व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“हे यहोवा, माझ्या मुलीला विश्‍वासू ठेव!”

“हे यहोवा, माझ्या मुलीला विश्‍वासू ठेव!”

“हे यहोवा, माझ्या मुलीला विश्‍वासू ठेव!”

ॲल्सास, फ्रान्स येथे १९३० मध्ये माझा जन्म, कलेची आवड असणाऱ्‍या एका कुटुंबात झाला. संध्याकाळच्या वेळी बाबा, त्यांच्या आराम खुर्चीत बसून, भूगोल किंवा खगोलशास्त्राची काही पुस्तके वाचत असत. माझे कुत्रे त्यांच्या पायाशी झोपलेले असायचे, आणि कुटुंबासाठी विणकाम करत असलेल्या माझ्या आईला, बाबा त्यांच्या वाचनातील काही ठळक गोष्टी सांगत. त्या सर्व सायंकाळाचा मी किती आनंद लुटला!

आमच्या जीवनात, धर्माचा मोठा वाटा होता. आम्ही कट्टर कॅथोलिक होतो, आणि आम्हाला रविवारी सकाळी चर्चला जात असताना पाहणारे लोक म्हणत असत: “नऊ वाजलेत. आरनॉल्ड कुटुंब चर्चला जात आहे.” दर दिवशी, शाळेला जाण्याआधी मी चर्चला जात होते. परंतु, पाद्रीच्या गैरवागणूकीमुळे आईने मला एकटे जाण्यास मनाई केली. त्यावेळी मी सहा वर्षांची होते.

बीबलफॉशरच्या (पवित्र शास्त्र विद्यार्थी, जे आता यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखले जातात), केवळ तीन पुस्तिका वाचल्यानंतर माझ्या आईने घरोघरी प्रचार करण्यास सुरवात केली. बाबा त्याबद्दल थोडे अस्वस्थ होते. त्यांनी असा नियमच बनवला की माझ्या समोर कोणतीही धार्मिक चर्चा करायची नाही. ‘ते फालतू वाचायचे नाही!’ परंतु, आई सत्याबद्दल इतकी आवेशी होती की माझ्याबरोबर काही पवित्र शास्त्र वाचन करण्याचा तिने निर्णय घेतला. तिने पवित्र शास्त्राची एक कॅथोलिक आवृत्ती मिळवली आणि त्यातून दररोज सकाळी मला वाचून दाखवत होती, परंतु बाबांच्या शब्दांचे पालन करण्यासाठी तिने त्यावर कधी चर्चा केली नाही.

एके दिवशी तिने स्तोत्रसंहिता ११५:४-८ मधील वचन वाचले: “त्यांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत; त्या मनुष्यांच्या हाताच्या कृती आहेत. . . . त्या बनविणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात.” तिने त्याचा संबंध दुसऱ्‍या आज्ञेशी जोडला, जी म्हणते: “आपल्यासाठी कोरीव मूर्ती करु नको.” (निर्गम २०:४-६) मी लागलीच उठले आणि माझ्या खोलीतील स्वतःच्या वेदीचा मी नाश केला.

मी शाळेत गेल्यावर माझ्या कॅथोलिक शाळा सोबत्यांबरोबर दैनिक पवित्र शास्त्र वाचनाची सहभागिता करत होते. त्यामुळे शाळेत बराच गोंधळ झाला. पुष्कळदा रस्त्यावर माझा पाठलाग करुन मुले मला “स्टिंकी ज्यू (तिरस्करणीय यहुदी)” असे म्हणत होते! ती १९३७ ची गोष्ट आहे. या गोष्टीमुळे, मी काय शिकत होते याविषयी माझे बाबा पाहणी करु लागले. त्यांनी स्वतःसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी (१९२७ मध्ये) प्रकाशित केलेले क्रिएशन हे पुस्तक आणले. त्यांनी ते वाचले आणि स्वतः एक साक्षीदार बनले!

जर्मनचे सैन्य, बेल्जियमच्या हद्दीमधून फ्रान्समध्ये आले तेव्हाच, सरकारी मुख्यालयावर फ्रान्सचा झेंडा फडकत असताना देखील, आम्हाला चर्चवरील झेंड्यांवर स्वस्तिक दिसू लागले. फ्रान्सच्या सरकाराने आमचे राज्य सभागृह बंद केले होते आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या कामावर बंदी घातली होती, व जर्मन लोक आले तेव्हा आम्ही आधीच भूमिगतपणे काम करत होतो. परंतु, साक्षीदारांचा नाश करण्याचा प्रयत्न अधिक तीव्र झाला. दोन वर्षांनंतर, ११ व्या वर्षी माझा बाप्तिस्मा झाला.

एका महिन्यानंतर, सप्टेंबर ४, १९४१ मध्ये, दुपारी दोन वाजता, दाराची घंटी वाजली. बाबा कामावरुन अजून घरी यायचे होते. मी पळाले, दार उघडले आणि त्यांना मिठी मारली. त्यांच्या पाठीमागे असणारा मनुष्य ओरडून म्हणाला, “हाईल हिटलर!” मिठी सोडल्यावर मला कळाले की ज्या माणसाला मी मिठी मारली तो एक एसएस सैनिक होता! त्यांनी मला माझ्या खोलीत पाठवले आणि माझ्या आईची चार तासांसाठी उलट तपासणी घेतली. घरातून जाता जाता एकाने ओरडून म्हटले: “तू तुझ्या नवऱ्‍याला येथून पुढे कधीच पाहणार नाहीस! तुला आणि तुझ्या मुलीला तीच वागणूक मिळेल!”

त्या दिवशी सकाळी बाबांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या खिशात त्यांची महिन्याची कमाई होती. एसएस सैनिकांनी बँकेतील खाते बंद केले आणि माझ्या आईला, कामाचे कार्ड—नोकरी मिळवण्यासाठी एक आवश्‍यक कागदपत्र—देण्यास नकार दिला. “विरोधकांसाठी कोणताही गुजारा करण्याचा मार्ग नाही,” असे त्यांचे धोरण होते.

शाळेत छळ

या काळात, मी जात असलेल्या महाविद्यालयाच्या प्रारंभिक शाळेतील दबाव वाढतच होते. शिक्षक वर्गात येताच, सर्व ५८ मुलांनी उठून हात पुढे करुन “हाईल हिटलर” म्हणायचे होते. धार्मिक शिक्षणासाठी पाद्री वर्गात आल्यावर ते आत येऊन असे म्हणत होते, “हाईल हिटलर—प्रभूच्या नावाने येणारा धन्य असो.” त्यावर, वर्ग उत्तर देई, “हाईल हिटलर—आमेन!”

मी “हाईल हिटलर” म्हणण्यास नकार दिला आणि ही गोष्ट शाळेच्या निर्देशकांच्या डोळ्यासमोर आली. त्यावर इशाऱ्‍याचे असे एक पत्र आले: “एक विद्यार्थीनी शाळेच्या नियमांचे पालन करत नाही व एका आठवड्याच्या आत काही बदल दिसून न आल्यास या विद्यार्थीनीला शाळा सोडून द्यावी लागेल.” पत्राच्या खाली असे उल्लेखिलेले होते की त्या पत्राला २० पेक्षा अधिक वर्गांनी वाचावयाचे होते.

वर्गासमोर मला बोलावून माझा निर्णय कळवण्याचा तो दिवस उगवला. निर्देशकांनी, मला एकतर, वंदन करण्यास किंवा कागदपत्र घेऊन शाळा सोडून जाण्यासाठी आणखी पाच मिनिटे दिली. ती घड्याळावरील पाच मिनिटे जणू अनंतकाळासारखी वाटली. माझे पाय थरथरू लागले, माझे डोके जड झाले, माझे हृदय धडधडत होते. मोठ्या आणि कर्कश “हाईल हिटलर” या आवाजाने संपूर्ण वर्गातील शांततेचा भंग केला मग, संपूर्ण वर्गाने ते तीनदा उच्चारले. मी मेजाकडे पळाले माझी कागदे उचलली, आणि बाहेर पळून गेले.

त्यानंतरच्या सोमवारी, मला आणखी एका शाळेत जाण्यासाठी परवानगी मिळाली. तेथील निर्देशकांनी या अटीवर मला घेण्यास मान्य केले की आधीच्या शाळेतून मला का बाहेर काढले, ते कोणालाही सांगायचे नाही. माझ्या वर्गातील सोबती मला चोर, अपराधी असे म्हणत आणि त्याचमुळे मला शाळेतून बाहेर काढले असे म्हणत होते. परंतु, मी खऱ्‍या कारणाचे स्पष्टीकरण देऊ शकत नव्हते.

मला वर्गात सर्वात शेवटी बसवले होते. माझ्या बाजूच्या मुलीने, मी वंदन करत नसल्याचे ओळखले. तिला वाटले मी फ्रेंच विरोधक होते. यास्तव, मी हिटलरला वंदन का करत नाही याचे मला स्पष्टीकरण द्यावे लागले: “प्रेषितांची कृत्ये ४:१२ प्रमाणे, ‘तारण दुसऱ्‍या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.’ केवळ ख्रिस्तच आमचा तारणारा आहे. ‘हाईल’ याचा अर्थ कोणाकडून तारण प्राप्त करणे असा होतो यासाठी, मी कोणत्याही मानवाकडून, हिटलरकडून देखील हे तारण मिळेल असे म्हणू शकणार नाही.” ही मुलगी आणि तिची आई यहोवाच्या साक्षीदारांशी शास्त्राभ्यास करू लागली आणि ते स्वतः साक्षीदार बनले!

भूमिगत हालचाली

हे सर्व चालत असताना, आम्ही गुप्तपणे प्रचार करणे चालूच ठेवले. आम्ही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी डोंगरातील एका जागेत जात होतो जेथे आम्हाला द वॉचटावरच्या फ्रेंच भाषेतील अंकाचे जर्मन भाषेत भाषांतर करण्यास दिले जात होते. छुपा खिसा असलेला एक खास बंद्याचा पट्टा, ज्यामध्ये द वॉचटावर नेऊ शकत होते, असा आईने मला बनवून दिला होता. एकदा आम्हाला थांबवून डोंगरातील एका शेतात नेण्यात आले व आमची तपासणी केली. मी इतकी आजारी पडले की त्यांनी मला वाळलेल्या गवतात झोपायला सांगितले आणि यामुळे, त्यांना द वॉचटावर हे मिळालेच नाही. या किंवा त्या मार्गाने यहोवा नेहमीच माझे रक्षण करत होता असे दिसत होते.

एके दिवशी मला मानसरोग चिकित्सकाकडे जाण्यास सांगितले. ते दोन एसएस सैनिक होते. तेथे इतर साक्षीदार मुले देखील होती. शेवटी बोलवण्यात येणारी मीच होते. ते दोन “चिकित्सक” एका टेबलाच्या पाठीमागे बसले होते, माझ्या तोंडावर प्रखर प्रकाश पाडला होता आणि मग उलट तपासणीची सुरवात झाली. एक “चिकित्सक” मला भूगोल किंवा इतिहासाविषयी प्रश्‍न विचारत असे परंतु, त्याचे उत्तर देण्याआधीच दुसरा मला भूमिगत हालचालींबद्दल विचारत होता. तो मला दुसऱ्‍या साक्षीदारांच्या नावाबद्दल देखील विचारत होता. मी जवळजवळ गळून पडण्याच्या स्थितीत आले होते, परंतु अचानक एक फोन आला आणि त्यांच्या चौकशीत व्यत्यय आला. यहोवाची मदत नेहमीच किती आश्‍चर्यकारकपणे मिळत होती!

मी माझ्या वर्गसोबतीला माझ्या विश्‍वासाबद्दल सांगत होते हे शाळेतील निर्देशकांना कळताच, मला अटक करण्यात आली, न्यायालयात माझी चौकशी करण्यात आली आणि “गुन्हेगारांच्या सुधारणूक शाळेत” जाण्याची मला शिक्षा बजावण्यात आली. निकालात असे नमूद केले होते की ‘कायद्याने बंदी असलेल्या आंतरराष्ट्रीय पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या शिक्षणात ती वाढली, आणि ती एक भ्रष्ट व्यक्‍ती व इतरांना धोका होऊ शकेल.’ माझ्यासाठी ती एक भयानक परीक्षा होती, त्या भीतीदायक न्यायालयात उभी असलेली मी केवळ १२ वर्षांचीच होते! परंतु, राज्यकारभारात कामाला असणाऱ्‍या एका सहानुभूती दर्शवणाऱ्‍या मित्रामुळे माझी शिक्षा लगेचच कार्यवाहित करण्यात आली नाही.

जवळजवळ एका महिन्यानंतर, आमच्या शाळेतील वर्गाला दोन आठवड्यांसाठी हिटलर युवक प्रशिक्षण शिबीरासाठी जाण्यास निवडले गेले. मी माझ्या आईला त्याबद्दल कधी सांगितले नाही. मी तेथे जाऊ नये याविषयीच्या निर्णयाबद्दलची जबाबदारी तिला उचलावी लागू नये, असे मला वाटत होते. जाण्याच्या आदल्या दिवशी, शाळेच्या निर्देशकांनी मला बजावले: “सोमवारी तू रेलरोड स्टेशन किंवा माझ्या कार्यालयात नसली तर मी तुझ्या पाठीमागे पोलिसांना पाठवीन!”

यासाठी, सोमवारी सकाळी मी शाळेला जाताना रेलरोड स्टेशनवरुन गेले. माझे सर्व शाळासोबती मला त्यांच्याबरोबर येण्यासाठी बोलवत होते परंतु, मी निर्देशकांच्या कार्यालयात जाण्याचे ठरवले होते. मला तेथे पोहोंचण्यात उशीर लागल्यामुळे, मी इतरांबरोबरच रेलगाडीत चढले असेन असे त्यांनी गृहीत धरले. मला पाहताच ते भडकले. त्यांनी मला त्यांच्या वर्गात नेले व संपूर्ण वर्गाला तेथे चार तासांसाठी शिक्षा भोगावी लागली. उदाहरणार्थ, ते प्रत्येक मुलाला वर्गासमोर बोलावून त्यांना पुस्तक हातात देण्याऐवजी, त्या पुस्तकाने त्यांना तोंडावर मारत होते. ते माझ्याकडे निर्देश करुन म्हणत: “याला ती जबाबदार आहे!” त्यांनी सर्व ४५ मुलांना, जे केवळ दहा वर्षांचे होते, माझ्यावर हल्ला करण्यास चेतवण्याचा प्रयत्न केला. परंतु वर्गाच्या शेवटी ते सर्व माझ्याकडे आले व मी सैनिकी गीते गाण्यास नकार दिला होता म्हणून माझे अभिनंदन करु लागले.

नंतर मला कागद, डबे आणि हाडे वेगवेगळे करण्यास निवडले गेले. ते डबे सैन्याच्या कामासाठी वापरली जात असल्यामुळे मी ते करण्यास नकार दिला. मला मारुन बेशुद्ध अवस्थेत सोडून दिले. नंतर माझ्या वर्गसोबत्यांनी माझी मदत केली.

मी शाळेत परतले तेव्हा, सर्व वर्गांना, जवळजवळ ८०० मुलांना, एका अंगणात झेंड्याभोवती उभे असलेले पाहून मला आश्‍चर्य वाटले. मला मध्यभागी उभे केले. स्वातंत्र्य आणि देशद्रोहींचा जो परिणाम होईल, त्याबद्दल एक लांबलचक वर्णन देण्यात आले, व नंतर झीग हाईल (विजय आणि तारण) हे तीन वेळा मोठ्याने म्हणण्यात आले. राष्ट्रगीत गायिले जात होते तेव्हा मी स्तब्ध आणि कापत होते. यहोवाने मला आधार दिला; मी सचोटी राखली. नंतर, मी आमच्या घरी आले, तेव्हा माझे कपडे खाटेवर काढून ठेवलेले आणि एक चिठ्ठी मी पाहिली, त्यात म्हटले होते: “सिमोन आरनॉल्ड, हिने उद्या सकाळी रेलरोड स्टेशन येथे यावे.”

गुन्हेगारांच्या सुधारणूक शाळेत

दुसऱ्‍या दिवशी सकाळी आई आणि मी, दोघी रेलरोड स्टेशन जवळ आलो. दोन स्त्रियांनी मला ताब्यात घेतले. रेलगाडीत बसले असता, आई मला पुनः-पुन्हा माझ्या वर्तणूकीबद्दल सल्ला देत होती. “अन्याय भोगत असताना देखील नेहमी विनयशील, नम्र आणि सौम्य राहा. कधीच हट्टी होऊ नकोस. उलट किंवा उद्धटपणे उत्तर देऊ नकोस. हे लक्षात ठेव की खंबीर असणे याचा अर्थ हट्टी असणे असा होत नाही. तुझ्या भविष्यातील जीवनासाठी हे शिक्षण आहे. आमच्या भावी काळातील लाभासाठी आम्ही परीक्षांचा सामना करावा अशी यहोवाची इच्छा आहे. तू त्यासाठी उत्तम तयारीत आहेस. तुला शिवण, स्वयंपाक, धुणे आणि बागकाम कसे करायचे ते ठाऊक आहे. तू आता मोठी झालीस.”

त्या सायंकाळी, आमच्या हॉटेलच्या बाहेरील द्राक्षाच्या मळ्यात आईने आणि मी आमच्या गुडघ्यांवर टेकून, पुनरुत्थानाच्या आशेबद्दलचे एक राज्यगीत गायिले आणि प्रार्थना केली. एका खंबीर आवाजात आईने माझ्यासाठी विनंती केली: “हे यहोवा, माझ्या मुलीला विश्‍वासू ठेव!” शेवटचे आईने माझ्यावर पांघरूण घालून मला झोपवले आणि माझा मुका घेतला.

गुन्हेगारांच्या सुधारणूक शाळेत, दिवस इतक्या लवकर संपला की आईला निरोप देण्यासाठी देखील मला संधी मिळाली नाही. एका मुलीने मला गव्हाच्या कोंड्याने भरलेली खाट दाखवली. माझे बूट काढून घेतले गेले, आणि आम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेपर्यंत अनवाणी चालायचे होते. पहिल्या दुपारचे जेवण गिळवले नाही. मला दुरूस्त करण्यासाठी मोज्याचे सहा जोड दिले गेले; नाहीतर मला जेवण दिले जाणार नव्हते. पहिल्या वेळी, मला रडू फुटले. माझ्या अश्रुंनी ते मोजे ओले झाले. मी जवळजवळ पूर्ण रात्र रडले.

दुसऱ्‍या दिवशी सकाळी मी ५:३० वाजता उठले. माझे अंथरूण रक्‍ताने माखलेले होते—याच्या काही काळाआधीच माझी मासिक पाळी सुरू झाली होती. घाबरत घाबरत, मला पहिल्यांदा ज्या भेटल्या त्या, मेसिंगर बाईंकडे मी गेले. तिने एका मुलीला बोलवले व त्या मुलीने मला ते अंथरूण थंड पाण्यात कसे धुवावे ते सांगितले. फरशी गार होती, व वेदना अधिक तीव्र झाल्या. मी पुन्हा रडू लागले. मग, मेसिंगर बाईंनी बोचक हास्य करत म्हटले: “तुझ्या यहोवाला सांग अंथरूण धुवायला!” मला तेच ऐकावयाचे होते. बस्स्‌, मी माझे डोळे टिपले, व त्यानंतर ते मला कधीच रडवू शकले नाही.

आम्हाला दररोज ८:०० वाजता नाश्‍ता—वाटीभर सूप—घेण्याआधी घर स्वच्छ करण्यासाठी ५:३० वाजता उठावे लागत होते. सहा ते चौदा वर्षांच्या ३७ मुलांसाठी शाळा घरातच घेतली जात होती. दुपारच्या वेळी आम्ही धुणे, शिवणकाम आणि बागकाम करत होतो, कारण या जड कामांना करण्यासाठी कोणतेच गडी नव्हते. एकदा, १९४४/४५ मध्ये हिंवाळ्यात, मला एका दुसऱ्‍या मुलीबरोबर करवतीचा उपयोग करुन दोन फुट व्यास असणाऱ्‍या झाडांना तोडायचे होते. मुलांना बोलण्याची मनाई होती आणि एकटे राहण्यास व लघवीला जाण्यासाठी देखील परवानगी नव्हती. आम्हाला वर्षांतून दोनदा आंघोळ करायला मिळत होती आणि आम्ही वर्षातून एकदा आमचे केस धूत होतो. उपासमार किंवा मार हीच आमच्यासाठी शिक्षा होती.

मला मेसिंगर बाईंची खोली साफ करण्यास मिळाली. तिने मला दररोज खाटेखाली जाऊन बिछान्याचे र्स्प्रिग स्वच्छ करण्यासाठी सांगितले. माझ्याजवळ मी घरात लपवून आणलेले एक छोटेसे पवित्र शास्त्र होते आणि ते मी त्या स्प्रिंगमध्ये अडकवून ठेवू शकले. त्यानंतर, मला दररोज पवित्र शास्त्रातील काही भाग वाचावयास मिळत होता. मला सर्वात हळू काम करणारी मुलगी असे म्हणत होते, यात काही आश्‍चर्य नाही!

प्रोटेस्टंट मुली रविवारच्या दिवशी त्यांच्या चर्चला जात होत्या व तीन कॅथोलिक मुली त्यांच्या चर्चला जात होत्या, परंतु मला सर्व ३७ मुलांसाठी स्वयंपाक करावा लागत होता. मी इतकी लहान होते की मला एका मेजावर उभे राहून माझ्या दोन्ही हातांनी चमचा धरून सूप ढवळावे लागत होते. आमच्या शिक्षकांसाठी मला मटन शिजवावे लागत होते, केक तयार करावा लागत होता आणि भाज्या बनवाव्या लागत होत्या. रविवारी दुपारी आम्हाला छोट्या रुमालांवर भरतकाम करावे लागत होते. खेळण्यासाठी वेळच नव्हता.

पुष्कळ महिन्यांनंतर, मेसिंगर बाईंनी, नक्कीच आनंदी होऊन, माझ्या प्रिय आईला अटक केल्याचे आणि तिला एका छळछावणीत घातल्याचे मला सांगितले.

मग, १९४५ मध्ये युद्ध संपले. छळछावण्या बंद पडल्या, त्यांच्या छळलेल्या बळींना सोडण्यात आले, कित्येक हजारो लोक, अजूनही अस्तित्वात असतील अशा कुटुंबातील राहिलेल्या सदस्यांना शोधण्यासाठी भटकत होते.

मर्मभेदक पुनर्मिलन

निदान माझ्या आईला तरी, मी कोठे होते ते माहीत होते, परंतु ती मला घेऊन जायला आली तेव्हा मी तिला ओळखले नाही. तिने जे सोसले होते त्यामुळेच हे झाले! आईला अटक केल्यावर, बाबा ज्या छावणीत होते तेथेच म्हणजे, शर्मेक येथे तिला पाठवण्यात आले, परंतु ती स्त्रियांच्या छावणीत होती. सैनिकांचे गणवेश दुरुस्त करण्यासाठी तिने नकार दिल्यामुळे तिला एकांत तुरुंगवासासाठी खोल जमिनीतील कोठडीत कित्येक महिन्यांसाठी ठेवले होते. नंतर, तिला रोगी बनवण्यासाठी उपदंश रोग असणाऱ्‍या स्त्रियांमध्ये हलवण्यात आले. रॉवन्सब्रुक येथे हलवण्यात येते असताना ती फारच अशक्‍त झाली होती व तिला खोकला होता. त्याचवेळी जर्मन लोक निघून गेले, आणि रॉवन्सब्रुकच्या मार्गावर असणारे कैदी अचानक सुटले. माझी आई त्यांच्यापैकी एक होती. जेथे मी होते, त्या जर्मनीला जाण्यास ती निघाली, परंतु हवाई हल्ल्यातील स्फोटामुळे तिच्या चेहऱ्‍यावर जखमा झाल्या आणि तो रक्‍ताने भरुन गेला होता.

तिच्या समोर मला आणण्यात आले तेव्हा ती इतकी बदलली होती—भुकेने क्षीण, अर्थात आजारी, तिचा जखमी व रक्‍ताने भरलेला चेहरा, तिचा आवाज तर ऐकूच येत नव्हता. पाहुण्यांच्या समोर वाकून नमस्कार करण्यासाठी आणि माझे सर्व काम—भरतकाम, शिवणकाम—दाखवण्यासाठी मला शिकवण्यात आले होते, कारण काही स्त्रिया मोलकरीण मिळवण्यासाठी तेथे येत होत्या. आणि त्याच प्रकारे मी बिचाऱ्‍या आईसोबत वागले! न्यायाधीशाकडे मला घरी घेऊन जाण्यासाठी कायदेशीर हक्क मिळवण्यासाठी नेले तेव्हा मला कळाले की ही माझी आई आहे! त्याचवेळी, गेल्या २२ महिन्यांपासून आत दाबून ठेवलेले अश्रू बाहेर पडले.

आम्ही जात असताना, लेडर्ले बाई या निर्देशकांनी जे म्हटले त्यामुळे माझ्या आईला बरे वाटले. त्या म्हणाल्या: “तुमची मुलगी ज्या मानसिक स्थितीत येथे आली होती त्या स्थितीत मी तिला परत देत आहे.” माझी सचोटी अजूनही शाबूत होती. आम्हाला आमचे घर सापडले व आम्ही परत एकदा तेथे राहू लागलो. बाबांचा अद्यापही पत्ता लागला नव्हता, याच गोष्टीमुळे आम्ही दुःखित होतो. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संस्थेने त्यांचे निधन झाले असल्याचे सांगितले होते.

मे १९४५ मध्ये, दाराची कडी वाजली. मी पुन्हा ते उघडण्यास धावले. मारिया कोल नावाची मैत्रिण दारावर होती, ती म्हणाली: “सिमोन, मी एकटीच नाही. तुझे बाबा खाली आहेत.” बाबांना पायऱ्‍यांवरुन चढून येण्याची ताकद नव्हती, आणि त्यांची ऐकण्याची क्षमता गमावली होती. ते माझ्या जवळून सरळ आईकडे चालत गेले! त्यांना एकेकाळी माहीत असलेली ११ वर्षाची मुलगी त्या ताटातूट झालेल्या पुष्कळ महिन्यांमध्ये आता एक लाजाळू तरुण युवती झाली होती. या नवीन मुलीला ते ओळखू शकले नाहीत.

त्यांनी जे सहन केले ते पराकोटीचे होते. पहिले त्यांना शर्मेक येथे नेण्यात आले तेथून डॉकाव येथे नेले, जेथे त्यांना साथीचा ताप (टायफस) झाला आणि त्यानंतर १४ दिवसांसाठी ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना नंतर वैद्यकीय प्रयोगांमध्ये वापरण्यात आले. डॉकाव नंतर, डॉकाव पेक्षाही वाईट निर्मूलन छावणीत म्हणजेच मऊथॉऊसन येथे नेले. तेथे त्यांना कठीण काम आणि मारहाण सहन करावी लागली आणि त्यांच्यावर पोलिसांच्या कुत्र्यांनी हल्ला केला. परंतु त्यातून ते जगले आणि शेवटी येथे पुन्हा एकदा घरी आले.

मी १७ वर्षांची झाल्यावर, यहोवाच्या साक्षीदाराची सेविका या नात्याने पूर्ण-वेळेच्या सेवेत उतरले आणि मग अमेरिकेतील वॉचटावर संस्थेच्या मिशनऱ्‍यांसाठी असणाऱ्‍या शाळेत, गिलियडसाठी गेले. संस्थेच्या मुख्यालयात, हिटलरच्या एका हत्याकांडाच्या छावणीत साक्षीदार बनलेला जर्मन यहुदी, मॉक्स लिबस्टर याला भेटले. आमचा १९५६ मध्ये विवाह झाला आणि आमचा देव यहोवा याच्या मदतीने आम्ही तेव्हापासून आतापर्यंत फ्रान्स येथे पूर्ण-वेळेच्या सेवेत, खास पायनियर सेवक या नात्याने काम करत आहोत.

आईने, पुष्कळ वर्षांआधी मी गुन्हेगारांच्या सुधारणूक शाळेत जाण्याआधीच्या सायंकाळी केलेल्या प्रार्थनेतील शब्द किती सत्य ठरले: “हे यहोवा, मी तुझ्याकडे विनंती करते की, माझ्या मुलीला विश्‍वासू ठेव!”

आणि आजपर्यंत यहोवाने अगदी तेच केले आहे!—सिमोन आरनॉल्ड लिबस्टरद्वारे निवेदित. (g93 9/22)

[२६ पानांवरील चित्र]

सिमोन आरनॉल्ड लिबस्टर आणि तिचे पती, मॉक्स लिबस्टर