देवाला जाणून घेतल्याने तुम्हाला कसा फायदा होईल?
आतापर्यंत या अंकातल्या लेखांद्वारे आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी खूप मदत झाली आहे. तो म्हणजे आपण देवाला जाणून घेऊ शकतो का? आपण आधी बायबलमधून पाहिलं की त्याचं नाव यहोवा आहे आणि प्रेम हा त्याचा मुख्य गुण आहे. तसंच आपण हेही पाहिलं की त्याने काय केलं आहे आणि तो मानवजातीच्या भविष्यासाठी काय करणार आहे. देवाबद्दल बरंच काही शिकण्यासारखं असलं, तरी तुमच्या मनात प्रश्न येईल की त्याच्याबद्दल आणखी शिकल्यामुळे तुम्हाला काय फायदा होईल.
देव वचन देतो की जर तुम्ही त्याचा शोध घ्याल तर तो तुम्हाला सापडेल. (१ इतिहास २८:९) तुम्ही देवाला जाणून घ्याल तेव्हा तुम्हाला एक खूप मौल्यवान भेटवस्तू मिळेल. ती भेटवस्तू म्हणजे “परमेश्वराचे सख्य.” (स्तोत्र २५:१४) या सख्यामुळे किंवा मैत्रीमुळे तुम्हाला कसा फायदा होईल?
खरा आनंद. बायबल देवाला ‘आनंदी देव’ असं म्हणतं. (१ तीमथ्य १:११) त्याच्याशी एक घनिष्ठ नातं जोडल्यामुळे आणि त्याच्या मार्गांचं अनुकरण केल्यामुळे तुम्हाला खरा आनंद मिळेल. यामुळे तुम्हाला भावनिक, मानसिक आणि शारीरिक रीत्या फायदा होईल. (स्तोत्र ३३:१२) तसंच तुम्ही धोकादायक असणारी जीवनशैली टाळाल, चांगल्या सवयी विकसित कराल आणि इतरांसोबत तुमचं चांगलं नातं असेल. या सर्व गोष्टी केल्यामुळे तुम्हाला जीवनात आनंद मिळेल. मग तुम्हाला स्तोत्रकर्त्यासारखं वाटेल. त्याने म्हटलं: “माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे.”—स्तोत्र ७३:२८.
वैयक्तिक रीत्या काळजी. यहोवा त्याच्या सेवकांना वचन देतो: “मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.” (स्तोत्र ३२:८) याचा अर्थ, यहोवा आपल्या सेवकांची वैयक्तिक रीत्या काळजी घेतो आणि प्रत्येकाच्या गरजा पुरवतो. (स्तोत्र १३९:१, २) यहोवासोबत एक घनिष्ठ नातं जोडल्यावर तुम्हाला जाणवेल की तो तुमची मदत करायला नेहमी तयार आहे.
एक सुंदर भविष्य. यहोवा देवाने तुम्हाला एक आनंदी आणि समाधानी जीवन मिळवण्यासाठी मदत करण्यासोबतच, एक सुंदर भविष्याचा मार्गही मोकळा केला आहे. (यशया ४८:१७, १८) बायबल म्हणतं: “सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे, की त्यांनी एकाच खऱ्या देवाला, म्हणजे तुला आणि ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला ओळखावं.” (योहान १७:३) या कठीण काळात देवाने दिलेली आशा एका अशा नांगरासारखी आहे जी आपल्याला स्थिर राहायला मदत करते.—इब्री लोकांना ६:१९.
देवाला जाणून घेण्याची आणि त्याच्यासोबत एक वैयक्तिक नातं विकसित करण्याची अनेक महत्त्वपूर्ण कारणं आहेत. या अंकात आपण त्यांपैकी काहींवरच चर्चा केली आहे. आणखीन माहितीसाठी आम्ही तुम्हाला यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधण्याचं किंवा jw.org/mr या वेबसाईटला भेट देण्याचं आमंत्रण देतो.