व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवासोबत काम करणं—आनंदी असण्याचं एक कारण

देवासोबत काम करणं—आनंदी असण्याचं एक कारण

“आम्ही त्याच्यासह कार्य करता करता विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये.”—२ करिंथ. ६:१.

गीत क्रमांक: २८, १४

१. यहोवा सर्वश्रेष्ठ देव असूनही, तो इतरांना काय करण्याचं आमंत्रण देतो?

यहोवा एक सर्वश्रेष्ठ देव आहे. त्यानंच सर्वकाही निर्माण केलं आहे. शिवाय, त्याच्याजवळ अमर्याद बुद्धी आणि शक्ती आहे. यहोवानं या गोष्टीची ईयोबाला जाणीव करून दिली, तेव्हा त्यानं म्हटलं: “तुला सर्व काही करता येते; तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही, असे मला कळून आले आहे.” (ईयो. ४२:२) यहोवाला आपल्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी कोणाच्याही मदतीची गरज नाही. असं असलं तरी, त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी तो प्रेमळपणे इतरांनाही आपल्यासोबत काम करण्याचं आमंत्रण देतो.

२. यहोवानं येशूला कोणतं महत्त्वाचं काम करण्याची अनुमती दिली?

देवानं सर्वात आधी आपल्या एकुलत्या एका पुत्राची, येशूची निर्मिती केली. आणि मग इतर गोष्टींची निर्मिती करण्यासाठी त्यानं आपल्या या पुत्राला मदत करण्याची अनुमती दिली. (योहा. १:१-३, १८) येशूबद्दल लिहिताना प्रेषित पौलानं म्हटलं: “आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले, जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले; सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे.” (कलस्सै. १:१५-१७) यावरून कळतं की यहोवानं आपल्या पुत्राला केवळ एक महत्त्वपूर्ण कामच दिलं नाही तर त्याविषयी इतरांना सांगितलंदेखील. येशूसाठी हा किती मोठा सन्मान होता!

३. यहोवानं आदामाला कोणतं काम दिलं होतं, आणि का?

यहोवानं मानवांनाही त्याच्यासोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं आहे. उदाहरणार्थ, त्यानं आदामाला प्राण्यांना नावं देण्याचं काम दिलं. (उत्प. २:१९, २०) आदामाला हे काम करत असताना खूप आनंद झाला असेल, नाही का? प्रत्येक प्राणी कसा दिसतो, त्याच्या हालचाली कशा आहेत, याचं त्यानं अगदी काळजीपूर्वकपणे परीक्षण केलं आणि मग त्यांना शोभतील अशी नावं त्यानं दिली. यहोवा स्वतः या प्राण्यांना नावं देऊ शकला असता. कारण त्यानंच या सर्व प्राण्यांना निर्माण केलं होतं. पण ही कामगिरी त्यानं आदामाला दिली. यावरून त्याचं आदामावर किती प्रेम होतं हे दिसून आलं. याशिवाय यहोवानं पूर्ण पृथ्वीला नंदनवन बनवण्याचं कामही आदामाला सोपवलं होतं. (उत्प. १:२७, २८) पण दुःखाची गोष्ट म्हणजे नंतर आदामानंच यहोवासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम असा झाला, की त्याला व त्याच्या सर्व संततीला अतिशय वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागलं.—उत्प. ३:१७-१९, २३.

४. यहोवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी, त्याच्यासोबत इतरांनी कसं कार्य केलं?

नंतर, देवानं इतर मानवांनाही आपल्यासोबत काम करण्याची संधी दिली. नोहाला देवानं तारू बांधण्यास सांगितलं. त्यामुळे त्याला व त्याच्या कुटुंबाला जलप्रलयातून स्वतःचा जीव वाचवता आला. इस्राएलांना इजिप्तमधून सोडवण्याचं काम यहोवानं मोशेला दिलं. वचन दिलेल्या देशापर्यंत इस्राएली लोकांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यानं यहोशवावर सोपवली. तसंच, यरुशलेम इथं मंदिर बांधण्याचं काम त्यानं शलमोनाला दिलं. आणि येशूची आई होण्यासाठी यहोवानं मरीयेला निवडलं. या व अशा अनेक विश्वासू लोकांनी यहोवासोबत काम केलं आणि त्याचा उद्देश पूर्ण केला.

५. आपण कोणत्या कामात सहभाग घेऊ शकतो, आणि या कामात आपल्याला सामील करण्याची यहोवाला गरज आहे का? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

आज, यहोवा आपल्यालाही त्याच्या राज्याला पाठिंबा देण्यासाठी आमंत्रित करत आहे. देवाची सेवा करण्यासाठी आपल्याकडे बरेच मार्ग उपलब्ध आहेत. या सर्वच मार्गांनी त्याची सेवा करणं आपल्याला शक्य नाही. पण राज्याची सुवार्ता घोषित करण्याचं काम मात्र आपण सर्व जण करू शकतो. यहोवा हे काम स्वतःच करू शकला असता. पृथ्वीवरच्या सर्व लोकांना थेट स्वर्गातून आकाशवाणी करून तो सुवार्ता सांगू शकला असता. शिवाय यहोवा त्याच्या राज्याच्या राजाबद्दल दगडांनाही बोलण्यास लावू शकतो, असं येशूनं म्हटलं. (लूक १९:३७-४०) पण यहोवानं त्याचे “सहकारी” म्हणून काम करण्यास आपल्याला निवडलं आहे. (१ करिंथ. ३:९) प्रेषित पौलानं लिहिलं: “आम्ही त्याच्यासह कार्य करता करता विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये.” (२ करिंथ. ६:१) खरंच, देवासोबत काम करणं, आपल्यासाठी एक मोठा सन्मान आहे. तेव्हा त्याच्यासोबत काम केल्यामुळे आपल्याला इतका आनंद का होतो, याची काही कारणं आता आपण पाहू या.

देवासोबत काम केल्यानं आनंद मिळतो

६. आपल्या पित्यासोबत काम करताना, त्याच्या ज्येष्ठ पुत्राला कसं वाटलं?

यहोवासोबत काम केल्यानं त्याचे सेवक नेहमीच आनंदी असतात. पृथ्वीवर येण्याआधी, देवाच्या ज्येष्ठ पुत्रानं आलंकारिकपणे असं म्हटलं: “परमेश्वराने सृष्टिक्रमाच्या आरंभी . . . मला पैदा केले. तेव्हा मी त्याच्यापाशी कुशल कारागीर होते; मी त्याला नित्य आनंददायी होते; त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे.” (नीति. ८:२२, ३०) या वचनातून कळतं की आपल्या पित्यासोबत काम केल्यामुळे येशूला बरंच काही साध्य करता आलं. शिवाय आपल्या पित्याचं आपल्यावर प्रेम आहे याची जाणीवही त्याला होती. त्यामुळे त्याला खूप आनंद झाला. मग आपल्याबद्दल काय?

एखाद्याला सत्य शिकवण्यापेक्षा, समाधान देणारं आणखी दुसरं काम कोणतं असू शकतं? (परिच्छेद ७ पाहा)

७. प्रचारकार्यामुळे आपल्याला आनंद का होतो?

येशूनं सांगितल्याप्रमाणे, आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट मिळते किंवा आपण इतरांना काही देतो तेव्हा आपल्याला आनंद होतो. (प्रे. कृत्ये २०:३५) आपल्याला सत्य मिळालं तेव्हा आपल्याला तर आनंद झालाच; पण आज जेव्हा तेच सत्य आपण इतरांना सांगतो, तेव्हादेखील आपल्याला आनंद होतो. कारण बायबल काय शिकवतं हे समजल्यामुळे इतरांना किती आनंद झाला आहे, आणि तेदेखील यहोवासोबत नातं जोडण्याचा कसा प्रयत्न करत आहेत हे आपण पाहत असतो. शिवाय जेव्हा ते स्वतःच्या जीवनात आणि विचारसरणीत बदल करतात, तेव्हा तर आपण आणखी आनंदी होतो. खरंच हे एक असं काम आहे, ज्यामुळे देवासोबत मैत्री करणाऱ्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त करणं शक्य होतं. याहून जास्त समाधान देणारं आणि महत्त्वपूर्ण काम आणखी कोणतं असू शकेल?—२ करिंथ. ५:२०.

८. यहोवासोबत काम करण्यात मिळणाऱ्या आनंदाबद्दल काही जण काय म्हणतात?

देवाबद्दल इतरांना शिकवताना, ते करत असलेली प्रगती पाहून आपल्याला आनंद होतोच. पण यामुळे यहोवालादेखील आनंद होतो आणि आपण करत असलेल्या परिश्रमांची त्याला किंमत आहे, ही जाणीवदेखील आपल्या आनंदात आणखी भर घालते. (१ करिंथकर १५:५८ वाचा.) इटलीमध्ये राहणारा मार्को म्हणतो: “मी कुठल्याही मानवाला नव्हे तर यहोवाला माझ्याकडचं सर्वात उत्तम ते देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तो ते कधीच विसरणार नाही. या गोष्टीचा विचार केल्यामुळे मिळणाऱ्या आनंदाची तुलना मी कशाशीच करू शकत नाही.” त्याचप्रमाणे इटलीमध्येच सेवा करणारा फ्रँकोही म्हणतो: “यहोवा, त्याच्या वचनातून आणि त्यानं केलेल्या आध्यात्मिक तरतुदीतून आपल्याला दररोज या गोष्टीची आठवण करून देतो की त्याचं आपल्यावर प्रेम आहे. शिवाय, आपण त्याच्यासाठी जे काही करतो, ते आपल्याला अगदी क्षुल्लक वाटत असलं, तरी त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच देवासोबत काम करण्यात मला खूप आनंद मिळतो आणि त्यामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ मिळाला आहे.”

देवासोबत काम केल्यानं आपण त्याच्या आणि इतरांच्या जवळ जातो

९. यहोवा आणि येशूचं नातं कसं आहे, आणि का?

आपल्या जवळच्या लोकांसोबत आपण एकत्र मिळून काम करतो, तेव्हा आपण त्यांच्या आणखी जवळ येतो. त्यांचं व्यक्तीमत्व आणि त्यांच्या गुणांना आपण आणखी चांगल्या प्रकारे ओळखू लागतो. तसंच, त्यांची ध्येयं काय आहेत आणि ती साध्य करण्यासाठी ते काय करत आहेत, हे आपल्याला कळतं. येशूनं यहोवासोबत लाखो-करोडो वर्षं काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रेम आणि आपुलकीचं एक घनिष्ठ आणि तितकंच अतूट असं नातं विकसित झालं. त्यांच्यात असणाऱ्या या घनिष्ठ नात्याबद्दल बोलताना, येशूनं म्हटलं: “मी आणि पिता एक आहो.” (योहा. १०:३०) त्यांच्यात अगदी खऱ्या अर्थानं एकता आहे आणि ते एकजुटीनं कार्य करतात.

१०. प्रचारकार्यामुळे देवासोबतचं आणि इतरांसोबतचं आपलं नातं आणखी घनिष्ठ होतं, असं का म्हणता येईल?

१० येशूनं आपल्या शिष्यांचं संरक्षण करण्याची विनंती यहोवाला केली. कारण, त्यानं म्हटलं: “यासाठी की, जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे.” (योहा. १७:११) आपण जेव्हा यहोवाच्या स्तरांनुसार जीवन जगतो आणि प्रचारकार्यात सहभाग घेतो, तेव्हा त्याच्या सुंदर गुणांची आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे ओळख होते. शिवाय त्याच्या मार्गदर्शनानुसार चालणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं शहाणपणाचं का आहे हे आपल्याला कळतं. अशा प्रकारे जेव्हा आपण त्याच्या जवळ जातो, तेव्हा तोदेखील आपल्या जवळ येतो. (याकोब ४:८ वाचा.) आपल्या बंधुभगिनींसोबतचं आपलं नातंदेखील आणखी घनिष्ठ होऊ लागतं. कारण आपली ध्येयं सारखी असतात आणि आपण तोंड देत असलेल्या समस्या आणि आपल्याला वाटणारा आनंददेखील सारखाच असतो. आपण एकत्र मिळून काम करतो, एकत्र मिळून आनंद करतो आणि एकत्र मिळून समस्यांचा सामनादेखील करतो. ब्रिटनमध्ये राहणारी ऑक्टावीया म्हणते: “देवासोबत काम केल्यानं इतरांसोबतचं माझं नातंदेखील आणखी जवळचं बनलं आहे.” कारण ती म्हणते, की इतरांसोबतची तिची मैत्री आता “एकाच प्रकारच्या मार्गदर्शनावर आणि ध्येयांवर” आधारलेली आहे. आपल्यालाही असंच वाटत नाही का? यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी आपले बांधव कष्ट करत असल्याचं जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आपल्यामधील नातंदेखील आणखी घनिष्ठ होतं.

११. नवीन जगात यहोवासोबत आणि बांधवांसोबत असणारं आपलं नातं आणखी घनिष्ठ का होईल?

११ देवावर आणि आपल्या बांधवांवर आपलं मनापासून प्रेम आहे. पण हेच प्रेम नवीन जगात आणखी वाढेल. भविष्यात आपल्याला जी रोमांचक कामं करायची आहेत, त्यांचा विचार करा. पुनरुत्थान झालेल्यांचं आपल्याला स्वागत करता येईल आणि यहोवाबद्दल त्यांना शिकवता येईल. पृथ्वीला नंदनवन बनवण्याच्या कामातही आपला सहभाग असेल. शिवाय, येशूच्या राज्याखाली एकत्र मिळून काम करताना आणि हळूहळू परिपूर्ण होताना आपल्याला किती आनंद होईल याचाही विचार करा. संपूर्ण मानवजात एकमेकांच्या आणि ‘आपली मूठ उघडून प्राणिमात्रांची इच्छा पुरी करणाऱ्या’ यहोवाच्या आणखी जवळ येईल.—स्तो. १४५:१६.

देवासोबत काम केल्यानं आपलं संरक्षण होतं

१२. प्रचारकार्यामुळे आपल्याला कशा प्रकारे संरक्षण मिळतं?

१२ यहोवासोबत असणाऱ्या आपल्या नात्याला जपणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण सैतानाच्या जगात राहत आहोत आणि आपण अपरिपूर्ण आहोत. त्यामुळे आपल्या विचारसरणीवर आणि आपल्या वागण्यावर या जगाचा नकळतपणे परिणाम होऊ शकतो. हे जणू नदीच्या प्रवाहात उलट्या दिशेनं पोहण्यासारखं आहे. तुम्हाला ज्या दिशेनं जायचं असतं, त्याच्या अगदी उलट दिशेनं पाण्याचा प्रवाह तुम्हाला खेचत असतो. म्हणून तुम्हाला पूर्ण ताकद लावून पोहण्याची गरज पडते. त्याचप्रमाणे सैतानाच्या या जगाचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करण्याची गरज आहे. मग यासाठी प्रचारकार्यामुळे आपल्याला कशी मदत होते? जेव्हा आपण लोकांना यहोवाबद्दल आणि बायबलबद्दल सांगतो, तेव्हा आपल्या विश्वासाला कमकुवत करणाऱ्या गोष्टींवर नव्हे तर चांगल्या आणि महत्त्वपूर्ण गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास आपल्याला शक्य होतं. (फिलिप्पै. ४:८) प्रचारकार्य आपल्याला देवाच्या अभिवचनांची आणि त्याच्या प्रेमळ स्तरांची आठवून करून देतं. त्यामुळे आपला विश्वास आणखी मजबूत होतो. शिवाय या सैतानी जगात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी लागणाऱ्या गुणांना विकसित करण्यासाठीसुद्धा यामुळे मदत होते.—इफिसकर ६:१४-१७ वाचा.

१३. प्रचारकार्याबद्दल एका बांधवाला काय वाटतं?

१३ आपण प्रचारकार्यात आणि इतर आध्यात्मिक कार्यांमध्ये स्वतःला व्यस्त ठेवतो, तेव्हा आपल्या स्वतःच्या समस्यांबद्दल विनाकारण काळजी करत बसण्याकरता आपल्याजवळ वेळच उरत नाही; आणि हीच गोष्ट आपल्याला संरक्षण देणारी ठरते. ऑस्ट्रेलियात राहणारा जोएल म्हणतो: “प्रचारकार्यात व्यस्त राहिल्यानं, मला वास्तविकतेचं भान ठेवायला मदत झाली आहे. आज लोक कोणत्या समस्यांना तोंड देत आहेत आणि बायबल सिद्धांतांना जीवनात लागू केल्यानं मला कसा फायदा झाला आहे, याची आठवण मला त्यामुळे होते. प्रचाराचं काम करत राहिल्यानं नम्र वृत्ती जोपासण्यासाठी मला मदत होते. एवढंच नव्हे तर यहोवावर आणि माझ्या बंधुभगिनींवर विसंबून राहण्यास यामुळे मला एक संधीदेखील मिळते.”

१४. देवाचा आत्मा आपल्याला मदत करत आहे, हे प्रचारकार्यातील आपल्या चिकाटीवरून कसं दिसून येतं?

१४ प्रचारकार्यामुळे आणखी एक फायदा आपल्याला होतो. देवाचा आत्मा आपल्यासोबत कार्य करत आहे, या गोष्टीवरील आपला विश्वास आणखी वाढतो. उदाहरणार्थ, अशी कल्पना करा की तुम्ही राहता त्या ठिकाणच्या लोकांपर्यंत पौष्टिक आहार पोचवण्याचं काम तुम्हाला देण्यात आलं आहे. या कामाकरता तुम्हाला कुणीही पगार देत नाही, आणि जाण्या-येण्यासाठी लागणारा खर्चदेखील तुम्हालाच करावा लागतो. शिवाय, बहुतेक लोकांना तुम्ही देत असलेलं अन्न घेण्याची इच्छा नाही, आणि त्यातले काही तर तुमच्यावर चिडतातदेखील. अशा प्रकारची नोकरी तुम्ही किती दिवस कराल? काही दिवसांतच तुम्ही निराश व्हाल आणि ती नोकरी सोडून द्याल. पण आपण करत असलेल्या प्रचारकार्याच्या बाबतीत असं नाही. हे खरं आहे, की आपण स्वतःचा वेळ आणि पैसा त्यासाठी खर्च करतो. शिवाय, लोकांचा राग आणि चेष्टाही आपल्याला सहन करावी लागते. पण तरी, आपल्यातील कित्येक जण वर्षानुवर्षं प्रचाराचं काम करत आहेत. मग यावरून, देवाचा आत्मा आपल्याला मदत करत आहे, हेच सिद्ध होत नाही का?

देवासोबत काम केल्यानं त्याच्याप्रती आणि इतरांप्रती असणारं आपलं प्रेम दिसून येतं

१५. मानवजातीसाठी असणारा देवाचा उद्देश पूर्ण करण्यात प्रचारकार्याचा कसा संबंध आहे?

१५ मानवजातीसाठी असणाऱ्या यहोवाच्या उद्देशाचा प्रचारकार्याशी कसा संबंध आहे? मानवानं सदासर्वकाळ जगावं असा देवाचा उद्देश होता; आणि आदामानं पाप केल्यानंतरही त्याचा उद्देश बदलला नाही. (यश. ५५:११) त्यामुळे, पाप आणि मृत्यूपासून सुटका मिळावी म्हणून देवानं एक तरतूद केली. या तरतुदीनुसार येशूनं पृथ्वीवर येऊन आपल्या जीवनाचं बलिदान दिलं. पण त्याच्या बलिदानाचा फायदा व्हावा म्हणून मानवांनी देवाची आज्ञा पाळण्याची गरज होती. म्हणून देव लोकांकडून काय अपेक्षा करतो हे येशूनं त्यांना सांगितलं आणि त्याच्या शिष्यांनाही तेच करण्याची आज्ञा दिली. आज आपणदेखील जेव्हा प्रचारकार्यात सहभाग घेतो आणि लोकांना देवासोबत मैत्री करण्यास मदत करत असतो; तेव्हा पाप आणि मृत्यूपासून मानवांना वाचवण्यासाठी देवानं केलेल्या प्रेमळ तरतुदीत आपण थेट त्याच्यासोबत काम करत असतो.

१६. देवाच्या सर्वात मोठ्या आज्ञेचा, आपल्या प्रचारकार्याशी कसा संबंध आहे?

१६ सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी जेव्हा आपण इतरांना मदत करतो, तेव्हा त्यांच्यावर आणि यहोवावर आपलं प्रेम असल्याचं आपण दाखवत असतो. देवाची “अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.” (१ तीम. २:४) एका परूशी व्यक्तीनं जेव्हा येशूला, देवाची सर्वात मोठी आज्ञा कोणती असं विचारलं, तेव्हा येशूनं म्हटलं: “तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर.’” (मत्त. २२:३७-३९) राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याद्वारे, आपण या आज्ञेचं पालन करतो.—प्रेषितांची कृत्ये १०:४२ वाचा.

१७. राज्याची सुवार्ता घोषित करण्याचा जो सुहक्क आपल्याला मिळाला आहे, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं?

१७ यहोवानं आपल्याला एक असं काम दिलं आहे, ज्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळतो आणि त्याच्या व आपल्या बांधवांच्या जवळ जाण्यासही त्यामुळे आपल्याला शक्य होतं. शिवाय देवासोबत असणारं आपलं नातंसुद्धा सुरक्षित राहतं. खरंच हा किती मोठा आशीर्वाद आहे! तसंच, देवाप्रती आणि इतरांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्याची संधीदेखील त्यामुळे आपल्याला मिळते. संपूर्ण जगभरात यहोवाचे लाखो सेवक आहेत आणि प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. कोणी तरुण आहे तर कोणी वृद्ध, कोणी गरीब तर कोणी श्रीमंत, कोणी सबळ तर कोणी दुर्बळ. पण काहीही असलं तरी आपण सर्वच इतरांना आपल्या विश्वासाबद्दल सांगण्यासाठी होईल तितकं करण्याचा प्रयत्न करतो. फ्रान्समध्ये राहणाऱ्या चॅन्टेलसारख्याच आपल्याही भावना आहेत. तो म्हणतो: “सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता, विश्वातला सर्वात शक्तिमान आणि आनंदी देव मला म्हणतो: ‘जा! माझ्यावतीनं बोल! अगदी मनापासून त्यांना सांग. माझी ताकद, माझं वचन, स्वर्गीय पाठबळ, पृथ्वीवरील तुझे सोबती, तुला मिळणारं प्रशिक्षण, आणि योग्य वेळी दिल्या जाणाऱ्या सूचना या सर्व गोष्टी तुझ्यासोबत आहेत.’ खरंच, देवासोबत काम करण्याचा आणि त्याची इच्छा पूर्ण करण्याचा किती मोठा विशेषाधिकार आपल्याला मिळाला आहे!”