देव लवकरच सर्व दुःखांचा अंत करेल
“हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू? तू ऐकत नाहीस. जुलूम झाला असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करत नाहीस.” (हबक्कूक १:२, ३) हे शब्द देवाच्या इच्छेनुसार वागणाऱ्या हबक्कूक नावाच्या एका भल्या व्यक्तीचे आहेत. देवावर त्याचा विश्वास नाही असा या विनंतीचा अर्थ होतो का? नाही! देवाने हबक्कूकला आश्वासन दिलं की तो त्याच्या नियुक्त वेळी सर्व दुःखांचा अंत करेल.—हबक्कूक २:२, ३.
तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला दुःख सहन करावं लागतं, तेव्हा तुम्ही सहजच या निष्कर्षावर याल की देव खूप उशीर लावत आहे, आतापर्यंत दुःख दूर करण्यासाठी त्याने काहीतरी पाऊल उचलायला हवं होतं. पण बायबल आपल्याला आश्वासन देतं: “काहींना वाटते त्याप्रमाणे, यहोवा आपले अभिवचन पूर्ण करण्याच्या बाबतीत उशीर करत नाही; उलट, तुमच्या बाबतीत तो सहनशीलता दाखवतो, कारण कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्चात्ताप करावा असे त्याला वाटते.”—२ पेत्र ३:९.
देव दुःखाचा कधी अंत करेल?
लवकरच! येशूने भविष्यवाणी केली की “जगाच्या व्यवस्थेच्या” शेवटच्या दिवसांमध्ये काही घटना घडतील. त्या घटना सोबत घडतील आणि एक विशिष्ट पिढी त्या घटना पाहील. (मत्तय २४:३-४२) येशूचे शब्द आपल्या दिवसांत पूर्ण होत आहेत. यावरून कळतं की मानवी घडामोडींबाबतीत देव लवकरच कार्यवाही करेल. *
पण देव दुःखांचा अंत कसा करणार आहे? येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने दाखवून दिलं की देवाकडे मानवांचं दुःख काढून टाकण्याची शक्ती आहे. याची काही उदाहरणं आपण पाहू या.
नैसर्गिक विपत्ती: येशू आणि त्याचे प्रेषित जेव्हा गालील समुद्रातून प्रवास करत होते तेव्हा समुद्रात एक भयंकर वादळ आलं. यामुळे नाव बुडून जाण्याची भीती होती. पण येशूने दाखवून दिलं की तो आणि त्याचा पिता नैसर्गिक शक्ती नियंत्रित करू शकतात. (कलस्सैकर १:१५, १६) येशूने फक्त म्हटलं: “श्श्श! शांत हो!” मग काय झालं? “तेव्हा वारा थांबला आणि समुद्र अगदी शांत झाला.”—मार्क ४:३५-३९.
आजारपण: बऱ्याच लोकांना माहीत होतं, की येशूकडे आजारी लोकांना बरं करण्याची शक्ती आहे. त्याने आंधळ्यांना, अपंगांना, कुष्ठरोग्यांना, आकडी किंवा फीट येण्याचा आजार असणाऱ्यांना तसंच इतर कुठलाही आजार असणाऱ्यांना बरं केलं. “आजारी असलेल्या सर्वांना त्याने बरे केले.”—मत्तय ४:२३, २४; ८:१६; ११:२-५.
अन्नटंचाई: येशूने देवाकडून मिळालेल्या शक्तीचा वापर करून अन्नाचं प्रमाण वाढवलं. बायबल म्हणतं की पृथ्वीवर असताना त्याने दोन वेळा हजारो लोकांना जेवू घातलं.—मत्तय १४:१४-२१; १५:३२-३८.
मृत्यू: पृथ्वीवर असताना येशूने देवाकडून मिळालेल्या शक्तीचा वापर करून तीन मृत जणांना जिवंत केलं. त्यांपैकी एकाचा तर मृत्यू होऊन चार दिवस झाले होते. यावरून दिसतं की यहोवाकडे मृत्यू काढून टाकण्याची शक्ती आहे. हे अहवाल बायबलमध्ये नमूद करण्यात आले आहेत.—मार्क ५:३५-४२; लूक ७:११-१६; योहान ११:३-४४.
^ परि. 5 शेवटच्या दिवसांबद्दल अधिक माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेलं, कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातला धडा ३२ पाहा. या पुस्तकाची मोफत प्रत तुम्ही www.dan124.com/mr या वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता.