व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ७

गीत १५ याहाचा जो एकुलता त्याची स्तुती करा

यहोवाची क्षमा—तुमच्यासाठी काय अर्थ होतो?

यहोवाची क्षमा—तुमच्यासाठी काय अर्थ होतो?

“तू खरोखर त्यांच्या पापांची क्षमा करतोस.”स्तो. १३०:४.

या लेखात:

बायबलमध्ये बरीच सुंदर शब्दचित्रं आहेत. या शब्दचित्रांचं परीक्षण केल्यामुळे यहोवा आपल्याला ज्या खास पद्धतीने क्षमा करतो त्याबद्दलची आपली कदर कशी वाढवता येईल ते पाहा.

१. “मी तुला माफ केलंय,” असं कोणी म्हणतं तेव्हा त्याचा नेमका अर्थ समजून घ्यायला अवघड का जातं?

 “मी तुला माफ केलंय,” असं कोणी म्हणतं तेव्हा आपल्याला खरंच खूप बरं वाटतं. खासकरून जेव्हा आपल्याला माहीत असतं की आपल्या वागण्या-बोलण्यामुळे आपण त्या व्यक्‍तीचं मन दुखावलंय. पण “मी तुला माफ केलंय” असं जेव्हा ती व्यक्‍ती म्हणते तेव्हा तिला नेमकं काय म्हणायचंय ते समजून घेणं थोडं अवघड असतं. कारण तिला कदाचित असं म्हणायचं असेल, की ‘आपली मैत्री अजूनही पूर्वीसारखीच आहे.’ किंवा मग तिला असं म्हणायचं असेल, की ‘याबद्दल आता मला आणखी काही बोलायचं नाही, पण आपली मैत्रीसुद्धा पूर्वीसारखी राहिलेली नाही.’ थोडक्यात, आपल्याला जेव्हा कोणी असं म्हणतं की मी तुला माफ केलंय तेव्हा त्याचे बरेच अर्थ निघू शकतात.

२. बायबलमध्ये यहोवाच्या क्षमेचं वर्णन कसं करण्यात आलंय? (तळटीपसुद्धा पाहा.)

यहोवा जसं अपरिपूर्ण मानवांना क्षमा करतो आणि आपण जसं एकमेकांना क्षमा करतो त्यात खूप फरक आहे. यहोवा ज्या प्रकारे आपल्याला क्षमा करतो, तसं इतर कोणीच करू शकत नाही. स्तोत्रकर्ता यहोवाबद्दल असं म्हणाला: “लोकांनी तुझं भय मानावं म्हणून, तू खरोखर त्यांच्या पापांची क्षमा करतोस.” a (स्तो. १३०:४) यावरून कळतं की यहोवाच असा आहे जो खऱ्‍या अर्थाने क्षमा करू शकतो. दुसऱ्‍या शब्दांत, क्षमा करण्याचा नेमका अर्थ काय असला पाहिजे हे तोच ठरवतो. बायबलच्या लेखकांनी हिब्रू शास्त्रवचनांत काही ठिकाणी क्षमेसाठी असा शब्द वापरलाय जो माणसांच्या क्षमेचं वर्णन करण्यासाठी कधीच वापरण्यात आला नाही.

३. यहोवाचं क्षमा करणं हे माणसांपेक्षा कसं वेगळं आहे? (यशया ५५:६, ७)

जेव्हा यहोवा एखाद्याला क्षमा करतो, तेव्हा त्या व्यक्‍तीचं पाप पुसून टाकलं जातं. तसंच, यहोवाचं त्याच्यासोबतचं बिघडलेलं नातं पुन्हा पूर्वीसारखं होतं. खरंच यहोवा पुन्हापुन्हा आणि अगदी पूर्णपणे क्षमा करतो याबद्दल आपण त्याचे खूप आभारी आहोत.—यशया ५५:६, ७ वाचा.

४. क्षमा करण्याचा नेमका काय अर्थ होतो हे समजून घेण्यासाठी यहोवा आपल्याला कशी मदत करतो?

यहोवा जशी क्षमा करतो आणि आपण जशी क्षमा करतो यात जर बराच फरक आहे, तर मग आपल्यासारखी अपरिपूर्ण माणसं क्षमा करायचा खरा अर्थ कसा समजू शकतील? यहोवाने बायबलमध्ये अशी बरीच शब्दचित्रं दिली आहेत, ज्यांमुळे आपल्याला तो कशा प्रकारे क्षमा करतो हे समजून घेता येईल. या लेखात आपण त्यातल्या काही शब्दचित्रांवर चर्चा करणार आहोत. त्यामुळे यहोवा आपलं पाप कसं दूर करतो आणि त्याच वेळी तो त्याच्यासोबत आपलं बिघडलेलं नातं पुन्हा पूर्वीसारखं कसं करतो हे आपल्याला समजून घेता येईल. या शब्दचित्रांवर चर्चा केल्यामुळे, आपल्याला बऱ्‍याच मार्गांनी क्षमा करणाऱ्‍या आपल्या दयाळू आणि कृपाळू पित्याबद्दल आपलं प्रेम आणि कदर आणखी वाढेल.

यहोवा आपलं पाप आपल्यापासून दूर करतो

५. यहोवा आपल्या पापांची क्षमा करतो तेव्हा काय होतं?

बायबलमध्ये बऱ्‍याच वेळा पापांची तुलना जड ओझ्याशी करण्यात आली आहे. दावीद राजाने स्वतःच्या पापांबद्दल असं म्हटलं: “माझ्या अपराधांची रास माझ्या डोक्याच्याही वर गेली आहे. त्यांचं भयानक ओझं आता मला सहन होत नाही.” (स्तो. ३८:४) पण पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांच्या पापांची यहोवा क्षमा करतो. (स्तो. २५:१८; ३२:५) “क्षमा” असं भाषांतर केलेल्या हिब्रू शब्दाचा मूळ अर्थ “उचलणं” किंवा “घेऊन जाणं” असा होतो. या शब्दांवरून आपण अशी कल्पना करू शकतो, की यहोवा एका बलवान माणसासारखा आहे. तो एका अर्थाने पापाचं ओझं आपल्या सगळ्यांच्या खांद्यांवरून उचलून दूर घेऊन जातो.

“क्षमा केलीस” (स्तो. ३२:५)


६. यहोवा आपली पापं आपल्यापासून किती दूर नेतो?

आणखी एका शब्दचित्रावरून दिसतं की यहोवा आपली पापं आपल्यापासून किती दूर नेऊ शकतो. स्तोत्र १०३:१२ म्हणतं: “पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितकेच त्याने आपले अपराध आपल्यापासून दूर केले आहेत.” पश्‍चिमेपासून पूर्व सगळ्यात दूर आहे. या दोन दिशा कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. दुसऱ्‍या शब्दांत, यहोवा आपली पापं आपण कल्पनाही करू शकत नाही, इतक्या दूर नेतो. यावरून आपल्याला ही खातरी मिळते की यहोवा आपल्या पापांची पूर्णपणे क्षमा करतो.

“पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे” (स्तो. १०३:१२)


७. यहोवा आपल्या पापांची जशी क्षमा करतो त्याबद्दल बायबलमध्ये काय सांगण्यात आलंय? (मीखा ७:१८, १९)

यहोवा आपली पापं लाक्षणिक अर्थाने आपल्यापासून दूर करतो, पण तरी तो ती लक्षात ठेवतो का? नाही. हिज्कीया राजाने यहोवाबद्दल म्हटलं: “माझे सगळे अपराध तू पाठीमागे टाकलेस.” किंवा जसं तळटीपमध्ये सांगितलंय: “माझे सगळे अपराध तू नजरेपासून दूर केले आहेत.” (यश. ३८:९, १७; तळटीप) या शब्दचित्रावरून कळतं की यहोवा पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांची पापं दूर फेकून देऊन ती नजरेआड करतो. वचनातल्या वाक्याचं अशा प्रकारेही भाषांतर केलं जाऊ शकतं: “तू माझ्या पापांकडे ती जणू कधी घडलीच नव्हती अशा प्रकारे बघतो.” तसंच, मीखा ७:१८, १९ (वाचा.) या वचनांत आणखी एका शब्दचित्राद्वारे हा मुद्दा स्पष्ट करण्यात आलाय. या वचनांत सांगितल्याप्रमाणे यहोवा आपली पापं खोल समुद्रात टाकून देतो. जुन्या काळात जेव्हा एखादी वस्तू समुद्रात फेकली जायची तेव्हा ती पुन्हा मिळवणं अशक्यच होतं.

“माझे सगळे अपराध तू पाठीमागे टाकलेस” (यश. ३८:१७)

“तू आमची सर्व पापं खोल समुद्रात टाकून देशील” (मीखा ७:१९)


८. आत्तापर्यंत आपण काय शिकलो?

या सगळ्या शब्दचित्रांमधून आपण शिकलो की यहोवा जेव्हा माफ करतो, तेव्हा तो आपल्याला आपल्या पापांच्या ओझ्यापासून मुक्‍त करतो. दावीदने म्हटलं: “सुखी आहेत ते, ज्यांच्या अपराधांची क्षमा करण्यात आली आहे आणि ज्यांची पापं झाकण्यात आली आहेत. सुखी आहे तो माणूस, ज्याच्या पापांचा यहोवा हिशोब ठेवत नाही.” (रोम. ४:७, ८) यालाच खऱ्‍या अर्थाने क्षमा करणं म्हणतात!

यहोवा आपली पापं पुसून टाकतो

९. यहोवा आपल्याला कितपत क्षमा करतो हे समजावून सांगायला त्याने कोणती शब्दचित्रं वापरली?

यहोवा खंडणीद्वारे पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांची पापं कशी माफ करतो हे समजावून सांगण्यासाठी बायबलमध्ये इतरही काही शब्दचित्रं वापरली आहेत. जसं की यहोवा आपली पापं धुतो आणि पुसून टाकतो. यामुळे पाप करणारा माणूस शुद्ध होतो. (स्तो. ५१:७; यश. ४:४; यिर्म. ३३:८) असं केल्यामुळे काय परिणाम होतात याबद्दल स्वतः यहोवा सांगतो: “तुमची पापं रक्‍तासारखी लाल असली, तरी ती बर्फासारखी शुभ्र केली जातील; ती किरमिजी रंगाच्या कापडासारखी लालभडक असली, तरी ती लोकरीसारखी पांढरी होतील.” (यश. १:१८) एखाद्या कपड्याला जर रक्‍तासारखा लाल किंवा किरमिजी रंगाचा डाग लागला, तर तो स्वच्छ करणं खूप कठीण असतं. पण तरी या शब्दचित्रातून यहोवा आपल्याला खातरी देतो की आपली पापं अशा पद्धतीने धुतली जातील की ती पूर्णपणे नाहीशी होतील.

“तुमची पापं रक्‍तासारखी लाल असली, तरी ती बर्फासारखी शुभ्र केली जातील” (यश. १:१८)


१०. यहोवा किती उदारतेने आपल्याला माफ करतो हे समजावण्यासाठी तो आणखी कोणतं शब्दचित्र वापरतो?

१० या आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे पापांची तुलना ‘कर्जांसोबतसुद्धा’ केली जाऊ शकते. (मत्त. ६:१२; लूक ११:४) म्हणजे आपण जेव्हाजेव्हा यहोवाच्या विरोधात पाप करतो, तेव्हातेव्हा आपल्यावरचं कर्ज आणखी वाढतच जातं. पण जेव्हा यहोवा आपल्याला माफ करतो तेव्हा जणू काय तो ते मोठं कर्ज पूर्णपणे रद्द करतो. त्याने जर तसं केलं नसतं तर ते कर्ज आपल्या नावावर जमा झालं असतं. पण यहोवा माफ केलेल्या पापांची कधीच भरपाई मागत नाही. खरंच, एखाद्या माणसाचं कर्ज जेव्हा माफ होतं तेव्हा त्याला जसा आनंद होतो, तसा आनंद यहोवाने आपली पापं माफ केल्यावर आपल्याला होतो.

“आमची कर्जं माफ कर” (मत्त. ६:१२)


११. आपली “पापं पुसून टाकली” जातात असं बायबल जेव्हा म्हणतं तेव्हा त्याचा काय अर्थ होतो? (प्रेषितांची कार्यं ३:१९)

११ यहोवा आपली कर्जं किंवा पापं फक्‍त माफच करत नाही, तर ती पूर्णपणे पुसून टाकतो. (प्रेषितांची कार्यं ३:१९ वाचा.) हे समजून घेण्यासाठी अशी कल्पना करा की तुम्ही एका माणसाकडून कर्ज घेतलंय. पण तो त्या कर्जाच्या किंमतीवर फुली मारतो. त्याने फुली मारलेली असली, तरी त्याखालचे आकडे दिसत असतात. पण एखादी लिहिलेली गोष्ट पुसून टाकणं यापेक्षा खूप वेगळं आहे. हे शब्दचित्र समजून घ्यायला आपण जुन्या काळात ज्या प्रकारची शाई वापरली जायची त्याचा विचार करू या. त्या शाईने जे काही लिहिलं जायचं ते पाण्याने पुसून टाकता यायचं. त्यामुळे एक व्यक्‍ती सहज ओलं कापड घेऊन लिहिलेलं सगळं काही पुसून टाकू शकत होती. जेव्हा एखादं कर्ज ‘पुसून टाकलं’ जायचं, तेव्हा ते पूर्णपणे नाहीसं व्हायचं; जणू ते कर्ज कधी घेतलंच नव्हतं. यहोवा आपली पापं फक्‍त माफच करत नाही, तर तो ती पूर्णपणे पुसून टाकतो. हे समजल्यामुळे आपल्याला खरंच किती बरं वाटतं!—स्तो. ५१:९.

“म्हणजे तुमची पापं पुसून टाकली जातील” (प्रे. कार्यं ३:१९)


१२. दाट ढगाच्या शब्दचित्रावरून आपल्याला काय शिकायला मिळतं?

१२ यहोवा आपली पापं कशी पुसून टाकतो याचं वर्णन करण्यासाठी त्याने यासारख्याच आणखी एका शब्दचित्राचा वापर केलाय. तो म्हणतो: “मी तुझे अपराध पुसून टाकीन, आणि तुझी पापं दाट ढगाने झाकून टाकीन.” (यश. ४४:२२) जेव्हा यहोवा आपल्याला क्षमा करतो, तेव्हा ती पापं नजरेआड व्हावीत म्हणून यहोवा जणू ती दाट ढगाने झाकून टाकतो.

“मी तुझे अपराध . . . दाट ढगाने झाकून टाकीन” (यश. ४४:२२)


१३. यहोवा जेव्हा आपल्या पापांची क्षमा करतो तेव्हा आपल्याला कसं वाटतं?

१३ या शब्दचित्रांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? जेव्हा यहोवा आपल्या पापांची क्षमा करतो, तेव्हा अशा पापांचं ओझं आपल्याला आयुष्यभर सहन करायची गरज पडत नाही. कारण येशू ख्रिस्ताच्या रक्‍ताद्वारे आपली पापं पूर्णपणे रद्द केली जातात. त्या कर्जांची नोंदसुद्धा ठेवली जात नाही. जेव्हा आपण आपल्या पापांबद्दल पश्‍चात्ताप करतो, तेव्हा यहोवा अशा प्रकारे आपल्याला क्षमा करतो.

यहोवा आपल्यासोबतचं नातं पुन्हा पहिल्यासारखं करतो

आपला स्वर्गातला पिता आपल्याला माफ करतो, तेव्हा आपल्याला त्याच्यासोबत एक चांगलं नातं जोडता येतं (परिच्छेद १४ पाहा)


१४. यहोवा आपल्याला पूर्णपणे माफ करेल असा भरवसा आपण का ठेवू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)

१४ यहोवा जेव्हा आपल्याला खऱ्‍या अर्थाने माफ करतो, तेव्हा त्याच्यासोबतचं आपलं नातं पुन्हा पहिल्यासारखं होईल अशी खातरी आपण ठेवू शकतो. शिवाय, यामुळे आपल्याला अपराधीपणाच्या भावनेवर मात करायला मदत होते. यहोवा आपल्याबद्दल राग बाळगून असेल आणि पुढे कधी न कधी त्याबद्दल आपल्याला शिक्षा करेल या भीतीने आपल्याला घाबरायची गरज नाही. कारण तसं कधीच होणार नाही. यहोवा आपल्याला क्षमा करेल असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा आपण त्याच्यावर भरवसा ठेवू शकतो. का बरं? यहोवाने यिर्मया संदेष्ट्याला सांगितलं: “मी त्यांचे अपराध माफ करीन, आणि त्यांची पापं पुन्हा कधीच लक्षात ठेवणार नाही.” (यिर्म. ३१:३४) या शब्दांचा संदर्भ घेऊन प्रेषित पौलनेसुद्धा म्हटलं: “[मी] त्यांची पापं पुन्हा कधीच आठवणीत आणणार नाही. (इब्री ८:१२) पण याचा नेमका काय अर्थ होतो?

“[मी] त्यांची पापं पुन्हा कधीच लक्षात ठेवणार नाही” (यिर्म. ३१:३४)


१५. यहोवा आपली पापं कधीच आठवणार नाही याचा काय अर्थ होतो?

१५ आपल्याला माहीत आहे, की ‘आठवणीत ठेवणं’ म्हणजे लक्षात ठेवणं किंवा कशाचातरी विचार करणं. पण बायबलमध्ये आठवणीत ठेवण्याचा अर्थ नेहमी असाच होत नाही. तर या शब्दांचा अर्थ काहीतरी पाऊल उचलणं असासुद्धा होऊ शकतो. येशूच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या शेजारी असलेल्या गुन्हेगाराने त्याला म्हटलं: “येशू, तू राजा होशील तेव्हा माझी आठवण ठेव.” (लूक २३:४२, ४३) इथे तो येशूला फक्‍त असं म्हणत नव्हता, की ‘तू राजा होशील तेव्हा माझ्याबद्दल विचार कर.’ उलट येशूने काहीतरी करावं असं त्याला वाटत होतं. कारण येशूने ज्या प्रकारे त्याला उत्तर दिलं त्यावरून कळतं, की या गुन्हेगाराचं पुनरुत्थान करण्यासाठी येशू पाऊल उचलणार होता. म्हणून जेव्हा यहोवा आपल्याला असं म्हणतो, की तो आपली पापं कधीच आठवणीत ठेवणार नाही, तेव्हा तो त्या पापांसाठी भविष्यात आपल्याविरुद्ध कोणतंही पाऊल उचलणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. दुसऱ्‍या शब्दांत, त्याने आपली पापं माफ केली म्हणजे तो भविष्यात आपल्याला कधीच शिक्षा देणार नाही.

१६. खऱ्‍या अर्थाने क्षमा मिळाल्यामुळे जे स्वातंत्र्य मिळतं त्याचं वर्णन बायबलमध्ये कसं करण्यात आलंय?

१६ खऱ्‍या अर्थाने क्षमा केल्यामुळे मिळणारं स्वातंत्र्य काय असतं हे समजून घेण्यासाठी बायबलमध्ये आणखी एक शब्दचित्र वापरण्यात आलंय. आपल्या पापी स्वभावामुळे आणि प्रवृत्तीमुळे आपल्याला “पापाचे दास” म्हटलंय. पण यहोवाने क्षमा केल्यामुळे आपण “पापापासून मुक्‍त” होतो. यासाठी आपण यहोवाचे किती आभार मानले पाहिजेत! (रोम. ६:१७, १८; प्रकटी. १:५) खरंच, यहोवाच्या क्षमेमुळे आपण पापाच्या गुलामीतून मुक्‍त झालो ही भावनाच किती सुखावणारी आहे!

“तुम्हाला पापापासून मुक्‍त करण्यात” आलंय (रोम. ६:१८)


१७. यहोवाच्या क्षमेमुळे आपण बरे कसे होतो? (यशया ५३:५)

१७ यशया ५३:५ वाचा. शेवटी आपण आणखी एका शब्दचित्राचा विचार करू या. या शब्दचित्रात आपली तुलना जीवघेणा आजार झालेल्या लोकांशी केली आहे. यहोवाने त्याच्या मुलाद्वारे दिलेल्या खंडणी बलिदानामुळे आपण या लाक्षणिक आजारातून बरं होतो असं म्हटलंय. (१ पेत्र २:२४) आध्यात्मिक आजारपणामुळे यहोवासोबतचं बिघडलेलं आपलं नातं या खंडणीमुळे पुन्हा चांगलं होतं. एक व्यक्‍ती जेव्हा गंभीर आजारातून बरी होते, तेव्हा तिला खूप आनंद होतो. त्याचप्रमाणे यहोवाची क्षमा मिळाल्यामुळे आपण आध्यात्मिक रितीने पुन्हा बरं होतो आणि आपल्याला त्याची मर्जी पुन्हा मिळवता येते. त्यामुळे आपल्यालासुद्धा त्या व्यक्‍तीसारखाच आनंद होतो.

“त्याला झालेल्या जखमांमुळे आम्ही बरे झालो” (यश. ५३:५)


यहोवाच्या क्षमेचा आपल्यासाठी काय अर्थ होतो?

१८. यहोवाच्या क्षमेबद्दल बायबलमध्ये जी वेगवेगळी शब्दचित्रं दिली आहेत, त्यांचं परीक्षण केल्यामुळे आपल्याला काय शिकायला मिळतं? (“यहोवा आपल्याला कशी क्षमा करतो?” ही चौकटसुद्धा पाहा.)

१८ यहोवाच्या क्षमेबद्दल बायबलमध्ये दिलेल्या शब्दचित्रांचं परीक्षण केल्यामुळे आपल्याला काय शिकायला मिळतं? हेच की यहोवा आपल्याला क्षमा करतो, तेव्हा तो ती पूर्णपणे आणि कायमची करतो. त्यामुळे आपल्याला स्वर्गातल्या आपल्या पित्यासोबत चांगलं नातं टिकवून ठेवता येतं. पण त्यासोबतच आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की जेव्हा यहोवा खऱ्‍या अर्थाने आपल्याला क्षमा करतो तेव्हा ही त्याच्याकडून एक भेटच आहे. खरंतर, आपल्यासारख्या पापी मानवांना ती मिळवायचा हक्क नाही. पण ही भेट तो त्याच्या प्रेमामुळे आणि अपार कृपेमुळेच आपल्याला देतो.—रोम. ३:२४.

१९. (क) आपण कशाबद्दल आभार मानले पाहिजेत? (रोमकर ४:८) (ख) पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

१९ रोमकर ४:८ वाचा. यहोवा “खरोखर” म्हणजे खऱ्‍या अर्थाने क्षमा करणारा देव आहे, याबद्दल आपण प्रत्येकाने त्याचे किती आभार मानले पाहिजेत! (स्तो. १३०:४) पण जर आपल्याला वाटत असेल की देवाने आपल्याला क्षमा करावी तर आपण एक महत्त्वाची गोष्ट करणं गरजेचंय. याबद्दल येशू म्हणाला: “जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा केली नाही, तर स्वर्गातला तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.” (मत्त. ६:१४, १५) म्हणून, यहोवाच्या क्षमेचं अनुकरण करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण आपण ते कसं करू शकतो? पुढच्या लेखात आपण या प्रश्‍नावर चर्चा करू या.

गीत ४६ यहोवा, तुझे आभार मानतो

a बायबलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमेबद्दल सांगण्यात आलंय. पण या वचनात मूळ हिब्रू भाषेत “क्षमा” यासाठी जो शब्द वापरलाय त्याचा अर्थ ‘हीच खरी क्षमा आहे’ असा होतो. बऱ्‍याच बायबल भाषांतरांमध्ये हा महत्त्वाचा फरक लक्षात घेतलेला नाही. पण पवित्र शास्त्र नवे जग भाषांतरमध्ये मात्र स्तोत्र १३०:४ मध्ये हा विशिष्ट अर्थ योग्यपणे जपण्यासाठी “खरोखर” हा शब्द वापरण्यात आलाय.