जगावरील दृष्टिक्षेप
जगावरील दृष्टिक्षेप
अमेरिका—कैद्यांचा बालेकिल्ला
“सध्या अमेरिकेत कारावासात असणाऱ्यांची संख्या कोणत्याही लोकशाही आणि हुकूमशाही राष्ट्रांत असलेल्या कैद्यांपेक्षाही अधिक आहे,” असे दि इकोनॉमिस्ट नियतकालिक म्हणते. “गेल्या वर्षी दर १५० [अमेरिकन] रहिवाशांपैकी (यात मुले सुद्धा आली) एका जणाला गजाआड करण्यात आले होते.” अमेरिकेतील कारावासाचे प्रमाण जपानच्या तुलनेत २० पट, कॅनडाच्या तुलनेत ६ पट आणि पश्चिम युरोपियन देशांच्या तुलनेत ५ ते १० पट अधिक आहे. सन १९८० पासून आजपर्यंत संयुक्त संस्थानांतील कैद्यांची संख्या चौपट झाली आहे. सध्या कैदखान्यात खितपत पडलेल्या ४,००,००० हून अधिक कैद्यांना ड्रग्सच्या आरोपाखाली कैद केली असली तरी १९८८ पासून आजपर्यंत ड्रग्सचा दुरुपयोग करणाऱ्या लोकांमध्ये काहीएक फरक पडलेला नाही. तेव्हा, दि इकोनॉमिस्ट नियतकालिक असा प्रश्न विचारते: “कारावासामुळे गुन्हेगारीला खीळ बसो अगर नसो, प्रश्न हा आहे की अमेरिका आणखीन कोठवर कैद्यांना पोसत राहणार?”
आर्मगेडनवर पैज
ब्रिटनमध्ये दर आठवडी डझनावारी लोक “आर्मगेडनवर (विश्वविनाशावर) पैज लावत आहेत,” असे द गार्डियन वृत्तपत्र म्हणते. तेथील १००१ लोकांच्या सर्व्हेत हे दिसून आले, की जगाचा अंत एखाद्या विश्वयुद्धाने होईल असे ३३ टक्के लोकांना वाटते, तर २६ टक्के लोकांचे असे मत आहे, की पृथ्वीच्या तापमानात निरंतर वाढ होऊन या जगाचा अंत होईल. इतर काहींचे म्हणणे आहे, की हा अंत अंतरिक्षातील एखादा लघूग्रह पृथ्वीवर आदळून होईल. किंबहुना, सदर सर्व्हेतील ५९ टक्के लोकांना “वाटते की त्यांना नॅशनल लॉट्री जिंकायची इतकी खात्री नाही जितकी या जगाचा अंत पाहण्याची खात्री आहे,” असे द गार्डियन वृत्तपत्राने म्हटले. पण, आर्मगेडनच्या बाबतीत इतकी चर्चा, इतके अंदाज का? “कदाचित नवीन सहस्रकाने आणि या सहस्रकाभोवती असलेल्या दहशतीच्या वलयाने त्यांना प्रभावित केले असावे,” असे सदर वृत्तपत्राने म्हटले.
“बाबेलचा मनोरा”
आज युरोपियन युनियनमध्ये (इयुमध्ये) ११ अधिकृत भाषा आहेत. आणि पुढे त्यांत दहापेक्षा अधिक भाषांची भर पडण्याची शक्यता आहे असा पॅरिसच्या इंटरनॅशनल हेरल्ड ट्रिब्यून वृत्तपत्राचा अहवाल आहे. त्यामुळे युरोपियन युनियनचे कार्यकारी मंडळ अर्थात युरोपियन कमिशन संयुक्त संस्थानांच्या (जेथे फक्त पाच अधिकृत भाषा आहेत) तुलनेत आता चार पटींहून अधिक अनुवादकांची आणि दुभाषकांची नेमणूक करत आहे. परंतु, युरोपमध्ये एकता साधून युरोपियन युनियनचे कामकाज सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू असताना भाषेच्या बाबतीत मात्र उलटच घडत आहे. जो तो देश आपल्याच भाषेचा पुरस्कार करतो. तेथे जणू ‘बाबेलच्या मनोऱ्याचे ओझरते चित्रच दिसत आहे’ असे वृत्तपत्र म्हणते. पण, समस्या इतकीच नाही. “युरोबोली” अर्थात युरोपियन राजकारण्यांमध्ये बोलली जाणारी दुर्बोध अथवा अनाकलनीय भाषा हा मंडळापुढे आ वासून असलेला आणखीन एक प्रश्न आहे. एका अनुवादकाचे म्हणणे आहे, की राजकारणी लोकांचा “हेतूच मुळात कोड्यात बोलण्याचा असल्यावर त्यांच्याकडून स्पष्ट वक्तेपणाची अपेक्षा करणे कठीण आहे.”
भिकाऱ्याचे सोंग
बरेचसे भिकारी खरोखरच दैन्यावस्थेत असले तरी काहीजण भिकाऱ्यांचे फक्त सोंग घेतात असा भारतात प्रकाशित होणाऱ्या द वीक नियतकालिकाचा अहवाल आहे. भारतातील महाराष्ट्र राज्यात, कुबड्यांच्या साह्याने चालणारा एक भिकारी ट्रॅफिक सिग्नलला थांबलेल्या एका कारपाशी आला. पण, भिकाऱ्याकडे दुर्लक्ष करत गाडी चालवणाऱ्या मनुष्याने आपल्या मैत्रिणीशी गप्पा मारण्याचे चालूच ठेवले तेव्हा भिकारी जोरजोराने ओरडून भीक मागू लागला. त्यावर गाडीतल्या मनुष्याने रागावून आपल्या खिडकीची काच खाली केली आणि भिकाऱ्याला ढकलून दिले. त्यामुळे भिकाऱ्याच्या कटोऱ्यातली चिल्लर खाली पडली. हे पाहून, “लंगड्याचं सोंग करणारा” भिकारी लगेच बरा झाला आणि आपल्या कुबड्यांनी कारच्या काचा फोडू लागला. हे सगळे कमी म्हणून की काय, “त्याच्यासारखंच अंधळ्याचं, अपंग असल्याचं सोंग करणाऱ्यांचा आणि इतर गाड्यांच्या आसपास भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांचा एक मोठा घोळकाच त्या भिकाऱ्याच्या मदतीला धावून आला.” भिकाऱ्यांचे सोंग घेणाऱ्या या लोकांनी दगडमार केला,
काठ्या आणि कुबड्यांनी गाडी चालवणाऱ्याला धमकावले. कारमध्ये बसलेल्या त्या व्यक्तीला त्यांनी अक्षरशः ओढून बाहेर काढले, असे द वीक म्हणते. पण, त्याच क्षणी एका पोलिसाची गाडी आल्याचे पाहून भिकाऱ्यांनी तेथून धूम ठोकली.दगदगीचे काम तब्येतीला चांगले
जर्मनीमध्ये ५०,००० कर्मचाऱ्यांच्या घेतलेल्या एका अभ्यासातून निष्पन्न झाले, की कामात सतत व्यस्त असणाऱ्या लोकांच्या तुलनेत फारसे दगदगीचे काम न करणाऱ्या लोकांना आरोग्य समस्या संभवण्याची दाट शक्यता आहे. “ज्या कर्मचाऱ्यांच्या कामात तोच तोपणा असतो, ज्यांना कामात पुरेसं स्वातंत्र्य नसतं अशा लोकांमध्ये, दगदगीचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आजारी पडण्याची दुप्पट शक्यता असते” असे आउग्सबूर्ग आल्जेमायना वृत्तपत्राचा अहवाल आहे. फारशी दगदग नसलेल्या कामामुळे कर्मचाऱ्यांची जितक्यांदा आणि जितक्या दिवसांपर्यंत कामावर गैरहजेरी होते तितकी इतर कोणत्याही आव्हानात्मक किंवा ताणतणावाच्या कामामुळे होत नाही. सदर अहवालानुसार, ज्यांचे काम जास्त दगदगीचे नसते, ज्यांच्या कामात आव्हान नसते अशांना “उच्च रक्त दाब असतो तसेच पोट, आंतड्या, पाठ आणि सांधे यांचा त्रास असतो.”
अक्षरशः निरर्थक
“धूम्रपान केल्याने लोक काही सडपातळ होत नसतात,” असे युनिव्हर्सिटी ऑफ बर्कली वेलनेस लेटर म्हणते. “धूम्रपान केल्याने अंगकाठी सडपातळ राहते असे समजून अनेक तरुणी धूम्रपान करू लागतात.” पण, १८ ते ३० वयोगटातील ४,००० प्रौढांच्या अभ्यासात निदर्शनास आले की, “एखादी व्यक्ती धूम्रपान करो अगर न करो, सातएक वर्षांच्या कालावधीत तिचे वजन वाढतच (म्हणजे वर्षागणिक एका पाउंडहून अधिक) होते.” या लेखाने शेवटी म्हटले: “धूम्रपान केल्याने आपल्या वजनावर नियंत्रण ठेवता येते हे साफ चुकीचे आहे. धूम्रपानाचे काहीच फायदे होत नसून धूम्रपान अक्षरशः निरर्थक आहे.”
रागाला वाट देणे
तथाकथित कथारसिसमुळे (भावविरेचनामुळे) अर्थात “निर्जीव वस्तूवर राग काढल्याने उदाहरणार्थ, उशीला किंवा पंचिंग बॅगला ठोसे मारल्याने आक्रमक वृत्ती कमी होण्याऐवजी व्यक्ती अधिकच आक्रमक बनते,” असे कॅनडाच्या नॅशनल पोस्ट वृत्तपत्राचा अहवाल आहे. आयवा राज्य विद्यापीठात मानसशास्त्र विषयावरील सहप्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या डॉ. ब्रॅड बुशमन यांनी म्हटले: “भावविरेचनास लोकप्रिय प्रसार माध्यमांनी जितका बढावा दिला तितका साहित्य संशोधनाने दिला नाही.” संशोधकाच्या हेही लक्षात आले आहे, की “रागाला वाट करून देण्यासाठी ‘भावविरेचन’ एक उत्तम मार्ग आहे असे म्हणणारी पुस्तके किंवा लेख व्यक्तीला स्वतःवर नियंत्रण न ठेवण्याची अनुमती देत असल्यामुळे ते वास्तवात आक्रमक वृत्तीला खतपाणी घालत असतात,” असे पोस्ट वृत्तपत्राचे म्हणणे आहे.
महागड्या मयती
हल्ली बरेच लोक दफनक्रियेचा वाढता खर्च चुकवण्यासाठी प्रेतांचे दहन करण्याकडे वळत आहेत. नॅशनल फ्यूनरल डायरेकटर्स असोसिएशननुसार १९९६ मध्ये संयुक्त संस्थानांत पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी साधारण ४,६०० डॉलर इतका खर्च व्हायचा. पण, “दहनक्रियेसाठी निवडलेले पात्र आणि मृत व्यक्तीच्या अस्थींसाठी असलेला कलश मिळून दहनक्रियेसाठी केवळ ५०० ते २००० डॉलर इतका खर्च होतो,” असे शीकागो सन-टाइम्स म्हणते. शिवाय, स्मशानभूमीतील जमिनीच्या तुकड्याची किंवा कबरेवरच्या दगडाची गरज पडत नसल्यामुळे पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्कारात आणखीन ४० टक्केचा खर्च वाचतो. वृत्तपत्राने म्हटले, की १९९७ साली २३.६ टक्के प्रेतांचे दहन केले जायचे आणि पुढील १० वर्षांच्या काळात ही संख्या ४२ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
तोंडाच्या कॅन्सरची साथ
भारतातील दिल्ली शहरात तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलीस शहरापेक्षा चौपट आहे असा दि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राचा अहवाल आहे. सन १९९५ साली दिल्लीतील पुरुष वर्गाला जडलेल्या विविध कॅन्सरपैकी १० टक्के लोकांना तोंडाचा कॅन्सर झाला होता; तर आज, याच कॅन्सरचे प्रमाण १८.१ टक्के इतके वाढले आहे. तोंडाचा कॅन्सर होण्याची काही प्रमुख कारणे म्हणजे तंबाखू खाणे, बिडी ओढणे आणि मसाला पान खाणे (ज्यात तंबाखू, सुपारीचा कूट आणि इतर पदार्थ असतात). आज पान मसाला खाणाऱ्या शाळकरी मुलांच्या वाढत्या संख्येमुळे फार मोठा धोका निर्माण झाला आहे असे वृत्तपत्राने म्हटले. किंबहुना, सबंध भारतच ‘तोंडाच्या कॅन्सरच्या साथीकडे’ वाटचाल करत आहे असा इशारा एका तज्ज्ञाने दिला आहे.