ब्राटिस्लाव्हा—नदीवरील प्राचीन बंदरापासून आधुनिक राजधानीपर्यंतचा प्रवास
ब्राटिस्लाव्हा—नदीवरील प्राचीन बंदरापासून आधुनिक राजधानीपर्यंतचा प्रवास
स्लोव्हाकियामधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
कल्पना करा की, तुम्ही १७४१ च्या काळात जगत आहात. सगळीकडे उत्सुकतेचे वातावरण आहे. लोकांची गजबज, आरडाओरड सुरू आहे; एकमेकांना धक्काबुक्की देत प्रत्येकजण रस्त्यावरची मिरवणूक पाहायला मिळावी म्हणून धडपडत आहे. शेतकरी आपले रविवारचे खास कपडे घालून आले आहेत आणि गर्विष्ठ श्रीमंत लोक नवनवीन फॅशनचे कपडे घालून आले आहेत; तेथे उमराव देखील इतरांना पाहायला आणि लोकांपुढे मिरवायला आले आहेत. राजमहालातले दूत एका तरुणीचे चित्र असलेले सोन्याचे आणि रुप्याचे नाणे लोकांना वाटत आहेत आणि लोक आनंदाने ओरडत आहेत. हा सगळा गोंधळ कशासाठी? माराया टेरिसा ही ऑस्ट्रियाची राजकन्या, हंगेरीची नवीन राणी म्हणून अभिषेक होण्याकरता शहरात प्रवेश करत आहेत.
आता पुन्हा वर्तमान स्थितीत या. तुम्हाला या महत्त्वपूर्ण राज्याभिषेकाच्या स्थळी भेट द्यायची असती तर तुम्ही कोठे गेला असता? पुष्कळसे पर्यटक माराया टेरिसाचे राजमहाल पाहायला जातात त्या व्हिएन्नाला नाही किंवा आधुनिक हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्टलाही नाही. तर तुम्हाला ब्राटिस्लाव्हा या शहराला जावे लागले असते; ते डान्यूब नदीच्या काठी वसलेले असून व्हिएन्नाच्या पूर्वेला ५६ किमी अंतरावर आहे.
आजच्या ब्राटिस्लाव्हा शहरात पाच लाख लोकांची वस्ती असून ते रमणीय स्लोव्हाकियाची राजधानी आहे. बुडापेस्ट, व्हिएन्ना आणि प्राग या आजूबाजूच्या राजधानींच्या तुलनेत ब्राटिस्लाव्हा छोटे शहर वाटते. तथापि, गेल्या दोन शतकांहून अधिक वर्षांपर्यंत ते हंगेरीची राजधानी होते आणि राजधानीला मिळणारे सर्व वैभव त्याने अनुभवले. हंगेरीतल्या ११ शासकांचे राज्याभिषेक याच शहरात झाले आहेत. पण, या शहराला इतकी ख्याती कशाने प्राप्त झाली?
एक प्राचीन वसाहत
ब्राटिस्लाव्हा हे शहर डान्यूब नावाच्या युरोपातील दुसऱ्या सर्वात मोठ्या नदीवर
वसलेले असल्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. गतकाळात, डान्यूब नदीचा प्रवाह अगदी याच ठिकाणी कमी होत असे आणि पात्र फार उथळ होत असे ज्यामुळे लोकांना नदी पार करायला एक नैसर्गिक मार्ग तयार झाला होता. या नदीवर पूल बांधण्याच्या कितीतरी वर्षांआधी आपली गुरेढोरे आणि गाड्या घेऊन लोक नदीतून ये-जा करत होते. अशाप्रकारे, सध्याच्या ब्राटिस्लाव्हा शहराच्या आसपासचा भाग प्राचीन काळापासून दळणवळणाचे वर्दळीचे ठिकाण होते. सा.यु.पू. १५०० सालीच उत्तर आणि दक्षिण युरोपला जोडणाऱ्या ॲम्बर रूट्सपैकी (हे मार्ग अत्यंत महत्त्वाचे व्यापारी मार्ग होते) एक मार्ग त्या शहरातून जात होता. नंतर, नदीच्या पलीकडील वाहनांचे नियंत्रण जवळपासच्या पर्वतावरील किल्ल्याहून केले जात होते; तेथे आता ब्राटिस्लाव्हा महाल वसलेला आहे.प्राचीन काळात तुम्ही जाऊ शकला असता तर या ठिकाणी तुम्हाला कोण भेटले असते? सा.यु.पू. चवथ्या शतकात तुम्ही आला असता तर सेल्टिक लोकांनी तुमचे स्वागत केले असते; त्या वेळी हे ठिकाण सेल्टिक लोकांच्या संस्कृतीचे केंद्रस्थान होते. तिथले पर्वत स्थानिक सेल्टिक लोकांकरता एका किल्ल्यासमान होते; हे लोक कुंभारकाम आणि नाण्यांवर शिक्के मारण्याचे काम करायचे.
सामान्य युगाच्या सुरवातीला तुम्ही तेथे असता तर काय? तुम्हाला लॅटिन भाषा ठाऊक असती तर तुम्ही तिथल्या स्थानिक लोकांशी बोलू शकला असता, कारण तोपर्यंत रोमन लोकांनी डान्यूब नदीपर्यंत त्यांच्या उत्तरेकडील सीमा पसरवल्या होत्या. त्याचप्रमाणे पश्चिमेकडून येणारे जर्मन लोकही तुम्हाला कदाचित भेटले असते.
मध्ययुगाच्या दरम्यान म्हणजेच अठराव्या शतकाच्या आसपास जर तुम्ही तेथे असता, तर तुम्हाला विविध देशातून आलेले भिन्न लोक भेटले असते. तोपर्यंत मोठे स्थलांतरण ज्याला म्हणतात ते झाले होते आणि पूर्वेकडील स्लाव्ह लोक त्या ठिकाणी वास करू लागले होते. हंगेरियन लोकांनी दक्षिणेला आपली वसाहत केली होती, शिवाय ब्राटिस्लाव्हाच्या प्रदेशातही ते राहू लागले होते. पण, स्लाव्ह लोकांचा प्रभाव जास्त होता. याचा पुरावा आहे दहाव्या शतकात त्या ठिकाणी बांधलेल्या पहिल्याच खऱ्याखुऱ्या महालाचे स्लोव्हाक भाषेतले नाव. ते नाव होते ब्रेझालाउस्पुट्र्झ अर्थात “ब्रास्लाउचे महाल”; एका मोठ्या सेनापतीच्या नावावरून हे नाव पडले असावे असे मानले जाते. याच नावावरून ब्राटिस्लाव्हा हे स्लोव्हाक नाव आले.
मध्ययुगीन शहर
कालांतराने, सध्या स्लोव्हाकिया नावाने ओळखले जाणारे राष्ट्र हंगेरीत सामील झाले. सा.यु. १२११ च्या एका ऐतिहासिक अहवालानुसार ब्राटिस्लाव्हाचे महाल हंगेरीतले सर्वात उत्तम तटबंदी असलेले महाल होते. ही गोष्ट तीस वर्षांनंतर सिद्ध झाली, कारण टाटार लोकांनी हल्ला केला तेव्हा ते महाल भक्कम राहिले होते. त्या विजयामुळे महालाच्या अवतीभोवतीची वसाहत आणखी वाढली आणि १२९१ साली तिसरा ऑन्द्रे या हंगेरियन राजाने त्या नगराला नगरपालिकेचे सर्व विशेष हक्क देऊ केले. अशाने तिथल्या नागरिकांना डान्यूब नदीतून आपला माल पाठवण्यासाठी आणि कोणत्याही बंधनाविना “पाण्यातून तसेच जमिनीवरून” व्यापार करता येण्यासाठी स्वतःचा नगरसेवक निवडण्याचा अधिकार मिळाला. उन्हात पसरलेल्या नगराच्या उताऱ्यांवर द्राक्षांचे मळे होते; त्यामुळे नागरिकांना घरी बनवलेला द्राक्षारस विकण्याचा अधिकार मिळाल्याबद्दल ते फार कृतज्ञ होते.
नंतर हंगेरियन राजांनी शहराला आणखीन सुविधा देऊ केल्या ज्यामुळे त्यांचे राज्य अधिक वाढले. १५२६ साली ब्राटिस्लाव्हा हे शहर हंगेरीची राजधानी बनले आणि १७८४ पर्यंत ते या
स्थानावर राहिले. दरम्यान, ब्राटिस्लाव्हामधील भिन्न जातीच्या लोकांमध्ये अधिकच भर पडली. तेथील जास्तीत जास्त लोक स्लाव्ह आणि हंगेरियन होते, पण त्यात जर्मन आणि यहुदी लोकही सामील झाले. १७ व्या शतकामध्ये, तुर्कांचे साम्राज्य पश्चिमेला आणि उत्तरेला पसरू लागले तसे पुष्कळ क्रोएशियन लोकांनी ब्राटिस्लाव्हामध्ये आश्रय घेतला; त्याचप्रमाणे, युरोपच्या दूरवरील पश्चिम राष्ट्रांमध्ये कॅथलिक आणि प्रोटेस्टंटांचे तीस वर्षांचे युद्ध झाले तेव्हा तेथून पळ काढलेले झेक निर्वासित लोकही ब्राटिस्लाव्हात आश्रयाला आले.२० व्या शतकातले ब्राटिस्लावा
विसाव्या शतकाच्या सुरवातीला ब्राटिस्लाव्हा शहरात विविध राष्ट्रांचे आणि संस्कृतींचे लोक राहत होते. त्या वेळी एखाद्या दुकानात जर्मन किंवा हंगेरियन भाषेत काही विचारले तर ते निश्चित मिळायचे. पण झेक, रोमानी (जिप्सी) आणि यहुदी समाजाचाही महत्त्वाचा भाग होता. पहिल्या महायुद्धाच्या आधी स्लाव्ह लोकांची संख्या फक्त १५ टक्के होती. परंतु १९२१ पर्यंत, त्यांची संख्या शहरातल्या इतर राष्ट्रांच्या लोकांपैकी सर्वात जास्त होती.
मग दुसऱ्या महायुद्धाचे काळोखे ढग युरोपवर थैमान घालू लागले. त्यानंतर ब्राटिस्लाव्हाच्या इतिहासात एका दुःखमय काळाची सुरवात झाली आणि सगळे चित्रच पालटले. सर्वात
आधी, झेक लोकांना शहर सोडून जायला भाग पाडले. नंतर, रोमी आणि यहुदी रहिवाशांना देशाबाहेर घालवण्यात आले; त्यातले हजारो लोक शेवटी छळ छावण्यांमध्ये मरण पावले. दुसरे महायुद्ध संपल्यावर, बहुतांशी जर्मनांनाही देशाबाहेर घालवण्यात आले. कालांतराने मात्र हे लोक पुन्हा आपापल्या जुन्या घरी आले. त्यांच्या वास्तव्याने आजही ब्राटिस्लाव्हाचे वातावरण खुलून जाते.आधुनिक ब्राटिस्लावाला एक भेट
आजच्या आधुनिक ब्राटिस्लाव्हामधून एक फेरफटका मारायला येणार का? तर मग, पहिल्यांदा आपण ब्राटिस्लाव्हा महालात जाऊ या; या महालाची पुनर्बांधणी करण्यात आल्यामुळे ते अधिक सुंदर बनले आहे. महालाच्या बगीच्यातून डान्यूब नदीच्या दोन्ही तीरांवर पसरलेल्या शहराचे विशाल दर्शन घडते.
पर्वताच्या पायथ्याशी अगदी महालाच्या खालोखाल जुने शहर आहे—हेच ते ब्राटिस्लाव्हाचे ऐतिहासिक केंद्र. या मनोरंजक शहराच्या चिंचोळ्या रस्त्यांवरून चालताना आपण जणू गेल्या शतकांमध्ये राहत आहोत असाच भास होतो. तिथल्या राजमहालांचे आणि घरांचे आकर्षक बांधकाम वाखाणण्याजोगे आहे. तुम्हाला हवे असल्यास, आपण एखाद्या ऐतिहासिक कॉफीच्या दुकानात कॉफी किंवा चहा आणि ब्राटिस्लाव्हाच्या प्रसिद्ध अक्रोड किंवा खसखसच्या पेस्ट्रींचा स्वाद घेऊ या.
येथील रहिवाशांना जुन्या शहराजवळच्या डान्यूब नदीच्या काठावर फेरफटका मारण्याची हौस आहे. मात्र इथला नवा पूल आणि पुलाच्या कलत्या बुरूजावरील हॉटेल आधुनिक ब्राटिस्लाव्हाचे नजरेतून न सुटणारे प्रतीक आहे. त्याची रचना पाहून असे वाटते की, ते हॉटेल नदीच्या पलीकडील पेट्रझालका नावाच्या प्रदेशावर जणू झुलत आहे.
ब्राटिस्लाव्हात पुष्कळ बांधकाम होत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास त्यात काहीच चूक नाही. जुन्या शहरातल्या काही भागांची पुनर्बांधणी हल्लीच केली आहे, शिवाय १९९० च्या दशकात स्टील आणि काचेच्या पुष्कळ इमारती बांधण्यात आल्या आणि त्यात अजूनही भर पडणार आहे. ही दफ्तरे, व्यापारी केंद्रे आणि बँका यांमुळेच ब्राटिस्लाव्हा शहराला आधुनिक चेहरा लाभला आहे.
साहजिकच, इथल्या स्थळाची आठवण म्हणून तुम्हाला काहीतरी घेऊन जावेसे वाटेल. तर मग, आपण जवळपासच्या दुकानांमध्ये जाऊन हाताने बनवलेल्या काही वस्तूंची खरेदी करू या; येथे सुंदर लेसचे टेबलक्लॉथ, राष्ट्रीय पोषाखातल्या बाहुल्या अशा वेगवेगळ्या वस्तू मिळतात. आणि जर तुम्हाला खुल्या मैदानातल्या मेन स्क्वेअर मार्केटमध्ये जायचे असेल तर तेथे तुम्ही ब्राटिस्लाव्हाचे रहिवाशी अनेक शतकांपासून करत आले आहेत तशा पद्धतीने खरेदी करू शकता. वाटल्यास, तुम्हाला ब्राटिस्लाव्हातल्या वॉच टावर संस्थेच्या आकर्षक शाखा दफ्तरालाही भेट द्यावीशी वाटेल.
कदाचित एके दिवशी तुम्हाला खरोखर ब्राटिस्लाव्हाला जाण्याची संधी मिळेल. आणि जर अशी संधी मिळालीच तर नदीवरील प्राचीन बंदरापासून आधुनिक काळातल्या राजधानीपर्यंतचा प्रवास केलेल्या या वैविध्यपूर्ण शहराचा आनंद तुम्ही नक्कीच उपभोगाल.
[१५ पानांवरील चित्र]
माराया टेरिसा
[चित्राचे श्रेय]
North Wind Picture Archives
[१६, १७ पानांवरील चित्र]
स्लोव्हाक नॅशनल चित्रपटगृह
[१७ पानांवरील चित्र]
जुन्या शहरातला एक रस्ता
[१८ पानांवरील चित्र]
नवा पूल आणि त्याच्यावरचा कलता बुरूज
[१८ पानांवरील चित्र]
यहोवाच्या साक्षीदारांचे शाखा दफ्तर आणि राज्य सभागृह