व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एक साधाच, पण जबरदस्त प्रश्‍न

एक साधाच, पण जबरदस्त प्रश्‍न

मेरी आणि तिचे पती जॉन a अशा एका ठिकाणी राहतात, जिथे फिलिपीन्झमधले बरेच लोक कामासाठी येतात. या जोडप्याला त्या लोकांना प्रचार करायला खूप आवडतं. कोविड-१९ महामारीच्या काळात मेरीने बरेच बायबल अभ्यास सुरू केले. तिचे हे विद्यार्थी फक्‍त तिच्याच देशातले नव्हते तर जगातल्या वेगवेगळ्या भागांतून होते. मग मेरीला इतके बायबल अभ्यास कसे सुरू करता आले?

मेरी तिच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्‍न विचारायची. ती त्यांना म्हणायची, “बायबल अभ्यास करायला आवडेल अशा कोणाला तुम्ही ओळखता का?” जर ते हो म्हटले तर ती त्यांना विचारायची, “तुम्ही त्यांची आणि माझी ओळख करून देऊ शकता का?” हा साधासाच प्रश्‍न विचारल्यामुळे जबरदस्त परिणाम दिसून येतात. ते कसे? ज्या विद्यार्थ्यांना देवाच्या वचनाची कदर असते, ते सहसा कुटुंबातल्या सदस्यांची आणि मित्रांची काळजी असल्यामुळे शिकलेल्या गोष्टी त्यांना सांगतात. मग हा प्रश्‍न विचारल्यामुळे काय परिणाम झाले आहेत?

मेरीची जॅस्मिन नावाची एक बायबल विद्यार्थी होती. तिने मेरीला बायबल अभ्यास करायची इच्छा असलेल्या चार जणांबद्दल सांगितलं. त्यांपैकी एक म्हणजे क्रिस्टीन. क्रिस्टीनला बायबल अभ्यास इतका आवडायचा की ती आठवड्यातून दोनदा अभ्यास करायची. मेरीने तिलाही तोच प्रश्‍न विचारला. त्यावर क्रिस्टीन म्हणाली, “हो आहेत ना, माझ्या मैत्रिणींना आवडेल बायबल अभ्यास करायला.” त्याच्या काही आठवड्यांतच क्रिस्टीनने अभ्यास करायची इच्छा असलेल्या तिच्या चार मैत्रिणींची मेरीशी ओळख करून दिली. नंतर क्रिस्टीनने तिला तिच्या इतर मैत्रिणींबद्दलही सांगितलं. आणि त्यांच्यापैकी काहींनी अजून काही लोकांबद्दल मेरीला सांगितलं.

क्रिस्टीनला वाटायचं की फिलिपीन्झमध्ये राहणाऱ्‍या आपल्या कुटुंबालाही बायबलबद्दल कळावं. त्यामुळे ती तिच्या मुलीशी, ॲन्ड्रीयाशी बोलली. ॲन्ड्रीयाला सुरुवातीला वाटायचं, ‘यहोवाचे साक्षीदार एक विचित्र पंथ आहे. ते लोक येशूला मानत नाहीत आणि फक्‍त जुना करारच पाळतात.’ पण एकाच अभ्यासात तिचे सगळे गैरसमज दूर झाले. अभ्यास करताना ती म्हणायची, “बायबलमध्ये म्हटलंय तर खरंच तसंच असेल!”

काही काळातच, ॲन्ड्रीयाने तिच्या दोन मैत्रिणींशी आणि कामावरच्या एका मुलीशी मेरीची ओळख करून दिली. तसंच ॲन्ड्रीयाचा बायबल अभ्यास चालत असताना तिची आत्या, ॲन्जेला ते ऐकायची. आणि याबद्दल मेरीला काहीच माहीत नव्हतं. ॲन्जेला अंध होती. एकदा तिने ॲन्ड्रीयाला मेरीशी तिची ओळख करून द्यायला सांगितलं आणि तिचा बायबल अभ्यास सुरू करायची विनंती केली. ॲन्जेला जे शिकत होती ते तिला खूप आवडायचं. इतकं, की एका महिन्यातच तिने बरीच वचनं तोंडपाठ केली आणि ती आठवड्यातून चार वेळा बायबल अभ्यास करू लागली. तसंच ती ॲन्ड्रीयाच्या मदतीने नियमितपणे व्हिडिओ कॉलवरून सभांना उपस्थितही राहू लागली.

जेव्हा मेरीच्या लक्षात आलं की क्रिस्टीनचा पती जोशूवा अभ्यासाच्या वेळी आजूबाजूला घुटमळतोय, तेव्हा तिने त्याला अभ्यासाला बसायला आवडेल का असं विचारलं. जोशूवाने म्हटलं, “मी बसेन पण मला फक्‍त ऐकायचंय. मला अजिबात प्रश्‍न विचारायचे नाहीत. नाहीतर मी निघून जाईन.” अभ्यासाच्या पहिल्या पाच मिनीटांतच त्याने क्रिस्टीनपेक्षा जास्त प्रश्‍न विचारले. अशा प्रकारे त्याचाही अभ्यास सुरू झाला.

मेरीच्या साध्याश्‍याच प्रश्‍नाने बरेच बायबल अभ्यास सुरू झाले. तिने चार देशांत एकूण २८ बायबल अभ्यास सुरू केले. त्यांपैकी काहींचे बायबल अभ्यास तिने इतर साक्षीदारांना चालवायला दिले.

या अनुभवात सांगितलेल्या मेरीच्या पहिल्या विद्यार्थिनीचा, जॅस्मीनचा एप्रिल २०२१ मध्ये बाप्तिस्मा झाला. मग मे २०२२ ला क्रिस्टीनचा बाप्तिस्मा झाला. कुटुंबासोबत राहता यावं म्हणून ती पुन्हा फिलिपीन्झला गेली. क्रिस्टीनने ज्या दोन विद्यार्थ्यांबद्दल मेरीला सांगितलं होतं त्यांनीही बाप्तिस्मा घेतला. याच्या काही महिन्यांनी ॲन्जेलाचा बाप्तिस्मा झाला आणि आता ती पायनियर म्हणून सेवा करत आहे. क्रिस्टीनचा पती जोशूवा आणि त्यांची मुलगी ॲन्ड्रीया यांच्यासोबत इतर विद्यार्थीही चांगली प्रगती करत आहेत.

पहिल्या शतकातल्या बऱ्‍याच लोकांनी येशूबद्दल शिकलेल्या गोष्टी आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना आणि मित्रांना सांगितल्या. (योहा. १:४१, ४२क; प्रे. कार्यं १०:२४, २७, ४८; १६:२५-३३) आपणही आपल्या बायबल विद्यार्थ्यांना आणि आवड दाखवणाऱ्‍या इतर लोकांना हा प्रश्‍न विचारू शकतो: “बायबल अभ्यास करायला आवडेल अशा कोणाला तुम्ही ओळखता का?” या साध्याशा प्रश्‍नाचे जबरदस्त परिणाम पाहून आपल्यालाच आश्‍चर्य वाटेल!

a काही नावं बदलण्यात आली आहेत.