बायबलनं बदललं जीवन!
आता मी स्त्रियांचा आणि स्वतःचाही आदर करतो
-
जन्म: १९६०
-
देश: फ्रान्स
-
पार्श्वभूमी: ड्रग्सचं व्यसन असलेला, क्रूर आणि स्त्रियांना तुच्छ लेखणारा
माझं आधीचं जीवन:
माझा जन्म फ्रान्समधील मलहाउस या ठिकाणी झाला. या शहरातील बहुतेक लोक फॅक्ट्रीमध्ये काम करणारे कामगार होते. आमचं हे शहर तिथं होणाऱ्या हिंसेसाठी कुख्यात होतं. माझ्या लहानपणीच्या आठवणी म्हणजे, शेजाऱ्यांमध्ये होणारी नेहमीची भांडणं आणि हिंसक मारा-माऱ्या. आमच्या कुटुंबात स्त्रियांना अगदी क्षुल्लक लेखलं जायचं. काही निर्णय घ्यायचे असले तर पुरुष मंडळी त्यांचे मत विचारात घ्यायचे नाही. मला लहानपणापासूनच असं शिकवण्यात आलं होतं की स्त्रियांचं विश्व हे फक्त चूल आणि मूल इतकंच आहे.
माझ्या बालपणातच मी फार वाईट प्रसंग बघितले. माझे बाबा खूप दारू प्यायचे आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा मी फक्त दहा वर्षांचाच होतो. पाच वर्षांनंतर माझ्या एका मोठ्या भावाने आत्महत्या केली. त्याच वर्षी आमच्या कुटुंबात एक खूप मोठा वाद झाला. आणि त्यात एकाचा खून होताना मी पाहिलं. हे पाहून तर मला धक्काच बसला. माझ्या कुटुंबातील सदस्यांनी मला चाकू आणि बंदूकीचा वापर करायला शिकवलं. मी जीवनात काहीच उद्देश नसलेला, गोंधळलेला तरुण होतो. मी माझं शरीर टॅटूनी भरून टाकलं. इतकंच नाही, तर मला दारू पिण्याचीही सवय लागली.
सोळा वर्षांचा झालो तोपर्यंत तर मी रोज १० ते १५ बियरच्या बॉटल्स संपवायचो. आणि लवकरच मला ड्रग्स घेण्याचीही सवय लागली. माझ्या या व्यसनांसाठी मी टाकून दिलेल्या लोखंडासारख्या भंगार गोष्टी विकू लागलो. इतकंच नाही तर मी चोरीही करू लागलो. १७ वर्षांचा होईपर्यंत तर मी जेलची हवादेखील खाल्ली होती. चोरी आणि मारामारीच्या गुन्ह्यांसाठी मला एकूण १८ वेळा शिक्षा ठोठावण्यात आली.
वीस-बावीस वर्षांचा होईपर्यंत मी आणखीनच बिगडलो. मी दिवसातनं २० वेळा चरस ओढायचो आणि अफूसारखी इतर ड्रग्स घेण्याचीही मला सवय लागली. ड्रग्सचं अती प्रमाणात सेवन केल्यामुळे कितीतरी वेळा मी मरता मरता वाचलो. त्यानंतर मी ड्रग्स विकू लागलो आणि त्यामुळे स्वतःकडे नेहमी हत्यारं ठेवू लागलो. एकदा मी एका माणसावर गोळी झाडली. पण, बरं झालं की ती त्याला न लागता त्याच्या बेल्टच्या बक्कलला लागली आणि तो वाचला. मी २४ वर्षांचा झालो तेव्हा माझी आई वारली. त्यानंतर मी आणखीनच रागीट बनलो. लोकांना माझी एवढी दहशत बसली, की मला समोरून येताना पाहून ते रस्ता बदलायचे. सतत मारा-मारी करत असल्यामुळे सहसा आठवड्याच्या शेवटी मी एकतर पोलीस स्टेशनमध्ये असायचो किंवा हॉस्पिटलमध्ये.
मी २८ वर्षांचा असताना लग्न केलं. पण, मी माझ्या बायकोला व्यवस्थित वागवत नव्हतो. मी तिला तुच्छ लेखायचो, तिला घालून पाडून बोलायचो आणि तिला मार-झोड करायचो. आम्ही सोबत असूनसुद्धा सोबत नसल्यासारखं होतो. मला वाटायचं की तिच्यावर फक्त चोरीच्या दागिन्यांचा वर्षाव केला तरी पुरे. त्यानंतर असं काही घडलं ज्याची मला जराही कल्पना नव्हती. माझी पत्नी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करू लागली. पहिल्याच बायबल अभ्यासानंतर तिने सिगरेट ओढणं सोडून दिलं. इतकंच नाही, तर तिने माझ्याकडून चोरीचे पैसे घेण्यास नकार दिला आणि मी तिला दिलेले सर्व दागिने तिने मला
परत केले. या गोष्टीचा मला फार राग आला. तिच्या बायबल अभ्यासाचा मी विरोध करायचो आणि तिच्या तोंडावर सिगरेटचा धूर सोडायचो. शेजाऱ्या-पाजाऱ्यांमध्ये, चारचौघांत मी नेहमी तिचा अपमान करायचो.एका रात्री दारूच्या नशेत असताना माझ्या हातून आमच्या घराला आग लागली. माझ्या पत्नीनं मला आणि आमच्या पाच वर्षांच्या मुलीला आगीतून वाचवलं. मी जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा माझं मन मला खाऊ लागलं, मला माझीच लाज वाटू लागली. देव मला कधीच माफ करणार नाही अशी माझी पक्की खात्री होती. कारण, एकदा मी एका पाळकाला असं म्हणताना ऐकलं होतं की सगळे दुष्ट लोक नरकात जातात. माझ्या सायकॅट्रिस्टने तर माझ्यापुढे हात टेकले. तो म्हणाला: “तू तर सुधारण्याच्या पलीकडे आहेस. तुझं काहीच होऊ शकत नाही.”
बायबलनं कसं जीवन बदललं?
या घटनेनंतर आम्ही माझ्या पत्नीच्या माहेरी राहायला गेलो. जेव्हा यहोवाचे साक्षीदार माझ्या पत्नीला भेटायला आले तेव्हा मी त्यांना विचारलं, “देव खरंच माझे सर्व गुन्हे माफ करेल का?” बायबलमधील १ करिंथकर ६:९-११ यातून त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यात देव ज्या गोष्टींचा द्वेष करतो अशा अनेक गोष्टींबद्दल सांगितलं आहे. पण त्यात पुढे असंही सांगितलं आहे, की “तुम्हापैकी कित्येक तसे होते.” या शब्दांमुळे मला ही खात्री पटली की मीही बदलू शकतो. यानंतर त्यांनी मला बायबलमधून १ योहान ४:८ हे वचनही दाखवलं. या वचनातून त्यांनी मला याची खात्री करून दिली, की देव माझ्यावर प्रेम करतो. हे सगळं ऐकून मला खूप उत्तेजन आणि सांत्वन मिळालं आणि मी त्यांना माझ्यासोबत आठवड्यातून दोनदा बायबल अभ्यास करायला सांगितलं. मी त्यांच्या ख्रिस्ती सभांनाही जाऊ लागलो. यासोबतच, मी यहोवा देवाला नेहमी प्रार्थना करायचो.
यानंतर एका महिन्यातच मी ड्रग्स घेण्याचं आणि दारू पिण्याचं सोडलं. पण, सुरुवातीला यामुळे मला खूप त्रास झाला. माझं शरीर माझ्याशीच लढू लागलं. रात्रीची भयंकर स्वप्नं, डोकं ठणकणं, संपूर्ण शरीरात वेदना होणं आणि व्यसनं सोडल्याचे इतरही परिणाम. पण, त्याच वेळी यहोवा माझा हात धरून मला सावरत आहे, हेदेखील मला जाणवत होतं. बायबलमधील एका लेखकाला जसं वाटलं तसंच मलाही वाटलं. पौल नावाच्या या लेखकाला देवाने ज्या प्रकारे मदत केली त्याबद्दल त्याने असं लिहिलं: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.” (फिलिप्पैकर ४:१३) कालांतराने मी सिगरेट ओढण्याचंही सोडू शकलो.—२ करिंथकर ७:१.
बायबलमुळे मला स्वतःवर ताबा मिळवणं तर शक्य झालंच, पण यामुळे माझ्या कुटुंबातही बरेच चांगले बदल घडले. माझ्या पत्नीबद्दलचा माझा दृष्टिकोन बदलला. मी तिला आदर देऊ लागलो. तिच्याशी बोलताना “प्लिज्” आणि “थँक्यू” या शब्दांचा वापर करू लागलो. तसंच, माझ्या मुलीचीही मी एका चांगल्या पित्यासारखी काळजी घेऊ लागलो. बायबल अभ्यास सुरू केल्याच्या एक वर्षातच मी असा निर्धार केला की मी संपूर्ण आयुष्य यहोवा देवाच्या इच्छेनुसार जगेन. आणि माझ्या पत्नीसारखाच मीही बाप्तिस्मा घेतला.
मला झालेला फायदा:
बायबलच्या तत्त्वांनुसार जीवन जगत असल्यामुळेच मी आज जिवंत आहे, हे मी पूर्ण खात्रीने म्हणू शकतो. यहोवाचे साक्षीदार नसलेले माझे नातेवाईकसुद्धा असं म्हणतात की जर मी स्वतःत बदल केले नसते, तर ड्रग्सच्या व्यसनात किंवा एखाद्या मारा-मारीत माझा जीव नक्कीच गेला असता.
पती आणि वडील म्हणून माझी काय जबाबदारी आहे ते मला बायबलमधून कळलं आणि त्यामुळे माझं कौटुंबिक जीवन पार बदलून गेलं. (इफिसकर ५:२५; ६:४) कुटुंब या नात्याने आम्ही खूप जवळ आलो. आता माझ्या पत्नीचं जीवन फक्त चूलीपर्यंतच मर्यादित नाही, तर आज ती आपला जास्तीतजास्त वेळ इतरांना देवाच्या राज्याबद्दल सांगण्यासाठी घालवते आणि या कामात मी तिला साथ देतो. आणि आमच्या ख्रिस्ती मंडळीत असलेली माझी जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी माझी पत्नी मला आनंदाने मदत करते.
यहोवा देवाने माझ्यावर जी दया केली आणि प्रेम दाखवलं त्यामुळे माझ्या आयुष्याला एक नवीन वळण मिळालं. त्याच्या गुणांबद्दल इतरांशी बोलावं असं मला मनापासून वाटतं. खासकरून अशा लोकांसोबत, ज्यांच्या सुधरण्याची आशा जगाने सोडून दिली आहे. कारण एकेकाळी माझ्याबद्दलही, लोकांचं असंच मत होतं. पण, मला हे समजलं आहे की बायबलमुळे कोणाचाही कायापालट होऊ शकतो आणि त्यांच्या जीवनाला चांगला उद्देश मिळू शकतो. बायबलमुळे मी इतरांचा आणि खासकरून स्त्रियांचा आदर करायला शिकलो. पण, यासोबतच मी स्वतःचाही आदर करायला शिकलो. (wp16-E No. 3)