उत्क्रांती की निर्मिती?
मुंगीची मान
मुंग्यांमध्ये त्यांच्या शरीराच्या कितीतरी पट जास्त वजन उचलण्याची क्षमता असते. या क्षमतेने इंजीनियर्सना आश्चर्यात टाकलं आहे. या क्षमतेबद्दल जाणून घेण्यासाठी अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी इथल्या इंजीनियर्सनी मुंगीच्या शरीराचे आणि त्यातील अवयव कसे काम करतात याची कंप्युटरमध्ये वेगवेगळी मॉडल तयार केली. मुंगीच्या शरीराचे एक्स-रे (मायक्रो सिटी स्कॅन) आणि तिला वजन उचलताना किती शक्ती लागते याची नक्कल करून कंप्युटरमध्ये ही मॉडल्स तयार करण्यात आली.
मुंगी तोंडाने वजन उचलते तेव्हा वजनाचा पूर्ण भार उचलण्यात मुंगीच्या मानेची महत्त्वाची भूमिका असते. तिचं डोकं आणि बाकीचं टणक शरीर नरम तंतूंनी जोडलेलं असतं. आपण आपल्या दोन्ही हाताची बोटं एकमेकात अडकवतो तशी या तंतूंची रचना असते. याविषयी एक संशोधक असं म्हणतो की, “मानेच्या सांद्याला वजन उचलता यावं यासाठी केलेली या तंतूंची रचना खूप महत्त्वाची आहे. ही विलक्षण रचना मानेच्या सांद्याला मजबूत करते. कदाचित यामुळेच मानेच्या सांद्याला मोठी वजनं उचलण्याची क्षमता मिळत असावी.” संशोधकांना वाटतं, मुंगीची मान कशी कार्य करते हे जर त्यांना व्यवस्थित कळलं, तर ते बनवत असलेल्या रोबोटच्या रचनेत आणि कार्यक्षमतेत त्यांना आणखी प्रगती करता येईल.
तुम्हाला काय वाटतं? मुंग्यांच्या मानेची जटील रचना उत्क्रांतीमुळे अस्तित्वात आली? की तिची रचना करण्यात आली? (g16-E No. 3)