जगावरील दृष्टिक्षेप
जगावरील दृष्टिक्षेप
मृतदेहांनी भरलेली गंगा
“शतकानुशतके हिंदू लोकांनी आपल्या मृत लोकांचे देह गंगेत सोडले आहेत; त्यांचा विश्वास आहे की, असे केल्याने आत्म्याला शारीरिक अवस्थेतून मोक्ष किंवा मुक्ती मिळते,” असे इलेक्ट्रॉनिक टेलिग्राफ यात म्हटले होते. “२,५०० किलोमीटरच्या गंगेची खोली जास्त होती तोपर्यंत पाण्याच्या जोरदार प्रवाहात सडणारे शेकडो मृतदेह वाहून नेले जात असत. परंतु, सर्व औद्योगिक गाळसाळ आणि केरकचऱ्याचा भरणा नदीच्या पात्रात झाल्यामुळे तिचा प्रवाह मंदावला, सोबतच नदीची खोलीही कमी झाली.” याच्या परिणामात मृतदेह “कित्येक आठवडे रानटी वनस्पतींमध्ये आणि घाणीत अडकून राहतात.” १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात एक प्रयत्न म्हणून सरकारने हजारो मांसाहारी कासव गंगेत सोडले. परंतु, १९९४ मध्ये ही प्रथा थांबवण्यात आली कारण कासवांची कमतरता भासू लागली आणि बेकायदेशीर शिकाऱ्यांमुळे कासवांचाच जीव धोक्यात येऊ लागला. आता एक नवीन मार्ग शोधला आहे; लोकांना आपल्या मृत नातेवाईकांचे शरीर नदीत न सोडता नदीजवळ जाळायला किंवा नदीकाठच्या वाळूत पुरायला प्रोत्साहन दिले जात आहे.
अपहरणाचा व्यापार
“अपहरण हा . . . मेक्सिको, कोलंबिया, हाँगकाँग आणि रशिया यांसारख्या ठिकाणी फोफावणारा व्यापार बनला आहे,” असे यु.एस. न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट म्हणते. “जगभरात, खंडणीसाठी अपहरण केले जाण्याच्या घटनांची संख्या गेल्या तीन वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी वाढतच होती.” आतापर्यंत, अपहरणाचे प्रमाण लॅटिन अमेरिकेत सर्वात जास्त आहे; तेथे १९९५ आणि १९९८ या सालांदरम्यान ६,७५५ अपहरणाची प्रकरणे झाली आहेत. यानंतर क्रमांक लागतो आशिया आणि दूरवरची पौर्वात्य राष्ट्रे (६१७), युरोप (२७१), आफ्रिका (२११), मध्यपूर्व (११८) आणि उत्तर अमेरिका (८०). बहुतेककरून स्थानीय उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्तींचे अपहरण होत असले तरीही कोणालाही अर्थात, मदतकार्य करणारे कार्यकर्ते, व्यापारासाठी प्रवास करणारे किंवा पर्यटक यांनाही धोका असू शकतो. हल्ली आंतरराष्ट्रीय कंपन्या, खंडणीच्या खर्चाची त्याचप्रमाणे पेशेवाईक मध्यस्थी करणाऱ्यांच्या आणि मानसशास्त्रीय सल्लागारांच्या खर्चाचीही भरपाई करण्यासाठी अपहरण किंवा खंडणी विमा योजना विकत घेतात. अपहरणकर्त्यांकडे सगळी माहिती असते; खरेदीविक्रीचा ते अभ्यास करतात आणि एखाद्या व्यक्तीचे अपहरण करण्यामध्ये किती धोका आहे या सर्व गोष्टी पडताळून पाहतात. ते सहसा आपल्या अपहृतांना चांगली वागणूक देतात; यामुळे, पळून जाण्याची शक्यता कमी होते आणि त्यांचा फायदा होईल हे त्यांना ठाऊक असते. “जगभरात अपहरण केलेल्यांमध्ये १० पैकी केवळ एका व्यक्तीचा मृत्यू होतो,” असे एक पत्रिका म्हणते; पण हा इशारासुद्धा देते की, “स्थानिक पोलिसांशी जरा जपून राहा. सहसा अपहरणकर्त्यांसोबत ते मिळालेले असतात.”
टमाटे विरुद्ध कर्करोग
कर्करोग संशोधनाच्या अमेरिकन संघटनेने सादर केलेल्या अलीकडील अभ्यासातून असे कळते की, टमाट्यामध्ये असा एक पदार्थ असू शकतो ज्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरची (शुक्राशय पिंडाचा कर्करोग) वाढ खुंटते. टमाट्यांना लाल रंग देणाऱ्या लायकोपीन या पदार्थामुळे शुक्राशय पिंडातील कर्कजन्य अर्बुदांचा आकार कमी होतो आणि मेटास्टेसिस अर्थात शरीरातल्या इतर ऊतकांमध्ये रोगाचा फैलाव रोखला जातो. यु.एस. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटद्वारे प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात “असे प्रकट झाले की, टमाटा आणि त्याच्यापासून बनवलेल्या सर्व पदार्थांचा फक्त प्रोस्टेट कॅन्सरवरच नव्हे तर स्वादुपिंड, फुफ्फुस आणि बृहदांत्र (मोठ्या आंतड्याचा शेवटचा भाग) यांच्या कर्करोगावरही फायदेकारक परिणाम होतो.”
आईची किंमत
कुटुंबातली आई एका वर्षात करत असलेल्या वेगवेगळ्या कामांचा पगार पाहिला तर तिच्या कामांचे किती मोल ठरेल? द वॉशिंग्टन पोस्ट यात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार तिला वर्षाला ५०८,७०० डॉलर्स मिळायला हवेत! हा आंकडा त्या सर्व कामांच्या कमीत कमी पगाराच्या अभ्यासानुसार दिलेला आहे जी एक आई करते. त्या अहवालात, पुढील १७ निवडक कामे त्याचप्रमाणे त्यांचा सरासरी वार्षिक पगार दिलेला आहे: बाळाची काळजी घेणारी, १३,००० डॉलर; बस चालक, ३२,००० डॉलर; मानसशास्त्रज्ञ, २९,००० डॉलर; प्राण्यांची देखभाल करणारी, १७,००० डॉलर; अधिकृत नर्स, ३५,००० डॉलर; मुख्य आचारी, ४०,००० डॉलर; आणि दफ्तरातील सर्वसामान्य कारकून, १९,००० डॉलर. हा अभ्यास घेणारे, आर्थिक सेवा कंपनीचे अध्यक्ष, रिक एडलमन यांच्या मते या आंकड्यांमध्ये सामाजिक सुरक्षा आणि इतर सेवानिवृत्तीचे फायदे सामील केलेले नाहीत.
बांबूचे झाड फुलताना धोका
उत्तरपूर्व भारतात दूरदूरपर्यंत पसरलेली बांबूची जंगले आहेत. मणिपूर आणि मिझोराम या राज्यांमध्ये बांबू फुलायला लागला की तिथल्या लोकांमध्ये भीती पसरू लागते. कारण या भागांतल्या विशिष्ट बांबूच्या जातीच्या झाडांना ५० वर्षांमध्ये एकदाच फुले येतात पण त्यामुळे उंदरे आकर्षित होतात. फुलांवर गुजराण करणाऱ्या उंदरांची प्रजोत्पत्ती भराभर वाढते; मग ही उंदरे इतपत पीकांचा फडशा पाडतात की दुष्काळ पडण्याची वेळ येते. द टाईम्स ऑफ इंडिया यातील अहवालानुसार, १९५४/५५ साली बांबूला फुले लागल्यावर १९५७ साली असाच दुष्काळ पडला होता. पुन्हा एकदा दुष्काळ पडू नये म्हणून मिझोरामच्या राज्य सरकारने उंदरे मारण्याची एक मोहीम काढली आहे. प्रत्येक उंदराच्या शेपटीसाठी एक रुपया देण्याचे त्यांनी घोषित केले आहे. एप्रिल १९९९ पर्यंत ९०,००० शेपट्या गोळा करण्यात आल्या होत्या. उंदरांविरुद्धची मोहीम चालू ठेवण्यासाठी आणखी पैशांची मागणी केली गेली आहे.