उत्तर का महत्त्वाचं आहे
या विश्वाचा कोणी निर्माणकर्ता आहे का हे जाणून घेणं का महत्त्वाचं आहे? आत्तापर्यंत पाहिलेल्या पुराव्यांवरून, एक सर्वशक्तिमान देव अस्तित्वात आहे ही गोष्ट जर तुम्हाला पटली असेल, तर बायबल हे त्याच्या प्रेरणेने लिहिलं आहे या गोष्टीचा पुरावासुद्धा तुम्हाला तपासून पाहावासा वाटेल. आणि बायबल जे म्हणतं त्यावर तुमचा विश्वास असेल, तर खाली दिलेल्या मार्गांनी तुम्हाला त्याचा फायदा होईल.
जीवनाला अर्थ आहे हे तुम्हाला समजेल
बायबल म्हणतं: “आकाशातून पाऊस आणि फलदायी ऋतू देऊन, अन्नधान्याने तुम्हाला तृप्त करून आणि तुमची मनं आनंदाने भरून [देव] तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करत राहिला.”—प्रेषितांची कार्यं १४:१७.
म्हणजे काय: निसर्गातल्या ज्या गोष्टींचा तुम्ही आनंद घेता त्या सर्व गोष्टी निर्माणकर्त्याकडून भेट आहेत. त्याला तुमची किती काळजी आहे हे जेव्हा तुम्हाला समजेल, तेव्हा या गोष्टींबद्दलची तुमची कदर आणखीन वाढेल.
दररोजच्या जीवनासाठी एक भरवशालायक मार्गदर्शन मिळेल
बायबल म्हणतं: “नीती, न्याय आणि निःपक्षपणा काय असतो, हेही तुला समजेल आणि योग्य मार्ग कोणता हे तुला कळेल.”—नीतिवचनं २:९.
म्हणजे काय: आपला निर्माणकर्ता असल्यामुळे, आपल्याला आनंदी राहण्यासाठी कशाची गरज आहे हे देवाला माहीत आहे. बायबल वाचल्यामुळे जीवनासाठी उपयोगी असलेल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजतील.
तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील
बायबल म्हणतं: “तुला देवाचं ज्ञान मिळेल.”—नीतिवचनं २:५.
म्हणजे काय: या विश्वाचा एक निर्माणकर्ता आहे ही गोष्ट समजल्यामुळे तुम्हाला जीवनातल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. जसं की, जीवनाचा उद्देश काय आहे? आज इतकं दु:ख का आहे? मेल्यानंतर आपलं काय होतं? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं तुम्हाला बायबलमध्ये मिळतील.
भविष्यासाठी एक सुंदर आशा मिळेल
बायबल म्हणतं: “यहोवा म्हणतो, ‘तुमच्यासाठी माझे काय विचार आहेत, हे मला चांगलं माहीत आहे. ते विचार शांतीचे आहेत; संकटाचे नाहीत. ते तुम्हाला चांगलं भविष्य आणि आशा देणारे आहेत.’”—यिर्मया २९:११.
म्हणजे काय: देव आपल्याला असं वचन देतो, की भविष्यात तो सर्व वाईट गोष्टी, दु:ख आणि मृत्यूसुद्धा काढून टाकेल. देवाने दिलेल्या या वचनावर तुमचा भरवसा असेल, तर सुंदर भविष्याच्या आशेमुळे दररोजच्या जीवनात येणाऱ्या समस्यांना तुम्हाला धैर्याने तोंड देता येईल.