व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही हे कसं ठरवू शकता?

तुम्ही हे कसं ठरवू शकता?

“हे विश्‍व शून्यातून स्वतःहून अस्तित्वात येऊ शकतं आणि येत राहील.”—स्टीफन हॉकिंग व लीओनार्ड म्लोडिनोव या भौतिकशास्त्रज्ञांनी लिहिलेल्या, आणि २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या द ग्रँड डिझाईन या पुस्तकातून.

“सुरुवातीला देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली.”—बायबल, उत्पत्ती १:१.

हे विश्‍व आणि जीवसृष्टी देवाने निर्माण केली, की ती आपोआप अस्तित्वात आली? या प्रश्‍नाचं, वरती उल्लेख केलेल्या दोन भौतिकशास्त्रज्ञांनी दिलेलं उत्तर आणि बायबलमध्ये दिलेलं उत्तर यात जमीन अस्मानाचा फरक आहे. या भोतिकशास्त्रज्ञांचं म्हणणं मानणारेही बरेच लोक आहे आणि बायबलचं म्हणणं मानणारेही बरेच आहेत. तर असेही अनेक जण आहेत ज्यांना यांपैकी काय मानायचं ते समजत नाही. या विषयावर अनेक प्रसिद्ध पुस्तकांमध्ये, तसंच टीव्ही कार्यक्रमांमध्ये बरेच वादविवाद होताना दिसतात.

एकीकडे तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला असं शिकवलं असेल, की हे विश्‍व आणि सगळी जीवसृष्टी आपोआप अस्तित्वात आली. पण याचा काही पुरावा त्यांनी तुम्हाला दिला का? दुसरीकडे, हे सगळं एका निर्माणकर्त्याने बनवलं आहे  असं धर्मगुरूंना शिकवताना तुम्ही ऐकलं असेल. पण याचाही काही पुरावा ते देतात का? की या गोष्टींवर तुम्ही डोळे झाकून “विश्‍वास” ठेवला पाहिजे असं ते म्हणतात?

हे विश्‍व कसं अस्तित्वात आलं असा प्रश्‍न तुम्हाला कधी ना कधी पडलाच असेल. पण या प्रश्‍नाचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही अशी शंका कदाचित तुमच्या मनात आली असेल. शिवाय, या प्रश्‍नाचं उत्तर मिळवणं खरंच इतकं महत्त्वाचं आहे का, असाही कदाचित तुम्ही विचार केला असेल.

सावध राहा!  मासिकाच्या या अंकात असे काही पुरावे दिले आहेत ज्यांचं परीक्षण केल्यामुळे अनेकांना खातरी पटली आहे, की हे विश्‍व कोणीतरी बनवलं आहे. तसंच, या अंकात हेसुद्धा सांगितलं आहे, की जीवसृष्टीची सुरुवात कशी झाली या प्रश्‍नाचं उत्तर मिळवणं इतकं महत्त्वाचं का आहे.