महान रचनाकाराची ओळख
महान रचनाकाराची ओळख
निसर्ग एखाद्या पुस्तकासमान आहे आणि या पुस्तकामुळे कोणाही विचारशील व्यक्तीच्या मनात निर्माणकर्त्याच्या किंवा रचनाकाराच्या अस्तित्वाविषयी शंका उरणार नाही हे पुष्कळ शास्त्रज्ञ देखील मान्य करतील. बऱ्याच वर्षांआधी, ख्रिस्ती प्रेषित पौलानेही लिहिले होते की, “सृष्टीच्या निर्मितीपासून [देवाच्या] अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.” (रोमकर १:२०) उदाहरणार्थ, निसर्गाच्या पुस्तकात देवाविषयी व त्याच्या इच्छेविषयी पूर्णपणे प्रकट केलेले नाही. परंतु, निर्मितीला अस्तित्वात आणणाऱ्याने एका दुसऱ्याच पुस्तकात स्वतःचा उद्देश प्रकट केला आहे; ते पुस्तक आहे त्याचे प्रेरित वचन बायबल.—२ तीमथ्य ३:१६.
बायबल हे जरी विज्ञानाचे पुस्तक नसले, तरी निसर्गात न सापडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे त्यात सापडतात. हस्तकलेची एखादी सुंदर वस्तू निरखून पाहताना प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की, हे बनवले कोणी? आणि प्रत्येकाच्या मनात अगदी पाहताक्षणीच येणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर प्रकटीकरण ४:११ येथे काय म्हटले आहे ते पाहा: “हे प्रभो [“यहोवा,” NW], आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” होय, यहोवा हा महान रचनाकार आहे आणि बायबलच्या मूळ हस्तलिखितांमध्ये त्याचे नाव सुमारे ७,००० वेळा आढळते.
बायबलमध्ये दिले आहे. निर्मितीविषयी बायबलमध्येया विज्ञान युगाच्या सुमारे ३,५०० वर्षांआधी ईयोब नावाच्या एका सद्गृहस्थाने निर्मितीचे श्रेय यहोवाला दिले; तो एक निसर्गप्रेमी आणि विचारशील मनुष्य होता यात शंका नाही. ईयोब म्हणाला: “तू पशूंस विचार, ते तुला शिकवितील; आकाशातील पक्ष्यांस विचार, ते तुला समजावून देतील, अथवा पृथ्वीशी बोल, ती तुला शिकवील; समुद्रातील मत्स्य तुला सांगतील.” या सर्व गोष्टी निर्मितीविषयी काय शिकवतील? ईयोबाने याचे उत्तर एका प्रश्नाच्या रूपात दिले: “परमेश्वराच्या हाताने हे घडले आहे असे ह्या सर्वांवरून कोणाला समजावयाचे नाही?”—ईयोब १२:७-९.
मानवांसाठी यहोवाचा उद्देश
मानवजातीसाठी असलेला यहोवाचा उद्देशसुद्धा बायबलमध्ये प्रकट केलेला आहे. तो उद्देश काय आहे? हाच की, नीतिमान मानवांनी अगदी याच पृथ्वीवर बागेसमान परिस्थितींमध्ये सार्वकालिक जीवनाच्या बक्षीसाचा आनंद लुटावा. “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील,” असे स्तोत्र ३७:२९ मध्ये म्हटले आहे. येशूही असे म्हणाला की, “जे लीन ते आशीर्वादित आहेत, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.”—मत्तय ५:५, पं.र.भा.
शिवाय, एका खास प्रकारच्या ज्ञानामुळे पृथ्वी शांतिमय बागेसमान बनेल. यशया ११:९ म्हणते: “माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या [यहोवाच्या] ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” खरे म्हणजे, ‘यहोवाचे ज्ञान’ हीच अनंत जीवन, शांती आणि आनंदाची गुरुकिल्ली आहे. येशूने पुढीलप्रमाणे म्हटले तेव्हा त्याने याला पुष्टी दिली; तो म्हणाला: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.
सार्वकालिक जीवन प्राप्त झाल्यावर देवाच्या मूळ उद्देशाप्रमाणे मानवजात पृथ्वीचा आनंद लुटू शकेल. तसेच अनंत जीवन कंटाळवाणे नसून कुतूहलाचा आणि हर्षाचा एक साहसी, कधी न संपणारा प्रवास असेल.
थरारक आव्हान!
उपदेशक ३:११ म्हणते, “आपआपल्या समयी होणारी हरएक वस्तु [देवाने] सुंदर बनविली आहे; त्याने मनुष्याच्या मनांत अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही.” लवकरच, ‘अनंतकाळापर्यंत’ किंवा सदासर्वदा जिवंत राहण्याची मानवांची स्वाभाविक इच्छा पूर्ण झाल्यावर “देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम” आपल्याला माहीत करून घेता येईल. होय, सबंध पृथ्वीच जणू एका शाळेसारखी बनेल, यहोवा आपला शिक्षक असेल आणि जीवन संशोधनाची एक उत्साही, कधी न संपणारी सफर असेल.
तुम्ही एका उद्यानासमान स्थळी आहात; तुमचे मन व शरीर एकदम निरोगी आहे, त्यात कोणताच दोष नाही अशी कल्पना करा. तेव्हा तुम्ही काही आव्हाने स्वीकाराल जी आता स्वीकारण्याचा विचारही तुम्ही करू शकणार नाही आणि विशेष म्हणजे तुम्ही स्वीकारलेले आव्हान पूर्ण झाल्याशिवाय ते हातावेगळे होऊ देणार नाही—मग त्याला शंभर वर्षे लागोत नाहीतर हजार वर्षे. त्या वेळी, तुमच्या निर्दोष क्षमता उपयोगात आणून तुम्ही कदाचित यहोवाच्या काही रचनांची नक्कलही कराल. तुमचे ते प्रयत्न मानवजातीच्या सध्याच्या प्रयत्नांसारखे मुळीच नसतील, कारण त्यांच्यामुळे कोणालाही हानी पोहंचणार नाही किंवा प्रदूषण होणार नाही. होय, यहोवासारखेच तुम्ही देखील जे काही कराल ते प्रीतीने प्रेरित होऊन कराल.—उत्पत्ति १:२७; १ योहान ४:८.
हे केवळ एक रंजक स्वप्न नाही असे का म्हणता येईल? यहोवाच्या दोन उत्कृष्ट “पुस्तकांमुळे.” होय, बायबल आणि निर्मिती या दोन पुस्तकांमध्ये असा बिनतोड पुरावा सापडतो की, आपला महान रचनाकार व निर्माणकर्ता याला जगातील कोणतीही गोष्ट असाध्य नाही. म्हणून त्याची आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांची ओळख आपण का करून घेऊ नये? यापेक्षा इतर कोणतेही कार्य मनोवेधक, आशादायक किंवा सार्थक ठरणारे नसेल.
[१० पानांवरील चित्रे]
बायबल आणि निसर्ग या पुस्तकांत महान रचनाकाराची ओळख करून दिली आहे