अभ्यास लेख २८
स्पर्धेची भावना उत्पन्न करू नका, शांती राखा
“आपण अहंकारी किंवा आपसात स्पर्धेची भावना उत्पन्न करणारे किंवा एकमेकांबद्दल ईर्ष्या बाळगणारे होऊ नये.”—गलती. ५:२६.
गीत ५३ ऐक्य जपू या
सारांश *
१. स्पर्धेच्या भावनेमुळे कोणते वाईट परिणाम होऊ शकतात?
आज जगात अनेक लोक सतत एकमेकांशी चढाओढ करत असतात. आपल्या या अशा वागण्यामुळे इतरांवर काय परिणाम होईल याचा ते जराही विचार करत नाहीत. याची काही उदाहरणं आपण पाहू या. काही बिझनेसमेन इतर बिझनेसमेनपेक्षा जास्त फायदा मिळवण्यासाठी वाटेल ते करतात. त्यामुळे इतरांचं कितीही नुकसान झालं तरीही त्यांना काही पर्वा नसते. स्पर्धा जिंकण्यासाठी काही खेळाडू इतर टीमच्या खेळाडूंना मुद्दाम इजा पोहचवतात. मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी काही विद्यार्थी परीक्षेत कॉपी करतात. पण अशा गोष्टी करणं किती चुकीचं आहे हे आपल्याला माहीत आहे. ही “शरीराची कामं” आहेत असं बायबल म्हणतं. (गलती. ५:१९-२१) अशी स्पर्धेची भावना नकळत मंडळीतल्या भाऊबहिणींमध्ये येऊ शकते का? या प्रश्नावर विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण स्पर्धेच्या भावनेमुळे मंडळीतली एकता धोक्यात येऊ शकते.
२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
२ या लेखामध्ये आपण अशा काही वाईट गुणांबद्दल पाहणार आहोत, ज्यांमुळे आपल्यामध्ये स्पर्धेची भावना निर्माण होऊ शकते. तसंच, बायबल काळातल्या काही विश्वासू स्त्री-पुरुषांची उदाहरणंही आपण पाहू, जे या भावनेच्या आहारी गेले नाहीत. पण सगळ्यात आधी आपण हे पाहू, की ही भावना आपल्यामध्ये का येऊ शकते.
स्वतःचं परीक्षण करा
३. आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?
३ वेळोवेळी काही प्रश्न विचारून आपण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे. जसं की, “माझ्यामध्ये इतरांपेक्षा जास्त कौशल्यं किंवा क्षमता आहेत हे जेव्हा मी पाहतो तेव्हाच मला स्वतःबद्दल चांगलं वाटतं का? मंडळीत मी जी मेहनत घेतो ती कशासाठी घेतो? मी इतरांपेक्षा सगळ्यात चांगलं काम करतो हे दाखवण्यासाठी? की यहोवाला खूश करण्यासाठी?” पण आपण स्वतःला हे प्रश्न का विचारले पाहिजेत? याबद्दल बायबल काय सांगतं ते आता आपण पुढे पाहू या.
४. गलतीकर ६:३, ४ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण स्वतःची तुलना इतरांबरोबर का करू नये?
४ आपण स्वतःची तुलना इतरांशी करू नये असं बायबल सांगतं. (गलतीकर ६:३, ४ वाचा.) कारण यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे, एखाद्या गोष्टीमध्ये आपण इतरांपेक्षा चांगले आहोत असा आपण विचार केला तर आपल्यामध्ये गर्व येऊ शकतो. दुसरी म्हणजे, इतर जण आपल्यापेक्षा चांगलं करतात हे पाहून आपण निराश होऊ शकतो. आणि या दोन्हीही गोष्टी बरोबर नाहीत. (रोम. १२:३) ग्रीसमध्ये राहणारी कॅथी * म्हणते, “मी सतत दुसऱ्या बहिणींसोबत स्वतःची तुलना करायचे. त्या माझ्यापेक्षा किती सुंदर आहेत, माझ्यापेक्षा किती चांगला प्रचार करतात आणि किती सहज इतरांशी मैत्री करतात, याचा मी विचार करायचे. त्यामुळे मला स्वतःबद्दल कमीपणा वाटायचा.” पण भाऊबहिणींनो, आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण सुंदर आहोत, खूप छान बोलतो आणि इतरांना आवडतो म्हणून यहोवाने आपल्याला त्याच्याकडे आणलं नाही; तर आपण त्याच्यावर प्रेम करायला, त्याच्या मुलाचं ऐकायला तयार आहोत म्हणून त्याने आपल्याला त्याच्याकडे आणलं.—योहा. ६:४४; १ करिंथ. १:२६-३१.
५. ह्यून नावाच्या भावाकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
५ आणखी एक प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो. तो म्हणजे: “मंडळीतले भाऊबहीण मला काय म्हणून ओळखतात? शांती टिकवून ठेवणारा, की वाद घालणारा?” दक्षिण कोरियामध्ये राहणाऱ्या ह्यून नावाच्या भावाचा विचार करा. तो म्हणतो, “मी असा विचार करायचो, की मंडळीतले काही जबाबदार भाऊ नेहमी स्वतःला माझ्यापेक्षा चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी त्यांची टीका करायचो आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर त्यांच्याशी वाद घालायचो.” त्याच्या अशा वागण्यामुळे काय झालं? तो म्हणतो, “माझ्यामुळे मंडळीत फूट पडू लागली.” पण त्याच्या काही मित्रांनी त्याची ही चूक त्याच्या लक्षात आणून दिली. ह्यूनने आपली चूक सुधारली आणि आज तो मंडळीमध्ये एक चांगला वडील आहे. आपल्यामध्ये स्पर्धेची भावना येत आहे असं जर आपल्याला जाणवलं, तर ती दूर करण्यासाठी आपण स्वतःमध्ये बदल केला पाहिजे आणि मंडळीत शांती टिकवून ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे.
अहंकार आणि ईर्ष्या टाळा
६. गलतीकर ५:२६ या वचनाप्रमाणे कोणत्या वाईट गुणांमुळे आपल्यामध्ये स्पर्धेची भावना येऊ शकते?
६ गलतीकर ५:२६ वाचा. कोणत्या वाईट गुणांमुळे आपल्यामध्ये स्पर्धेची भावना येऊ शकते? एक म्हणजे अहंकार. एक अंहकारी व्यक्ती खूप गर्विष्ठ आणि स्वार्थी असते. दुसरा म्हणजे, ईर्ष्या. ईर्ष्या करणाऱ्याला दुसऱ्याकडे असलेली गोष्ट हवी असते आणि तो ती गोष्ट त्याच्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न करतो. यावरून दिसून येतं, की जो माणूस एखाद्याची ईर्ष्या करतो तो त्याचा द्वेष करतो. त्यामुळे अशा वाईट गुणांपासून आपण दूरच राहिलं पाहिजे.
७. अहंकार आणि ईर्ष्येमुळे काय होऊ शकतं हे उदाहरण देऊन सांगा.
७ अहंकार आणि ईर्ष्या या गुणांची तुलना पेट्रोलमध्ये असलेल्या कचऱ्याशी केली जाऊ शकते. असं पेट्रोल विमानात भरलं तर ते उड्डाण करेल खरं, पण इंजिनमध्ये कचरा अडकल्यामुळे काही वेळाने ते अचानक बंद पडून दुर्घटना होऊ शकते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीमध्ये अहंकार आणि ईर्ष्या असेल, तर काही काळासाठी ती यहोवाची सेवा करेल खरं, पण पुढे तिचं वाईट होऊ शकतं. नीति. १६:१८) ती कदाचित यहोवाची सेवा करायचं सोडून देईल आणि त्यामुळे तिचं स्वतःचं आणि इतरांचंही नुकसान होऊ शकतं. तर मग, आपण अहंकार आणि ईर्ष्या या वाईट गुणांपासून दूर कसं राहू शकतो?
(८. आपण अहंकारापासून दूर कसं राहू शकतो?
८ अहंकारापासून दूर राहण्यासाठी पौलने दिलेला सल्ला आपण लागू केला पाहिजे. त्याने फिलिप्पैकरांना असा सल्ला दिला, “भांडखोर वृत्तीने किंवा अहंकाराने कोणतीही गोष्ट करू नका, तर नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.” (फिलिप्पै. २:३) आपण जर इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजलं, तर ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त कौशल्यं आणि क्षमता आहेत त्यांच्याशी आपण स्पर्धा करणार नाही. उलट त्यांच्याकडे या गोष्टी आहेत याचा आपल्याला आनंद होईल. खासकरून ते आपल्या कौशल्यांचा वापर यहोवाच्या सेवेसाठी करत असतील तर. आणि अशी कौशल्यं असलेल्या भाऊबहिणींनी प्रेषित पौलचा सल्ला पाळला तर त्यांनासुद्धा आपल्यामधले चांगले गुण दिसतील. त्यामुळे मंडळीत शांती आणि एकता टिकून राहील.
९. आपण ईर्ष्येची भावना कशी टाळू शकतो?
९ ईर्ष्येपासून दूर राहण्यासाठी आपण हे ओळखलं पाहिजे, की आपण सगळ्याच गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकत नाही. त्यामुळे आपण हे कधीच दाखवण्याचा प्रयत्न करणार नाही, की बाकी सगळ्यांपेक्षा आपण फार कुशल आहोत. उलट ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त क्षमता आहेत, कौशल्यं आहेत त्यांच्याकडून शिकून घेण्याचा आपण प्रयत्न करू. उदाहरणार्थ, एखादा भाऊ चांगली भाषणं देत असेल, तर तो भाषणांची तयारी कशी करतो हे आपण त्याला विचारू शकतो. एखादी बहीण चांगला स्वयंपाक करत असेल, तर आपण तिच्याकडून तो शिकू शकतो. किंवा एखाद्या तरुण भावाला किंवा बहिणीला इतरांशी मैत्री करायला कठीण जात असेल, तर ते अशा भाऊबहिणींचा सल्ला घेऊ शकतात जे सहजपणे इतरांशी मैत्री करतात. अशा प्रकारे आपण ईर्ष्येची भावना टाळू शकतो आणि स्वतःची कौशल्यं वाढवू शकतो.
बायबलमधल्या उदाहरणांतून शिका
१०. गिदोनसमोर कोणती समस्या आली?
१० मनश्शे वंशातला गिदोन आणि एफ्राईम वंशातली माणसं यांच्यामध्ये काय झालं याचा विचार करा. गिदोन आणि त्याच्या ३०० माणसांनी यहोवाच्या मदतीने एक मोठं युद्ध जिंकलं होतं. पण या गोष्टीचा त्यांनी गर्व केला नाही. त्या वेळी, एफ्राईमची माणसं गिदोनची प्रशंसा करण्याऐवजी त्याच्याशी भांडायला लागली. कारण देवाच्या शत्रूंशी शास्ते ८:१.
लढण्यासाठी गिदोनने त्यांना सुरुवातीला बोलवलं नाही या गोष्टीचा त्यांना खूप राग आला होता. आता लोक आपल्या वंशाचा आदर करणार नाहीत, असं त्यांना वाटत होतं. पण गिदोनने जे केलं त्यामुळे देवाच्या नावाचा गौरव झाला आणि त्याच्या लोकांचं संरक्षण झालं या गोष्टीकडे मात्र एफ्राईमच्या माणसांनी दुर्लक्ष केलं.—११. गिदोन एफ्राईमच्या लोकांशी कसा वागला?
११ एफ्राईमच्या माणसांशी बोलताना गिदोन नम्रपणे म्हणाला, “मी तुमच्याशी काय बरोबरी करणार?” मग यहोवाच्या मदतीने एफ्राईमच्या माणसांनी किती मोठमोठ्या गोष्टी केल्या होत्या यांची त्याने त्यांना आठवण करून दिली. त्यामुळे त्यांचा “राग शांत झाला.” (शास्ते ८:२, ३) देवाच्या लोकांमध्ये शांती टिकवून ठेवण्यासाठी गिदोनने नम्रता दाखवली. त्याने गर्व केला नाही.
१२. एफ्राईमच्या माणसांकडून आणि गिदोनकडून आपण काय शिकू शकतो?
१२ या अहवालातून आपण काय शिकू शकतो? एफ्राईम वंशाच्या माणसांकडून आपण हे शिकतो, की स्वतःच्या नावापेक्षा यहोवाच्या नावाचा गौरव करण्याचा आपण जास्त विचार केला पाहिजे. तसंच, कुटुंबप्रमुख आणि मंडळीतले वडील गिदोनकडून एक महत्त्वाचा धडा शिकू शकतात. आपल्यामुळे एखाद्याला वाईट वाटलं तर त्याला तसं का वाटलं हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. इतकंच नाही, तर त्याने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्यांबद्दल त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. असं करण्यासाठी नम्रता लागते. खासकरून समोरची व्यक्ती चुकत असते तेव्हा. कारण आपण बरोबर आहोत हे सिद्ध करण्यापेक्षा आपसातली शांती टिकवून ठेवणं हे जास्त महत्त्वाचं आहे.
१३. हन्नाची समस्या काय होती, आणि तिने त्या समस्येचा सामना कसा केला?
१३ आता हन्नाच्या उदाहरणाचा विचार करा. तिचं लग्न लेवी वंशाच्या एका पुरुषाशी झालं होतं. त्याचं नाव एलकाना होतं. त्याला आणखी एक बायको होती. तिचं नाव होतं पनिन्ना. एलकानाचं पनिन्नापेक्षा हन्नावर जास्त प्रेम होतं. “पनिन्नाला मुलंबाळं होती. पण हन्नाला मात्र एकही मूल नव्हतं.” त्यामुळे पनिन्ना “तिला दुखावण्यासाठी सतत टोमणे मारायची.” पनिन्नाच्या अशा वागण्यामुळे हन्नाला खूप वाईट वाटायचं. ती “फार रडायची आणि जेवायचीही नाही.” (१ शमु. १:२, ६, ७) पण म्हणून हन्नाने कधीही बदला घ्यायचा प्रयत्न केला नाही. त्याऐवजी तिने आपलं दुःख यहोवाला सांगितलं आणि तो सगळं काही नीट करेल असा भरवसा तिने ठेवला. मग यामुळे पनिन्नाच्या वागण्यात काही बदल झाला का? बायबलमध्ये त्याबद्दल काही सांगितलेलं नाही. पण हन्नाबद्दल बायबल म्हणतं, की तिचं मन शांत झालं आणि “तिचा चेहरा उदास राहिला नाही.”—१ शमु. १:१०, १८.
१४. हन्नाच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?
१४ हन्नाकडून आपण काय शिकतो? जर एखादी व्यक्ती आपल्याशी चढाओढ करत असेल तर आपल्यालाही तसं वागायची गरज नाही. वाइटाबद्दल वाईट करण्याऐवजी त्या व्यक्तीसोबत आपण शांतीने राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (रोम. १२:१७-२१) असं केल्यामुळे समोरच्या व्यक्तीमध्ये काही बदल दिसून आला नाही तरी आपल्याला मात्र मनाची शांती मिळेल.
१५. अपुल्लो आणि पौलमध्ये कोणत्या गोष्टी एकसारख्या होत्या?
१५ शेवटी, आपण अपुल्लोचं आणि प्रेषित पौलचं उदाहरण पाहू. दोघांनाही शास्त्रवचनांचं भरपूर ज्ञान होतं. दोघंही चांगले शिक्षक होते. आणि अनेक जण त्यांना ओळखायचे. त्यांनी बऱ्याच जणांना शिष्य बनायला मदत केली होती. पण त्यांनी कधीच एकमेकांशी बरोबरी करायचा प्रयत्न केला नाही.
१६. अपुल्लो हा कसा होता?
१६ अपुल्लो हा आलेक्सांद्रियाचा राहणारा होता. पहिल्या शतकात हे शहर शिक्षणासाठी खूप प्रसिद्ध होतं. “तो एक चांगला वक्ता आणि शास्त्रवचनांचा जाणकार होता.” (प्रे. कार्यं १८:२४) अपुल्लो काही काळासाठी करिंथमध्ये होता तेव्हा तिथल्या काही भाऊबहिणींनी हे दाखवून दिलं, की ते प्रेषित पौल आणि इतर भावांपेक्षा अपुल्लोला जास्त पसंत करतात. (१ करिंथ. १:१२, १३) पण या गोष्टीला अपुल्लोने बढावा दिला नाही. खरंतर अपुल्लो करिंथ सोडून गेला त्याच्या काही काळानंतर पौलने त्याला परत तिथे जायला सांगितलं. (१ करिंथ. १६:१२) अपुल्लो मंडळीत फूट पाडत असता तर पौलने त्याला तिथे परत जायला सांगितलं असतं का? मुळीच नाही. यावरून दिसून येतं, की अपुल्लोने आपल्या क्षमतांचा चांगल्या गोष्टींसाठी वापर केला. म्हणजे, संदेशाची घोषणा करण्यासाठी आणि बांधवांचा विश्वास वाढवण्यासाठी. शिवाय, तो नम्र होता असंही आपण म्हणू शकतो. कारण अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांनी देवाच्या मार्गाबद्दल त्याला आणखी अचूकपणे समजावून सांगितलं तेव्हा त्याने मुळीच वाईट वाटून घेतलं नाही.—प्रे. कार्यं १८:२४-२८.
१७. पौलने मंडळीची शांती कशी टिकवून ठेवली?
१७ अपुल्लोने किती चांगलं काम केलं होतं हे पौलला माहीत होतं. पण यामुळे लोक अपुल्लोला आपल्यापेक्षा चांगलं समजतील अशी भीती पौलला नव्हती. पौलने करिंथ मंडळीला जे पत्र लिहिलं होतं त्यावरून दिसून येतं, की पौल नम्र होता आणि त्याला आपल्या मर्यादांची जाणीव होती. “मी पौलचा,” असं काही जण म्हणायचे तेव्हा ते त्याला १ करिंथ. ३:३-६.
मुळीच आवडायचं नाही. उलट तो नेहमी त्यांचं लक्ष यहोवाकडे आणि येशू ख्रिस्ताकडे वळवायचा.–१८. अपुल्लो आणि पौलकडून आपण काय शिकू शकतो? (१ करिंथकर ४:६, ७)
१८ अपुल्लो आणि पौलकडून आपण काय शिकू शकतो? आपण यहोवाच्या सेवेत खूप मेहनत करू, अनेकांना बाप्तिस्मा घ्यायला मदत करू. पण हे सगळं काही आपण यहोवाच्या मदतीमुळेच करू शकतो, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. अपुल्लो आणि पौलकडून आपल्याला अजून एक धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे, ज्यांना मंडळीत जबाबदाऱ्या आहेत त्यांनी मंडळीत शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मंडळीतले वडील आणि सहायक सेवक इतरांना सल्ला देताना स्वतःच्या मनाने नाही, तर बायबलमधून सल्ला देतात. तसंच, ते भाऊबहिणींचं लक्ष स्वतःकडे नाही तर येशूकडे वेधतात. असं करून ते मंडळीतली शांती आणि एकता टिकवून ठेवतात.—१ करिंथकर ४:६, ७ वाचा.
१९. आपल्यापैकी प्रत्येक जण काय करू शकतो? (“ स्पर्धेची भावना टाळा,” ही चौकटसुद्धा पाहा.)
१९ आपल्यापैकी प्रत्येकाकडे काही ना काही क्षमता किंवा कौशल्यं आहेत. आपण त्यांचा “इतरांच्या सेवेसाठी” उपयोग करू शकतो. (१ पेत्र ४:१०) आपल्याला कदाचित वाटेल, की आपण फारसं काही करू शकत नाही. पण जसं छोटेछोटे टाके घालून एक सुंदर पोशाख तयार होतो. अगदी तसंच आपल्या छोट्याछोट्या कामांमुळे मंडळीची एकता आणि शांती टिकून राहते. तर मग, स्पर्धेची भावना टाळण्यासाठी आणि मंडळीतली शांती आणि एकता टिकवून ठेवण्यासाठी आपण सगळे पुरेपूर प्रयत्न करू या.—इफिस. ४:३.
गीत १ यहोवाचे गुण
^ परि. 5 मातीच्या भांड्याला चिरा पडल्या तर ते कधीही फुटू शकतं. अगदी तसंच मंडळीत स्पर्धेची भावना असेल तर त्यात फूट पडू शकते. मंडळी मजबूत नसेल, तिच्यात एकता नसेल, तर सगळ्यांना शांतीने यहोवाची उपासना करायला कठीण जाऊ शकतं. त्यामुळे या लेखात आपण पाहणार आहोत, की स्पर्धेची भावना आपण कशी टाळू शकतो आणि मंडळीत शांती राखण्यासाठी आपण काय करू शकतो.
^ परि. 4 नावं बदलण्यात आली आहेत.