आत्मसंयम—यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी लागणारा महत्त्वाचा गुण
“माझा चुलत भाऊ जेव्हा माझ्याशी भांडू लागला तेव्हा मी त्याचा गळा धरला. असं वाटत होतं की त्याला मारून टाकू.”—पॉल.
“घरात असताना अगदी लहानसहान गोष्टीवरून मला लगेच राग यायचा. मग माझ्या हाती जे काही लागेल फर्निचर, खेळणी ते मी तोडून टाकायचो.”—मार्को.
आपण कदाचित या दोघांइतके हिंसक होणार नाही. तरी आपल्याला काही वेळा स्वतःवर ताबा किंवा आत्मसंयम ठेवणं कठीण जातं. याचं मुख्य कारण म्हणजे पहिला पुरुष आदाम याच्याकडून आपल्याला वारशाने पापी प्रवृत्ती मिळाली आहे. (रोम. ५:१२) पॉल आणि मार्को यांच्यासारखं काहींना आपल्या रागावर ताबा मिळवणं कठीण जातं. तर काहींना आपल्या विचारांवर ताबा ठेवणं कठीण जातं. त्यांना भीती वाटेल किंवा ते निराश होतील अशा गोष्टींवर ते सतत विचार करत राहतात. इतरही असे काही आहेत ज्यांना अनैतिक लैंगिक कृत्यं करणं, अती प्रमाणात दारू पिणं किंवा ड्रग्सचं सेवन करणं या इच्छांवर आवर घालणं कठीण जातं.
जे आपल्या विचारांवर, इच्छांवर आणि कार्यांवर ताबा ठेवू शकत नाहीत त्यांचं जीवन बरबाद होऊ शकतं. पण आपण हे टाळू शकतो. ते कसं? यासाठी आपल्याला आत्मसंयम विकसित करावा लागेल. हा गुण विकसित करता यावा म्हणून आपण तीन प्रश्नांवर चर्चा करू या. (१) आत्मसंयम म्हणजे काय? (२) हा गुण आपल्यात असणं का गरजेचं आहे? (३) पवित्र ‘आत्म्याच्या फळाचा’ हा पैलू आपण कसा विकसित करू शकतो? (गलती. ५:२२, २३) तसंच, आत्मसंयम राखणं कठीण जातं तेव्हा आपण काय केलं पाहिजे हेही आपण पाहणार आहोत.
आत्मसंयम म्हणजे काय?
आत्मसंयम असणारी व्यक्ती तिला कराव्याशा वाटत असलेल्या गोष्टी लगेच करण्याचा प्रयत्न करत नाही. त्याऐवजी देवाला न आवडणारी गोष्ट बोलण्याचं किंवा करण्याचं ती टाळते.
आत्मसंयम असण्याचा नेमका काय अर्थ होतो हे येशूने आपल्या कार्यांद्वारे दाखवलं. बायबल म्हणतं, “त्याचा अपमान केला जात असताना, त्याने उलटून अपमान केला नाही. दुःख भोगत असताना, त्याने धमकावले नाही; उलट, त्याने नीतीने न्याय करणाऱ्याच्या हाती स्वतःला सोपवून दिले.” (१ पेत्र २:२३) धार्मिक नेत्यांनी येशूला शब्दांत पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने आत्मसंयम दाखवला. (मत्त. २२:१५-२२) एका प्रसंगी काही चिडलेल्या यहुद्यांनी येशूला मारण्यासाठी दगड उचलले तेव्हा रागात एखादं पाऊल उचलण्याऐवजी “येशू लपला आणि मंदिराबाहेर निघून गेला.” (योहा. ८:५७-५९) इतकंच काय तर त्याला वधस्तंभावर खिळलं गेलं तेव्हासुद्धा येशूने आत्मसंयम दाखवला.—मत्त. २७:३९-४४.
आपण येशूचं अनुकरण करू शकतो का? हो, काही प्रमाणात आपण करू शकतो. प्रेषित पेत्रने लिहिलं, “ख्रिस्तानेसुद्धा दुःख सोसले आणि असे करण्याद्वारे त्याने तुमच्याकरता एक आदर्श घालून दिला, यासाठी की तुम्ही त्याच्या पावलांचे जवळून अनुकरण करावे.” (१ पेत्र २:२१) आपण अपरिपूर्ण असलो तरी आत्मसंयम बाळगण्याच्या बाबतीत आपण येशूचं जवळून अनुकरण करू शकतो. पण असं करणं गरजेचं का आहे?
आत्मसंयम गरजेचा का आहे?
यहोवाची पसंती मिळवायची असेल तर आपल्यात आत्मसंयम असणं गरजेचं आहे. आपण कदाचित यहोवाची बऱ्याच वर्षांपासून सेवा करत असू. पण आपण जे बोलतो आणि जे करतो त्यावर जर ताबा ठेवला नाही तर त्याच्यासोबतची आपली मैत्री मोडू शकते.
मोशेच्या उदाहरणाचा विचार करा, तो “भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.” (गण. १२:३) अनेक वर्षं इस्राएली लोक तक्रारी करत होते. त्या मोशेने शांतपणे ऐकून घेतल्या. पण एक दिवस इस्राएली लोक पुरेसं पाणी नसल्याबद्दल पुन्हा तक्रार करू लागले. तेव्हा तो खूप चिडला. त्याने लोकांना रागावून म्हटलं, “अहो, बंडखोरांनो, ऐका; तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढायाचे काय?”—गण. २०:२-११.
मोशे स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. खरंतर यहोवाने चमत्कार करून इस्राएली लोकांना पाणी पुरवलं होतं. पण याचं श्रेय मोशेने यहोवाला दिलं नाही. (स्तो. १०६:३२, ३३) याचा परिणाम असा झाला की यहोवाने त्याला वचन दिलेल्या देशात जाऊ दिलं नाही. (गण. २०:१२) मोशेने आपल्या रागावर ताबा ठेवला नाही याची त्याला आयुष्यभर खंत राहिली असेल.—अनु. ३:२३-२७.
यातून आपण काय शिकू शकतो? आपण बऱ्याच वर्षांपासून सत्यात असलो तरी भाऊबहिणींशी नेहमी आदराने बोललं पाहिजे. आपल्याला चीड येईल असं कदाचित भाऊबहीण आपल्याशी वागत असतील किंवा त्यांना सुधारण्याची गरज असेल तेव्हासुद्धा आपण त्यांच्याशी रागावून बोलू नये. (इफिस. ४:३२; कलस्सै. ३:१२) आपलं जसजसं वय वाढत जातं तसतसं आपल्याला धीर दाखवणं कठीण जाऊ शकतं. पण आपण मोशेचं उदाहरण लक्षात ठेवलं पाहिजे. जर थोड्या वेळासाठी आपण आपला आत्मसंयम गमावला, तर अनेक वर्षांपासून यहोवासोबत असलेलं आपलं घनिष्ठ नातं बिघडू शकतं. आणि असं काही व्हावं अशी आपल्यापैकी कोणाचीच इच्छा नाही. मग हा महत्त्वाचा गुण आपण कसा विकसित करू शकतो?
आपण आत्मसंयम कसा विकसित करू शकतो?
यहोवाकडे पवित्र आत्मा मागा. आपण असं का केलं पाहिजे? कारण आत्मसंयम हा देवाच्या पवित्र आत्म्याच्या फळाचा एक पैलू आहे. आणि यहोवाकडे जो कोणी पवित्र आत्मा मागतो त्याला तो देतो. (लूक ११:१३) पवित्र आत्म्याच्या मदतीने यहोवा आपल्याला आत्मसंयम राखण्यासाठी लागणारी ताकद देईल. (फिलिप्पै. ४:१३) तसंच, तो आपल्याला पवित्र आत्म्याच्या फळाचे इतर पैलूही विकसित करायला मदत करेल. जसं की, प्रेम. प्रेमामुळे आपल्याला आत्मसंयम राखणं सोपं जाईल.—१ करिंथ. १३:५.
अशा गोष्टी टाळा ज्यांमुळे संयम ठेवता येणार नाही. उदाहरणार्थ, अशा वेबसाईट्स किंवा मनोरंजनापासून दूर राहा ज्यात चुकीच्या गोष्टी दाखवल्या जातात. (इफिस. ५:३, ४) खरंतर चुकीची गोष्ट करायला प्रवृत्त करेल अशी कोणतीही गोष्ट करणं आपण टाळलं पाहिजे. (नीति. २२:३; १ करिंथ. ) उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला जाणीव असेल की तिला अनैतिक गोष्टी करण्याचा लगेच मोह होऊ शकतो, तर ती रोमँटिक पुस्तकं किंवा चित्रपट बघायचं पूर्णपणे टाळेल. ६:१२
हा सल्ला लागू करणं कदाचित आपल्याला कठीण वाटेल. पण जर आपण मेहनत घेतली तर स्वतःवर ताबा ठेवण्यासाठी लागणारी ताकद यहोवा देईल. (२ पेत्र १:५-८) आपले विचार, बोलणं आणि कार्यं यांवर ताबा ठेवण्यासाठी तो आपल्याला मदत करेल. आधी उल्लेख केलेले पॉल आणि मार्को यांनासुद्धा त्याने मदत केली. आणि त्यामुळे ते आपल्या हिंसक प्रवृत्तीवर ताबा मिळवू शकले. आणखी एका बांधवाचा विचार करा. सहसा गाडी चालवताना त्याचा राग अनावर व्हायचा. इतकंच काय तर तो इतर गाडी चालवणाऱ्यांसोबत भांडायचासुद्धा. तो या समस्येवर मात कसा करू शकला. त्याबद्दल तो म्हणतो, “मी दररोज कळकळून प्रार्थना करायचो. मी आत्मसंयम या विषयावर असलेल्या लेखांवर अभ्यास केला. आणि मला मदत करतील अशी वचनं मी तोंडपाठ केली. मी बऱ्याच वर्षांपासून यावर काम करत असलो तरी मी प्रत्येक दिवशी सकाळी स्वतःला आठवण करून देतो की मला आज शांत राहायचंय. तसंच, मला कुठेही जायचं असेल तर मी घरातून लवकर निघण्याचा प्रयत्न करतो. यामुळे इतर ड्रायवरांसोबत माझा आधीसारखा वाद होत नाही.”
आत्मसंयम राखण्यात आपण कमी पडलो तर . . .
कधीकधी आपण आत्मसंयम राखण्यात कमी पडतो. जेव्हा असं घडतं तेव्हा आपल्याला यहोवाला प्रार्थना करायची लाज वाटू शकते. पण खरंतर आपण अशा वेळी प्रार्थनेत यहोवाची मदत मागितली पाहिजे. म्हणून यहोवाला लगेच प्रार्थना करा. त्याला मनापासून क्षमा मागा आणि त्याने तुम्हाला मदत करावी अशी त्याला विनंती करा. शिवाय, अशी चूक तुम्ही पुन्हा करणार नाही असा निर्धार करा. (स्तो. ५१:९-११) असा विचार करू नका, की तुम्ही मनापासून करत असलेल्या दयेच्या याचनेकडे तो लक्ष देणार नाही किंवा तो ती ऐकणार नाही. (स्तो. १०२:१७) प्रेषित योहान आपल्याला आठवण करून देतो की देवाचा पुत्र “येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध” करते. (१ योहा. १:७; २:१; स्तो. ८६:५) यहोवा त्याच्या सेवकांना काय सांगतो हे नेहमी लक्षात असू द्या. त्याची इच्छा आहे की त्यांनी इतरांना नेहमी क्षमा करावी. म्हणून तुम्ही या गोष्टीची खातरी बाळगू शकता की तोसुद्धा तुम्हाला क्षमा करेल.—मत्त. १८:२१, २२; कलस्सै. ३:१३.
मोशे अरण्यात आत्मसंयम राखण्यात कमी पडला तेव्हा यहोवा त्याच्यावर रागावला होता. पण नंतर यहोवाने त्याला माफ केलं. बायबल सांगतं की मोशे याने विश्वासाच्या बाबतीत एक उत्तम उदाहरण मांडलं आणि आपण त्याचं अनुकरण केलं पाहिजे. (अनु. ३४:१०; इब्री ११:२४-२८) यहोवाने मोशेला वचन दिलेल्या देशात जाऊ दिलं नाही. पण नंदनवनात यहोवा नक्कीच त्याचं पुनरुत्थान करेल आणि त्याला सर्वकाळाचं जीवन देईल. आपण आत्मसंयम हा महत्त्वाचा गुण विकसित करण्यासाठी मेहनत घेत राहिलो तर आपल्यालाही सर्वकाळाचं जीवन मिळू शकतं.—१ करिंथ. ९:२५.