याही युद्धात भाग घ्यायची इच्छा नाही. पण आपल्या मनात थोड्या प्रमाणात का होईना शत्रुत्वाची भावना आहे का? जर असेल तर त्यामुळे मंडळीत मतभेद होऊ शकतात किंवा फुटी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या मनातून अशा भावना पूर्णपणे काढून टाकायचा प्रयत्न केला पाहिजे.—याको. ४:१, ११.
जगातल्या युद्धांमध्ये भाग घेण्याऐवजी आपण शांतीने आणि प्रेमाने राहायचा प्रयत्न करू या. (योहा. १३:३४, ३५) यहोवा लवकरच सगळ्या युद्धांचा अंत करणार आहे. पण तोपर्यंत आपण आपली निष्पक्षता टिकवून ठेवायचा प्रयत्न करू या.—स्तो. ४६:९.
^ कधीकधी इस्राएली वंश एकमेकांविरुद्ध लढायचे. पण या लढाया यहोवाला मुळीच मान्य नव्हत्या. (१ राजे १२:२४) कधीकधी काही वंश यहोवाशी अविश्वासूपणे वागायचे किंवा घोर पाप करायचे. त्यामुळे यहोवाने काही वंशांना एकमेकांविरुद्ध लढू दिलं.—शास्ते २०:३-३५; २ इति. १३:३-१८; २५:१४-२२; २८:१-८.