अभ्यास लेख ५१
नेहमी “त्याचं ऐका”
“हा माझा मुलगा मला प्रिय आहे. त्याने माझं मन आनंदित केलंय. तुम्ही त्याचं ऐका.”—मत्त. १७:५.
गीत ३२ निर्भय व निश्चयी राहा!
सारांश *
१-२. (क) येशूच्या तीन प्रेषितांना देवाने काय आज्ञा दिली, आणि त्यांनी काय केलं? (ख) या लेखात आपण काय पाहणार आहोत?
इ.स. ३२ च्या वल्हांडण सणानंतर पेत्र, याकोब आणि योहान या तीन प्रेषितांनी एक रोमांचक दृष्टान्त पाहिला. एका उंच डोंगरावर असताना त्यांच्यासमोर येशूचं रूप बदललं. “त्याचा चेहरा सूर्यासारखा चमकू लागला आणि त्याचे कपडे प्रकाशासारखे तेजस्वी दिसू लागले.” (मत्त. १७:१-४) मग दृष्टान्ताच्या शेवटी, प्रेषितांनी देवाचा आवाज ऐकला. देवाने त्यांना म्हटलं: “हा माझा मुलगा मला प्रिय आहे. त्याने माझं मन आनंदित केलंय. तुम्ही त्याचं ऐका.” (मत्त. १७:५) हे तीन प्रेषित ज्या प्रकारे जीवन जगले त्यावरून दिसून आलं, की त्यांनी येशूचं ऐकलं. आपल्यालाही तेच करायचं आहे.
२ येशूचं ऐकणं म्हणजे काही गोष्टी करायचं सोडून देणं आणि काही गोष्टी करणं. मागच्या लेखात आपण दोन गोष्टी पाहिल्या ज्या आपण करायचं सोडून दिलं पाहिजे. आता या लेखात आपण अशा दोन गोष्टी पाहू ज्या आपण केल्या पाहिजेत.
“अरुंद दरवाजाने आत जा”
३. मत्तय ७:१३, १४ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण काय केलं पाहिजे?
३ मत्तय ७:१३, १४ वाचा. येशूने या ठिकाणी दोन दरवाजांबद्दल सांगितलं; एक दरवाजाने आपण “पसरट” रस्त्याकडे जाऊ शकतो, तर दुसऱ्या दरवाजाने आपण “छोट्या” किंवा “चिंचोळ्या” रस्त्याकडे जाऊ शकतो. या दोन रस्त्यांशिवाय तिसरा पर्याय नसल्यामुळे आपल्याला हे ठरवावं लागेल, की आपण कोणत्या रस्त्याने जाणार. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपलं सर्वकाळाचं जीवन या निर्णयावर अवलंबून आहे.
४. “पसरट” रस्त्याबद्दल काय म्हणता येईल?
४ या दोन रस्त्यांमधला फरक लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. “पसरट” रस्त्याने १ करिंथ. ६:९, १०; १ योहा. ५:१९.
जाणं सोपं असल्यामुळे बहुतेक लोक त्या रस्त्याने जायचं निवडत आहेत. आणि त्यांना पाहून बरेच लोक तेच करत आहेत. पण लोकांना हे समजत नाही, की खरंतर सैतान लोकांना या मार्गाने जायला लावतो. आणि हा मार्ग शेवटी नाशाकडे जातो.—५. काही जणांना “चिंचोळा” रस्ता कसा सापडला?
५ “पसरट” रस्त्याच्या अगदी उलट दुसरा रस्ता आहे. तो “छोटा” किंवा “चिंचोळा” आहे. आणि येशूने म्हटल्याप्रमाणे फक्त थोड्याच लोकांना तो सापडतो. याचं कारण येशूने पुढच्याच वचनात दिलं. त्याने आपल्या शिष्यांना खोट्या संदेष्ट्यांपासून जपून राहायचा इशारा दिला. (मत्त. ७:१५) काहींच्या म्हणण्याप्रमाणे आज हजारो धर्म अस्तित्वात आहेत. आणि सगळेच असा दावा करतात, की ते जे शिकवतात तेच सत्य आहे. त्यामुळे लाखो लोक गोंधळात पडले आहेत आणि त्यांची निराशा झाली आहे. म्हणून जीवनाकडे जाणाऱ्या रस्त्याचा शोध करायचा ते प्रयत्नच करत नाहीत. पण जीवनाकडे जाणारा रस्ता त्यांना कधीच सापडणार नाही असा याचा अर्थ होतो का? नाही. येशूने म्हटलं: “मी शिकवलेल्या गोष्टींचं जर तुम्ही पालन करत राहिला, तर तुम्ही खऱ्या अर्थाने माझे शिष्य ठराल. तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल.” (योहा. ८:३१, ३२) ही किती आनंदाची गोष्ट आहे, की लोकांना पाहून तुम्ही नाशाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जायचं निवडलं नाही; तर या वचनात सांगितल्याप्रमाणे तुम्ही सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला. यहोवाच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही बायबलचा सखोल अभ्यास करायला सुरुवात केली आणि येशूच्या शिकवणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकलात. तुम्ही हे शिकला, की खोट्या धर्मातून आलेल्या शिकवणी, रूढी-परंपरा आणि सणवार आपण सोडून दिले पाहिजेत. खरंतर या सगळ्या गोष्टी सोडून देणं तुम्हाला सोपं नव्हतं. पण तरी तुम्ही ते केलं. (मत्त. १०:३४-३६) कारण यहोवावर तुमचं प्रेम आहे आणि त्याला खूश करायची तुमची मनापासून इच्छा आहे. विचार करा, या सगळ्या गोष्टी पाहून यहोवाला खरंच किती आनंद झाला असेल!—नीति. २७:११.
आपण छोट्या किंवा चिंचोळ्या रस्त्यावर कसं चालत राहू शकतो?
६. स्तोत्र ११९:९, १०, ४५, १३३ या वचनांनुसार चिंचोळ्या रस्त्यावर चालत राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
६ छोट्या रस्त्यावर चालायला सुरुवात केल्यानंतर आपण त्यावर कसं टिकून राहू शकतो? एक उदाहरण घ्या. तुम्ही पाहिलंच असेल, की डोंगरातून जाणाऱ्या चिंचोळ्या रस्त्याच्या कडेला एक संरक्षक कठडा असतो. वाहनं रस्त्याच्या कडेला जाऊन खाली दरीत कोसळू नयेत म्हणून हा कठडा बांधलेला असतो. त्यामुळे, कोणताही चालक अशी तक्रार करणार नाही, की ‘हा विनाकारण बांधलाय’ किंवा ‘यामुळे गाडी चालवायला खूप अडचण होते.’ बायबलमध्ये दिलेले यहोवाचे स्तरसुद्धा या संरक्षक कठड्यासारखेच आहेत. त्यामुळे ‘चिंचोळ्या’ रस्त्यावर चालत राहायला आपल्याला मदत होते.—स्तोत्र ११९:९, १०, ४५, १३३ वाचा.
७. मुलांनी चिंचोळ्या रस्त्याबद्दल कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आणि का?
७ मुलांनो, यहोवाचे स्तर खूपच बंधनकारक आहेत असं कधीकधी तुम्हाला वाटतं का? तसं असेल, तर हे लक्षात घ्या, की सैतानाला तुम्ही असाच विचार करावा असं वाटतं. पसरट रस्त्यावरून जाणारे लोक काय करत आहेत आणि ते आपलं जीवन किती आनंदाने जगत आहेत या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यावं असं त्याला वाटतं; मग त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद वरवरचा का असेना. आपल्या शाळेतले मित्र आणि इंटरनेटवर दिसणारे लोक किती मजा मारत आहेत, आणि आपल्याला मात्र ही सगळी मजा घेता येत नाही, असा विचार तो तुम्हाला करायला लावतो. जीवनाचा मनसोक्त आनंद घेण्यापासून देवाचे स्तर आपल्या आड येत आहेत असा विचार तुम्ही करावा असं त्याला वाटतं. * पण एक गोष्ट लक्षात घ्या, की सैतानाच्या रस्त्याने जाणाऱ्या लोकांना शेवटी काय मिळणार आहे हे त्यांना कधीच कळू नये अशी त्याची इच्छा आहे. याउलट, ‘चिंचोळ्या’ रस्त्यावरून चालत राहिल्यामुळे शेवटी आपल्याला काय मिळणार आहे हे यहोवाने आधीच स्पष्टपणे सांगितलं आहे.—स्तो. ३७:२९; यश. ३५:५, ६; ६५:२१-२३.
८. ओलॅफच्या अनुभवातून तरुण मुलं काय शिकू शकतात?
८ ओलॅफ नावाच्या एका तरुण बांधवाचाच विचार करा. * शाळेतल्या मित्रांनी त्याच्यावर, मुलींसोबत सेक्स करायचा दबाव टाकला. पण त्याने त्यांना सांगितलं, की तो एक यहोवाचा साक्षीदार आहे आणि बायबलच्या उच्च नैतिक स्तरांप्रमाणे चालायचा तो प्रयत्न करतो. तेव्हा त्याच्या शाळेतल्या मुलींनी ही गोष्ट चॅलेंज म्हणून घेतली, आणि त्याला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा त्या जास्तच प्रयत्न करू लागल्या. ओलॅफ मात्र बिलकूल बहकला नाही, तो आपल्या निर्णयावर एकदम ठाम होता. पण यासोबतच ओलॅफला आणखी एका समस्येचा सामना करावा लागला. तो म्हणतो: “माझे शिक्षक मला हे पटवून द्यायचा प्रयत्न करत होते, की मला जर चारचौघांत नाव कमवायचं असेल, तर मी भरपूर शिक्षण घेणं गरजेचंए; नाहीतर मी आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही.” मग ओलॅफने या दबावांचा कशा प्रकारे सामना केला? तो म्हणतो, की “मी माझ्या मंडळीतल्या लोकांसोबत चांगली मैत्री केली. माझ्यासाठी ते घरच्यांसारखेच होते. त्यासोबतच, मी बायबलचा सखोल अभ्यास करू लागलो. मी जितका अभ्यास करत गेलो, तितकी मला खातरी पटत गेली, की हेच सत्य आहे. आणि त्यामुळेच मी बाप्तिस्मा घ्यायचं ठरवलं.”
९. चिंचोळ्या रस्त्यावर चालत राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
९ आपण जीवनाकडे जाणाऱ्या चिंचोळ्या रस्त्यावरून चालायचं सोडून, “नाशाकडे जाणाऱ्या” पसरट रस्त्यावरून जावं अशी सैतानाची इच्छा आहे. (मत्त. ७:१३) पण आपल्याला जर चिंचोळ्या रस्त्यावर चालत राहायचं असेल, तर आपण नेहमी येशूचं ऐकलं पाहिजे. आणि या रस्त्यावर चालत राहिल्यामुळेच आपल्याला जीवन मिळेल हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. पण येशूने आणखी एक गोष्ट आपल्याला करायला सांगितली. त्याकडे आता आपण लक्ष देऊ या.
आपसातले मदभेद मिटवून शांतीने राहा
१०. मत्तय ५:२३, २४ या वचनांनुसार सर्वात आधी आपण कोणती गोष्ट केली पाहिजे असं येशूने म्हटलं?
१० मत्तय ५:२३, २४ वाचा. या वचनात येशूने अशा एका विधीबद्दल सांगितलं जी यहुद्यांसाठी अतिशय महत्त्वाची होती. कल्पना करा, की एक यहुदी मंदिरात आहे. आणि प्राण्याचं अर्पण देण्यासाठी तो याजकाला आपला प्राणी देणारच आहे. इतक्यात त्याला आठवतं, की आपल्यामुळे कोणाचंतरी मन दुखावलं गेलं आहे. अशा वेळी त्याला आपलं अर्पण ‘तिथेच वेदीसमोर ठेवून निघून जायचं’ होतं. का? कारण यहोवाला अर्पण देण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं असं काहीतरी होतं. त्याबद्दल येशूने म्हटलं: “आधी आपल्या भावाशी समेट कर.”
११. आपला मोठा भाऊ एसाव याच्यासोबत पुन्हा शांतीचे संबंध जोडण्यासाठी याकोबने काय केलं?
११ याकोबच्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्यातून मदभेद मिटवून शांतीचे संबंध जोडण्याच्या बाबतीत आपल्याला महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात. याकोबला आपला देश सोडून जवळजवळ २० वर्षं झाली होती. मग देवाने त्याला एका स्वर्गदूताद्वारे आपल्या मायदेशी परत जायला सांगितलं. (उत्प. ३१:११, १३, ३८) पण याकोबसमोर एक समस्या होती. त्याचा मोठा भाऊ एसाव त्याच्या जिवावर उठला होता. (उत्प. २७:४१) त्यामुळे एसावच्या मनात आपल्याबद्दल अजूनही राग असेल का, या विचाराने याकोब “खूप घाबरला आणि चिंतेत पडला.” (उत्प. ३२:७) मग याकोबने आपल्या भावासोबत पुन्हा शांतीचे संबंध जोडण्यासाठी काय केलं? सर्वात आधी त्याने याविषयी यहोवाला कळकळून प्रार्थना केली. मग त्याने एसावला उदारपणे एक मोठी भेट पाठवली. (उत्प. ३२:९-१५) आणि शेवटी, जेव्हा ते दोघे भाऊ समोरासमोर आले तेव्हा एसावला मान देण्यासाठी सर्वात आधी याकोब पुढे आला. त्याने एकदा किंवा दोनदा नाही, तर सात वेळा जमिनीला डोकं टेकवून त्याला नमस्कार केला. अशा प्रकारे नम्रता आणि आदर दाखवून याकोबने आपल्या भावासोबत पुन्हा शांतीचे संबंध जोडले.—उत्प. ३३:३, ४.
१२. याकोबच्या उदाहरणातून आपण काय शिकतो?
१२ एसावला भेटण्याआधी याकोबने कायकाय केलं आणि तो त्याच्याशी कसा वागला, यातून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. सर्वात आधी याकोबने नम्रपणे यहोवाला प्रार्थना केली. पण प्रार्थना करण्यासोबतच आपल्या भावासोबत शांतीचे संबंध जोडण्यासाठी त्याला जे काही करता येईल ते त्याने केलं. एसावला भेटल्यानंतर, कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे असा वाद त्याने घातला नाही. कारण त्याला आपल्या भावाचं मन जिंकायचं होतं. मग याकोबच्या या उदाहरणाचं आपण कसं अनुकरण करू शकतो.
इतरांसोबत पुन्हा शांतीचे संबंध कसे जोडता येतील?
१३-१४. आपल्यामुळे जर एखाद्याचं मन दुखावलं असेल, तर आपण काय केलं पाहिजे?
१३ जीवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चालत राहायचं असेल, तर आपल्याला नेहमी इतरांसोबत शांतीने राहावं लागेल. (रोम.१२:१८) आपल्याला जर लक्षात आलं, की आपल्यामुळे मंडळीतल्या एखाद्या भावाचं किंवा बहिणीचं मन दुखावलं गेलं आहे, तर आपण काय केलं पाहिजे? याकोबप्रमाणेच आपणसुद्धा यहोवाला कळकळून प्रार्थना केली पाहिजे. त्यांच्यासोबत शांतीचे संबंध पुन्हा जोडण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करू, त्यावर यहोवाने आशीर्वाद द्यावा अशी विनंती आपण त्याला केली पाहिजे.
१४ यासोबतचं, आपण स्वतःचं परीक्षणही केलं पाहिजे. त्यासाठी आपण स्वतःला असे प्रश्न विचारले पाहिजेत: ‘गर्विष्ठपणा सोडून मी नम्रपणे क्षमा मागायला आणि पुन्हा शांतीचे संबंध जोडायला तयार असतो का? मी जर असं करायचा प्रयत्न केला तर यहोवा आणि येशूला कसं वाटेल?’ आपण जर या प्रश्नांवर विचार केला, तर येशूचं ऐकायची आणि आपल्या भाऊबहिणींसोबत बिघडलेले संबंध पुन्हा जोडायची प्रेरणा आपल्याला मिळेल. आणि त्यासाठी पुन्हा याकोबचंच उदाहरण आपल्याला मदत करेल.
१५. एखाद्यासोबत शांतीचे संबंध पुन्हा जोडण्यासाठी इफिसकर ४:२, ३ मध्ये दिलेल्या सल्ल्यामुळे आपल्याला कशी मदत होते?
१५ एसावला भेटल्यानंतर याकोबने त्याच्याशी वाद घातला असता, तर काय झालं असतं याचा विचार करा. त्याचा परिणाम नक्कीच चांगला झाला नसता. म्हणून आपणसुद्धा एखाद्याकडे वाद मिटवण्यासाठी जातो, तेव्हा आपण नम्र असलं पाहिजे. (इफिसकर ४:२, ३ वाचा.) नीतिवचनं १८:१९ म्हणतं: “दुखावलेल्या भावाची समजूत घालणं तटबंदी शहर काबीज करण्यापेक्षा कठीण असतं, आणि काही मतभेद किल्ल्याच्या अडसरांसारखे असतात.” आपण जर नम्रपणे क्षमा मागितली, तर अडसर लावलेले ‘किल्ल्याचे’ दरवाजेसुद्धा आपल्यासाठी पुन्हा उघडतील.
१६. आपण कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि का?
१६ आपसातले वाद मिटवताना आपण काय बोलणार आणि कसं बोलणार याचाही आपण विचार केला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर जेव्हा आपण त्याच्याशी बोलायला जाऊ, तेव्हा आपला उद्देश त्याच्यासोबत शांतीचे संबंध जोडण्याचा असला पाहिजे. सुरुवातीला कदाचित तो आपल्याशी चांगलं बोलणार नाही. त्यामुळे कदाचित आपल्याला राग येईल आणि आपण आपलीच बाजू मांडायचा प्रयत्न करू. पण असं केल्यामुळे आपसातले मतभेद मिटतील का? मुळीच नाही. हे लक्षात घ्या, की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे हे सिद्ध करण्यापेक्षा आपल्या भावासोबत शांतीचे संबंध पुन्हा जोडणं जास्त महत्त्वाचं आहे.—१ करिंथ. ६:७.
१७. बंधू गिल्बर्ट यांच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
१७ इतरांसोबत शांतीचे संबंध पुन्हा जोडण्यासाठी बंधू गिल्बर्ट यांचं चांगलं उदाहरण आहे. ते म्हणतात: “माझं माझ्या मुलीसोबत बिलकुल पटत नव्हतं. पण तरी जवळजवळ दोन वर्षं मी तिच्याशी बोलायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो.” याशिवाय, बंधू गिल्बर्ट यांनी आणखी काय केलं? ते म्हणतात: “तिच्याशी बोलण्याआधी प्रत्येक वेळी मी प्रार्थना करायचो. आणि ती कितीही वाईट बोलली, तरी ते ऐकून घ्यायला मी तयार असायचो. तिला मोठ्या मनाने क्षमा करायला मी तयार होतो. मीच कसा बरोबर आहे, हे सिद्ध
करण्यापेक्षा तिच्यासोबत शांतीचे संबंध जोडणं जास्त महत्त्वाचं आहे हे मला समजलं.” मग याचा काय परिणाम झाला? गिल्बर्ट म्हणतात: “आता मला या गोष्टीचा आनंद आहे, की तिच्याशी आणि कुटुंबातल्या सगळ्यांशीच माझे चांगले संबंध आहेत.”१८-१९. आपल्यामुळे जर एखाद्याचं मन दुखावलं असेल तर आपण काय करण्याचा निश्चय केला पाहिजे, आणि का?
१८ तर मग, आपल्यामुळे मंडळीतल्या एखाद्याचं मन दुखावलं गेलं असेल, तर आपण काय करायचा निश्चय केला पाहिजे? येशूने सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीसोबत आपण परत शांतीचे संबंध जोडायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याविषयी आपण यहोवासोबत बोललं पाहिजे आणि मतभेद मिटवण्यासाठी पवित्र शक्तीच्या मदतीवर विसंबून राहिलं पाहिजे. यामुळे आपल्याला आनंद तर होईलच, शिवाय आपण येशूचं ऐकत आहात हेही दिसून येईल.—मत्त.५:९.
१९ आज यहोवा ‘मंडळीच्या मस्तकाद्वारे’ म्हणजे येशूद्वारे प्रेमाने आपलं मार्गदर्शन करत आहे. याबद्दल आपण खरंच किती आभारी आहोत! (इफिस. ५:२३) पेत्र, याकोब आणि योहान या प्रेषितांप्रमाणेच आपणसुद्धा त्याचं ऐकायचा ठाम निश्चय केला पाहिजे. (मत्त. १७:५) आपल्यामुळे ज्यांचं मन दुखावलं गेलं आहे, त्यांच्यासोबत शांतीचे संबंध पुन्हा जोडण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा आपण हे दाखवून देतो, की आपण येशूचं ऐकत आहोत. असं केल्यामुळे आपण जीवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चालत राहू. आणि त्यामुळे आपल्याला आत्ता आणि भविष्यातही भरपूर आशीर्वाद मिळतील.
गीत ३५ देवाच्या धीराबद्दल कृतज्ञता
^ परि. 5 येशूने आपल्याला जीवनाकडे जाणाऱ्या अरुंद दरवाजाने जायला आणि आपसातले मतभेद मिटवून एकमेकांसोबत शांतीचे संबंध जोडायला सांगितलं. पण या सल्ल्यानुसार वागताना आपल्यासमोर कोणत्या समस्या येऊ शकतात? आणि आपण त्या कशा सोडवू शकतो?
^ परि. 7 तरुणांच्या मनात येणाऱ्या १० प्रश्नांची उत्तरं या माहितीपत्रकातला, “मी सोबत्यांच्या दबावाचा सामना कसा करू शकतो?” हा ६ वा प्रश्न पाहा. तसंच, www.dan124.com/mr वर सोबत्यांच्या दबावाचा यशस्वी रीत्या सामना करा! हे बोर्डवरचं कार्टून पाहा. (बायबलच्या शिकवणी > तरुण या टॅबखाली पाहा.)
^ परि. 8 काही नावं बदलण्यात आली आहेत.
^ परि. 56 चित्रांचं वर्णन: संरक्षक कठड्यासारख्या असलेल्या देवाच्या स्तरांचं जर आपण पालन केलं आणि “चिंचोळ्या” रस्त्यावर चालत राहिलो, तर पोर्नोग्राफी, अनैतिक संबंध आणि उच्च शिक्षण यांसारख्या धोक्यांपासून आपलं संरक्षण होईल.
^ परि. 58 चित्रांचं वर्णन: एसावसोबत पुन्हा शांतीचे संबंध जोडण्यासाठी याकोबने बऱ्याच वेळा नम्रपणे जमिनीला डोकं टेकून त्याला नमस्कार केला.