वाचकांचे प्रश्न
प्रेषित पौलाने म्हटलं: यहोवा “तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही.” (१ करिंथ. १०:१३) या वचनाचा असा अर्थ होतो का, की आपण कितपत सहन करू शकतो हे यहोवा आधीच पाहतो आणि त्यानुसार आपल्यावर कोणत्या परीक्षा याव्यात हे ठरवतो?
ही गोष्ट जर खरी असती तर विचार करा, आपल्या जीवनावर तिचा किती मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असता! उदाहरणार्थ, आपल्या एका बांधवाच्या मुलाने आत्महत्या केली. साहजिकच यामुळे तो बांधव खचून गेला आणि फार दुःखी झाला. तो विचार करू लागला, ‘माझ्या मुलाने आत्महत्या करण्याआधी यहोवाने भविष्यात पाहिलं असेल का? आणि मग मी आणि माझी पत्नी हे मोठं दुःख सहन करू शकेन हे पाहून आमच्यावर हे संकट येऊ दिलं असेल का?’ आज या दुष्ट व्यवस्थेत आपल्यापैकी अनेकांना या ना त्या प्रकारे संकटांना आणि दुःखद प्रसंगांना सामोरं जावं लागेल. मग आपण असा विचार करणं योग्य ठरेल का, की आपल्या जीवनात जे काही होतं ते सर्व यहोवा नियंत्रित करतो?
पहिले करिंथ १०:१३ या वचनाची पडताळणी करत असताना आपण हे पाहणार आहोत की, आपण कितपत सहन करू शकतो हे यहोवा आधीच पाहतो आणि त्यानुसार आपल्यावर कोणत्या परीक्षा याव्यात हे ठरवतो, या गोष्टीला बायबल दुजोरा देत नाही. हे आपण कोणत्या आधारावर म्हणू शकतो? यासाठी आपण पुढील चार कारणांचा विचार करू.
पहिलं कारण: यहोवाने मानवांना इच्छास्वातंत्र्य म्हणजेच निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. आपण स्वतः निर्णय घ्यावेत अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. (अनु. ३०:१९, २०; यहो. २४:१५) यहोवाला आनंद होईल असे निर्णय घेण्याचं जेव्हा आपण ठरवतो, तेव्हा त्याच्याकडून मार्गदर्शन मिळवण्याची अपेक्षा आपण करू शकतो. (नीति. १६:९) पण जेव्हा आपण चुकीचे निर्णय घेतो, तेव्हा आपल्याला त्यांच्या परिणामांनाही सामोरं जावं लागतं. (गलती. ६:७) मग जर आपण कोणत्या परीक्षेतून जावं हे यहोवा ठरवत असेल, तर आपल्याला खरंच इच्छास्वातंत्र्य आहे असं म्हणता येईल का?
दुसरं कारण: आपल्यासोबत जेव्हा एखादी “अनपेक्षित घटना” घडते तेव्हा यहोवा ती घटना घडण्यापासून रोखत नाही. (उप. ९:११, NW) फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला अनपेक्षित घटनेला किंवा अपघाताला सामोरं जावं लागू शकतं. येशूनेही अशा एका अपघाताचा उल्लेख केला ज्यामध्ये एक बुरूज पडल्याने १८ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या अपघाताचा उल्लेख करताना येशूने हे स्पष्ट केलं की यहोवा या लोकांच्या मृत्यूला कारणीभूत नव्हता. (लूक १३:१-५) मग एखादा अपघात होण्याआधी त्यातून कोण बचावेल आणि कोणाचा मृत्यू होईल हे देव ठरवतो, असा विचार करणं योग्य ठरेल का?
तिसरं कारण: आपण प्रत्येकाने यहोवाप्रती असलेली आपली एकनिष्ठता टिकवून ठेवली पाहिजे. आपण स्वार्थी कारणांसाठी यहोवाची ईयो. १:९-११; २:४; प्रकटी. १२:१०) मग जर आपल्यावर येणार असलेली एखादी परीक्षा यहोवाने आपल्यावर येऊच दिली नाही, तर सैतानाने केलेला दावा योग्य होता हे सिद्ध होणार नाही का?
उपासना करतो असं सैतान म्हणाला. परीक्षांचा सामना करताना आपण यहोवाप्रती असलेली आपली एकनिष्ठता टिकवून ठेवू शकणार नाही, असा त्याने दावा केला. (चौथं कारण: आपल्यासोबत भविष्यात होणाऱ्या सर्वच गोष्टींच्या बाबतीत काय होईल हे यहोवा माहीत करून घेत नाही. हे खरं आहे की जर यहोवाची इच्छा असेल तर भविष्यात काय होणार आहे हे तो माहीत करून घेऊ शकतो. (यश. ४६:१०) पण बायबलमधून आपल्याला हे समजतं की सर्वच गोष्टींच्या बाबतीत पुढे काय होणार आहे, हे यहोवा माहीत न करून घेण्याचं निवडतो. (उत्प. १८:२०, २१; २२:१२) यहोवा हा प्रेमळ आणि नीतीने वागणारा आहे. त्यामुळे आपल्याला असलेल्या निवड करण्याच्या स्वातंत्र्यामध्ये तो ढवळाढवळ करत नाही.—अनु. ३२:४; २ करिंथ. ३:१७.
मग, यहोवा “तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही” असं जे पौलाने म्हटलं त्याचा काय अर्थ होतो? या वचनात पौल, परीक्षा येण्याआधी यहोवा काय करतो यावर नाही, तर परीक्षांदरम्यान तो काय करतो याविषयी सांगत होता. आपण जर यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला, तर आपल्यावर येणाऱ्या कोणत्याही परीक्षेचा सामना करण्यास तो आपल्याला मदत करेल. (स्तो. ५५:२२) पौल असं का म्हणू शकला हे समजून घेण्यासाठी, आता आपण दोन कारणांचा विचार करू.
सर्वात पहिलं कारण म्हणजे, “मनुष्यांना सहन करता येणार नाहीत अशा परीक्षा” आपल्यावर येत नाहीत. जोपर्यंत आपण सैतानाच्या जगाच्या या दुष्ट व्यवस्थेत जगत आहोत, तोपर्यंत आपल्या प्रत्येकालाच कठीण समस्यांना आणि कदाचित दुःखद प्रसंगांनाही तोंड द्यावं लागेल. पण जर आपण यहोवावर अवलंबून राहिलो तर आपण या परीक्षांचा धीरानं सामना करू शकतो आणि यहोवाप्रती असलेली आपली एकनिष्ठता टिकवून ठेवू शकतो. (१ पेत्र ५:८, ९) पहिले करिंथ याच्या १० व्या अध्यायात पौलाने आधी अरण्यात इस्राएली लोकांवर आलेल्या काही परीक्षांबद्दल लिहिलं. (१ करिंथ. १०:६-११) जे इस्राएली लोक त्या वेळी यहोवावर अवलंबून राहिले ते या परीक्षांमधून निभावले. पण काही इस्राएली लोकांनी मात्र यहोवाच्या आज्ञांचं पालन केलं नाही. ते यहोवावर अवलंबून राहिले नाहीत, त्यामुळे ते यहोवाला एकनिष्ठही राहू शकले नाहीत.
दुसरं कारण म्हणजे “देव विश्वसनीय आहे.” याचा काय अर्थ होतो? यहोवा देव आपल्या विश्वासू सेवकांना कशा प्रकारे सांभाळतो याचा इतिहास जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आपल्याला हे कळतं की, “जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात” त्यांच्याशी तो एकनिष्ठ राहतो आणि त्यांना मदत करतो. (अनु. ७:९) तसंच यहोवा त्याने दिलेलं वचन नेहमी पूर्ण करतो हेही आपल्याला समजतं. (यहो. २३:१४) आपण या गोष्टीची पूर्ण खात्री बाळगू शकतो की, (१) आपल्यावर येणाऱ्या परीक्षा यहोवा आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे होऊ देणार नाही, आणि (२) तो “तिच्यातून निभावण्याचा उपायही करेल.”
मग जे यहोवा देवावर निर्भर राहतात त्यांच्यासाठी तो त्या परीक्षेतून निभावण्याचा उपाय कसा करतो? आपल्याला सामना कराव्या लागणाऱ्या परीक्षांना तो पूर्णपणे आपल्या जीवनातून काढून टाकू शकतो हे खरं आहे. पण लक्षात घ्या की पौलाने इथं काय म्हटलं आहे. त्याने म्हटलं, यहोवा परीक्षेतून “निभावण्याचा उपायही करेल, यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.” याचा अर्थ असा की, परीक्षेचा धीरानं सामना करण्यासाठी आणि त्याच्याप्रती आपली एकनिष्ठता टिकवून ठेवण्यासाठी यहोवा आपल्याला ताकद देतो. अशा प्रकारे तो आपल्यासाठी त्या परीक्षेतून निभावण्याचा मार्ग काढतो. तो हे कोणकोणत्या मार्गांनी करतो? आता आपण अशा काही मार्गांवर चर्चा करू ज्यांद्वारे यहोवा आपल्याला मदत पुरवतो.
-
यहोवा सर्व संकटांत आपले “सांत्वन करतो.” (२ करिंथ. १:३, ४) यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे, वचनाद्वारे आणि विश्वासू दासाकरवी आध्यात्मिक अन्न पुरवण्याद्वारे आपल्याला आपलं मन व हृदय शांत ठेवण्यास आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो.—मत्त. २४:४५; योहा. १४:१६; रोम. १५:४.
-
आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याचा उपयोग करू शकतो. (योहा. १४:२६) देवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीमुळे आपल्याला बायबलमधील अहवाल आणि त्यातील तत्त्वं आठवण्यास मदत होते. त्यांमुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकतो.
-
यहोवा आपल्याला मदत करण्यासाठी त्याच्या स्वर्गदूतांचा उपयोग करू शकतो.—इब्री १:१४.
-
आपल्याला मदत करण्यासाठी यहोवा आपल्या बंधुभगिनींचा उपयोग करू शकतो. जेव्हा आपले बंधुभगिनी आपल्याशी काही बोलतात किंवा आपल्यासाठी काही करतात तेव्हा त्याद्वारे आपल्याला मदत मिळू शकते.—कलस्सै. ४:११.
मग पहिले करिंथ १०:१३ या वचनातील पौलाच्या शब्दांवरून आपल्याला काय शिकायला मिळालं? हेच की, आपल्यावर कोणत्या परीक्षा याव्यात आणि कोणत्या नाहीत हे यहोवा देव ठरवत नाही. पण आपण या गोष्टीची पूर्ण खात्री बाळगू शकतो की जर आपण यहोवावर भरवसा ठेवला, तर तो आपल्याला कोणत्याही परीक्षेचा धीरानं सामना करण्यास नक्की मदत पुरवेल. आपल्या सर्वांना या गोष्टीची पूर्ण खात्री आहे की, परीक्षांमधून निभावण्यासाठी व आपली एकनिष्ठता टिकवून ठेवण्यासाठी यहोवा देव आपल्याकरता नक्कीच मार्ग काढेल.