व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लामू—काळाच्या ओघात हरवलेले एक बेट

लामू—काळाच्या ओघात हरवलेले एक बेट

लामू—काळाच्या ओघात हरवलेले एक बेट

केनियामधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

खाऱ्‍या वाऱ्‍यावर फडफडणारे शीड लाकडी जहाजाला पुढे ढकलत होते. डोलकाठीवर चढलेला मनुष्य, हिंदी महासागराच्या पाण्यावर चकाकणाऱ्‍या प्रकाशात डोळे ताणून किनारा कोठे दिसतो का ते पाहत होता. खरे तर, त्या जहाजावरील सगळे नाविक एका खास बेटाच्या शोधात निघाले होते. त्या बेटाचे नाव आहे लामू. ही सा.यु. १५ व्या शतकातली गोष्ट आहे.

सोने, हस्तिदंत, मसाले, गुलाम या सगळ्यांची आफ्रिकेत काही कमी नव्हती. आफ्रिकेतील हे खजिने आणि प्रवासाची ओढ या कारणांमुळे अनेक साहसी लोक दूर देशांतून पूर्वेकडील या आफ्रिकन किनाऱ्‍यावर येत असत. हे नावाडी, खजिन्यांच्या शोधात समुद्रावरील तुफानांतूनही प्रवास करण्याचे धाडस करायचे. लहानशा लाकडी जहाजात खच्चाखच भरून हे सगळे दूरदूरच्या प्रवासाला निघत.

आफ्रिकेच्या पूर्वेकडील किनारपट्टीच्या मध्यावर लामू द्वीपसमूह होता; हा लहान बेटांचा एक समूह होता. हे ठिकाण, खलाशांकरता आणि त्यांच्या लहानशा जहाजांकरता एक सुरक्षित बंदर होते, जे प्रवालशिलांनी घेरलेले होते. येथे खलाशी अन्‍न-पाण्याचा साठा भरून घेत असत.

पंधराव्या शतकापर्यंत लामू बेटावर फार मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा; जणू ते याचे केंद्रस्थानच बनले होते. १६ व्या शतकात तेथे जाणाऱ्‍या पोर्तुगीज खलाशांना रेशमाच्या पगड्या आणि ढगळ कफ्तान घातलेले धनाढ्य व्यापारी आणि चिंचोळ्या रस्त्यांवरून अत्तर लावून हातापायांमध्ये सोन्याचे जाडजूड कडे घातलेल्या स्त्रिया दिसायच्या. बंदरामध्ये, डोलकाठीभोवती गुंडाळलेल्या शिडांची, मालाने खच्चाखच भरलेली जहाजे लावलेली असत; ही सगळी जहाजे हा माल घेऊन परदेशांत जायची. तसेच, जहाजांवर चढवले जाण्याच्या प्रतिक्षेत उभे असलेल्या गुलामांचे घोळके देखील तेथे नजरेस पडत.

अगदी सुरवातीला लामू बेटावर गेलेले युरोपियन शोधक तिथली स्वच्छता आणि वास्तुकला पाहून थक्क झाले होते. समुद्राच्या दिशेने दारे असलेली घरे प्रवाल खडकांनी बांधलेली होती; हे प्रवाल खडक तिथल्याच प्रवालशिलांतून फोडून आणलेली असत. घरांना वजनदार, बारीक नक्षीकाम केलेली लाकडी दारे होती; त्यांची घरेसुद्धा फार पद्धतशीरपणे रांगेत बांधलेली असत; त्यामुळे त्या चिंचोळ्या गल्लीतून येणारा समुद्राचा गार वारा तळपत्या उन्हापासून थंडावा देई.

श्रीमंत लोकांची घरे मोठी आणि ऐसपैस होती. त्यांच्या न्हाणीघरात जुन्या पद्धतीच्या नळांमधून स्वच्छ पाण्याचा पुरवठा केलेला असायचा. सांडपाण्याची व्यवस्था तर वाखाणण्याजोगी होती आणि विशेष म्हणजे त्या काळातल्या युरोपियन देशांमध्येसुद्धा त्यांच्याइतकी प्रगत सांडपाण्याची व्यवस्था नव्हती. खडकांमधून खोदलेल्या मोठमोठ्या वाहिन्या समुद्रापर्यंत गेलेल्या असायच्या आणि त्यातले सांडपाणी खोल खणलेल्या खड्ड्यांमध्ये जायचे; हे खड्डे स्वच्छ पाण्याच्या उगमांपासून फार दूरवर असायचे. घरांमध्ये स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणाऱ्‍या दगडी हौदांमध्ये लहान मासे असायचे आणि हे मासे डासांच्या डिंभांना फस्त करून डासांचे प्रमाण आटोक्यात ठेवायचे.

एकोणीसाव्या शतकापर्यंत लामूच्या बेटांवरून मोठ्या प्रमाणात व्यापार चालत होता. हस्तिदंत, तेल, बिया, प्राण्यांची चामडी, कासवांची कवचे, पाणघोड्यांचे दात आणि असंख्य गुलाम यांनी भरभरून जहाजे जायची. परंतु, हळूहळू लामूची सुसंपन्‍नता नाहीशी होऊ लागली. प्लेग, हिंसक जमातींचे दरोडे आणि गुलामांच्या व्यापारावरील बंदी या कारणांमुळे लामूला पूर्वीसारखे आर्थिक महत्त्व राहिले नाही.

गतकाळात प्रवेश

आज, लामूच्या बंदरात गेल्यावर इतिहासात गेल्यासारखे वाटते. निळ्याशार हिंदी महासागराचा थंडगार वारा एकसारखा वाहत असतो. हिरवट निळ्या लाटा चंदेरी किनाऱ्‍यावर येऊन विरत असतात. किनाऱ्‍याला रांगेने लावलेली जुन्या पद्धतीची लाकडी जहाजे पाण्यावर तरंगत असतात; त्यांची त्रिकोणी शिडे उडत्या फुलपाखरांसारखी भासतात. ही जहाजे मासे, फळे, नारळ, गाई, कोंबड्या आणि प्रवाशांनी भरलेली असतात.

धक्क्यावरती माडाची झाडे उष्ण हवेत हेलकावे खात असतात; त्यांच्या अर्धवट सावलीतच लोक जहाजांवरचे सामानसुमान उतरवत असतात. बाजारात गेल्यावर, सर्व विक्रेत्यांचा एकच गोंगाट चाललेला असतो. पण हे व्यापारी आधीप्रमाणे सोने, हस्तिदंत किंवा गुलाम विकत नाहीत तर केळी, नारळ, मासे आणि बुट्ट्या विकतात.

आंब्याच्या झाडाच्या थंडगार सावलीत बसून पुरुषमंडळी सुतळीचा दोर वळतात; या दोरांनी ते जहाजांच्या शिडांची दुरुस्ती करतात. तिथले रस्ते अजूनही चिंचोळेच आहेत आणि ते देखील लोकांनी गजबजलेले. लांब, ढगळ पांढरे झगे घातलेले व्यापारी दुकानातून गिऱ्‍हाईकांना त्यांच्या वस्तू पाहण्याचा आग्रह करत असतात. त्याच गर्दीत, धान्याच्या पोत्यांनी भरलेली गाडी ओढणारे गाढव लोकांमधून वाट काढत पुढे सरकत चाललेले दिसते. लामू बेटावर मोटारगाड्यांची सोय नसल्याने तेथील लोक सगळीकडे पायीच जातात. बेटावर येण्यासाठी बोटीने प्रवास हाच एक पर्याय आहे.

ऐन दुपारी सूर्य डोक्यावर येतो तेव्हा जणू काळ तेथेच थांबलाय असे वाटते. त्या तळपत्या उन्हात बाहेर निघण्याचे कोणी धाडस करत नाही; गाढवेसुद्धा एकाच ठिकाणी डोळे घट्ट मिटून ऊन उतरण्याची वाट पाहत थांबलेली दिसतात.

सूर्य खाली उतरू लागतो आणि तापमान कमी होऊ लागते तेव्हा सामसूम झालेले बेट पुन्हा एकदा जागे होते. व्यापारी आपल्या दुकानांची वजनदार, नक्षीकाम केलेली दारे उघडून व्यापार सुरू करतात आणि हा व्यापार रात्री उशिरापर्यंत चालू राहतो. स्त्रिया आपल्या मुलांना न्हाऊ घालतात आणि खोबऱ्‍याच्या तेलाने चांगले मालिश करतात. नारळाच्या पानांनी विणलेल्या चटईंवर बसून स्त्रिया स्वयंपाकालाही सुरवात करतात. येथे आजही स्वयंपाक चुलीवरच केला जातो; मसालेदार मच्छी आणि नारळ-भात असे स्वादिष्ट जेवण तयार होत असते. तिथले लोक फार प्रेमळ, आदरातिथ्य करणारे आणि मनमिळाऊ आहेत.

लामू बेटाची आता आधीसारखी संपन्‍नता राहिली नाही तरीही २० व्या शतकाआधीची पारंपरिक आफ्रिकन संस्कृती जशीच्या तशी टिकून राहिली आहे. उष्णकटिबंधातल्या उबदार वातावरणात, तिथले जीवन शतकानुशतकांपासून चालत आल्याप्रमाणे आजही चालू आहे. येथे आपल्याला भूतकाळ आणि वर्तमान काळ यांचे एकसाथ दर्शन घडते. खरेच, लामू बेट म्हणजे, गत इतिहासातली एक आगळीवेगळी स्मृती आहे—काळाच्या ओघात हरवलेले बेट!

[१८, १९ पानांवरील चौकट/चित्रे]

लामू बेटाला आमची भेट

अलीकडेच आम्ही लामू बेटाला भेट दिली होती; व्यापाराच्या उद्देशाने किंवा काही खरेदी करायच्या उद्देशाने नव्हे तर तिथल्या यहोवाच्या साक्षीदारांना अर्थात आमच्या ख्रिस्ती बांधवांना भेटायला आम्ही गेलो होतो. उंचसखल केनियाच्या किनारपट्टीवरून आमचे विमान उत्तर दिशेकडे निघाले. खाली पाहिल्यावर, उष्णकटिबंधातली हिरवीगार जंगले, त्याभोवती चंदेरी वाळूची किनार आणि त्या किनाऱ्‍यावर खेळणाऱ्‍या लाटा असे दृश्‍य दिसत होते. तेवढ्यात आम्हाला लामू द्वीपसमूह दिसला; निळ्याशार समुद्रात चमकणाऱ्‍या रत्नांसारखा तो दिसत होता. एका मोठ्या आफ्रिकन घारीप्रमाणे, आम्ही बेटावर घिरट्या मारत खाली सरर्कन येऊन एका लहानशा धावपट्टीवर उतरलो. विमानातून उतरून आम्ही किनाऱ्‍यापर्यंत चालत गेलो आणि लामूला जाण्यासाठी एका लाकडी नावेत बसलो.

सगळीकडे छान ऊन पसरले होते आणि समुद्राचा वारा उबदार आणि तजेला देणारा होता. आम्ही बेटाजवळ येऊ लागलो तसे धक्क्यावरची लोकांची वर्दळ आमच्या नजरेस पडली. दणकट पुरुष, नावेतील ओझे पाठीवरून वाहून नेत होते तर स्त्रिया आपले सामानसुमान डोक्यावर ठेवून चालल्या होत्या. आमचे सामान उचलून आम्ही गर्दीतून वाट काढत एका माडाच्या झाडाच्या सावलीत येऊन उभे राहिलो. काही मिनिटांतच आमच्या ख्रिस्ती बांधवांनी आम्हाला शोधून काढले. त्यांनी धावतच येऊन आमचे स्वागत केले. आम्हाला पाहून ते फारच खूष होते.

दुसऱ्‍या दिवशी आम्ही भल्या पहाटेच उठलो, कारण आम्हाला समुद्रकिनाऱ्‍याजवळच्या बांधवांना जाऊन भेटायचे होते. मंडळीच्या सभांना जाण्यासाठी दोन-चार तासांचा लांबचा प्रवास करायचा होता. आम्ही सगळ्या तयारीनिशी निघालो होतो; पिण्याचे पाणी, मोठ्या टोप्या आणि आरामदायी बूट अशा सर्व वस्तुंनी आम्ही सुसज्ज होतो. मेनलँडवर सभा भरवल्या जायच्या म्हणून आम्ही बोटीने मेनलँडकडे निघालो; त्या वेळी, सूर्योदयाचे विलोभनीय दृश्‍य आम्ही पाहिले.

प्रवासात बांधवांनी बोटीतल्या इतरांना साक्ष द्यायला सुरवात केली; त्यामुळे आम्हाला बायबलबद्दल लोकांशी छान चर्चा करता आली आणि आम्ही पुष्कळ मासिकेसुद्धा दिली. बोटीतून आम्ही उतरलो तेव्हा रस्त्यावर एक चिटपाखरू नव्हते; उष्णता इतकी होती की अक्षरशः झळा लागत होत्या आणि कच्चा रस्ता असल्याने धूळसुद्धा खूप होती. आम्ही जंगलातून पायी निघालो. तेव्हा बांधवांनी आम्हाला सावध राहायला सांगितले; कारण म्हणे तेथे कोणत्याही क्षणी रानटी जनावर समोर येऊ शकते, काही वेळा तर जंगली हत्ती देखील रस्ता ओलांडताना दिसतात. तरीदेखील, सगळे बांधव आनंदाने, हसत-खेळत चालले होते.

थोड्या वेळातच आम्ही एक लहानशा गावात पोचलो. तिथे आमचे इतरही बांधव आम्हाला भेटले; तेसुद्धा फार दूरदूरहून पायी आले होते. बांधवांना इतक्या दूरहून यावे लागते म्हणून एकाच दिवशी चार सभा चालवल्या जातात.

एका ओबडधोबड दगडी शाळेच्या लहान इमारतीत सभा भरवल्या जात होत्या; त्या खोलीची दारं-खिडक्याही धड नीट नव्हत्या. एका वर्गात आम्ही १५ जण लहान लहान बाकांवर बसून सभांचा आनंद घेतला; त्यातून बरेच प्रोत्साहन मिळाले आणि खूप काही शिकायलाही मिळाले. त्या खोलीला पत्र्याचे छत होते आणि म्हणून इतके उकडत होते की काही विचारायची सोय नाही; तरीसुद्धा कोणालाही त्याची पर्वा नव्हती. सगळ्यांना एकत्र आल्याचाच जास्त आनंद झाला होता. चार तासांची सभा संपल्यानंतर आम्ही सर्वांचा निरोप घेतला आणि सगळेजण आपापल्या घरी गेले. आम्ही लामूला परतलो तेव्हा क्षितिजावर मावळणाऱ्‍या सूर्याची सोनेरी किरणे आकाशात पसरली होती.

त्या सायंकाळी, रात्रीच्या थंड हवेत आम्ही लामू बेटावर राहणाऱ्‍या साक्षीदारांच्या कुटुंबासोबत मिळून साध्यासुध्या जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतरचे काही दिवस आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत तिथल्या चिंचोळ्या रस्त्यांवर प्रचार करून बायबलमधील सत्यासाठी आसुसलेल्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न केला. या बेटावरील बांधवांची संख्या तशी बोटावर मोजण्याइतकीच आहे, पण त्यांचा आवेश आणि साहस मात्र अवर्णनीय आहे.

शेवटी, निरोप घेण्याचा दिवस उजाडला. बांधव आमच्यासोबत धक्क्यापर्यंत आले; त्यांना सोडून येताना अंतःकरण भरून आले होते. आमच्या भेटीमुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले असे ते म्हणाले; पण खरे तर, त्यांच्यामुळे आम्हालाच कितीतरी प्रोत्साहन मिळाले होते. मेनलँडवर आल्यावर आम्ही पुन्हा आमच्या लहान विमानात बसलो. वर जाता जाता आम्ही लामूच्या सुंदर बेटाकडे पाहत होतो. तिथल्या बांधवांचा दृढ विश्‍वास, त्यांना सभांना येण्यासाठी करावा लागणारा दूरचा, खडतर प्रवास आणि सत्याबद्दल त्यांच्याठायी असणारा आवेश आणि प्रेम याची आम्हाला आठवण झाली. बऱ्‍याच काळाआधी स्तोत्र ९७:१ येथे ही भविष्यवाणी लिहून ठेवली होती: “परमेश्‍वर राज्य करितो; पृथ्वी उल्लास करो; द्वीपसमूह हर्ष करो.” (तिरपे वळण आमचे.) होय, लामूच्या दूरच्या बेटावरही लोकांना देवाच्या राज्यातील भावी आनंदमय परिस्थितीची अद्‌भुत आशा ऐकण्याची संधी दिली जात आहे.—सौजन्याने.

[१७ पानांवरील नकाशे/चित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

आफ्रिका

केनिया

लामू

[१७ पानांवरील चित्राचे श्रेय]

© Alice Garrard

[१८ पानांवरील चित्राचे श्रेय]

© Alice Garrard