व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २२

गीत १२७ यहोवाला हवं तसं मी बनेन!

डेटींग करताना योग्य निर्णय कसा घेता येईल?

डेटींग करताना योग्य निर्णय कसा घेता येईल?

‘आपल्या मनातली गुप्त व्यक्‍ती फार मौल्यवान आहे.’​—१ पेत्र ३:४.

या लेखात:

डेटींग करत असताना योग्य निर्णय कसा घेता येईल आणि मंडळीतले इतर जण याबाबतीत कशी मदत करू शकतात हे पाहू या.

१-२. डेटींगबद्दल काही जणांना काय वाटतं?

 डेटींग करणाऱ्‍यांसाठी तो एक खूप आनंदाचा काळ असतो. त्यांच्या चेहऱ्‍यावर एक वेगळाच आनंद झळकत असतो. तुम्ही जर सध्या डेटींग करत असाल, तर सगळं काही व्यवस्थित व्हावं अशी नक्कीच तुमची इच्छा असेल. आणि डेटींग करणाऱ्‍या बऱ्‍याच जणांना तुमच्यासारखंच वाटतं. सिआन, a नावाची इथियोपियात राहणारी बहीण म्हणते: “मी माझ्या पतीशी जेव्हा डेटींग करायचे तो काळ माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. आम्ही खूप महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा केली आणि आम्ही चेष्टा-मस्करीपण करायचो. माझ्यावर प्रेम करणारा मला भेटला आणि माझंही त्याच्यावर प्रेम आहे हे मला जेव्हा जाणवलं तेव्हा मला खूप आनंद झाला होता.”

पण नेदरलँड्‌समध्ये राहणारा ॲलिसिओ नावाचा भाऊ म्हणतो: “मी माझ्या पत्नीसोबत डेटींग करत होतो, तेव्हा तो माझ्यासाठी खूप आनंदाचा काळ होता. पण डेटींग करताना आम्हाला काही समस्यांचाही सामना करावा लागला.” डेटींग करताना कोणत्या काही अडचण येऊ शकतात याबद्दल या लेखात आपण चर्चा करू या. सोबतच अशा काही बायबल तत्त्वांवरसुद्धा विचार करू या, यामुळे एका जोडप्याला यशस्वीपणे डेटींग करायला मदत होईल. तसंच मंडळीतले इतर जण त्यांना याबाबतीत कशी मदत करू शकतात ते आपण पाहू या.

डेटींग करण्यामागचा हेतू

३. डेटींग करण्यामागचा हेतू काय आहे? (नीतिवचनं २०:२५)

डेटींगचा काळ जरी आनंदाचा असला, तरी तो तितकाच गंभीरसुद्धा आहे. कारण त्यामुळे एक मुलगा आणि मुलगी लग्न करायचं, की नाही या गोष्टीविषयी निर्णय घेतात. लग्नाच्या दिवशी हे जोडपं यहोवासमोर अशी शपथ घेतं, की जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत ते एकमेकांवर प्रेम करतील आणि एकमेकांचा आदर करतील. आणि अशा प्रकारची कोणतीही शपथ घेण्याआधी काळजीपूर्वक विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. (नीतिवचनं २०:२५ वाचा.) डेटींगमुळे एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घेता येतं आणि योग्य निर्णय घेता येतो. डेटींग करणारे एकतर लग्न करायचा निर्णय घेतील किंवा डेटींग (कोर्टशिप) तिथेच थांबवायचा निर्णय घेतील. मुलाने आणि मुलीने डेटींग तिथेच थांबवायचा (ब्रेकअपचा) निर्णय घेतला, तर डेटींग यशस्वी झाली नाही असं म्हणता येणार नाही. उलट डेटींगचा हेतू साध्य झाला असं म्हणता येईल. कारण यामुळे त्या दोघांना एक चांगला निर्णय घ्यायला मदत झाली.

४. डेटींगबद्दल आपला योग्य दृष्टिकोन असणं का गरजेचं आहे?

डेटींगबद्दल योग्य दृष्टिकोन असणं का गरजेचं आहे? जर एखाद्या अविवाहित मुलाचा किंवा मुलीचा डेटींगबद्दल योग्य दृष्टिकोन असेल, तर ते अशा व्यक्‍तीसोबत डेटींग करणार नाहीत ज्यांच्याशी त्यांना लग्न करायचं नाही. पण डेटींगबद्दल फक्‍त अविवाहित मुलाने किंवा मुलीनेच योग्य दृष्टिकोन ठेवला पाहिजे असं नाही. आपण सगळ्यांनीच  योग्य दृष्टिकोन ठेवला पाहिजे. उदाहरणार्थ, काही जण असा विचार करतात, की जो मुलगा किंवा मुलगी डेटींग करत आहेत त्यांनी लग्न केलंच पाहिजे. पण अशा दृष्टिकोनामुळे एखाद्या अविवाहित भावावर किंवा बहिणीवर कसा परिणाम होऊ शकतो? अमेरिकेत राहणारी मेलिसा नावाची एक अविवाहित बहीण म्हणते: “डेटींग करणाऱ्‍या भाऊबहिणींनी लग्न करावंच असा दबाव इतर जण त्यांच्यावर टाकत असतात. त्यामुळे डेटींग करणारे काही भाऊबहीण त्यांचं एकमेकांशी जरी जुळत नसलं तरी डेटींग करत राहतात. तसंच असेही काही जण आहेत जे लग्नाआधी एकमेकांना जाणून घेण्यासाठी डेटींग करायचंच टाळतात. अशा प्रकारचा दबाव इतरांकडून असल्यामुळे त्यांना खूप तणावातून जावं लागतं.”

एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घ्या

५-६. डेटींग करणाऱ्‍या भावाने किंवा बहिणीने कोणत्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे? (१ पेत्र ३:४)

तुम्ही जर डेटींग करत आहात तर, लग्न करायचं की नाही हा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला कोणती गोष्ट मदत करू शकते? त्यासाठी तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे  जाणून घेऊ शकता. डेटींग सुरू करण्याआधी तुम्ही त्या व्यक्‍तीबद्दल काही गोष्टी नक्कीच माहीत करून घेतल्या असतील. पण आता त्या भावाच्या किंवा बहिणीच्या “मनातल्या गुप्त व्यक्‍तीला” समजून घेण्यासाठी तुमच्याकडे संधी आहे. (१ पेत्र ३:४ वाचा.) यामध्ये त्या व्यक्‍तीची आध्यात्मिकता, तिचं व्यक्‍तिमत्त्व आणि ती कसा विचार करते या गोष्टी समजून घेणंसुद्धा येतं. डेटींग करत असताना तुम्हाला हळूहळू काही प्रश्‍नांची उत्तरं समजली पाहिजेत. जसं की ‘ती व्यक्‍ती माझा चांगला विवाह जोडीदार होऊ शकते का?’ (नीति. ३१:२६, २७, ३०; इफिस. ५:३३; १ तीम. ५:८) ‘आम्ही एकमेकांच्या भावनिक गरजा पूर्ण करू शकतो का? एकमेकांमध्ये ज्या कमतरता आहेत त्या स्वीकारून आम्ही आयुष्य जगू शकतो का?’ b (रोम. ३:२३) एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घेत असताना नेहमी लक्षात ठेवा, की तुमच्या आवडीनिवडी किती सारख्या आहेत यापेक्षा तुम्ही एकमेकांच्या वेगळेपणाशी किती जुळवून घेता हे जास्त महत्त्वाचं आहे.

डेटींग करताना समोरच्या व्यक्‍तीमधल्या कोणत्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या पाहिजेत? त्या व्यक्‍तीमध्ये भावनिकरीत्या गुंतून जाण्याआधी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींवर त्या व्यक्‍तीसोबत चर्चा करावीशी वाटेल. जसं की, त्या व्यक्‍तीच्या ध्येयांबद्दल. पण आरोग्याच्या समस्या, आर्थिक समस्या किंवा त्या व्यक्‍तीच्या आयुष्यात पूर्वी होऊन गेलेल्या काही घटना, अशा वैयक्‍तिक गोष्टींबद्दल काय? डेटींग करताना सुरुवातीला या सगळ्याच गोष्टींवर तुम्हाला चर्चा करायची गरज नाही. (योहान १६:१२ सोबत तुलना करा.) अशा गोष्टींबद्दल तुम्हाला खूप लवकर विचारलं जातंय असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तसं त्या व्यक्‍तीला स्पष्टपणे सांगा. पण तिच्यासोबत तुमचं लग्न होईल असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तिला योग्य निर्णय घेता यावा म्हणून या सगळ्या गोष्टींबद्दल तिला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आज-ना-उद्या तुम्हाला त्या व्यक्‍तीला याबद्दल सांगावंच लागेल.

७. डेटींग करणारे एकमेकांना कसं जाणून घेऊ शकतात? (“ दूर राहणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत डेटींग करताना” ही चौकटसुद्धा पाहा.) (चित्रंसुद्धा पाहा.)

एखादी व्यक्‍ती आतून कशी आहे हे तुम्ही कसं समजून घेऊ शकता? यासाठी चांगला मार्ग म्हणजे त्या व्यक्‍तीसोबत मन मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे बोलणं. त्यासाठी तुम्ही समोरच्या व्यक्‍तीला प्रश्‍न विचारू शकता आणि जेव्हा ती बोलते तेव्हा तिचं लक्ष देऊन ऐकू शकता. (नीति. २०:५; याको. १:१९) हे करण्यासाठी तुम्ही अशा काही गोष्टी सोबत मिळून करू शकता, ज्यामुळे तुम्हाला एकमेकांसोबत बोलता येईल. जसं की, एकत्र जेवणं, सार्वजनिक ठिकाणी फिरायला जाणं किंवा प्रचार करणं. तसंच तुम्ही मित्रांसोबत आणि घरच्यांसोबत वेळ घालवतानाही एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकता. त्यासोबतच अशा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे ती व्यक्‍ती वेगवेगळ्या लोकांसोबत आणि परिस्थितींमध्ये कशी वागते हे तुम्हाला समजेल. नेदरलँड्‌समध्ये राहणाऱ्‍या अश्‍विनने काय केलं याचा विचार करा. आलिशासोबत डेटींग करताना त्याने काय केलं याबद्दल तो म्हणतो: “आम्ही अशा गोष्टी करायचा प्रयत्न केला, ज्यांमुळे आम्हाला एकमेकांना जाणून घेता आलं. त्यासाठी आम्ही सोबत मिळून जेवण बनवलं आणि घरची इतर कामं केली. या सगळ्या साध्याशाच गोष्टी होत्या. पण त्या करत असताना आम्हाला एकमेकांमधल्या चांगल्या गोष्टी आणि कमतरतासुद्धा समजून आल्या.”

तुम्ही जर काही गोष्टी सोबत मिळून केल्या, तर त्यामुळे तुम्हाला बोलता येईल आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल (परिच्छेद ७-८ पाहा)


८. डेटींग करणाऱ्‍या जोडप्याला एकत्र मिळून अभ्यास केल्यामुळे कसा फायदा होऊ शकतो?

आध्यात्मिक विषयांवर सोबत मिळून चर्चा केल्यामुळेसुद्धा तुम्ही एकमेकांबद्दल बरंच काही जाणून घेऊ शकता. जर तुमचं लग्न झालं, तर यहोवाची उपासना तुमच्या विवाहात एक महत्त्वाचा भाग असावा म्हणून तुम्हाला कौटुंबिक उपासनेसाठी वेळ काढावाच लागेल. (उप. ४:१२) मग डेटींग सुरू असतानाच सोबत अभ्यास करण्यासाठी वेळ का काढू नये? हे खरंय की डेटींग करणारा भाऊ आणि बहीण अजून एक कुटुंब नाही किंवा तो भाऊ अजून तिचा मस्तक नाही. पण तरीसुद्धा सोबत मिळून नियमितपणे अभ्यास केल्यामुळे एकमेकांचं यहोवासोबतचं नातं कसं आहे, हे समजायला तुम्हाला मदत होईल. अमेरिकेत राहणाऱ्‍या मॅक्स आणि लायसाला आणखी एक गोष्ट फायद्याची असल्याचं दिसून आलं. तो म्हणतो: “आम्ही डेटींग, विवाह आणि कौटुंबिक जीवन अशा विषयांवर आपल्या प्रकाशनांमधून डेटींग सुरू असतानाच अभ्यास करायचो. त्यामुळे आम्हाला अशा काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करता आली जे सहसा आम्हाला जमलं नसतं.”

लक्षात घेण्यासारख्या आणखी काही गोष्टी

९. डेटींग करताना त्याबद्दल कोणाला सांगायचं हे ठरवताना एखाद्या जोडप्याने कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?

तुम्ही डेटींग करत आहात याबद्दल तुम्ही कोणाला सांगू शकता?  याबद्दल डेटींग करणाऱ्‍या दोघांनी मिळून निर्णय घेतला पाहिजे. डेटींग सुरू केल्यावर कदाचित तुम्ही लगेचच याबद्दल जास्त लोकांना सांगणार नाही. (नीति. १७:२७) असं केल्यामुळे लोक तुमची विनाकारण चौकशी करणार नाहीत आणि त्यामुळे लगेच एखादा निर्णय घ्यायचा दबाव तुमच्यावर येणार नाही. पण दुसरीकडे पाहता, ‘याबद्दल इतरांना कळलं तर काय?’ या भीतीने जर तुम्ही कोणालाच सांगितलं नाही आणि एकटं-एकटंच भेटू लागला, तर त्यामुळे काही धोकेसुद्धा निर्माण होऊ शकतात. म्हणून तुम्हाला जे चांगला सल्ला देऊ शकतील किंवा याबाबतीत मदत करू शकतील अशा निदान काही जणांनातरी तुम्ही याबद्दल सांगितलं पाहिजे. (नीति. १५:२२) उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या घरच्या काही लोकांना, मंडळीतल्या काही समंजस मित्रांना किंवा मंडळीतल्या वडिलांना सांगू शकता.

१०. डेटींग करताना आपल्या हातून चुकीचं काही होणार नाही म्हणून एक जोडपं काय करू शकतं? (नीतिवचनं २२:३)

१० डेटींग करताना आपल्या हातून चुकीचं काही होऊ नये, म्हणून तुम्ही काय करू शकता?  डेटींग करताना तुम्ही एकमेकांना जितकं जास्त जाणून घ्याल, तितकंच तुम्ही एकमेकांच्या जास्त जवळ याल. मग अशा वेळी नैतिकरीत्या शुद्ध राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता? (१ करिंथ. ६:१८) त्यासाठी तुम्ही अनैतिक गोष्टींवर चर्चा करायचं, एकांतात भेटायचं आणि जास्त प्रमाणात मद्य घ्यायचं टाळू शकता. (इफिस. ५:३) कारण अशा गोष्टींमुळे लैंगिक इच्छा उत्तेजित होतात आणि योग्य ते करत राहायचा तुमचा निश्‍चय कमकुवत होऊ शकतो. म्हणून अशा प्रकारची कोणतीही गोष्ट आपल्या हातून होऊ नये, म्हणून काय करता येईल यावर नियमितपणे चर्चा करणं योग्य ठरणार नाही का? (नीतिवचनं २२:३ वाचा.) इथियोपियामधल्या भाऊ दावीत आणि बहीण अल्माज यांना कोणत्या गोष्टींमुळे मदत झाली याबद्दल ते म्हणतात: “आम्ही अशा ठिकाणी सोबत मिळून वेळ घालवायचो ज्या ठिकाणी भरपूर लोक आहेत किंवा सोबत आमचे मित्र आहेत. आम्ही कधीच कारमध्ये किंवा घरात एकटं असताना भेटलो नाही. त्यामुळे आमच्या हातून काहीतरी चुकीचं घडेल अशी परिस्थिती आम्हाला टाळता आली.”

११. काही मार्गांनी प्रेम व्यक्‍त करण्याच्या बाबतीत डेटींग करणारं जोडपं कोणत्या गोष्टी लक्षात घेऊ शकतं?

११ डेटींग करताना काही मार्गांनी प्रेम व्यक्‍त करण्याच्या बाबतीत काय? तुमचं नातं जसजसं घट्ट होत जातं तसतसं काही मार्गांनी प्रेम व्यक्‍त करणं चुकीचं नाही. पण त्यामुळे जर तुमच्या लैंगिक इच्छा उत्तेजित होत असतील, तर तुम्हाला त्या व्यक्‍तीबद्दल योग्यपणे विचार करायला कठीण जाऊ शकतं. (गीत. १:२; २:६) त्यामुळे कदाचित यहोवाचं मन नाराज होईल अशा गोष्टही तुमच्या हातून घडू शकतात. (नीति. ६:२७) त्यामुळे डेटींग सुरू असताना शक्यतो सुरुवातीलाच बायबल तत्त्वांच्या आधारावर स्वतःला कोणत्या मर्यादा घातल्या पाहिजेत, याबद्दल सोबत मिळून चर्चा करा. c (१ थेस्सलनी. ४:३-७) तुम्ही स्वतःला असं विचारू शकता: ‘आम्ही ज्या पद्धतीने एकमेकांना प्रेम व्यक्‍त करतो, त्याबद्दल आपल्या भागात राहणारे इतर लोक काय विचार करतील? त्यामुळे आमच्या दोघांपैकी कोणाच्याही लैंगिक इच्छा उत्तेजित होतील का?’

१२. डेटींग करताना येणाऱ्‍या समस्या आणि मतभेदांबद्दल डेटींग करणाऱ्‍या जोडप्याने कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१२ डेटींग करताना जर समस्या आल्या किंवा मतभेद झाले तर तुम्हाला ते कसे हाताळता येतील?  तुमच्यात जर सारखेच मतभेद होत असतील तर तुम्ही एकमेकांसाठी योग्य नाही असा याचा अर्थ होतो का? नक्कीच नाही! कारण प्रत्येक जोडप्यामध्ये एकमेकांचे विचार हे वेगवेगळे असतातच. कारण विवाहातसुद्धा एकमेकांचं नातं तेव्हाच मजबूत होतं, जेव्हा दोघांची मतं वेगवेगळी असूनही ते एकमेकांशी जुळवून घेतात आणि एका मतावर येऊन पोचतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या समस्या कशा सोडवता यावरून तुम्ही पुढे लग्नात यशस्वी व्हाल की नाही हे समजेल. म्हणून तुम्ही दोघं स्वतःला असं विचारू शकता: ‘आम्ही शांतीने आणि आदराने एखाद्या गोष्टीवर एकमेकांसोबत चर्चा करतो का? आम्ही आमच्या कमतरता मान्य करून त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो का? आम्ही लगेच माघार घ्यायला, माफी मागायला आणि माफ करायला तयार असतो का?’ (इफिस. ४:३१, ३२) पण तुमच्यात जर नेहमीच मतभेद आणि वादावाद होत असेल, तर कदाचित पुढे लग्नानंतरसुद्धा यात काही सुधारणा होणार नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला जाणवलं की ती व्यक्‍ती आपल्यासाठी योग्य नाही, तर अशा वेळी तुम्ही डेटींग तिथंच थांबवणं तुम्हा दोघांसाठी  योग्य असेल. d

१३. डेटींग करणाऱ्‍या जोडप्याला कधीपर्यंत डेटींग करायची हे ठरवायला कोणत्या गोष्टीमुळे मदत होईल?

१३ तुम्ही किती काळ डेटींग करत राहिलं पाहिजे?  घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयांचा परिणाम सहसा वाईट होतो. (नीति. २१:५) त्यामुळे एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घेईपर्यंत तुम्ही डेटींग केली पाहिजे. पण डेटींगचा काळ गरज नसताना विनाकारण वाढवणं योग्य ठरणार नाही. कारण बायबल असंही म्हणतं: “अपेक्षा पूर्ण व्हायला वेळ लागला, तर मन उदास होतं.” (नीति. १३:१२) शिवाय, डेटींगचा काळ जर वाढत गेला, तर लैंगिक इच्छांवर ताबा ठेवणं कठीण जाऊ शकतं. (१ करिंथ. ७:९) तुम्ही किती काळ डेटींग करत आहात यावर विचार करण्यापेक्षा, तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘लग्नाचा निर्णय घेण्याआधी अजूनही अशी एखादी गोष्ट आहे का, जी मला त्याच्याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे?’

इतर जण कशी मदत करू शकतात?

१४. डेटींग करणाऱ्‍या जोडप्याला आपण आणखी कोणत्या व्यावहारिक मार्गांनी मदत करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

१४ जर डेटींग करणारा एखादा भाऊ किंवा बहीण तुम्हाला माहीत असतील, तर तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता? तुम्ही त्या दोघांनाही घरी जेवायला, कौटुंबिक उपासनेला, किंवा मनोरंजनासाठी आपल्या घरी बोलवू शकता. (रोम. १२:१३) त्यामुळे त्या दोघांना एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घ्यायची संधी मिळू शकते. समजा त्यांना बाहेर फिरायला जायचं असेल किंवा सोबत मिळून कारने कुठेतरी जायचं असेल, तसंच एकांतात बोलता येईल अशा ठिकाणी जायचं असेल. आणि त्यासाठी त्यांना सोबत कोणीतरी पाहिजे असेल, तर तुम्ही त्यांना मदत करू शकता का? (गलती. ६:१०) आधी उल्लेख केलेली आलिशा तिला आणि अश्‍विनला डेटींग करताना कोणती गोष्ट आवडली याबद्दल म्हणते: “काही भाऊबहिणींनी आम्हाला सांगितलं होतं, की जर आम्हाला सोबत वेळ घालवायचा असेल तर आम्ही त्यांच्या घरी येऊ शकतो. ही गोष्ट आम्हाला खूप आवडली.” डेटींग करणाऱ्‍या जोडप्याने जर तुम्हाला त्यांच्यासोबत राहायला सांगितलं, तर त्यांना मदत करायची ही एक चांगली संधी आहे असं समजा. पण हेही लक्षात घ्या, की ते नेहमी तुमच्या नजरेसमोर राहतील आणि त्याच वेळेस त्यांना वैयक्‍तिकपणे बोलण्याची संधीसुद्धा मिळेल.​—फिलिप्पै. २:४.

डेटींग करणारं एखादं जोडपं तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही काही व्यावहारिक मार्गांनी त्यांना मदत करू शकता (परिच्छेद १४-१५ पाहा)


१५. डेटींग करणाऱ्‍या जोडप्याला मदत करण्यासाठी भाऊबहीण आणखी काय करू शकतात? (नीतिवचनं १२:१८)

१५ डेटींग करणाऱ्‍या जोडप्याला आपण आणखी एका मार्गाने मदत करू शकतो. ते म्हणजे आपण काय बोलणार आणि काय नाही हे नेहमी लक्षात ठेवू शकतो. कधीकधी आपल्याला आपली जीभ ताब्यात ठेवायची गरज असू शकते. (नीतिवचनं १२:१८ वाचा.) उदाहरणार्थ, या जोडप्याने डेटींग सुरू केली आहे, हे इतरांना सांगायची आपल्याला खूप उत्सुकता असेल. पण याबद्दल आपण स्वतः इतरांना सांगावं अशी कदाचित त्या जोडप्याची इच्छा असेल. तसंच, आपण त्यांच्याबद्दल गप्पागोष्टी करत फिरू नये किंवा त्यांच्या निर्णयांबद्दल त्यांची टीका करू नये. (नीति. २०:१९; रोम. १४:१०; १ थेस्सलनी. ४:११) तसंच, त्या जोडप्यावर लग्न करण्यासाठी दबाव येईल अशी कोणतीही गोष्ट आपण त्यांना बोलू नये किंवा विचारू नये. ॲलिस आणि तिचे पती याबद्दल म्हणतात: “भाऊबहीण जेव्हा आम्हाला आमच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल विचारायचे तेव्हा आम्हाला खूप अवघडल्यासारखं वाटायचं. कारण तोपर्यंत आम्ही या गोष्टीवर चर्चाच केली नव्हती.”

१६. डेटींग करणाऱ्‍या जोडप्याने जर डेटींग करायचं थांबवलं, तर आपण काय केलं पाहिजे?

१६ डेटींग करणाऱ्‍या जोडप्याने जर डेटींग थांबवायचा (ब्रेकअपचा) निर्णय घेतला तर काय? अशा वेळी आपण त्यांना कोणतेही खाजगी प्रश्‍न विचारणार नाही. किंवा त्या दोघांपैकी कोणाची बाजू घेऊन त्यांना दोष देणार नाही. (१ पेत्र ४:१५) लिआ नावाची एक बहीण म्हणते: “मी एका बांधवासोबत डेटींग करत होते. पण नंतर आम्ही डेटींग करायचं थांबवलं. आम्ही डेटींग का थांबवली असेल याबद्दल बरेच जण अंदाज बांधत आहेत, हे मला कळलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं.” आधी सांगितल्याप्रमाणे डेटींग थांबवण्याचा अर्थ डेटींग अयशस्वी ठरली असा होत नाही. उलट याचा अर्थ असा होतो, की डेटींगचा हेतू साध्य झाला. तो म्हणजे डेटींग करणाऱ्‍या जोडप्याला योग्य निर्णयावर पोचता आलं. हे खरंय, की अशा प्रकारच्या निर्णयांमुळे कधीकधी भावनिक त्रास होऊ शकतो किंवा एकटं पडल्यासारखं वाटू शकतं. म्हणून त्या जोडप्याला आणखी कशी मदत करता येईल याकडे आपण लक्ष देऊ शकतो.​—नीति. १७:१७.

१७. डेटींग करणाऱ्‍या जोडप्याने काय केलं पाहिजे?

१७ या लेखात पाहिल्याप्रमाणे डेटींग किंवा कोर्टशिप करताना बऱ्‍याच समस्या आणि आव्हानं येऊ शकतात. पण हा एक आनंदाचा काळसुद्धा असू शकतो. जेसिका म्हणते: “खरंखरं सांगायचं तर डेटींग करणं साधीसोपी गोष्ट नाही. त्यात तुमचा बराच वेळ आणि शक्‍ती खर्च होते. पण तुमची मेहनत वाया जात नाही.” तुम्ही जर डेटींग करत असाल तर एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जर असं केलं, तर त्यामुळे तुमची डेटींग यशस्वी होईल आणि तुम्हा दोघांनाही योग्य निर्णयावर पोचायला मदत होईल.

गीत ४९ यहोवाचं मन आनंदित करा

a काही नावं बदलण्यात आली आहेत.

b अशाच आणखी काही प्रश्‍नांवर विचार करण्यासाठी क्वेशन्स यंग पीपल्स आस्क—आन्सर्स दॅट वर्क,  व्हॉल्यूम २ या इंग्रजीतल्या पुस्तकातली पानं ३९-४० पाहा.

c दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या गुप्तागांना कुरवाळणं हे लैंगिक अनैतिकतेत मोडणारं कृत्य आहे. त्यामुळे असं काही घडलं तर मंडळीतल्या वडिलांकडून न्यायिक कारवाई केली जाते. तसंच, स्तनांना कुरवाळणं किंवा मेसेज किंवा फोनद्वारे अश्‍लील संभाषण करणं अशा गोष्टींसाठीसुद्धा परिस्थितीनुसार न्यायिक कारवाई केली जाऊ शकते.

d आणखी माहिती जाणून घेण्यासाठी १५ ऑगस्ट, १९९९ च्या टेहळणी बुरूज  अंकातला “वाचकांचे प्रश्‍न” हा लेख पाहा.