अभ्यास लेख ३७
आपला हात आवरू नका
“सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीही आपला हात आवरू नको.”—उप. ११:६.
गीत ४४ कापणीत आनंदाने सहभागी व्हा!
सारांश *
१-२. उपदेशक ११:६ या वचनाचा आपल्या प्रचारकार्याशी काय संबंध आहे?
काही देशांमध्ये लोक खूप आनंदाने आपला संदेश ऐकतात. जणू त्याचीच ते वाट पाहत होते! तर इतर देशांमध्ये लोकांना बायबलबद्दल किंवा देवाबद्दल बोलायला आवडत नाही. तुमच्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल काय? लोक आपलं ऐकोत किंवा न ऐकोत, जोपर्यंत यहोवा आपल्याला हे काम थांबवायला सांगत नाही, तोपर्यंत आपण ते करत राहावं अशी त्याची इच्छा आहे.
२ प्रचाराचं काम कधी थांबवायचं याची वेळ यहोवाने आधीच ठरवली आहे. “त्यानंतर अंत येईल.” (मत्त. २४:१४, ३६) पण तोपर्यंत, “आपला हात आवरू नको” * या आज्ञेचं आपण पालन कसं करू शकतो?—उपदेशक ११:६ वाचा.
३. या लेखात आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत?
३ आपण ‘माणसं धरणारे,’ म्हणजे चांगले प्रचारक बनण्यासाठी कोणत्या चार गोष्टी केल्या पाहिजेत हे आधीच्या लेखात पाहिलं होतं. (मत्त. ४:१९) आता या लेखात आपण हे पाहू, की परिस्थिती कितीही वाईट असली, तरी प्रचार करत राहण्याचा आपला निर्धार पक्का करण्यासाठी कोणत्या तीन गोष्टी आपल्याला मदत करतील. त्या तीन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे: (१) प्रचाराच्या कामावर लक्ष लावणं (२) धीर धरणं आणि (३) आपला विश्वास मजबूत ठेवणं.
प्रचाराच्या कामावर लक्ष लावा
४. यहोवाने आपल्याला जे काम दिलं आहे त्यावर आपण लक्ष का लावलं पाहिजे?
४ शेवटल्या दिवसांत लोक कसे असतील आणि कोणत्या घटना घडतील हे येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं होतं. आणि यामुळे प्रचाराच्या कामावरून त्यांचं लक्ष विचलित होऊ शकतं हे येशूला माहीत होतं. म्हणून त्याने त्यांना “जागृत राहा” असं म्हटलं. (मत्त. २४:४२) नोहाच्या दिवसांत अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्यांमुळे लोकांनी नोहाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. आज अशाच गोष्टी आपल्या काळातसुद्धा आहेत, ज्यांमुळे आपलं लक्ष विचलित होऊ शकतं. (मत्त. २४:३७-३९; २ पेत्र २:५) म्हणून, यहोवाने आपल्याला जे प्रचाराचं काम दिलं आहे त्यावर आपण आपलं लक्ष लावलं पाहिजे.
५. प्रेषितांची कार्ये १:६-८ या वचनांप्रमाणे प्रचाराचं काम किती मोठ्या प्रमाणात केलं जाणार होतं?
योहा. १४:१२) पण येशूच्या मृत्यूनंतर त्याचे काही शिष्य पुन्हा मासेमारीचा व्यवसाय करू लागले. आपलं पुनरुत्थान झाल्यावर येशूने एकदा एक मोठा चमत्कार करून त्याच्या काही शिष्यांना भरपूर मासे पकडायला मदत केली. त्यानंतर त्याने या गोष्टीवर भर दिला, की दुसऱ्या कोणत्याही कामापेक्षा प्रचाराचं आणि शिष्य बनवण्याचं काम करणं खूप महत्त्वाचं आहे. (योहा. २१:१५-१७) स्वर्गात जाण्याआधी येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं, की त्याने सुरू केलेलं प्रचाराचं काम फक्त इस्राएल देशापर्यंत सीमित राहणार नाही, तर ते संपूर्ण जगभरात केलं जाईल. (प्रेषितांची कार्ये १:६-८ वाचा.) पुढे अनेक वर्षांनंतर, येशूने प्रेषित योहानला “प्रभूच्या दिवसात” * काय होईल हे एका दृष्टान्ताद्वारे सांगितलं. त्या दृष्टान्तात योहानने अनेक गोष्टी पाहिल्या. त्यांपैकी एक रोमांचक घटना म्हणजे: एका देवदूताकडे “प्रत्येक राष्ट्राच्या, वंशाच्या, भाषेच्या आणि जातीच्या लोकांना घोषित करण्यासाठी सर्वकाळाचा आनंदाचा संदेश होता.” (प्रकटी. १:१०; १४:६) यावरून दिसून येतं, की आज जगभरात केलं जाणारं प्रचाराचं काम संपत नाही, तोपर्यंत आपण ते करत राहावं अशी यहोवाची इच्छा आहे.
५ आज प्रचाराच्या कामावर लक्ष लावणं खूप महत्त्वाचं आहे. या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. येशूने आधीच सांगितलं होतं, की त्याचे शिष्य त्याच्या मृत्यूनंतर हे काम बऱ्याच काळापर्यंत आणि खूप मोठ्या प्रमाणावर करतील. (६. प्रचाराच्या कामावर लक्ष लावायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?
६ आपल्याला मदत करण्यासाठी आज यहोवा काय-काय करत आहे याचा जर आपण विचार केला, तर प्रचाराच्या कामावर आपण लक्ष लावू शकतो. आज यहोवा आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांतून भरपूर आध्यात्मिक अन्न पुरवत आहे. जसं की, छापील व इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रकाशनं, ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि JW ब्रॉडकास्टिंग. तसंच, आपल्या वेबसाईबद्दलही विचार करा: आज १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये ती उपलब्ध आहे. (मत्त. २४:४५-४७) आज आपण अशा जगात राहत आहोत जिथे लोकांची राजकीय व धार्मिक मतं वेगवेगळी आहेत, आणि काही लोक गरीब, तर काही खूप श्रीमंत आहेत. या कारणांमुळे संपूर्ण जग विभाजित आहे. पण त्याच वेळी जगभरातल्या ८० लाखांपेक्षा जास्त यहोवाच्या सेवकांमध्ये खऱ्या अर्थाने एकी आहे. याचं एक उदाहरण शुक्रवार, १९ एप्रिल २०१९ या दिवशी पाहायला मिळालं. त्या दिवशी सकाळी जगभरातल्या सगळ्या यहोवाच्या साक्षीदारांनी दैनिक वचनाची चर्चा करणारा एक व्हिडिओ पाहिला. आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळला. त्या विधीसाठी २,०९,१९,०४१ लोक उपस्थित होते. आधुनिक दिवसातला हा चमत्कार पाहण्याचा आणि त्याचा भाग असण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे, याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रचाराच्या कामावर लक्ष लावायला आपल्याला मदत होते.
७. प्रचाराच्या कामावर लक्ष लावायला येशूचं उदाहरण आपल्याला कसं मदत करू शकतं?
७ प्रचाराच्या कामावर लक्ष लावण्यासाठी आणखी एक गोष्ट आपल्याला मदत करते. ती म्हणजे, येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करणं. येशूने कोणत्याही गोष्टीमुळे प्रचाराच्या कामावरून आपलं लक्ष विचलित होऊ दिलं नाही. (योहा. १८:३७) जसं की, सैतानाने त्याला “जगातली सर्व राज्ये व त्यांचे वैभव” देण्याचं आमीष दाखवलं, तेव्हा तो त्या मोहाला बळी पडला नाही. तसंच, लोकांनी त्याला राजा बनवण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही तो त्या प्रलोभनाला बळी पडला नाही. (मत्त. ४:८, ९; योहा. ६:१५) याशिवाय, त्याने कधीच धनसंपत्ती मिळवण्याचा विचार केला नाही, किंवा तीव्र विरोधाला तो घाबरला नाही. (लूक ९:५८; योहा. ८:५९) आपल्या विश्वासाची परीक्षा होते तेव्हा प्रेषित पौलने दिलेला सल्ला आपल्याला मदत करू शकतो. ख्रिश्चनांनी ‘थकून जाऊन हार मानू नये’ म्हणून पौलने त्यांना येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करायचा सल्ला दिला होता. तोच सल्ला आपणही पाळला तर प्रचाराच्या कामावर लक्ष लावायला आपल्याला मदत होईल.—इब्री १२:३.
धीर धरा
८. धीर धरणं म्हणजे काय, आणि खासकरून आज तो दाखवणं का महत्त्वाचं आहे?
८ धीर धरणं म्हणजे एखादी परिस्थिती बदलेपर्यंत शांतपणे वाट पाहत राहणं. आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितींत धीर धरण्याची गरज असते. जसं की, एखादी वाईट परिस्थिती कधी संपेल याची आपण वाट पाहत असतो तेव्हा. किंवा मग एखादी चांगली गोष्ट घडण्याची आपण बऱ्याच काळापासून वाट पाहत असतो तेव्हा. हबक्कूक संदेष्टा यहुदामध्ये असलेली हिंसक परिस्थिती संपण्याची वाट पाहत होता. (हब. १:२) तसंच, येशूचे शिष्य अशी आशा करत होते, की देवाचं राज्य “लगेचच प्रकट” होईल आणि ते जुलमी रोमी शासनापासून आपली सुटका करेल. (लूक १९:११) आज आपणसुद्धा त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत जेव्हा देवाचं राज्य जगातली दुष्टाई काढून एक नीतिमान नवीन जग आणेल. (२ पेत्र ३:१३) पण त्यासाठी यहोवाने ठरवलेली वेळ येईपर्यंत आपल्याला वाट पाहण्याची आणि धीर धरण्याची गरज आहे. यहोवा कोणत्या काही मार्गांनी आपल्याला धीर धरायला शिकवतो ते आता आपण पाहू.
९. यहोवा धीर दाखवतो हे कशावरून दिसून येतं?
९ धीर धरण्याच्या बाबतीत यहोवाने सगळ्यात चांगलं उदाहरण मांडलं आहे. त्याने नोहाला तारू बांधण्यासाठी आणि “नीतिमत्त्वाचा प्रचारक” म्हणून सेवा करण्यासाठी पुरेसा वेळ दिला. असं करून त्याने धीर दाखवला. (२ पेत्र २:५; १ पेत्र ३:२०) तसंच, यहोवाने सदोम आणि गमोरा या शहरांतल्या दुष्ट लोकांचा नाश करायचं ठरवलं, तेव्हा अब्राहामने त्याला एकापाठोपाठ एक अनेक प्रश्न विचारले. त्या वेळी यहोवाने धीराने त्याचं ऐकलं. (उत्प. १८:२०-३३) याशिवाय, वारंवार यहोवाला सोडून इतर दैवतांची उपासना करणाऱ्या इस्राएल राष्ट्राच्या बाबतीतही यहोवाने कितीतरी शतकांपर्यंत धीर दाखवला. (नहे. ९:३०, ३१) यहोवाच्या धीराचा पुरावा आजही आपल्याला पाहायला मिळतो. ज्या लोकांना तो आपल्याकडे आकर्षित करतो त्या “सगळ्यांनी पश्चात्ताप करावा” म्हणून तो वेळ देत आहे. (२ पेत्र ३:९; योहा. ६:४४; १ तीम. २:३, ४) यहोवाचं हे उदाहरण आपल्याला प्रचाराचं आणि शिकवण्याचं काम करत असताना धीर दाखवायला मदत करू शकतं. बायबलमध्ये दिलेल्या एका उदाहरणातून यहोवा आपल्याला धीर धरायला शिकवतो.
१०. याकोब ५:७, ८ या वचनांमध्ये दिलेल्या शेतकऱ्याच्या उदाहरणातून आपण काय शिकतो?
१० याकोब ५:७, ८ वाचा. या वचनांत दिलेल्या शेतकऱ्याच्या उदाहरणातून आपण धीर धरायला शिकतो. हे खरं आहे की काही पिकांची वाढ झपाट्याने होते. पण बऱ्याचशा पिकांना वाढायला खूप वेळ लागतो. जसं की, प्राचीन इस्राएलमध्ये पिकांची वाढ व्हायला जवळजवळ सहा महिने लागायचे. पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी पेरणी करायचा, पण कापणी करण्यासाठी त्याला शेवटचा पाऊस पडेपर्यंत धीराने वाट पाहावी लागायची. (मार्क ४:२८) शेतकऱ्याप्रमाणेच आपणसुद्धा धीर दाखवला पाहिजे. पण असं करणं सोपं नाही.
११. धीर धरल्यामुळे आपल्याला प्रचारकार्यात कशी मदत होते?
११ मानवी प्रवृत्ती अशी आहे, की एखाद्या गोष्टीसाठी आपण मेहनत घेतली असेल तर आपल्याला त्याचं फळ लगेच हवं असतं. पण सहसा असं होत नाही. त्यासाठी एका उदाहरणाचा विचार करा. तुमच्या बागेतल्या झाडांनी फळं द्यावीत असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी तुम्हाला सतत मेहनत घ्यावी लागेल. जसं की, तुम्हाला जमीन तयार करावी लागेल, रोपटी लावावी लागतील, जंगली गवत उपटून काढावं लागेल आणि पाणी देत राहावं लागेल. त्याचप्रमाणे, शिष्य बनवण्याच्या कामातही आपल्याला सतत मेहनत घ्यावी लागेल. कारण आपण ज्यांच्यासोबत बायबल अभ्यास करतो त्यांच्या मनातून भेदभावाची भावना मुळासकट काढून टाकण्यासाठी, आणि त्यांना सर्वांवर प्रेम करायला शिकवण्यासाठी वेळ लागू शकतो. तसंच, लोक आपला संदेश ऐकत नाहीत तेव्हासुद्धा आपण धीर धरला पाहिजे. मग आपण निराश होणार नाही. पण लोक आपला संदेश ऐकतात तेव्हाही आपण धीर धरण्याची गरज आहे. कारण आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांना भरभर प्रगती करायची जबरदस्ती करू शकत नाही. काही वेळा येशूच्या शिष्यांनाही तो शिकवत असलेल्या गोष्टी समजायला वेळ लागला. (योहा. १४:९) एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे; ती म्हणजे आपण जरी रोपटं लावलं आणि पाणी घातलं तरी वाढवणारा देव आहे.—१ करिंथ. ३:६.
१२. सत्यात नसलेल्या आपल्या नातेवाइकांना साक्ष देताना आपण धीर कसा दाखवू शकतो?
१२ सत्यात नसलेल्या नातेवाइकांना साक्ष देताना धीर दाखवणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. अशा वेळी उपदेशक ३:७ मध्ये दिलेलं तत्त्व आपल्याला मदत करेल. त्यात म्हटलं आहे: “मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.” आपण जर आपली वागणूक चांगली ठेवली, तर काहीही न बोलता आपण त्यांना साक्ष देऊ शकू. पण त्यासोबतच, संधी मिळेल तेव्हा आपण त्यांना सत्याबद्दल सांगितलंही पाहिजे. (१ पेत्र ३:१, २) हे खरं आहे, की आपण आवेशाने प्रचाराचं आणि शिकवण्याचं काम केलं पाहिजे. पण ते करत असताना आपण सगळ्यांशी, अगदी आपल्या नातेवाइकांशीही धीराने वागलं पाहिजे.
१३-१४. धीर धरण्याच्या बाबतीत कोणती काही उदाहरणं आपल्याला मदत करतील?
१३ धीर दाखवण्याच्या बाबतीत आपण बायबल काळातल्या आणि आपल्या काळातल्या विश्वासू सेवकांच्या उदाहरणांतून बरंच काही शिकू शकतो. जसं की, दुष्टाईचा अंत कधी होईल याची हबक्कूक वाट पाहत असला तरी त्याने धीर धरला. ही गोष्ट त्याच्या शब्दांतून दिसून येते. त्याने म्हटलं: “मी आपल्या पहाऱ्यावर उभा राहीन.” (हब. २:१) तसंच, प्रेषित पौलला आपलं सेवाकार्य पूर्ण करायची आणि स्वर्गातलं जीवन मिळवायची मनापासून इच्छा होती. पण म्हणून त्याने घाई केली नाही, तर तो धीराने “आनंदाच्या संदेशाची अगदी पूर्णपणे साक्ष” देत राहिला.—प्रे. कार्ये २०:२४.
१४ गिलियड प्रशालेतून पदवीधर झालेल्या एका जोडप्याचंही उदाहरण लक्षात घ्या. पदवीधर झाल्यानंतर त्यांना अशा एका देशात सेवा करायला पाठवण्यात आलं जिथे फार कमी साक्षीदार होते, आणि ख्रिस्ती धर्म पाळणारे लोकही फार कमी होते. त्यामुळे लोक बायबलचा अभ्यास करायला सहसा तयार व्हायचे नाही. याच्या अगदी उलट, गिलियड प्रशालेतले त्यांचे सोबती ज्या देशांमध्ये सेवा करत होते, तिथे ते बरेच बायबल अभ्यास चालवत होते आणि त्या क्षेत्रात चांगली प्रगती होत होती. त्यांचे चांगले अनुभव ते या जोडप्याला सांगायचे. पण आपल्या या सोबत्यांच्या तुलनेत आपल्या क्षेत्रात फार कमी प्रगती होत आहे, या विचाराने हे जोडपं निराश झालं नाही. तर ते धीराने आपलं सेवाकार्य करत राहिलं. आठ वर्षं अशा क्षेत्रात प्रचारकार्य केल्यानंतर शेवटी त्यांच्या एका बायबल विद्यार्थ्याने बाप्तिस्मा घेतला, तेव्हा त्यांना किती आनंद झाला असेल याचा विचार करा! या तिन्ही उदाहरणांमध्ये एक गोष्ट सारखीच होती याकडे तुम्ही लक्ष दिलं का? त्यांनी ‘आपला हात आवरला नाही,’ म्हणजेच त्यांनी सेवेतला आपला आवेश कमी होऊ दिला नाही. आणि त्यांच्या या धीराचं यहोवाने त्यांना प्रतिफळ दिलं. म्हणून आपणही “विश्वासाद्वारे आणि धीर धरण्याद्वारे जे अभिवचनाचे वारसदार” आहेत अशांचं अनुकरण करू या.—इब्री ६:१०-१२.
आपला विश्वास मजबूत ठेवा
१५. प्रचार करत राहण्याचा आपला निर्धार विश्वासामुळे कसा पक्का होतो?
१५ आपण जो संदेश सांगतो तो खरा असल्याचा आपल्याला विश्वास आहे. कारण बायबलमध्ये दिलेल्या अभिवचनांवर आपला भरवसा आहे. (स्तो. ११९:४२; यश. ४०:८) तसंच, बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्या आपल्या दिवसांत पूर्ण झाल्याचंही आपण पाहिलं आहे. आणि लोक जेव्हा बायबलची तत्त्वं लागू करतात तेव्हा त्यांच्या जीवनात कसा बदल होतो हेसुद्धा आपण पाहिलं आहे. या सगळ्या गोष्टींमुळे आपला विश्वास आणखी मजबूत होतो आणि जास्तीत जास्त लोकांना आनंदाचा संदेश सांगायची आपल्याला प्रेरणा मिळते.
१६. स्तोत्र ४६:१-३ या वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवावर आणि येशूवर असलेल्या आपल्या विश्वासामुळे प्रचार करत राहण्याचा आपला निर्धार कसा पक्का होतो?
१६ तसंच, आनंदाचा संदेश देणाऱ्या यहोवा देवावर आणि त्याने ज्याला आपल्या राज्याचा राजा म्हणून निवडलं आहे त्या येशू ख्रिस्तावर आपला विश्वास आहे. (योहा. १४:१) म्हणून आपल्यावर कितीही वाईट परिस्थिती आली, तरी यहोवा आपल्याला सामर्थ्य देईल आणि आपलं संरक्षण करेल याची आपल्याला खातरी आहे. (स्तोत्र ४६:१-३ वाचा.) तसंच, आपल्याला याचीही खातरी आहे की यहोवाकडून मिळालेल्या अधिकाराचा आणि शक्तीचा उपयोग करून आज येशू स्वर्गातून प्रचारकार्याचं मार्गदर्शन करत आहे.—मत्त. २८:१८-२०.
१७. आपण प्रचाराचं काम का करत राहावं याचं एक उदाहरण द्या.
१७ विश्वासामुळे आपल्याला याची खातरी मिळते, की यहोवा आपल्या मेहनतीवर नक्की आशीर्वाद देईल; कधीकधी आपण अपेक्षाही करणार नाही अशा मार्गांनी. (उप. ११:६) आपण साक्षकार्य करण्यासाठी ट्रॉली लावतो किंवा टेबल मांडतो, तेव्हा तिथून दररोज ये-जा करणारे हजारो लोक ते पाहत असतात. साक्षकार्य करण्याची ही पद्धत परिणामकारक आहे का? हो, नक्कीच आहे! नोव्हेंबर २०१४ ची आपली राज्य सेवा यात दिलेल्या अनुभवाकडे लक्ष द्या. एका कॉलेज विद्यार्थीनीला यहोवाच्या साक्षीदारांवर एक लेख लिहायचा होता. पण तिला राज्य सभागृह सापडत नव्हतं. काही दिवसांनी मात्र तिला कॉलेजच्या आवारातच टेबलावर प्रकाशनांचं प्रदर्शन मांडलेले साक्षीदार दिसले. आणि लेख लिहिण्यासाठी तिला जी माहिती हवी होती ती तिला तिथून मिळाली. पुढे तिचा बाप्तिस्मा झाला आणि आज ती नियमित पायनियर म्हणून सेवा करत आहे. अशा अनुभवांमुळे आपल्याला याची जाणीव होते, की अजूनही असे बरेच लोक आहेत ज्यांना राज्याचा संदेश ऐकायची इच्छा आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला प्रचार करत राहण्याची प्रेरणा देते.
आपला हात आवरू न देण्याचा निर्धार करा
१८. प्रचाराचं काम यहोवाच्या इच्छेप्रमाणे पूर्ण होईल याची आपण खातरी का बाळगू शकतो?
१८ प्रचाराचं काम पूर्ण व्हायला उशीर होणार नाही. ठरलेल्या वेळी ते नक्की पूर्ण होईल. कारण यहोवा प्रत्येक गोष्ट वेळेवर करतो. नोहाच्या दिवसांत काय झालं त्याचा विचार करा. जलप्रलय कधी येईल याची वेळ यहोवाने जवळजवळ १२० वर्षांआधीच ठरवली होती. याच्या बऱ्याच वर्षांनंतर त्याने नोहाला तारू बांधायला सांगितलं. तेव्हापासून ४० किंवा ५० वर्षांपर्यंत नोहा तारू बांधायला आणि लोकांना प्रचार करायला मेहनत घेत राहिला. लोक त्याच्या इशाऱ्याकडे लक्ष देत नव्हते. पण तरीही यहोवाने जोपर्यंत त्याला प्राण्यांना तारवात घेऊन जायला सांगितलं नाही, तोपर्यंत तो लोकांना प्रचार करत राहिला. मग ठरवलेल्या वेळी यहोवाने तारवाचं दार बंद केलं.—उत्प. ६:३; ७:१, २, १६.
१९. आपण जर ‘आपला हात आवरला नाही’ तर आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतील?
१९ लवकरच अशी वेळ येईल जेव्हा यहोवा आपल्याला प्रचाराचं काम बंद करायला सांगेल. मग तो सैतानाच्या दुष्ट जगाचा नाश करेल आणि एक नवीन जग आणेल जिथे फक्त यहोवाच्या आज्ञा पाळणारेच लोक राहतील. पण तोपर्यंत नोहा, हबक्कूक आणि इतरांप्रमाणे आपण ‘आपला हात आवरणार नाही.’ तर आपण प्रचाराच्या कामावर आपलं लक्ष लावू, धीर धरू आणि यहोवावर आणि त्याच्या अभिवचनांवर आपला विश्वास मजबूत करत राहू.
गीत १० “हा मी आहे मला पाठीव!”
^ परि. 5 आधीच्या लेखात, प्रगती करणाऱ्या बायबल विद्यार्थ्यांना राज्याचा प्रचारक बनण्याचं प्रोत्साहन दिलं होतं. या लेखात सगळ्याच प्रचारकांना, मग ते नवीन असोत किंवा अनुभवी, प्रचार करत राहण्याचं प्रोत्साहन दिलं आहे. आणि जोपर्यंत यहोवा हे काम थांबवायला सांगत नाही, तोपर्यंत ते करत राहण्यासाठी कोणत्या तीन गोष्टी आपल्याला मदत करतील याबद्दलही या लेखात सांगितलं आहे.
^ परि. 2 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: या लेखात, “आपला हात आवरू नको” या शब्दांचा अर्थ असा होतो, की जोपर्यंत यहोवा प्रचाराचं काम थांबवायला सांगत नाही, तोपर्यंत ते करत राहण्याचा पक्का निर्धार करणं.
^ परि. 5 येशू १९१४ मध्ये राजा बनला तेव्हा ‘प्रभूचा दिवस’ सुरू झाला. आणि हा दिवस, येशूच्या हजार वर्षांच्या राज्याच्या शेवटी संपेल.