प्रेम—एक मौल्यवान गुण
यहोवाने प्रेषित पौलला पवित्र आत्म्याच्या कार्यामुळे उत्पन्न होणाऱ्या नऊ गुणांबद्दल लिहिण्यास प्रेरित केलं. (गलती. ५:२२, २३) बायबलमध्ये या नऊ सुरेख गुणांना एकत्रितपणे “आत्म्याचे फळ” असं म्हटलं गेलं आहे. * आत्म्याचे हे फळ ‘नवीन व्यक्तिमत्त्वाचं’ एक खास वैशिष्ट्य आहे. (कलस्सै. ३:१०) एखाद्या झाडाला व्यवस्थित पाणी मिळाल्यास ते चांगलं फळ देतं. त्याच प्रकारे, देवाचा पवित्र आत्मा एखाद्याच्या जीवनात मुक्तपणे कार्य करतो, तेव्हा ती व्यक्ती आत्म्याचे हे सुंदर गुण विकसित करते.—स्तो. १:१-३.
या नऊ गुणांमध्ये पौलने ‘प्रेम’ या गुणाचा सर्वात पहिला उल्लेख केला. हा गुण किती मौल्यवान आहे? पौल म्हणाला की त्याच्यामध्ये जर प्रेम नसेल, तर तो “काहीच नाही.” (१ करिंथ. १३:२) पण, प्रेम म्हणजे नेमकं काय? आणि हा गुण आपण कसा विकसित करू शकतो व आपल्या रोजच्या जीवनात तो कसा दाखवू शकतो?
प्रेम म्हणजे काय?
प्रेम म्हणजे काय हे नेमक्या शब्दांत सांगता येत नसलं, तरी एक प्रेमळ व्यक्ती कशा प्रकारे विचार करते आणि वागते ते बायबल आपल्याला सांगतं. उदाहरणार्थ, एक प्रेमळ व्यक्ती “सहनशील आणि दयाळू” असते. तसंच ती “सत्यामुळे आनंदित होते.” ती “सर्वकाही सहन करते, सर्व गोष्टींवर भरवसा ठेवायला तयार असते, सर्व गोष्टींची आशा धरते, सर्व बाबतींत धीर धरते.” प्रेमळ व्यक्ती मित्रांना एकनिष्ठ राहते, तिला इतरांबद्दल खरी आस्था व काळजी असते. पण, एखाद्या व्यक्तीमध्ये प्रेमाचा गुण नसतो तेव्हा ती इतरांचा हेवा करते, बढाई मारते, गर्विष्ठ व स्वार्थी बनते. तसंच, ती असभ्यपणे वागते आणि आपल्याविरुद्ध केलेल्या चुकांचा हिशोब ठेवते. अशा चुकीच्या प्रवृत्ती किंवा गुण दाखवण्याची आपली मुळीच इच्छा नाही. त्याऐवजी, इतरांना खरं प्रेम दाखवण्याची आपली इच्छा आहे; असं प्रेम जे स्वतःचा “स्वार्थ पाहत नाही.”—१ करिंथ. १३:४-८.
प्रेम दाखवण्याच्या बाबतीत यहोवाचं आणि येशूचं सर्वोत्तम उदाहरण
“देव प्रेम आहे.” (१ योहा. ४:८) देवाच्या सर्व कार्यांतून आणि कृतींतून हे दिसून येतं. देवाने येशूला या पृथ्वीवर मानवांसाठी छळ सोसण्यास आणि मरण अनुभवण्यास पाठवलं; आणि हाच, मानवांवर असलेल्या देवाच्या प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा आहे. प्रेषित योहान याविषयी म्हणतो: “देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवले, यासाठी की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन मिळावे. यावरूनच देवाचे आपल्यावरील प्रेम दिसून आले. प्रेम यातच आहे; आपण देवावर प्रेम केले असे नाही, तर त्याने आपल्यावर प्रेम केले; आणि त्याच्यासोबत आपला समेट होण्याकरता, आपल्या पापांसाठी प्रायश्चित्ताचे बलिदान म्हणून त्याने आपल्या पुत्राला पाठवले.” (१ योहा. ४:९, १०) देवाने दाखवलेल्या या प्रेमामुळे आपल्याला पापांची क्षमा आणि सर्वकाळाच्या जीवनाची आशा मिळते.
येशूनेही, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपलं जीवन अर्पण करून मानवांवर प्रेम असल्याचं दाखवून दिलं. प्रेषित पौल म्हणाला: “याच ‘इच्छेमुळे’ आपल्याला सर्वकाळासाठी एकदाच देण्यात आलेल्या येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या अर्पणाद्वारे पवित्र करण्यात आले आहे.” (इब्री १०:९, १०) यापेक्षा मोठं प्रेम कोणत्याही मानवाने दाखवलेलं नाही. येशूने म्हटलं: “कोणी आपल्या मित्रांसाठी आपला प्राण द्यावा यापेक्षा मोठं प्रेम कोणतंच असू शकत नाही.” (योहा. १५:१३) पण, अपरिपूर्ण असलेले मानव प्रेम दाखवण्याच्या बाबतीत यहोवाचं आणि येशूचं अनुकरण करू शकतात का? हो नक्कीच! हे कोणत्या मार्गाने करता येईल ते आता आपण पाहू.
“प्रेमाने वागत राहा”
पौल आपल्याला आर्जव करतो: “देवाची प्रिय मुले या नात्याने त्याचे अनुकरण करा. प्रेमाने वागत राहा, जसे ख्रिस्तानेही आपल्यावर प्रेम केले आणि . . . अर्पण व बलिदान म्हणून स्वतःला आपल्याकरता दिले.” (इफिस. ५:१, २) इथं “प्रेमाने वागत राहा” असं जे म्हटलं आहे त्याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ, आपण सर्व प्रसंगी इतरांवर प्रेम केलं पाहिजे. इतरांवर आपलं प्रेम आहे हे फक्त शब्दांतून नाही, तर कृतींतूनही आपण दाखवून देतो. योहानने लिहिलं: “मुलांनो, आपण शब्दांनी किंवा तोंडाने नाही, तर कार्यांतून आणि अगदी खऱ्या मनाने प्रेम केले पाहिजे.” (१ योहा. ३:१८) उदाहरणार्थ, आपण ‘राज्याचा आनंदाचा संदेश’ घोषित करतो, कारण यहोवावर आणि शेजाऱ्यांवर आपलं प्रेम आहे. (मत्त. २४:१४; लूक १०:२७) यासोबतच, आपण जेव्हा सहनशील, दयाळू आणि क्षमाशील मनोवृत्ती दाखवतो, तेव्हा ‘प्रेमाने वागत’ असतो. कारण, बायबलमध्ये म्हटलं आहे: “यहोवाने जशी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली आहे, तशी तुम्हीही केली पाहिजे.”—कलस्सै. ३:१३.
आपण इतरांची चूक सुधारली किंवा त्यांना ताडन दिलं, याचा अर्थ आपण प्रेमळ नाही असं नाही. एक उदाहरण घ्या. मुलांनी रडणं थांबवावं म्हणून काही पालक मुलांचे सर्व हट्ट पूर्ण करतात. पण जे पालक आपल्या मुलांवर खरोखर प्रेम करतात, ते गरज पडल्यास त्यांना शिस्तही लावतात. अगदी त्याच प्रकारे, देव प्रेमळ असला तरी तो ‘ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना सुधारतोही.’ (इब्री १२:६) त्यामुळे, आपल्यात जर प्रेम हा गुण असेल तर गरज पडल्यास आपण योग्य शिस्तही लावू. (नीति. ३:११, १२) पण लक्षात असू द्या, आपण सर्व जण पापी आहोत आणि सहसा प्रेम दाखवण्यात कमी पडतो. त्यामुळे आपल्या सर्वांनाच या बाबतीत सुधारणा करण्याची गरज आहे. हे आपण कसं करू शकतो? याचे तीन मार्ग आता आपण पाहू.
आपण प्रेम हा गुण कसा उत्पन्न करू शकतो?
पहिला, देवाकडे त्याच्या पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा. कारण, प्रेम हा गुण पवित्र आत्म्यामुळे उत्पन्न होतो. येशूने म्हटलं, की जे स्वर्गातील पित्याकडे मागतात त्यांना तो विशेषकरून त्याचा पवित्र आत्मा देतो. (लूक ११:१३) त्यामुळे आपण या गोष्टीची खातरी बाळगू शकतो, की पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केल्याने आणि त्याला आपल्या जीवनात कार्य करू दिल्याने आपण अधिक प्रेमळ व्यक्ती बनू. (गलती. ५:१६) उदाहरणार्थ, मंडळीत एक वडील म्हणून सेवा करत असताना तुम्हाला बायबलमधून सल्ला देण्याची आणि इतरांची सुधारणूक करण्याची गरज पडू शकते. अशा वेळी, प्रेमळ वृत्ती दाखवण्याकरता तुम्ही पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करू शकता. किंवा, जर तुम्ही पालक असाल, तर आपल्या मुलांना रागाने नाही, तर प्रेमाने शिस्त लावण्यासाठी देवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीसाठी प्रार्थना करू शकता.
दुसरा, इतरांनी येशूला वाईट वागणूक दिली तरी त्याने प्रेमळपणा कसा दाखवला त्यावर मनन करा. (१ पेत्र २:२१, २३) एखाद्या व्यक्तीमुळे आपण अडखळतो किंवा आपल्याला अन्यायाचा सामना करावा लागतो, तेव्हा स्वतःला विचारा: ‘माझ्या जागी येशू असता तर तो कसा वागला असता?’ ली नावाच्या आपल्या एका बहिणीचा अनुभव लक्षात घ्या. असाच प्रश्न स्वतःला विचारल्यामुळे कोणतीही गोष्ट करण्याआधी खोलवर विचार करायला तिला मदत मिळाली. ली म्हणते: “माझ्यासोबत काम करणाऱ्या एका स्त्रीने एकदा माझ्याविषयी आणि माझ्या कामाविषयी चुकीची माहिती ई-मेलने कामाच्या ठिकाणी सगळीकडे पसरवली. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. पण नंतर मी स्वतःला विचारलं, ‘या व्यक्तीसोबत वागताना मी येशूचं अनुकरण कसं करू शकते?’ अशा परिस्थितीत येशूने काय केलं असतं यावर विचार केल्यानंतर, त्या गोष्टीचा बाऊ न करता ती सोडून देण्याचं मी ठरवलं. काही दिवसांनी मला समजलं, की माझ्यासोबत काम करणारी ती स्त्री एका गंभीर आजाराचा सामना करत आहे आणि त्यामुळे ती फार निराश आहे. नंतर मी विचार केला, की तिने जे काही माझ्याविषयी लिहिलं त्यामागे तिचा वाईट हेतू नक्कीच नसावा. येशूच्या उदाहरणावर मनन केल्यामुळे अशा परिस्थितीतही त्या स्त्रीला प्रेम दाखवण्यास मला मदत झाली.” येशूचं अनुकरण केल्यास आपणही इतरांना नेहमी प्रेम दाखवू.
तिसरा, निःस्वार्थ प्रेम दाखवण्यास शिका. अशा प्रकारचं प्रेम हे खऱ्या ख्रिश्चनांचं ओळखचिन्ह आहे. (योहा. १३:३४, ३५) निःस्वार्थ प्रेम दाखवण्याच्या बाबतीत येशूने आपल्यासमोर एक परिपूर्ण उदाहरण मांडलं आहे. ते कसं? मानवजातीसाठी स्वर्गातलं आपलं स्थान सोडून “त्याने आपल्याजवळ असलेल्या सर्व गोष्टींचा त्याग केला.” अगदी “मरण सोसण्याइतपत” त्याने स्वतःला नम्र केलं. (फिलिप्पै. २:५-८) येशूच्या निःस्वार्थ प्रेमाचं जेव्हा आपण अनुकरण करतो, तेव्हा आपले विचार आणि भावना त्याच्याप्रमाणेच होतात. आणि त्यामुळे आपणही स्वतःपेक्षा इतरांच्या गरजांना अधिक महत्त्व देतो.
प्रेम दाखवल्यामुळे होणारे फायदे
इतरांना प्रेम दाखवल्याचे अनेक चांगले परिणाम दिसून येतात. पुढील दोन उदाहरणं लक्षात घ्या:
-
आपला जगव्याप्त बंधुसमाज: आपलं एकमेकांवर प्रेम आहे. त्यामुळे, आपण जगातल्या कोणत्याही मंडळीत गेलो तरी तिथले बंधुभगिनी आपलं स्वागतच करतील याची आपल्याला पूर्ण खातरी आहे. ‘सबंध जगातील आपले बांधव’ आपल्यावर प्रेम करतात हा आपल्यासाठी खरंच किती मोठा आशीर्वाद आहे! (१ पेत्र ५:९) अशा प्रकारचं खरं प्रेम फक्त देवाच्या लोकांमध्येच पाहायला मिळतं.
-
शांती: ‘प्रेमाने एकमेकांचे सहन केल्यामुळे’ आपल्याला, “एकमेकांशी बांधून ठेवणाऱ्या शांतीच्या” बंधनाचा आनंद अनुभवता येतो. (इफिस. ४:२, ३) अशी शांती आपण मंडळीमध्ये, संमेलनांत आणि अधिवेशनांत अनुभवतो. आजच्या या फूट पडलेल्या जगात अशा प्रकारची शांती असणं ही खरंच एक अद्भुत गोष्ट आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? (स्तो. ११९:१६५; यश. ५४:१३) आपण इतरांसोबत शांतिपूर्ण नातेसंबंध जोपासतो तेव्हा हेच दाखवून देतो, की आपलं त्यांच्यावर प्रेम आहे; आणि यामुळे आपल्या स्वर्गीय पित्यालाही आनंद होतो.—स्तो. १३३:१-३; मत्त. ५:९.
“प्रेम उन्नती करते”
पौलने लिहिलं: “प्रेम उन्नती करते.” (१ करिंथ. ८:१) याचा काय अर्थ होतो? १ करिंथकर याच्या १३ व्या अध्यायात पौलने याचं स्पष्टीकरण दिलं; या अध्यायाला काही जण “प्रेमाचं स्तोत्र” म्हणून ओळखतात. प्रेम इतरांचं हित पाहतं आणि इतरांच्या गरजांची जाणीव बाळगतं. (१ करिंथ. १०:२४; १३:५) याशिवाय, प्रेम इतरांचा विचार करतं, काळजी करतं. तसंच, ते सहनशील आणि दयाळू असतं. त्यामुळे कुटुंबांमध्ये जिव्हाळा आणि मंडळींत ऐक्य निर्माण होतं.—कलस्सै. ३:१४.
इतरांवर आपलं प्रेम आहे हे दाखवण्याचे असे अनेक मार्ग आहेत. पण, देवावर असलेलं प्रेम हे सर्वात मौल्यवान आणि अधिक उन्नती करणारं आहे. असं आपण का म्हणू शकतो? कारण, देवावर असलेलं प्रेम आपल्या सर्वांना एकमेकांशी ऐक्यात बांधून ठेवतं! वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे, वर्णाचे, वंशाचे आणि भाषेचे लोक खांद्याला खांदा लावून आज यहोवाची उपासना करत आहेत. (सफ. ३:९) तर मग, देवाच्या पवित्र आत्म्याचा हा मौल्यवान गुण आपण दररोजच्या जीवनात दाखवत राहण्याचा पक्का निर्धार करू या.
^ परि. 2 नऊ लेखांच्या श्रृंखलेतला हा पहिला लेख आहे. प्रत्येक लेखात आपण आत्म्याच्या फळाच्या एका गुणाबद्दल चर्चा करणार आहोत.