व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

१ करिंथकर १५:२९ या वचनात दिलेल्या पौलच्या शब्दांचा असा अर्थ होतो का, की त्याच्या काळातले काही ख्रिस्ती मेलेल्या लोकांसाठी बाप्तिस्मा घ्यायचे?

नाही. बायबलमध्ये किंवा बायबल काळाचा इतिहास सांगणाऱ्‍या कोणत्याही पुस्तकात आपल्याला असं काहीच वाचायला मिळत नाही.

पण बायबलच्या अनेक भाषांतरांमध्ये या वचनाचं ज्या प्रकारे भाषांतर करण्यात आलं आहे, त्यावरून काही लोकांना असं वाटतं, की पहिल्या शतकातले ख्रिस्ती मेलेल्या लोकांसाठी पाण्याचा बाप्तिस्मा घ्यायचे. उदाहरणार्थ, एका भाषांतरात असं म्हटलं आहे: “जर मेलेले उठविले जात नाहीत तर त्यांच्यासाठी लोक बाप्तिस्मा का घेतात?”—ईझी-टू-रीड व्हर्शन.

पण याबद्दल बायबलच्या दोन विद्वानांनी काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या. डॉ. ग्रेगरी लॉकवूड यांनी म्हटलं, की मेलेल्या व्यक्‍तीसाठी कोणी बाप्तिस्मा घेतल्याचा कुठलाही पुरावा बायबलमध्ये किंवा इतिहासात सापडत नाही. तसंच, प्रोफेसर गॉर्डन डी. फी यांनीसुद्धा म्हटलं, की अशा प्रकारच्या बाप्तिस्म्याचं एकही उदाहरण बायबलमध्ये किंवा इतिहासात वाचायला मिळत नाही. ते पुढे म्हणाले, की याबद्दल नवीन करारात कोणताही उल्लेख नाही. तसंच, पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांमध्ये किंवा प्रेषितांच्या मृत्यूनंतर लगेच तयार झालेल्या चर्चमध्ये अशा प्रकारचा बाप्तिस्मा दिला जायचा याचाही कोणता पुरावा नाही.

येशूने आपल्या अनुयायांना अशी आज्ञा दिली होती: “सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा आणि त्यांना . . . बाप्तिस्मा द्या,  आणि मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.” (मत्त. २८:१९, २०) यावरून दिसून येतं, की एखाद्या व्यक्‍तीला जर बाप्तिस्मा घेऊन येशूचा शिष्य व्हायचं असेल, तर त्याने यहोवाबद्दल आणि त्याच्या मुलाबद्दल शिकलं पाहिजे. तसंच, त्याने त्यांच्यावर विश्‍वास ठेवला पाहिजे आणि त्यांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. या गोष्टी एक जिवंत व्यक्‍तीच करू शकते. जे मेले आहेत ते या गोष्टी करू शकत नाहीत. शिवाय, एक जिवंत ख्रिस्ती व्यक्‍तीसुद्धा मेलेल्या लोकांसाठी या गोष्टी करू शकत नाही.—उप. ९:५, १०; योहा. ४:१; १ करिंथ. १:१४-१६.

तर मग, १ करिंथकर १५:२९ या वचनात पौलला नेमकं काय म्हणायचं होतं?

करिंथमधल्या काही लोकांचं असं म्हणणं होतं, की मेलेल्या लोकांचं पुनरुत्थान होणार नाही. (१ करिंथ. १५:१२) पण त्यांचं हे म्हणणं किती चुकीचं आहे हे पौलने त्यांना दाखवून दिलं. तो त्यांना म्हणाला, की तो “दररोज मृत्यूचा सामना करतो.” दुसऱ्‍या शब्दांत, त्याला दररोज जीवघेण्या संकटांचा सामना करावा लागतो. पण असं असलं तरी त्याला याची खातरी होती, की त्याचा मृत्यू झाल्यावर येशूसारखंच त्याचंही स्वर्गातल्या जीवनासाठी पुनरुत्थान होईल.—१ करिंथ. १५:३०-३२, ४२-४४.

करिंथमधल्या ख्रिश्‍चनांना एक गोष्ट समजून घ्यायची होती. ती म्हणजे, ते अभिषिक्‍त ख्रिस्ती असल्यामुळे स्वर्गातल्या जीवनाच्या पुनरुत्थानासाठी त्यांनाही दररोज परीक्षांचा सामना करावा लागेल आणि शेवटपर्यंत विश्‍वासू राहून मरण सोसावं लागेल. ज्या वेळी त्यांचा “ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा” झाला, त्याच वेळी “त्याच्या मरणातही [त्यांचा] बाप्तिस्मा झाला.” (रोम. ६:३) याचा अर्थ असा होतो, की येशूप्रमाणेच स्वर्गातल्या जीवनाच्या पुनरुत्थानासाठी त्यांना परीक्षांचा सामना करावा लागणार होता आणि मरण सोसावं लागणार होतं.

येशूचा पाण्याने बाप्तिस्मा झाला त्याच्या दोनपेक्षा जास्त वर्षांनी तो त्याच्या दोन प्रेषितांना म्हणाला: ‘जो बाप्तिस्मा मी घेतोय तो तुम्ही घ्याल.’ (मार्क १०:३८, ३९) इथे येशू पाण्याने बाप्तिस्मा घेण्याबद्दल बोलत नव्हता; तर तो असं म्हणत होता, की देवाला विश्‍वासू राहिल्यामुळे शेवटी त्याला खरोखरचं मरण सोसावं लागेल. तसंच पौलनेही म्हटलं, की ‘अभिषिक्‍त जनांचा येशूसोबत गौरव व्हावा म्हणून आधी त्यांना त्याच्यासोबत दुःख सोसावं लागेल.’ (रोम. ८:१६, १७; २ करिंथ. ४:१७) स्वर्गातल्या जीवनाच्या पुनरुत्थानासाठी येशूसारखंच त्यांनाही मरण सोसावं लागणार होतं.

या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यावर, १ करिंथकर १५:२९ मध्ये दिलेल्या पौलच्या शब्दांचं अचूक भाषांतर असं केलं जाऊ शकतं: “मग, मृत्यूसाठी बाप्तिस्मा घेणाऱ्‍यांचं काय? जर मेलेल्यांचं पुनरुत्थानच होणार नसेल, तर ते मृत्यूसाठी बाप्तिस्मा तरी का घेतात?”