अभ्यास लेख ८
गीत १३० क्षमा करत राहा
यहोवाची क्षमा—अनुकरण कसं कराल?
“यहोवाने जशी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली, तशी तुम्हीही करा.”—कलस्सै. ३:१३.
या लेखात:
आपलं मन दुखावणाऱ्या व्यक्तीला माफ करण्यासाठी आपण कोणती व्यावहारिक पावलं उचलू शकतो ते पाहा.
१-२. (क) आपल्याला क्षमा करायला जास्त कठीण कधी जाऊ शकतं? (ख) क्षमा करायच्या बाबतीत डायनाने चांगलं उदाहरण कसं मांडलं?
तुम्हाला दुसऱ्यांना माफ करायला कठीण जातं का? बऱ्याच जणांना कठीण जातं. समोरची व्यक्ती आपल्याशी खूप वाईट वागते किंवा बोलते, तेव्हा आपल्याला तिला माफ करणं जास्त कठीण जातं. पण आपण अशा भावनांवर मात करू शकतो आणि क्षमा करू शकतो. उदाहरणार्थ, डायना a नावाच्या बहिणीच्या अनुभवाचा विचार करा. तिने ज्या प्रकारे क्षमा केली ती खूप कमालीची गोष्ट होती. २०१७ मध्ये डायना आणि तिचं कुटुंब नवीनच तयार झालेलं यहोवाच्या साक्षीदारांचं जागतिक मुख्यालय पाहायला गेलं होतं. तिथून घरी परत येताना दुसऱ्या एका गाडीच्या चालकाचा ताबा सुटला आणि त्यांचा अपघात झाला. त्यामुळे डायना बेशुद्ध पडली. पण जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिला कळलं, की तिच्या मुलांना गंभीर दुखापत झाली आहे आणि तिचा नवरा ब्रायन याचा अपघातात मृत्यू झालाय. या घटनेचा विचार करून ती म्हणते: “मी आतून पार तुटून गेले होते आणि गोंधळलेल्या अवस्थेत होते.” नंतर डायनाला कळलं की हा अपघात त्या चालकाकडून चुकून झाला होता. पण तरी त्या माणसाबद्दल मनात खूप राग असल्यामुळे तिने तिचं मन शांत ठेवायला यहोवाकडे प्रार्थना केली.
२ ज्या चालकाने त्यांच्या गाडीला ठोकलं होतं, त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला. जर त्याचा हा गुन्हा सिद्ध झाला असता तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली असती. पण कोर्टाने डायनाला सांगितलं की त्या माणसाला शिक्षा होणार की नाही हे तिच्या साक्षीवरून ठरेल. डायना म्हणते: “मला माझ्या आयुष्यातले सगळ्यात वाईट क्षण पुन्हा आठवावे लागणार होते आणि त्याबद्दल बोलावं लागणार होतं. मला असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या जखमा उघडून त्यांवर भरमसाठ मीठ ओतलंय.” याच्या काही आठवड्यांनी कोर्टात साक्ष देण्यासाठी डायना त्याच माणसासमोर बसली होती. याच माणसाने तिच्या कुटुंबाला एवढं दुःख दिलं होतं. मग ती कोर्टात काय म्हणाली? डायनाने जजला त्या माणसाचा गुन्हा माफ करायला सांगितलं. b जेव्हा तिचं हे बोलणं संपलं तेव्हा जजच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले: “मी एवढी २५ वर्षं जज म्हणून काम केलंय, पण मला असा अनुभव कधीच आला नाही. मी कधीच कोणाला असं बोलताना ऐकलं नाही. ज्याचं एवढं मोठं नुकसान झालंय, तोच गुन्हेगारासाठी दयेची भीख मागतोय, हा प्रकार मी पहिल्यांदाच पाहतोय. अशा प्रकारचं प्रेम आणि दया मी कधीच पाहिली नाही.”
३. डायनाला कोणत्या गोष्टीमुळे क्षमा करता आली?
३ कोणत्या गोष्टीमुळे डायनाला क्षमा करायला मदत झाली? यहोवा आपल्याला कशी क्षमा करतो यावर तिने मनन केलं. (मीखा ७:१८) जेव्हा आपण यहोवाने केलेल्या क्षमेची कदर करतो, तेव्हा आपणही इतरांना क्षमा करायला प्रवृत्त होतो.
४. आपण काय करावं अशी यहोवाची इच्छा आहे? (इफिसकर ४:३२)
४ यहोवा इतरांना जशी मोठ्या मनाने क्षमा करतो तशीच आपणही करावं अशी त्याची इच्छा आहे. (इफिसकर ४:३२ वाचा.) आपलं मन दुखावणाऱ्याला आपण माफ करायला तयार असावं अशी अपेक्षा तो आपल्याकडून करतो. (स्तो. ८६:५; लूक १७:४) या लेखात आपण तीन गोष्टींवर विचार करणार आहोत. त्यांमुळे आपल्याला आणखी मोठ्या मनाने क्षमा करायला मदत होईल.
तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका
५. जर कोणी आपलं मन दुखावलं तर नीतिवचनं १२:१८ प्रमाणे आपल्याला कदाचित कसं वाटू शकतं?
५ कदाचित कोणी असं काहीतरी बोलेल किंवा वागेल, ज्यामुळे आपल्याला खूप वाईट वाटू शकतं; खासकरून ती व्यक्ती जवळची असते तेव्हा. (स्तो. ५५:१२-१४) त्या वेळी जो त्रास होतो तो कधीकधी वार केल्यासारखा वाटू शकतो. (नीतिवचनं १२:१८ वाचा.) कदाचित आपण त्या भावना दाबायचा किंवा त्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करू. पण असं करणं हे जणू शरीरात भोसकलेला सुरा तशाच अवस्थेत ठेवण्यासारखं असू शकतं. त्याचप्रमाणे, आपण जर आपल्या भावनांकडे दुर्लक्ष केलं, तर आपलं दुखावलेलं मन आपोआप बरं होईल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही.
६. कोणी आपलं मन दुखावतं, तेव्हा कदाचित आपण कसं वागू?
६ जेव्हा कोणी आपलं मन दुखावतं, तेव्हा कदाचित आपल्याला लगेच राग येऊ शकतो. बायबल सांगतं की राग येणं साहजिकच आहे, पण ते अशी ताकीद देतं की आपण त्या भावनेला स्वतःवर हावी होऊ देऊ नये. (स्तो. ४:४; इफिस. ४:२६) का बरं? कारण आपल्या भावनांमुळे सहसा आपल्या हातून काहीतरी होऊ शकतं. आणि रागामुळे तर क्वचितच चांगल्या गोष्टी घडतात. (याको. १:२०) लक्षात ठेवा की राग येणं ही एक प्रतिक्रिया आहे, पण राग धरून ठेवणं ही एक निवड आहे.
राग येणं ही एक प्रतिक्रिया आहे, पण राग धरून ठेवणं ही एक निवड आहे
७. जेव्हा कोणी आपल्याला दुखावतं, तेव्हा आपल्याला आणखी कोणता भावनिक त्रास होऊ शकतो?
७ जेव्हा आपल्याशी कोणी वाईट वागतं तेव्हा आपल्याला आणखी कोणता भावनिक त्रास सहन करावा लागू शकतो? उदाहरणार्थ, ॲन नावाची एक बहीण म्हणते: “मी लहान असताना माझ्या वडिलांनी माझ्या आईला सोडून दिलं आणि त्यांनी माझा सांभाळ करणाऱ्या स्त्रीबरोबर लग्न केलं. त्या वेळी त्यांनी मला एकटं टाकून दिलंय असं वाटलं. जेव्हा त्यांना मुलं झाली तेव्हा त्या मुलांनी माझी जागा घेतली आहे असं मला वाटलं. मी आता नकोशी झाली आहे, या भावनेनेच मी लहानाची मोठी झाले.” जॉर्जेट नावाच्या बहिणीचा नवरा जेव्हा तिच्याशी अविश्वासूपणे वागला, तेव्हा तिला कसं वाटलं त्याबद्दल ती सांगते: “आम्ही लहानपणापासून मित्र होतो. आम्ही सोबत मिळून पायनियर सेवासुद्धा केली होती. पण जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा मी आतून पार खचून गेले.” नेओमी नावाची आणखी एक बहीण म्हणते: “मी कधी विचारच केला नव्हता की माझा नवरा मला दुखावेल. पण तो पोर्नोग्राफी पाहत होता आणि माझ्यापासून लपवत होता, हे जेव्हा त्याने कबूल केलं तेव्हा त्याने मला फसवलंय आणि माझा विश्वासघात केलाय असं मला वाटलं.”
८. (क) आपण इतरांना क्षमा का केली पाहिजे? (ख) जेव्हा आपण इतरांना क्षमा करतो तेव्हा त्याचे काय फायदे होतात? (“ मनावर खूप मोठा आघात झाल्यावर काय करावं?” ही चौकट पाहा.)
८ दुसरे लोक आपल्याला काय म्हणतात किंवा आपल्यासोबत काय करतात हे आपल्या हातात नसतं. पण आपली प्रतिक्रिया काय असणार हे मात्र आपल्या हातात असतं. आणि क्षमा करणं ही सहसा सगळ्यात चांगली प्रतिक्रिया असते. का बरं? कारण आपलं यहोवावर प्रेम आहे. आणि त्याची इच्छा आहे की आपण दुसऱ्यांना क्षमा करावी. आपण जर राग धरून बसलो आणि क्षमा केली नाही, तर आपल्या हातून एखादी मूर्खपणाची गोष्ट घडू शकते. आणि यामुळे आपल्याच आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. (नीति. १४:१७, २९, ३०) क्रिस्टिन नावाच्या एका बहिणीचं उदाहरण लक्षात घ्या. ती म्हणते: “जेव्हा माझ्या मनात राग असतो किंवा माझं मन नाराज असतं, तेव्हा मी शांत-शांतच राहते. नीट खातपीत नाही. नीट झोपतही नाही. आणि मग मला माझ्या भावनांवर ताबा मिळवायला जास्तच कठीण होऊन बसतं. याचा परिणाम माझ्या नवऱ्यासोबतच्या आणि दुसऱ्यांसोबतच्या वागण्या-बोलण्यावर होतो.”
९. आपण आपला राग सोडून का दिला पाहिजे?
९ आपलं मन दुखावणारी व्यक्ती जरी तिच्या चुका कबूल करत नसली, तरी आपल्याला झालेलं नुकसान आपण कमी करू शकतो. ते कसं? सुरुवातीला उल्लेख केलेली जॉर्जेट म्हणते: “घटस्फोट झाल्यावरही माझ्या मनात नवऱ्याबद्दल राग आणि संताप होताच. तो जाऊ देण्यासाठी मला थोडा वेळ लागला खरा, पण असं केल्यामुळे माझं मन एकदम शांत झालं.” जेव्हा आपण आपला राग सोडून देतो तेव्हा मनातल्या कडवटपणामुळे आपण स्वतःचं नुकसान होऊ देत नाही. त्यासोबतच आपण त्याचत्याच गोष्टींवर विचार करत नाही आणि आयुष्यात पुढे वाटचाल करतो. अशा प्रकारे आपण स्वतःलाच एक भेट देत असतो. (नीति. ११:१७) पण एवढं करूनही इतरांना माफ करणं आपल्याला कठीण जात असेल, तर काय?
आपल्या भावनांवर ताबा मिळवा
१०. आपण स्वतःला भावनिक रित्या बरं व्हायला वेळ का दिला पाहिजे? (चित्रंसुद्धा पाहा.)
१० एखाद्याबद्दल राग किंवा नाराजी धरून राहायचं टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? एक मार्ग म्हणजे, स्वतःला सावरण्यासाठी वेळ द्या. जसं, गंभीरपणे जखमी झालेल्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार मिळाल्यानंतर बरं व्हायला वेळ लागतो. त्याच प्रकारे आपलं मन दुखावणाऱ्या व्यक्तीला माफ करण्याआधी आपल्याला भावनिक रित्या बरं व्हायला वेळ लागू शकतो.—उप. ३:३; १ पेत्र १:२२.
११. तुम्हाला प्रार्थनेमुळे क्षमा करायला कशी मदत होऊ शकते?
११ यहोवाने इतरांना क्षमा करण्यासाठी आपल्याला मदत करावी म्हणून त्याला प्रार्थना करा. c प्रार्थनेमुळे आपल्याला कशी मदत झाली याबद्दल सुरुवातीला उल्लेख केलेली ॲन म्हणते: “आम्ही एकमेकांना ज्या चुकीच्या गोष्टी बोललो आणि एकमेकांशी ज्या चुकीच्या पद्धतीने वागलो, त्याबद्दल यहोवाने आमच्यापैकी प्रत्येकाला माफ करावं अशी मी त्याला प्रार्थना केली. मग मी माझ्या वडिलांना आणि त्यांच्या पत्नीला पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की मी त्यांना माफ केलंय.” ॲन म्हणते की हे सगळं करणं सोपं नव्हतं. पण ती पुढे म्हणते: “मला आशा आहे की क्षमा करण्याच्या बाबतीत यहोवासारखं वागल्यामुळे माझ्या वडिलांना आणि त्यांच्या पत्नीला यहोवाबद्दल आणखीन शिकून घ्यायला मदत होईल.”
१२. आपण भावनांच्या आहारी जाण्याऐवजी यहोवावर भरवसा का ठेवला पाहिजे? (नीतिवचनं ३:५, ६)
१२ आपल्या भावनांच्या आहारी जाऊ नका, तर यहोवावर भरवसा ठेवा. (नीतिवचनं ३:५, ६ वाचा.) आपल्यासाठी काय चांगलं आहे हे यहोवाला नेहमी माहीत असतं. (यश. ५५:८, ९) आपलं नुकसान होईल अशी गोष्ट तो कधीच आपल्याला करायला सांगणार नाही. त्यामुळे जेव्हा तो आपल्याला माफ करण्याचं प्रोत्साहन देतो, तेव्हा आपण खातरी बाळगू शकतो की त्यामुळे आपल्याला नेहमी फायदाच होईल. (स्तो. ४०:४; यश. ४८:१७, १८) दुसरीकडे आपण जर आपल्या भावनांच्या आहारी गेलो, तर आपण कधीच समोरच्या व्यक्तीला माफ करू शकणार नाही. (नीति. १४:१२; यिर्म. १७:९) आधी उल्लेख केलेली नेओमी म्हणते: “मला सुरुवातीला वाटायचं की मी माझ्या पतीला माफ केलं नाही हे बरंच केलं. मला भीती होती की तो परत पोर्नोग्राफी पाहील आणि माझं मन दुखावेल किंवा त्याने माझं किती नुकसान केलंय हे तो विसरेल. मला वाटायचं की यहोवाला माझ्या भावना कळत आहेत. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की यहोवाला जरी माझ्या भावना कळत असल्या तरी माझ्याशी तो सहमत असेलच असं नाही. मला नेमकं कसं वाटतंय आणि मला सावरायला वेळ लागेल हे तर यहोवाला माहीत आहे, पण मी माझ्या नवऱ्याला क्षमा करावी अशीही त्याची इच्छा आहे.” d
मनात चांगल्या भावना निर्माण करा
१३. रोमकर १२:१८-२१ प्रमाणे आपल्याला काय करायची गरज आहे?
१३ आपलं मन दुखावणाऱ्या व्यक्तीला जेव्हा आपण माफ करतो, तेव्हा आपण त्या विषयावर कदाचित तिच्याशी बोलायचं टाळू. पण फक्त माफ करणंच पुरेसं नाही. आपलं मन दुखावणारी व्यक्ती जर आपला ख्रिस्ती भाऊ किंवा बहीण असली, तर तिच्यासोबत समेट करणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. (मत्त. ५:२३, २४) अशा प्रकारे आपण राग धरण्याऐवजी दया दाखवतो आणि नाराज राहण्याऐवजी माफ करायची निवड करत असतो. (रोमकर १२:१८-२१ वाचा; १ पेत्र ३:९) पण यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत होईल?
१४. आपण काय करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि का?
१४ आपलं मन दुखावणाऱ्या व्यक्तीकडे आपण यहोवाच्या नजरेने पाहायचा प्रयत्न केला पाहिजे. यहोवा लोकांमध्ये चांगल्या गोष्टी पाहायची निवड करतो. (२ इति. १६:९; स्तो. १३०:३) आपण लोकांमध्ये सहसा जे पाहायची निवड करतो, तेच आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतं; मग ते चांगलं असो किंवा वाईट. जेव्हा आपण लोकांमध्ये चांगल्या गोष्टी पाहतो, तेव्हा आपल्याला त्यांना माफ करणं जास्त सोपं जातं. उदाहरणार्थ, जॅरेड नावाचा एक भाऊ म्हणतो: “जेव्हा मी एका भावाने केलेल्या चुकीची तुलना त्याच्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांच्या लांबलचक यादीशी करतो, तेव्हा मला त्याला माफ करायला सोपं जातं.”
१५. तुम्ही समोरच्या व्यक्तीला माफ केलंय, हे तिला बोलून दाखवल्यामुळे काय फायदा होऊ शकतो?
१५ आपण आणखी एक महत्त्वाची गोष्ट करायचा प्रयत्न केला पाहिजे. ती म्हणजे समोरच्या व्यक्तीला ‘मी तुला माफ केलंय,’ हे बोलून दाखवणं. हे इतकं महत्त्वाचं का आहे? सुरुवातीला उल्लेख केलेली नेओमी काय म्हणते त्याकडे लक्ष द्या: “माझ्या नवऱ्याने मला विचारलं, ‘तू खरंच मला माफ केलंय का?’ आणि मी जेव्हा ‘हो, मी तुला माफ केलंय,’ असं बोलायचा प्रयत्न केला, तेव्हा मला ते बोलताच आलं नाही. माझ्या लक्षात आलं, की मी अजूनही त्याला क्षमा केलेलीच नव्हती. पण काही काळानंतर मला ते जबरदस्त शब्द बोलता आले. आणि ते ऐकल्यावर त्याला आपले अश्रूच आवरता आले नाहीत. आमचं बोलणं झाल्यावर त्याला आणि मलाही किती बरं वाटलं याचं मला आश्चर्य झालं. तेव्हापासून मी त्याच्यावर पुन्हा भरवसा ठेवायला शिकले आणि आता आम्ही पुन्हा चांगले मित्र आहोत.”
१६. क्षमा करण्याबद्दल तुम्हाला काय शिकायला मिळालं?
१६ इतरांना माफ करणं आपल्याला कितीही कठीण वाटत असलं, तरी आपण त्यांना माफ करावं अशी यहोवाची इच्छा आहे. (कलस्सै. ३:१३) त्यासाठी आपण आपल्या भावनांकडे दुर्लक्ष न करता त्यांवर ताबा मिळवला पाहिजे आणि इतरांबद्दल मनात चांगल्या भावना निर्माण केल्या पाहिजेत.—“ क्षमा करण्यासाठी तीन पावलं” ही चौकट पाहा.
क्षमा केल्यामुळे होणाऱ्या फायद्यांवर लक्ष द्या
१७. आपण इतरांना क्षमा का केली पाहिजे?
१७ आपलं मन दुखावणाऱ्याला क्षमा करायची आपल्याकडे बरीच कारणं आहेत. यांपैकी काही कारणांचा विचार करा. पहिलं, क्षमा केल्यामुळे आपण आपल्या दयाळू पित्याचं, यहोवाचं अनुकरण करून त्याला खूश करत असतो. (लूक ६:३६) दुसरं, त्याने केलेल्या क्षमेबद्दल आपण कदर असल्याचं दाखवत असतो. (मत्त. ६:१२) आणि तिसरं, त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि इतरांसोबतची आपली नाती आणखी घट्ट होतात.
१८-१९. क्षमा केल्यामुळे काय होऊ शकतं?
१८ आपण जेव्हा दुसऱ्यांना माफ करतो, तेव्हा आपल्याला अनपेक्षित आशीर्वाद मिळू शकतात. उदाहरणार्थ, आधी सांगितलेल्या डायना नावाच्या बहिणीच्या बाबतीत काय झालं याचा विचार करा. ज्या माणसामुळे अपघात झाला होता, त्याने खटला संपल्यावर खरंतर आत्महत्या करायचा विचार केला होता. आणि ही गोष्ट डायनाला त्या वेळी माहीत नव्हती. पण तिने दया दाखवल्यामुळे आणि त्याला माफ केल्यामुळे त्याच्यावर इतका जबरदस्त प्रभाव पडला, की त्याने नंतर यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करायला सुरुवात केली.
१९ इतरांना माफ करणं आपल्याला कदाचित सगळ्यात कठीण जाऊ शकतं. पण हीच गोष्ट सगळ्यात जास्त समाधान देणारी ठरू शकते. (मत्त. ५:७) म्हणून यहोवाच्या क्षमेचं अनुकरण करायचा आपण सगळे जण होता होईल तितका प्रयत्न करत राहू या!
गीत १२५ जे दयाळू ते सुखी
a काही नावं बदलण्यात आली आहेत.
b अशा परिस्थितीत, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने काय करावं याबद्दल तिने वैयक्तिक निर्णय घेतला पाहिजे.
c jw.org वर असलेली ही खास गीतं पाहा, “नाते पुन्हा जोडू मित्रा,” “एक-दूसरे को माफ करें” आणि “दिल से माफ करूँ.”
d एखाद्याने पोर्नोग्राफी पाहणं पाप आहे आणि त्याच्या जोडीदाराला यामुळे त्रास होतो. असं असलं तरी, निर्दोष जोडीदाराकडे या कारणासाठी त्याला घटस्फोट द्यायचा शास्त्रीय आधार नाही.