जगभरात मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ
“मनावर सतत काहीतरी दडपण असतं, काही कारण नसतानाही चिंता वाटते.”
“मी खूप खुश असतो तेव्हा खरंतर मला भीती वाटते, कारण थोड्या वेळानंतर मी खूप उदास होणारेय हे मला माहीत असतं.”
“मी सहसा फक्त आजच्यापुरता विचार करायचा प्रयत्न करते, पण तरीसुद्धा मला पुढच्या कितीतरी गोष्टींची चिंता सतावते.”
वर दिलेली वाक्यं मानसिक आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांशी झगडत असलेल्या व्यक्तींची आहेत. तुम्हालाही कधी त्यांच्यासारखंच वाटतं का? किंवा तुमची एखादी जवळची व्यक्ती अशा समस्येचा सामना करत आहे का?
जर असं असेल, तर निराश होऊ नका. तुम्ही एकटे नाहीत. आज बरेच लोक मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करत आहेत, मग या त्यांच्या स्वतःच्या असोत किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या.
आज आपण “खूप कठीण” काळात राहत आहोत यात काहीच शंका नाही. लोकांना आज वेगवेगळ्या समस्यांचा आणि दुःखांचा सामना करावा लागतोय. (२ तीमथ्य ३:१) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेल्या एका संशोधनातून असं दिसून आलंय, की जगभरात दर आठ व्यक्तींपैकी एका व्यक्तीला मानसिक आरोग्याची कोणती ना कोणती समस्या आहे. २०२० मध्ये कोविड महामारीमुळे चिंता विकार आणि अतिनैराश्य (डिप्रेशन) असलेल्या रुग्णांची संख्या जवळजवळ सात कोटी ऐंशी लाखांनी वाढली.
या संख्या माहीत असणं नक्कीच महत्त्वाचंय; पण मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय आणि तुम्ही व तुमची जवळची माणसं आपलं मानसिक आरोग्य कसं जपू शकतात, हे माहीत असणं त्यापेक्षा जास्त महत्त्वाचंय.
मानसिक आरोग्य म्हणजे काय?
तुमचं मानसिक आरोग्य चांगलं असतं तेव्हा तुमचं मन शांत असतं आणि तुम्ही आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकता. तसंच, तुम्ही रोजच्या जीवनातल्या ताणतणावांचा सामना करून आपलं कामही व्यवस्थित करू शकता. आणि एकंदरीत तुम्ही आपल्या जीवनात समाधानी असता.
मानसिक आजार म्हणजे काय?
-
एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार झालाय याचा अर्थ तिच्यात काहीतरी शारीरिक किंवा मानसिक कमतरता आहे किंवा तिच्या स्वतःच्या चुकीमुळे तिला तो आजार झालाय असा होत नाही.
-
ही एक आरोग्याची समस्या आहे. यामध्ये एका व्यक्तीच्या विचार करायच्या क्षमतेवर, भावनांवर आणि वागण्या-बोलण्यावर परिणाम होतो आणि यामुळे तिला खूप त्रास होतो.
-
मानसिक आजार झालेल्या व्यक्तीला इतरांशी जुळवून घेता येत नाही आणि दररोजच्या जीवनातले ताणतणाव ती सहन करू शकत नाही.
-
मानसिक आजार हा कोणत्याही वयाच्या, संस्कृतीच्या, वर्णाच्या, वंशाच्या किंवा धर्माच्या व्यक्तीला, तसंच गरीब, श्रीमंत, शिक्षित किंवा अशिक्षित अशा कोणालाही होऊ शकतो.
मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी मदत
कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यात, तसंच झोपण्याच्या किंवा खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये लक्षात येण्यासारखे बदल दिसून येतात. ती बऱ्याच काळापर्यंत दुःखी, निराश किंवा चिंतेत राहते. जर तुम्हाला स्वतःमध्ये किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीमध्ये असे बदल दिसून आले, तर याचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी कदाचित तुम्हाला तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल.
आजपर्यंत होऊन गेलेला सगळ्यात बुद्धिमान माणूस, येशू ख्रिस्त एकदा असं म्हणाला होता: “वैद्याची गरज निरोगी लोकांना नाही, तर आजारी लोकांना असते.” (मत्तय ९:१२) मानसिक आजारांचा सामना करणारे जेव्हा योग्य उपचार आणि औषधं घेतात, तेव्हा त्यांच्या आजाराची लक्षणं बऱ्यापैकी कमी होतात. तसंच ते समाधानी आणि आनंदी जीवन जगू लागतात. म्हणूनच, जर एखाद्यामध्ये खूप दिवसांपासून किंवा गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसत असतील तर लवकरात लवकर उपचार घेणं खूप गरजेचंय. a
बायबल हे वैद्यकीय उपचारांबद्दल सांगणारं पुस्तक नसलं, तरी यात दिलेल्या सल्ल्यांमुळे आपलं मानसिक आरोग्य जपायला मदत होऊ शकते. बायबल आपल्याला कशी मदत करू शकतं, हे आता आपण पुढच्या लेखांमध्ये पाहू या.
a टेहळणी बुरूज नियतकालिक कोणत्याही विशिष्ट उपचारपद्धतीची शिफारस करत नाही. प्रत्येक व्यक्तीने उपलब्ध असलेल्या पर्यायांचा नीट विचार करून याबाबतीत स्वतः निर्णय घ्यावा.