देव कसा आहे?
आपण जितकं जास्त एका व्यक्तीच्या गुणांबद्दल जाणून घेऊ, तितक्या चांगल्या प्रकारे आपण तिला ओळखू. यामुळे आपली तिच्यासोबत असलेली मैत्री घनिष्ठ होईल. त्याच प्रकारे, यहोवाचे गुण जाणून घेतल्यामुळे आपल्याला कळेल की तो कसा आहे आणि आपलं त्याच्यासोबतचं नातं घनिष्ठ होईल. देवाच्या सर्व अद्भुत गुणांमध्ये त्याचे चार गुण खूप उल्लेखनीय आहेत: शक्ती, बुद्धी, न्याय आणि प्रेम.
देव शक्तिशाली आहे
“प्रभू परमेश्वरा! पाहा, तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली.”—यिर्मया ३२:१७.
देवाने घडवलेल्या सृष्टीतून आपल्याला त्याची शक्ती दिसून येते. जसं की, तुम्ही उन्हाळ्यात लख्ख प्रकाशात बाहेर उभं राहिलात की तुमच्या त्वचेला काय जाणवेल? सूर्याच्या प्रकाशामुळे तुम्हाला ऊब जाणवेल. खरंतर तुम्ही यहोवाची शक्ती अनुभवत असता. सूर्य किती शक्तिशाली आहे? सूर्याच्या आतल्या भागाचं तापमान जवळपास १,५०,००,००० डिग्री सेल्सियस इतकं आहे. लाखो-करोडो आण्विक बॉम्ब्सच्या विस्फोटातून जितकी ऊर्जा बाहेर पडेल, तितकी ऊर्जा सूर्यातून दर सेकंदाला बाहेर पडत असते.
असं असलं तरी, विश्वातल्या कोट्यवधी ताऱ्यांच्या तुलनेत आपला सूर्य खूप लहान आहे. वैज्ञानिकांनी अनुमान लावला आहे की मोठ्या ताऱ्यांपैकी, यु वाय स्कुती (UY Scuti) नावाच्या ताऱ्याचा व्यास सूर्यापेक्षा जवळजवळ १,७०० पट जास्त आहे. जर यु वाय स्कुतीला सूर्याच्या जागी ठेवलं तर पृथ्वी त्याच्यात सामावेल आणि त्याचा विस्तार गुरू (जुपिटर) ग्रहाच्या कक्षेबाहेरपर्यंत असेल. यामुळे सुरुवातीला उल्लेख केलेल्या यिर्मया नावाच्या बायबलच्या एका लेखकाचे शब्द आणखी चांगल्या प्रकारे समजायला आपल्याला मदत
होते. त्याने म्हटलं की यहोवा देवाने त्याच्या महासामर्थ्याद्वारे आकाश आणि पृथ्वी म्हणजे संपूर्ण विश्व बनवलं.देव शक्तिशाली आहे हे जाणल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो? देवाने बनवलेली सृष्टी जसं की, सूर्य आणि पृथ्वी यांवर आपलं जीवन अवलंबून आहे. त्यासोबतच, प्रत्येकाला फायदा होईल अशा प्रकारे देव त्याच्या शक्तीचा वापर करतो. ते कसं? पहिल्या शतकात देवाने येशूला चमत्कार करण्याची शक्ती दिली होती. त्याबद्दल बायबलमध्ये सांगितलं आहे: “आंधळे आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत, लंगडे चालत आहेत, कुष्ठरोगी शुद्ध केले जात आहेत, बहिऱ्यांना ऐकू येत आहे, मेलेल्यांना जिवंत केलं जात आहे.” (मत्तय ११:५) आजच्या काळाबद्दल काय? बायबल म्हणतं: “तो थकलेल्याला शक्ती देतो.” तसंच त्यात हेही म्हटलं आहे: “जे यहोवाची प्रतीक्षा करतात ते आपली शक्ती नवी करतील.” (यशया ४०:२९, ३१, पं.र.भा.) जीवनात कठीण समस्यांना सामोरे जायला आणि परीक्षेत टिकून राहायला देव आपल्याला “असाधारण सामर्थ्य” देऊ शकतो. (२ करिंथकर ४:७) आपण समस्येत असताना देव आपली मदत करण्यासाठी आपल्या शक्तीचा वापर करतो. अशा प्रेमळ देवासोबत आपलं एक घनिष्ठ नातं असावं असं आपल्या सर्वांनाच वाटणार नाही का? नक्कीच वाटेल!
देव बुद्धिमान आहे
“हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सुज्ञतेने केली; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.”—स्तोत्र १०४:२४.
देवाने घडवलेल्या गोष्टींबद्दल आपण जितकं जास्त शिकू तितकंच त्याच्या बुद्धिमत्तेबद्दल आपल्या मनात कृतज्ञता वाढेल. बायोमिमेटिक्स किंवा बायोमिमिक्री हे असं एक शास्त्र आहे ज्यात निसर्गातल्या गोष्टींच्या रचनेची नक्कल केली जाते. यात वैज्ञानिक यहोवाने बनवलेल्या सृष्टीचं परीक्षण करतात आणि आपल्या रचनेत सुधारणा करण्यासाठी त्यांची नक्कल करतात. याची अनेक उदाहरणं आहेत. जसं की, कॅमेरा किंवा विमानाची रचना.
देवाच्या बुद्धीचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मानवाचं शरीर. हे समजण्यासाठी आपण गर्भात बाळ कसं वाढतं याचं उदाहरण घेऊ या. ही प्रक्रिया फलित कोशिकेपासून सुरू होते. यात मानवाचं शरीर तयार होण्यासाठी लागणारी सर्व माहिती असते. या कोशिकेचं (Cell) विभाजन त्यासारख्याच अनेक कोशिकांमध्ये होत राहतं. पण एका योग्य वेळी त्या कोशिकांचं विभाजन विशिष्ट प्रकारच्या अनेक कोशिकांमध्ये होतं. जसं की रक्त कोशिका, मज्जातंतू कोशिका व हाडांच्या कोशिका. लवकरच शरीराचे भाग तयार होतात आणि संपूर्ण शरीर कार्य करू लागतं. फक्त नऊ महिन्यांतच एका कोशिकेपासून लाखो कोशिका असलेलं एक बाळ तयार होतं. अशा रचनेमागे असणारी बुद्धी पाहून अनेक जण बायबलच्या एका लेखकाशी सहमत होतील. त्याने म्हटलं: “भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो.”—स्तोत्र १३९:१४.
देवाच्या बुद्धीमुळे आपल्याला कसा फायदा होतो? आपल्याला आनंदी राहण्यासाठी कशाची गरज आहे हे आपल्या निर्माणकर्त्याला माहीत आहे. त्याच्याकडे असलेलं अफाट ज्ञान आणि समज यांमुळे तो आपल्याला त्याच्या वचनातून म्हणजे बायबलमधून सुज्ञ सल्ला देतो. उदाहरणार्थ, बायबलमध्ये म्हटलं आहे: “एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.” (कलस्सैकर ३:१३) हा सल्ला खरंच सुज्ञ आहे का? हो. संशोधनातून दिसून आलं आहे की क्षमा केल्यामुळे चांगली झोप लागू शकते आणि रक्तदाब कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. यामुळे नैराश्य येण्याचा आणि इतर आजार जडण्याचा धोका कमी होऊ शकतो. देव एका प्रेमळ आणि दयाळू मित्रासारखा आहे. एक असा मित्र जो नेहमी मदतदायी आणि फायदेकारक ठरणारा सल्ला देतो. (२ तीमथ्य ३:१६, १७) तुम्हालाही असा एक मित्र हवा आहे का?
देव न्यायी आहे
“परमेश्वराला न्याय प्रिय आहे.”—स्तोत्र ३७:२८.
देव नेहमी योग्य तेच करतो. इतकंच काय तर “देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाही” आपण करू शकत नाही. (ईयोब ३४:१०) त्याचा न्यायीपणा खरा आहे. स्तोत्रकर्त्याने यहोवाबद्दल म्हटलं: “तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील.” (स्तोत्र ६७:४) “परमेश्वर हृदय पाहतो” म्हणून ढोंगीपणा करून कोणी त्याला फसवू शकत नाही. यामुळे तो अचूक न्याय करू शकतो. (१ शमुवेल १६:७) तसंच, या पृथ्वीवर होत असलेला सर्व प्रकारचा अन्याय आणि भ्रष्टाचार त्याला माहीत आहे. त्याने अभिवचन दिलं आहे की तो लवकरच “दुर्जनांचा देशांतून उच्छेद” करेल.—नीतिसूत्रे २:२२.
पण देव शिक्षा करण्यासाठी आतुर असलेला दुष्ट न्यायाधीश नाही. त्याला योग्य वाटतं तेव्हा तो दया दाखवतो. बायबल म्हणतं की दुष्ट व्यक्ती मनापासून पश्चात्ताप करते, तेव्हा यहोवा तिच्याबाबतीतही “दयाळू व कृपाळू आहे.” यालाच आपण खरा न्याय म्हणणार नाही का?—स्तोत्र १०३:८; २ पेत्र ३:९.
देवाच्या न्यायीपणाचा आपल्याला कसा फायदा होतो? येशूच्या एका शिष्याने, पेत्रने म्हटलं: “देव भेदभाव करत नाही, तर प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भीती बाळगून योग्य ते करतो, त्याचा तो स्वीकार करतो.” (प्रेषितांची कार्ये १०:३४, ३५) देव पक्षपाती नाही किंवा तो फक्त काही विशिष्ट लोकांबद्दलच आवड दाखवत नाही. यामुळे आपल्याला त्याच्या न्यायीपणाचा फायदा होतो. आपण कोणत्याही समाजाचे, देशाचे असलो किंवा आपलं शिक्षण कितीही असलं अथवा समाजात आपलं कोणतंही स्थान असलं तरी तो आपल्याला त्याचे उपासक होण्यासाठी निवडतो.
देवाची इच्छा आहे की आपण त्याचा न्यायीपणा समजून घ्यावा आणि त्यापासून फायदा मिळवावा. यासाठी त्याने आपल्याला विवेक दिला आहे. बायबलमध्ये त्याचं वर्णन करताना म्हटलं आहे, की विवेक हा “हृदयावर” लिहिलेल्या एका नियमशास्त्राप्रमाणे आपलं वागणं योग्य किंवा अयोग्य ठरवण्यासाठी “साक्ष देतो.” (रोमकर २:१५) यामुळे आपल्याला कसा फायदा होतो? आपला विवेक जर प्रशिक्षित असेल तर तो आपल्याला धोकेदायक गोष्टींपासून किंवा अन्याय करण्यापासून रोखू शकतो. आणि जर आपल्या हातून एखादी चूक झाली तर तो आपल्याला पस्तावा करण्यासाठी आणि सुधार करण्यासाठी मदत करू शकतो. खरंच, देव कसा न्याय करतो याची समज असल्यामुळे आपल्याला खूप मदत होते. आणि आपण त्याच्याशी एक नातं जोडू शकतो.
देव प्रेम आहे
“देव प्रेम आहे.”—१ योहान ४:८.
बायबल म्हणतं की देव प्रेम आहे. पण त्यात असं म्हटलेलं नाही की देव शक्ती, बुद्धी किंवा न्याय आहे. असं का? कारण शक्तीमुळे तो कार्यं करू शकतो. आणि त्याचा न्यायीपणा व बुद्धी यांमुळे त्याच्या कार्याचं मार्गदर्शन होतं. पण खरंतर प्रेम हा गुण त्याला कार्यं करायला प्रेरित करतो. तो जे काही करतो ते तो प्रेमाने प्रेरित होऊन करतो.
यहोवाला कशाचीच कमी नाही. पण तरी प्रेमामुळे प्रेरित होऊन त्याने स्वर्गात आणि पृथ्वीवर बुद्धिमान जणांची रचना केली. ते देवाच्या प्रेमाचा व त्याच्या दयेचा आनंद लुटू शकतात आणि त्यांना यामुळे फायदा होतो. त्याने निस्वार्थपणे मानवांना राहण्यासाठी एक सुंदर पृथ्वी बनवली. तो आजही सर्व मानवांप्रती प्रेम दाखवतो. “तो चांगल्या लोकांसोबतच दुष्टांवरही सूर्य उगवतो आणि नीतिमान लोकांसोबतच अनीतिमान लोकांवरही पाऊस पाडतो.”—मत्तय ५:४५.
त्यासोबतच, “यहोवा दयाळू व अतिशय कनवाळू आहे.” (याकोब ५:११) त्याला जाणून घेण्यासाठी आणि त्याच्याशी एक नातं जोडण्यासाठी जे प्रामाणिक मनाने प्रयत्न करतात त्यांच्याप्रती तो आपलं प्रेम व्यक्त करतो. देव अशा प्रत्येक व्यक्तीची दखल घेतो. इतकंच काय तर “त्याला तुमची काळजी आहे.”—१ पेत्र ५:७.
देवाच्या प्रेमामुळे आपल्याला कसा फायदा होतो? तांबडे सोनेरी सूर्यास्त पाहायला आपल्या सर्वांनाच आवडतं. बाळाच्या हसण्याचा गोड आवाज कानावर पडला की मन अगदी प्रफुल्लित होतं. आपल्या कुटुंबातल्या सदस्यांचं प्रेम अनुभवायला आपल्याला आवडतं. या गोष्टी जीवनावश्यक नसल्या तरी यामुळे आपलं जीवन खूप समृद्ध बनतं.
देवाचं आपल्यावर प्रेम आहे हे आणखी एका मार्गाने सिद्ध होतं आणि यामुळे आपल्याला फायदा होतो. तो मार्ग म्हणजे प्रार्थना. बायबल आपल्याला आर्जवतं: “कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. तर, सर्व गोष्टींत देवाचे आभार मानून प्रार्थना व याचना करा आणि आपल्या विनंत्या देवाला कळवा.” एका प्रेमळ पित्याप्रमाणे तो आपल्या वैयक्तिक चिंतांबद्दलही आपल्याला मदत करू शकतो. त्यानंतर यहोवा आपलं निःस्वार्थ प्रेम दाखवून आपल्याला अभिवचन देतो, की तो आपल्याला “सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती” देईल.—फिलिप्पैकर ४:६, ७.
आपण देवाचे मुख्य गुण म्हणजे शक्ती, बुद्धी, न्याय आणि प्रेम यांबद्दल संक्षिप्त माहिती पाहिली. यामुळे तुम्हाला देव कसा आहे हे आणखीन चांगल्या रीत्या समजण्यासाठी मदत झाली असेल. नाही का? तुमच्या फायद्यासाठी त्याने काय केलं आहे आणि पुढे तो काय करणार आहे हे तुम्ही जाणून घ्यावं यासाठी आम्ही तुम्हाला आर्जवतो. यामुळे तुम्हाला देवाबद्दल आणखीन कदर वाढवण्यासाठी मदत मिळेल.
देव कसा आहे? देव सर्वात शक्तिशाली, बुद्धिमान आणि न्यायी आहे. पण त्याचा सर्वात उल्लेखनीय गुण प्रेम आहे