वेदनारहित जीवन जवळ आहे!
वेदनारहित जीवन जवळ आहे!
आम्हाला इजा पोंहचण्यापासून सुरक्षित ठेवणारी शरीराची गुंतागुंतीची रचना खरोखर एक आश्चर्य आहे. स्तोत्रकर्त्याप्रमाणे तिच्या अभ्यासाने आम्ही निर्माणकर्त्याची स्तुती करावयास उत्तेजित झाले पाहिजे. त्याने लिहिले: “भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो.” (स्तोत्र १३९:१४) खरेच, वेदनारहित जीवन केवळ देवच आणू शकतो! परंतु, हे कसे साध्य केले जाईल?
याकडे लक्ष द्या की, वेदना व अश्रू काढून टाकण्याच्या अभिवचनाआधीच पवित्र शास्त्र, “नवे आकाश व नवी पृथ्वी” याविषयी सांगते, कारण “पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती.” (प्रकटीकरण २१:१, ४) अर्थात, पवित्र शास्त्र आपले अक्षरशः आकाश व पृथ्वी निघून गेल्याबद्दल सांगत नाही. त्याउलट, ते म्हणते की, लवकरच या सद्य व्यवस्थीकरणाऐवजी एक संपूर्णतः नवे व्यवस्थीकरण येईल. होय, एक नवे अतिमानुष सरकार, याच पृथ्वीवर वेदनारहित जीवनाचा आनंद लुटण्यास शक्य करील.
या सरकारचे वर्णन देताना पवित्र शास्त्र म्हणते की, “स्वर्गीय देव एका राज्याची [किंवा सरकाराची] स्थापना करील . . . ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यास नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” (दानीएल २:४४) येशू ख्रिस्त या पृथ्वीवर असताना, त्याने आम्हाला या राज्य सरकारासाठी प्रार्थना करण्यास शिकवले. त्याने म्हटले: “ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”—मत्तय ६:९, १०, किंग जेम्स व्हर्शन.
परंतु, तुम्हासाठी त्या प्रार्थनेच्या पूर्णतेचा अर्थ, वेदनारहित जीवन कसा होऊ शकतो?
अतिमानुष शक्ती असलेला अधिपती
देवाने त्याचे सरकार चालवण्यास ज्या व्यक्तीची निवड केली आहे, तिच्या बुद्धी व शक्तीमध्ये याचे उत्तर मिळते. तो स्वतः येशू ख्रिस्त आहे. त्याच्याबद्दल एक पवित्र शास्त्रीय भविष्यवाणी अशी म्हणते: “त्याच्या खांद्यावर सत्ता राहील . . . त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार.”—यशया ९:६, ७, किं.जे.
आता स्वर्गात असणाऱ्या येशूची बुद्धी पार्थिव वैद्यांपेक्षा फार असीम आहे. तो आपल्या दैहिक शरीराचे कार्य तसेच स्वतःला इजेपासून सुरक्षित ठेवण्याच्या रचनेबद्दल पूर्णपणे जाणून आहे. तो १,९०० वर्षांपूर्वी, मानव या नात्याने या पृथ्वीवर होता तेव्हा, असा एकही रोग किंवा पीडा नव्हती ज्यांना तो बरे करू शकला नाही. अशाप्रकारे त्याने, देवाच्या राज्याचा राजा या नात्याने मोठ्या प्रमाणात तो काय करील हे तेव्हा दर्शवले. एका प्रसंगाविषयी, पवित्र शास्त्र सांगते:
“मग लोकांचे थव्यांचे थवे त्याच्याकडे आले; त्यांच्याबरोबर लंगडे, व्यंग, आंधळे, मुके व दुसरे पुष्कळ जण होते; त्यांना त्यांनी त्याच्या पायांशी आणून ठेवले आणि त्याने त्यांना बरे केले. मुके बोलतात, व्यंग धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात, हे पाहून लोकसमुदायाने आश्चर्य केले.” (मत्तय १५:३०, ३१) येशूच्या राज्य सत्तेच्या दरम्यान तो ज्या पीडांना बरे करील त्यापैकी ही एक भयानक पीडा आहे, कायमची वेदना.
निश्चितच, तो एक किती अद्भुत आशीर्वाद असेल! त्याचप्रमाणे त्याची पूर्णता केवळ काहींच्या बाबतीतच पूर्ण होणार नाही. निर्माणकर्त्याचे अभिवचन आहे: “‘मी रोगी आहे,’ असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४) त्यानंतर, देवराज्याच्या सत्तेखाली “कष्ट [वेदना] ही नाहीत,” या अभिवचनाची पूर्णता होईल.—प्रकटीकरण २१:४.
ख्रिस्ताच्या भव्य राज्य सत्तेखाली, आम्हाला इजा होण्यापासून सुरक्षित ठेवणाऱ्या रचनेसोबत आपल्या शरीराच्या पुष्कळ रचना, वारशाने मिळालेले पाप काढून टाकल्यामुळे अगदी निर्दोष रीतीने कार्य करतील. आमच्या शरीरातील धोक्याची सूचना देणारी रचना कधीही छळवणूक करणारी गोष्ट ठरणार नाही. आनंदाची गोष्ट म्हणजे, आता पूर्ण होत असलेल्या पवित्र शास्त्रीय भविष्यवाण्यांनुसार आम्ही त्या नव्या जगाच्या अगदी उंबरठ्यावर आहोत. त्या जगात, वेदना कधीही पीडा देणार नाहीत.—मत्तय २४:३-१४, ३६-३९; २ तीमथ्य ३:१-५; २ पेत्र ३:११-१३.
आज लाखो लोकांना पीडित करणारी वेदना कधीही अस्तित्वात नसेल अशा जीवनाचा आनंद तुम्ही देवराज्याखाली लुटू शकता. परंतु, तुम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे. येशूने देवाला प्रार्थना केली तेव्हा त्याने एका मूलभूत गरजेकडे बोट दाखवले: “सार्वकालिक जीवन हे आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला, व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.
हे अत्यावश्यक ज्ञान मिळवण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांना आनंद वाटेल. तुमच्या भागातील एकाला विचारा, किंवा तुम्हाला तुमच्या घरात किंवा इतर कोणा सोयीस्कर ठिकाणी पवित्र शास्त्राभ्यास हवा असल्यास ती इच्छा प्रकट करून या नियतकालिकाच्या प्रचारकांना लिहा. मानवजातीसाठी वेदनारहित जीवनाचा आनंद लुटण्याच्या देवाच्या उद्देशांविषयी आणखी शिकण्यासाठी तुमच्याकरता योजना केली जाईल. (g94 6/22)