अभ्यास लेख २६
लोकांना शिकवा आणि शिष्य बनवा
देव तुमच्यामध्ये इच्छा निर्माण करतो आणि कार्य करायची ताकदही देतो.—फिलिप्पै. २:१३.
गीत ४४ कापणीत आनंदाने सहभागी व्हा!
सारांश *
१. यहोवाने तुमच्यासाठी काय केलं आहे?
तुम्ही सत्यात कसे आला याचा विचार करा. सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या आईवडिलांकडून किंवा कामावरच्या किंवा शाळेतल्या मित्राकडून आनंदाचा संदेश ऐकला असेल. किंवा मग, साक्षीदार प्रचार करता-करता तुमच्या घरी आले तेव्हा तुम्ही तो ऐकला असेल. (मार्क १३:१०) नंतर तुमचा बायबल अभ्यास घेण्यासाठी कोणीतरी भरपूर वेळ दिला आणि मेहनत घेतली. त्या अभ्यासातून तुम्हाला समजलं, की यहोवा तुमच्यावर खूप प्रेम करतो. त्यामुळे तुम्हीही त्याच्यावर प्रेम करू लागला. यहोवाने तुम्हाला सत्याकडे आकर्षित केलं. आणि आता येशूचे शिष्य बनल्यामुळे तुम्हाला सर्वकाळाच्या जीवनाची आशा आहे. (योहा. ६:४४) यहोवाने कुणाद्वारे तरी तुम्हाला सत्य शिकवलं आणि तुम्हाला त्याचा सेवक म्हणून स्वीकारलं, याबद्दल तुम्ही नक्कीच त्याचे खूप आभारी असाल.
२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
२ सत्यात आल्यावर आता आपल्यालासुद्धा दुसऱ्यांना सत्य शिकवायची चांगली संधी आहे. घरोघरचं प्रचारकार्य करणं आपल्याला सोपं वाटत असेल. पण, ‘तुम्हाला बायबल अभ्यास करायला आवडेल का?’ असं एखाद्याला विचारणं किंवा एखाद्याचा बायबल अभ्यास चालवणं आपल्याला कदाचित कठीण वाटत असेल. तुम्हालाही असंच वाटत असेल तर या लेखात दिलेले सल्ले तुम्हाला मदत करतील. या लेखात आपण याची चर्चा करणार आहोत, की आपण शिष्य बनवण्याचं काम का करतो? तसंच, बायबल अभ्यास घेण्याच्या बाबतीत ज्या समस्या आपल्यासमोर येतात त्या आपण कशा सोडवू शकतो, याचीही चर्चा आपण करणार आहोत. पण सगळ्यात आधी आपण हे पाहू की आपण फक्त प्रचार करणारे नाही, तर लोकांना शिकवणारेही का असलं पाहिजे.
येशूने आपल्याला प्रचार करायची आणि शिकवायची आज्ञा दिली आहे
३. आपण प्रचार का करतो?
३ येशूने आपल्या शिष्यांना राज्याच्या संदेशाचा प्रचार करायला सांगितलं आणि तो कसा करायचा हेसुद्धा दाखवलं. (मत्त. १०:७; लूक ८:१) त्याने त्यांना सांगितलं, की लोकांनी संदेश ऐकला तर काय करायचं आणि नाही ऐकला तर काय करायचं. (लूक ९:२-५) तसंच, प्रचाराचं हे काम किती मोठ्या प्रमाणात केलं जाईल हेसुद्धा त्याने सांगितलं. तो म्हणाला, “आनंदाचा संदेश संपूर्ण जगात घोषित केला जाईल.” (मत्त. २४:१४; प्रे. कार्यं १:८) त्यामुळे लोक ऐकोत किंवा न ऐकोत, शिष्यांना देवाच्या राज्याबद्दल आणि ते राज्य काय-काय करेल याबद्दल लोकांना सांगत राहायचं होतं.
४. मत्तय २८:१८-२० यात सांगितल्याप्रमाणे, प्रचार करण्यासोबतच येशूने शिष्यांना आणखी काय करायला सांगितलं?
४ येशूने शिष्यांना फक्त प्रचार करायची आज्ञा दिली नाही, तर शिकवायचीही आज्ञा दिली होती. पण काही जण कदाचित म्हणतील, की प्रचाराचं आणि शिकवायचं हे काम फक्त पहिल्या शतकासाठी होतं. हे खरं आहे का? नाही. कारण येशूने म्हटलं होतं, की हे महत्त्वाचं काम “जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत,” म्हणजे आपल्या काळापर्यंत चालू राहील. (मत्तय २८:१८-२० वाचा.) येशू ५०० पेक्षा जास्त शिष्यांना दिसला तेव्हा बहुतेक त्याने ही आज्ञा दिली असावी. (१ करिंथ. १५:६) इतकंच नाही, तर त्याने प्रेषित योहानला दृष्टान्तात स्पष्टपणे सांगितलं, की त्याच्या सगळ्याच शिष्यांनी इतरांना यहोवाबद्दल शिकवलं पाहिजे.—प्रकटी. २२:१७.
५. प्रचार करण्यासोबतच शिकवणंही महत्त्वाचं आहे, हे समजावण्यासाठी पौलने १ करिंथकर ३:६-९ यात कोणतं उदाहरण दिलं?
५ प्रचार करण्यासोबतच शिकवणंही महत्त्वाचं आहे, हे समजावण्यासाठी प्रेषित पौलने शिष्य बनवण्याच्या कामाची तुलना शेतीच्या कामासोबत केली. तो करिंथकरांना म्हणाला, “मी पेरलं, अपुल्लोने पाणी घातलं, . . . तुम्ही देवाचं असं शेत आहात, ज्याची तो मशागत करत आहे.” (१ करिंथकर ३:६-९ वाचा.) आपण देवाच्या शेतातले कामकरी आहोत. त्यामुळे आपण जेव्हा लोकांना प्रचार करतो तेव्हा आपण बी पेरत असतो, आणि शिकवतो तेव्हा पाणी घालायचं काम करत असतो. (योहा. ४:३५) पण त्याची वाढ करणारा देव आहे हे आपल्याला माहीत आहे.
६. लोकांना शिकवताना आपण त्यांना काय करायला मदत केली पाहिजे?
६ आपण “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” असणाऱ्या लोकांना शोधत असतो. (प्रे. कार्यं १३:४८) अशांना शिष्य बनवण्यासाठी आपण त्यांना बायबलमधल्या गोष्टी (१) समजायला, (२) त्यावर विश्वास ठेवायला, आणि (३) त्याप्रमाणे जीवन जगायला मदत केली पाहिजे. (योहा. १७:३; कलस्सै. २:६, ७; १ थेस्सलनी. २:१३) मंडळीतले सगळेच जण बायबल विद्यार्थ्याला मदत करू शकतात. विद्यार्थी सभांना येतो तेव्हा ते त्याचं मनापासून स्वागत करू शकतात आणि त्याच्याशी प्रेमाने वागू शकतात. (योहा. १३:३५) बायबल विद्यार्थी पूर्वी ज्या गोष्टी मानायचा किंवा करायचा त्या “भक्कम बुरूजांसारख्या” असतात. त्यामुळे त्या ‘उलथून टाकण्यासाठी’ विद्यार्थ्यासोबत अभ्यास करणाऱ्याला बराच वेळ द्यायची आणि मेहनत घ्यायची गरज पडू शकते. (२ करिंथ. १०:४, ५) जीवनात असे सगळे बदल करायला आणि बाप्तिस्मा घ्यायला विद्यार्थ्याला बराच वेळ लागू शकतो. पण त्याला मदत करण्यासाठी आपण जी काही मेहनत घेऊ ती कधीच वाया जाणार नाही.
प्रेमामुळे आपण शिष्य बनवायचं काम करतो
७. आपण प्रचाराचं आणि शिकवायचं काम का करतो?
७ आपण प्रचाराचं आणि शिकवायचं काम का करतो? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, यहोवावर आपलं प्रेम आहे म्हणून. आपण प्रचाराच्या आणि शिकवायच्या आज्ञेचं मनापासून पालन करतो तेव्हा आपण दाखवून देतो की देवावर आपलं प्रेम आहे. (१ योहा. ५:३) याचा विचार करा, यहोवावर प्रेम असल्यामुळेच तुम्ही घरोघरचं प्रचारकार्य करायला तयार झालात. हे करणं सोपं होतं का? कदाचित नाही. तुम्ही पहिल्यांदा प्रचाराला गेला तेव्हा तुम्हाला भीती वाटली का? नक्कीच वाटली असेल. पण हे काम येशूने दिलं आहे हे माहीत असल्यामुळे तुम्ही ते केलं. आणि पुढे जसजसं तुम्ही हे काम करत गेला तसतसं तुम्हाला ते सोपं वाटू लागलं. पण बायबल अभ्यास चालवण्याबद्दल काय? त्या विचारानेच तुम्हाला भीती वाटते का? असेल तर त्याबद्दल यहोवाला प्रार्थना करा. आणि ‘मला एकतरी बायबल अभ्यास घ्यायचा आहे,’ हे त्याला सांगा. तो नक्कीच तुमच्या मनातली भीती घालवेल आणि बायबल अभ्यास चालवायचं धैर्य तुम्हाला देईल.
८. मार्क ६:३४ या वचनाप्रमाणे आणखी कोणती गोष्ट आपल्याला इतरांना शिकवायला मदत करेल?
८ आपण इतरांना सत्य का शिकवतो याचं दुसरं कारण म्हणजे, लोकांवर आपलं प्रेम आहे. एकदा येशू आणि त्याचे शिष्य बराच वेळ प्रचार केल्यामुळे थकले होते. त्यामुळे विश्रांती घेण्यासाठी ते एका एकांत ठिकाणी जायला निघाले. पण लोकांनी त्यांना जाताना पाहिलं आणि ते त्यांच्या आधीच तिथे पोचले. त्यांना पाहून येशूला त्यांचा कळवळा आला. आणि खूप थकलेला असतानाही तो त्यांना “बऱ्याच गोष्टी शिकवू लागला.” (मार्क ६:३४ वाचा.) येशूने स्वतःला त्यांच्या जागी ठेवून पाहिलं. त्यामुळे ते किती दुःखी आहेत आणि त्यांना आशेची किती गरज आहे हे त्याच्या लक्षात आलं, आणि त्याने त्यांना मदत केली. आजसुद्धा लोकांची परिस्थिती अशीच आहे. ते वरवर कितीही आनंदी, समाधानी वाटत असले, तरी त्यांच्या जीवनात अनेक समस्या आहेत आणि त्यांना आशेची खूप गरज आहे. त्यांचं मार्गदर्शन करणारा कुणीही ‘मेंढपाळ नसल्यामुळे ते हरवलेल्या मेंढरांसारखे’ आहेत. प्रेषित पौलने म्हटलं की, “असे लोक कोणतीही आशा नसलेले आणि . . . देवाशिवाय” आहेत. (इफिस. २:१२) ते ‘नाशाकडे जाणाऱ्या रस्त्यावर’ चालत आहेत. (मत्त. ७:१३) आपल्या क्षेत्रातल्या लोकांना देवाबद्दल जाणून घेण्याची किती गरज आहे, याचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा त्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम आणि दया वाटेल. आणि त्यामुळे आपल्याला त्यांना मदत करावीशी वाटेल. त्यांना मदत करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे, त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करणं.
९. फिलिप्पैकर २:१३ या वचनात सांगितल्याप्रमाणे यहोवा तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो?
९ बायबल अभ्यासाची तयारी करायला आणि तो चालवायला बराच वेळ द्यावा लागेल हे माहीत असल्यामुळे तुम्ही कदाचित तो घ्यायला कचरत असाल. तसं असेल तर त्याबद्दल यहोवाला प्रार्थना करा. आणि बायबल अभ्यास चालवायची इच्छा तुमच्या मनात निर्माण करायला त्याला सांगा. (फिलिप्पैकर २:१३ वाचा.) प्रेषित योहान आपल्याला सांगतो, की देवाच्या इच्छेप्रमाणे आपण काहीही मागितलं तर तो ते आपल्याला देतो. (१ योहा. ५:१४, १५) त्यामुळे लोकांना शिकवायची इच्छा यहोवा नक्कीच तुमच्या मनात निर्माण करेल.
इतर समस्या कशा सोडवता येतील?
१०-११. कोणत्या गोष्टीमुळे आपण बायबल अभ्यास घ्यायला कचरत असू?
१० लोकांना शिकवायचं काम खूप महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहीत आहे. पण ते सोपं नाही. आपल्यासमोर अनेक समस्या येऊ शकतात. त्या आपण कशा सोडवू शकतो याबद्दल आता आपण पुढे पाहू या.
११ परिस्थितीमुळे आपल्याला हवं तितकं करता येत नसेल. उदाहरणार्थ, आपल्यापैकी काहींचं वय झालं असेल किंवा काहींची तब्येत चांगली नसेल. तुमचीही अशीच समस्या आहे का? असेल तर हार मानू नका. कोव्हिड-१९ च्या महामारीमुळे आपण एक खूप चांगली गोष्ट शिकलो. आपण फोनवरून बायबल अभ्यास घ्यायला शिकलो. त्यामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या सोयीनुसार बायबल अभ्यास सुरू करू शकता आणि तो चालवू शकता. याचा आणखी एक फायदा आहे. काहींना बायबल अभ्यास करायचा असतो. पण आपण जेव्हा प्रचार करतो तेव्हा कदाचित त्यांना अभ्यास करायला वेळ नसेल. त्यांना कदाचित अगदी सकाळी किंवा रात्री उशीरा वेळ असेल. मग अशा वेळी तुम्ही फोनवरून त्यांच्यासोबत बायबल अभ्यास कराल का? जसं निकदेम रात्रीच्या वेळी येशूकडे आला तेव्हा त्याने त्याला शिकवलं.—योहा. ३:१, २.
१२. एक चांगला शिक्षक बनायला कोणत्या तीन गोष्टी आपल्याला मदत करू शकतात?
१२ आपण बायबल अभ्यास घेऊ शकत नाही असं कदाचित आपल्याला वाटत असेल. एखाद्याचा बायबल अभ्यास घेण्याआधी आपल्याला बायबलचं भरपूर ज्ञान असलं पाहिजे आणि आपण शिकवण्यात खूप निपुण असलं पाहिजे असा कदाचित आपण विचार करत असू. तुम्हाला जर असं वाटत असेल तर पुढे दिलेल्या तीन २ करिंथ. ३:५) दुसरी गोष्ट म्हणजे, शिकवायची आज्ञा येशूने आपल्याला दिली आहे. ही आज्ञा द्यायचा त्याला अधिकार आहे. (मत्त. २८:१८) तिसरी गोष्ट म्हणजे, यहोवा आणि इतर जण तुम्हाला मदत करू शकतात. यहोवाने जशी येशूला मदत केली तशी तो तुम्हालाही मदत करू शकतो. (योहा. ८:२८; १२:४९) याशिवाय, एखादा बायबल अभ्यास सुरू करायला आणि तो चालवायला तुम्ही तुमच्या क्षेत्र सेवा गटाच्या पर्यवेक्षकाला, एखाद्या अनुभवी पायनियरला किंवा प्रचारकाला मदत मागू शकता. तुम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या बायबल अभ्यासाला जाऊ शकता. त्यामुळे एक चांगला शिक्षक व्हायला तुम्हाला मदत मिळेल.
गोष्टींचा विचार करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. पहिली गोष्ट म्हणजे, तुम्ही इतरांना शिकवू शकता असा भरवसा यहोवाला आहे. (१३. आपण वेगळ्या पद्धतीने इतरांना शिकवायला का तयार असलं पाहिजे?
१३ नवीन पद्धती आणि नवीन साधनं वापरणं आपल्याला कठीण वाटू शकतं. बायबल अभ्यास घ्यायची आपली पद्धत आता बदलली आहे. आता आपण कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातून लोकांसोबत अभ्यास करतो. त्यातून अभ्यास घेण्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारे तयारी करावी लागते, आणि वेगळ्या प्रकारे अभ्यास चालवावा लागतो. त्यात वाचण्यासाठी कमी परिच्छेद आहेत आणि चर्चा करण्यासारखं बरंच काही आहे. शिकवताना आपण व्हिडिओचा, वेबसाईटवरच्या साहित्याचा आणि JW लायब्रेरीचा वापर करतो. हे सगळं कसं वापरायचं हे माहीत नसेल तर ते शिकण्यासाठी कोणाची तरी मदत घ्या. माणसाचा स्वभाव असा असतो की ज्या गोष्टी आपण सवयीने करतो, त्या आपल्याला खूप सोप्या वाटतात. त्यामुळे एखादी नवीन गोष्ट शिकायला आपल्याला कठीण जातं. पण यहोवाच्या आणि इतरांच्या मदतीने तुम्ही शिकवायच्या या नवीन पद्धती आणि साधनं वापरायला शिकाल. आणि अशा प्रकारे इतरांसोबत बायबल अभ्यास करणं तुम्हाला आवडू लागेल. एका पायनियर भावाने म्हटलं, “अभ्यास करायची ही पद्धत खूप छान आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला आणि शिक्षकाला अभ्यास करताना खूप मजा येते.”
१४. (क) आपल्या क्षेत्रातले लोक आपला संदेश ऐकत नाहीत तेव्हा आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? (ख) १ करिंथकर ३:६, ७ या वचनांतून आपल्याला कोणता दिलासा मिळतो?
१४ आपण अशा ठिकाणी राहत असू जिथे बायबल अभ्यास मिळणं कठीण असू शकतं. कधीकधी लोक आपला संदेश ऐकत नाहीत किंवा ते आपला विरोधही करतात. पण असे लोकसुद्धा पुढे-मागे आपलं ऐकतील अशी आशा आपण ठेवू शकतो. कारण आजच्या या जगात लोकांची परिस्थिती अचानक बदलू शकते. पूर्वी ज्यांना आपलं ऐकायची इच्छा नव्हती त्यांना नंतर देवाच्या मार्गदर्शनाची गरज वाटू लागली. (मत्त. ५:३) असे काही जण आहेत जे कधीच आपलं साहित्य घेत नव्हते. पण नंतर त्यांनी बायबल अभ्यास सुरू केला. शिवाय, ‘शेताचा मालक’ यहोवा आहे हेसुद्धा आपल्याला माहीत आहे. (मत्त. ९:३८) आपण बी पेरत राहावं आणि पाणी घालत राहावं असं त्याला वाटतं. पण शेवटी वाढवणारा तोच आहे. (१ करिंथ. ३:६, ७) सध्या आपल्याकडे एकही बायबल अभ्यास नसेल तर आपल्याला निराश होण्याची गरज नाही. उलट हे जाणून आपल्याला दिलासा मिळतो, की यहोवा आपल्या मेहनतीवर आशीर्वाद देतो; आपण किती प्रकाशनं दिली आणि किती बायबल अभ्यास चालवले यावर नाही. *
इतरांना शिकवायचा आनंद अनुभवा
१५. एखादी व्यक्ती सत्यात येते आणि मग इतरांना सत्य शिकवते तेव्हा यहोवाला कसं वाटतं?
१५ एखादी व्यक्ती सत्यात येते आणि मग इतरांना सत्य शिकवते तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो. (नीति. २३:१५, १६) उदाहरणार्थ, २०२० च्या सेवा वर्षादरम्यान जगभरात महामारी असूनसुद्धा ७७,०५,७६५ बायबल अभ्यास चालवण्यात आले आणि त्यातल्या २,४१,९९४ लोकांनी बाप्तिस्मा घेतला. हे पाहून यहोवाला नक्कीच खूप आनंद झाला असेल. बाप्तिस्मा घेतलेले हे नवीन शिष्यसुद्धा बायबल अभ्यास चालवतील आणि आणखीन शिष्य बनवतील. (लूक ६:४०) खरंच, आपण जेव्हा इतरांना शिकवतो आणि त्यांना शिष्य बनवतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो.
१६. आपण कोणतं ध्येय ठेवू शकतो?
१६ एखाद्या व्यक्तीला सत्यात आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण यहोवाच्या मदतीने हे करणं शक्य आहे. त्यामुळे किमान एकतरी बायबल अभ्यास चालवायचं आपण ध्येय ठेवू शकतो का? त्यासाठी संधी मिळेल तेव्हा आपण लोकांना विचारू शकतो, की त्यांना बायबल अभ्यास करायला आवडेल का? बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी आपण जी काही मेहनत घेऊ, त्यावर यहोवा नक्की आशीर्वाद देईल.
१७. एखाद्याचा बायबल अभ्यास घेतल्यामुळे आपल्याला कसं वाटेल?
१७ सत्याबद्दल इतरांना प्रचार करायचा आणि शिकवायचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे! या कामातून आपल्याला खरा आनंद मिळतो. प्रेषित पौलने थेस्सलनीकामधल्या अनेकांना शिष्य बनायला मदत केली होती. त्या कामाबद्दल तो असं म्हणाला, “आपला प्रभू येशू याच्या उपस्थितीच्या वेळी आमची आशा, आनंद किंवा आमचा अभिमानाचा मुकुट शेवटी काय आहे? तुम्हीच नाही का? खरोखर, तुम्हीच आमचा गौरव आणि आमचा आनंद आहात.” (१ थेस्सलनी. २:१९, २०; प्रे. कार्यं १७:१-४) शिष्य बनवायच्या कामाबद्दल आज अनेकांना असंच वाटतं. स्टेफनी नावाच्या एका बहिणीने आणि तिच्या पतीने अनेकांना बाप्तिस्मा घ्यायला मदत केली. ती म्हणते, “एखाद्याला बाप्तिस्मा घ्यायला मदत केल्यामुळे जो आनंद मिळतो त्यासारखा दुसरा आनंद नाही.”
गीत १८ देवाचे खरे प्रेम
^ परि. 5 यहोवाने आपल्याला फक्त इतरांना प्रचार करायचाच नाही, तर येशूने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पाळायला शिकवायचाही बहुमान दिला. आपण इतरांना का शिकवतो? या कामात आपल्यासमोर कोणत्या समस्या येतात? आणि आपण त्या कशा सोडवू शकतो? या प्रश्नांची उत्तरं या लेखात आपण पाहणार आहोत.
^ परि. 14 मंडळीतला प्रत्येक जण शिष्य बनवायच्या कामात कशी मदत करू शकतो, हे जाणून घेण्यासाठी मार्च २०२१ च्या टेहळणी बुरूज अंकातला “विद्यार्थ्याला प्रगती करायला सगळेच मदत करू शकतात,” हा लेख पाहा.
^ परि. 53 चित्राचं वर्णन: बायबलचा अभ्यास केल्यामुळे एखाद्याच्या जीवनात कसा बदल होतो ते या चित्रात दाखवलं आहे. सुरुवातीला, यहोवाची ओळख नसल्यामुळे एका माणसाला असं वाटतं, की आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही. मग त्याला साक्षीदार भेटतात आणि तो बायबल अभ्यास सुरू करतो. तो शिकलेल्या गोष्टी लागू करतो आणि बाप्तिस्मा घेतो. काही काळाने तोसुद्धा शिष्य बनवायचं काम करतो. शेवटी नंदनवनात ते सगळे जीवनाचा आनंद घेतात.