या जगाचा अंत होणार आहे का?
या जगाचा अंत होणार आहे हे तुम्ही ऐकलं असेल. बायबलमध्येसुद्धा तेच सांगितलं आहे. (१ योहान २:१७) पण बायबल असं सांगतं का, की पृथ्वीचा आणि पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांचा नाश होईल? त्यावर काहीच उरणार नाही?
नाही, बायबल असं काहीही सांगत नाही!
अंत कशाचा होणार नाही ?
सगळ्याच लोकांचा अंत होणार नाही
बायबल म्हणतं: देवाने “पृथ्वी विनाकारण बनवली नाही, तर तिच्यावर लोकांनी राहावं म्हणून तिला घडवलं.”—यशया ४५:१८.
पृथ्वीचा अंत होणार नाही
बायबल म्हणतं: “एक पिढी जाते आणि दुसरी येते, पृथ्वी मात्र सर्वकाळ राहते.”—उपदेशक १:४.
याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ असा होतो, की पृथ्वीचा कधीच नाश होणार नाही आणि त्यावर लोक नेहमीच राहतील. मग जगाचा अंत म्हणजे नेमकं काय?
या माहितीवर विचार करा: बायबलमध्ये या जगाच्या अंताची तुलना फार पूर्वी होऊन गेलेल्या एका घटनेशी करण्यात आली आहे. त्या वेळी, “पृथ्वीवर हिंसाचार खूप वाढला होता.” (उत्पत्ती ६:१३) त्यामुळे देवाने एक मोठा जलप्रलय आणला आणि त्यात सगळ्या दुष्ट लोकांचा नाश केला. पण त्या काळात नोहा नावाचा देवाचा एक भक्त होता. तो एक चांगला माणूस होता. म्हणून देवाने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला त्या जलप्रलयातून वाचवलं. त्या घटनेबद्दल बायबल असं म्हणतं: “त्या काळातल्या जगाचा जलप्रलयाने नाश झाला.” (२ पेत्र ३:६) ‘जगाचा नाश झाला’ असं जरी इथे म्हटलं आहे, तरी त्या वेळी पृथ्वीचा नाश झाला नव्हता; तर पृथ्वीवरच्या दुष्ट लोकांचा नाश झाला होता. अगदी तसंच, जेव्हा या जगाचा अंत होईल तेव्हा पृथ्वीवरच्या फक्त दुष्ट लोकांचा आणि वाईट परिस्थितीचा नाश होईल. या पृथ्वीचा नाश होणार नाही.
अंत कशाचा होईल ?
समस्यांचा आणि दुष्टाईचा
बायबल म्हणतं: “थोड्याच काळाने दुष्ट लोक नाहीसे होतील; त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी तू त्यांना शोधलंस, तरी ते तुला सापडणार नाहीत. पण नम्र लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल, भरपूर शांती असल्यामुळे त्यांच्या आनंदाला सीमा राहणार नाही.”—स्तोत्र ३७:१०, ११.
याचा काय अर्थ होतो? नोहाच्या दिवसांत जेव्हा जलप्रलय आला, तेव्हा दुष्टाई कायमची नाहीशी झाली नव्हती. जलप्रलयानंतर लोक पुन्हा वाईट कामं करू लागले. पण लवकरच जो अंत येणार आहे त्यात देव दुष्टाईला आणि ‘दुष्ट लोकांना कायमचं नाहीसं करेल.’ हे तो त्याच्या राज्याद्वारे करणार आहे. देवाचं राज्य एक असं सरकार आहे जे संपूर्ण पृथ्वीवर स्वर्गातून राज्य करेल.
या माहितीवर विचार करा: सध्या जे लोक या जगावर अधिकार गाजवत आहेत ते देवाच्या राज्याला स्वीकारतील का? नाही. बायबल म्हणतं, की ते देवाच्या राज्याचा विरोध करतील. (स्तोत्र २:२) देवाचं राज्य मात्र या सगळ्या मानवी सरकारांचा नाश करेल आणि “फक्त तेच कायम टिकेल.” (दानीएल २:४४) पण मानवी सरकारांचा अंत होणं का गरजेचं आहे?
गरज—मानवी सरकारांचा अंत होण्याची
बायबल म्हणतं: “मनुष्याला तर आपली पावलंही नीट टाकता येत नाहीत.”—यिर्मया १०:२३.
याचा काय अर्थ होतो? मानवांना मुळात अधिकार गाजवण्यासाठी बनवलंच नव्हतं. त्यामुळे ते इतरांवर कधीच चांगल्या प्रकारे शासन करू शकत नाहीत आणि त्यांच्या समस्याही सोडवू शकत नाहीत.
या माहितीवर विचार करा: ब्रिटानिका अकॅडेमिक या पुस्तकात असं म्हटलं आहे: “आजपर्यंत कोणतंही मानवी सरकार गरिबी, उपासमार, रोगराई, नैसर्गिक आपत्ती, युद्धं आणि हिंसाचार यांसारख्या समस्या सोडवू शकलं नाही.” त्या पुस्तकात पुढे असंही म्हटलं आहे: “काहींचं असं म्हणणं आहे, की संपूर्ण जगावर जर एकाच सरकारने राज्य केलं, तरच या समस्या कायमच्या सुटतील.” पण जगातली सगळी मानवी सरकारं एक झाली, तरी ती या समस्या सोडवू शकणार नाहीत. कारण शेवटी ती माणसंच आहेत. देवाचं राज्य हे एकच असं सरकार आहे जे या जगातल्या सगळ्या समस्या कायमच्या काढू शकतं.
तर आपण पाहिलं, की जगाचा अंत म्हणजे फक्त दुष्ट लोकांचा आणि वाईट परिस्थितीचा अंत. त्यामुळे चांगल्या लोकांना घाबरायची गरज नाही. उलट, ते उत्सुकतेने त्याची वाट पाहू शकतात. कारण या जुन्या जगाचा नाश होऊन लवकरच एक सुंदर नवीन जग येणार आहे!
पण हे सगळं कधी होईल? या प्रश्नाचं उत्तर पुढच्या लेखात दिलं आहे.