ऊस महाकाय गवत
ऊस महाकाय गवत
ऑस्ट्रेलियामधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
साखर नसती तर आपण काय केले असते? जग चालूच शकले नसते, असे म्हटले तर कदाचित ती अतिशयोक्ती वाटेल. पण साखर नसली तर आहारामध्ये खरोखरच प्रचंड बदल होईल. होय, आज जगातल्या अनेक भागांमध्ये खाण्यापिण्यात साखरेचा दररोज वापर केला जातो. त्यामुळेच, सबंध जगभरात साखरेचे उत्पादन केले जाते.
क्यूबापासून भारतापर्यंत आणि ब्राझीलपासून आफ्रिकेपर्यंत ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड करून पीक काढले जाते. एके काळी तर, साखरेचे उत्पादन हा जगातला सर्वात मोठा आणि फायदेकारक उद्योग होता. ऊसाप्रमाणे इतर कोणत्याही वनस्पतीने जगात असा बदल घडवून आणलेला नाही.
या विलक्षण वनस्पतीविषयी तुम्हाला आणखी माहिती घ्यायला आवडेल का? मग आमच्याबरोबर ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलंड येथे चला; या ठिकाणी ऊसाची लागवड केली जाते. येथे ऊसाचे उत्पन्न फारसे होत नसले तरी शेती करण्याच्या आणि साखर उत्पन्न करण्याच्या परिणामकारक पद्धतींमुळे कच्च्या साखरेची निर्यात करण्यात संपूर्ण जगात आघाडीवर असलेल्या ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे.
ऊसाच्या देशाला एक भेट
हवामान उष्ण आणि दमट होते. सगळीकडे कडक ऊन पडले होते. गव्हाच्या कापणीसाठी वापरतात तशाच एका यंत्राच्या साहाय्याने ऊसाची कापणी करून त्याच्या लहान लहान कांड्या केल्या जात होत्या. या यंत्राच्या सोबत चाललेल्या ट्रेलरमध्ये या कांड्या गोळा केल्या जात होत्या. कापलेल्या कांड्यांमधून ऊसाचा रस येत असल्यामुळे हवेत गोड आणि कुबट वास दरवळत होता. साखरेच्या रूपात तुमच्यापर्यंत पोहंचण्यासाठी ऊसाच्या रसाच्या प्रवासाला सुरवात झाली होती.
काही वर्षांआधी येथे ऑस्ट्रेलियात ऊसाची कापणी हाताने केली जात होती. आजही अनेक देशांमध्ये अशाचप्रकारे कापणी केली जाते. हाताने कापणी करताना एका हाताने ऊसाच्या कांड्या एका बाजूला धरून दुसऱ्या हातातल्या कोयत्याने त्या अगदी जमिनीलगत सटासट तोडल्या जातात. घामाने डबडबलेले मजूर एका ओळीत पुढे सरकत असतात. सगळ्यांची हालचाल तालबद्ध असते. मग कापलेल्या कांड्यांचा ढीग जमवून कापणी करणारे पुढे जातात. पण जगभरात हे दृश्य आता बदलत आहे. कारण अधिकाधिक राष्ट्रांमध्ये यंत्रे वापरली जाऊ लागली आहेत.
ऑस्ट्रेलियात ऊसाची लागवड, खासकरून किनारपट्टीच्या २,१०० किलोमीटर लांबीच्या प्रदेशात केली जाते; हा प्रदेश प्रसिद्ध ग्रेट बॅरियर रीफच्या समांतर आहे. (जून ८, १९९१ च्या सावध राहा! (इंग्रजी) अंकातील “ग्रेट बॅरियर रीफचे दर्शन” हा लेख पाहा.) वर्षभर येथील वातावरण उष्ण आणि दमट असल्यामुळे ऊसाच्या पीकाला ते अनुकूल ठरते. येथे सुमारे ६,५०० शेतकरी आपल्या लहान लहान शेतांवर राहतात; त्यांची शेते द्राक्षाच्या वेलीवरील द्राक्षाच्या घडांसारखी किनारपट्टीवर विखुरलेली आहेत.
दूरचा प्रवास करून आल्यावर आम्हाला क्वीन्सलंडच्या मध्य किनारपट्टीवरील बंडाबर्ग हे शहर नजरेस पडते. या शहराला साखरेचे शहर म्हणतात. एका लहानशा डोंगरावरून खाली येत असताना एक विलोभनीय दृश्य आम्हाला दिसले; क्षितिजापर्यंत ऊसच ऊस पसरला आहे, तोही वेगवेगळ्या रंगात! काही भागांमधला ऊस नुकताच लावलेला होता तर काही भागांमध्ये तो कापणीला तयार झाला होता आणि काही भागांमध्ये पेरणी केली होती किंवा नुकतीच कापणी केली होती; त्यामुळे हिरवा, सोनेरी आणि अधूनमधून चॉकलेटी असा हा सगळा परिसर रंगीबेरंगी दिसत होता.
जुलै महिना सर्वात थंड महिना असतो. या वेळी कापणीला आणि रस काढण्याला सुरवात केली जाते. हा हंगाम डिसेंबरपर्यंत राहतो. जसजसे पीक तयार होते तसतसे त्याची कापणी करून रस काढला जातो. आता कापलेल्या ऊसाच्या कांड्यांचे काय करतात हे पाहायला आम्हाला साखर कारखान्यात जाण्याची उत्सुकता लागून होती. पण साखर कारखान्यात जाण्याआधी ऊसाविषयी आणखी माहिती घ्यावी असे आम्हाला सांगण्यात आले. म्हणून सर्वात आधी आम्ही त्या परिसरातल्या एका प्रयोगशाळेत गेलो. येथे वैज्ञानिक, ऊसाचे विविध प्रकार तयार करतात आणि ऊसाची शेती आणि त्याचे उत्पन्न यांच्यात सुधार करण्याच्या दृष्टीने संशोधन करतात.
ऊसाचा उगम आणि त्याची लागवड
या संशोधन केंद्रात आम्हाला ऊसाविषयी आणि त्याची वाढ कशी होते याविषयी एका कृषी-उत्पन्न तज्ज्ञाने माहिती दिली. ऊसाचे मूळ उगमस्थान आग्नेय आशिया आणि न्यू गिनी येथील पर्जन्यारण्यांमध्ये आहे. बगीच्यासाठी (लॉनसाठी) वापरले जाणारे गवत, कडधान्य आणि बांबू यांचा समावेश असलेल्या गवताच्या कुलातील ऊस हा सर्वात विशाल गवताचा प्रकार आहे. या सर्व वनस्पती, प्रकाशसंश्लेषणाद्वारे पानांमध्ये शर्करा तयार करतात. पण ऊसामध्ये ही शर्करा मोठ्या मात्रेत तयार होत असते आणि ती गोड रसाच्या रूपात ऊसाच्या तंतूमय देठांमध्ये साठवली जाते.
प्राचीन भारतात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असे. सा.यु.पू. ३२७ मध्ये थोर सिकंदरच्या सैन्याने भारतावर हल्ला चढवला तेव्हा त्या सैन्यामधील काही ग्रंथकारांनी अशी नोंद केलेली आढळते की, भारतातील रहिवाशी “एक प्रकारचे विलक्षण वेत खात असत, ज्यामधून मधमाशांच्या साहाय्याविना तयार होणारा मधासारखा पदार्थ निघत असे.” १५ व्या शतकात, वेगवेगळ्या प्रदेशांचा शोध केला जाऊ लागला आणि झपाट्याने विकास होऊ लागला तेव्हा ऊसाची लागवड वणव्यासारखी सगळीकडे पसरली. आज, ऊसाचे हजारो प्रकार आहेत आणि ८० पेक्षा अधिक राष्ट्रे ऊसाचे एकूण १००,००,००,००० टन उत्पन्न काढतात.
जगाच्या अनेक भागांमध्ये ऊसाची शेती करण्यासाठी मजुरीवर फार पैसा खर्च करावा लागतो. पक्व झालेल्या ऊसाच्या कांड्यांचे तुकडे करतात; प्रत्येक तुकडा ४० सेंटीमीटरचा असतो. मग १.५ मीटर अंतरावरील सऱ्यांमध्ये ह्या बेणे-कांड्या पेरल्या जातात. प्रत्येक बेणे-कांड्याला ८ ते १२ फुटवे येतात; हे फुटवे १२ ते १६ महिन्यांच्या कालावधीत पक्व होतात. पक्व ऊसाच्या शेतातून चालण्याचा अनुभव फार भीतीजनक असू शकतो. ऊसाच्या कांड्या आणि दाट पानांची उंची चार
मीटर इतकी असू शकते. पानांची सळसळ वाऱ्यामुळे, सापामुळे की उंदरामुळे होत आहे याचा काहीच पत्ता लागत नाही. उगाच जीव धोक्यात नको म्हणून ऊसाच्या शेतातून बाहेर आलेलेच बरे!ऊसावरील कीड आणि रोग यांच्यावर परिणामकारक औषध शोधण्यासाठी संशोधन चालू आहे. या क्षेत्रात पुष्कळसे यशही प्राप्त झाले आहे; पण अद्याप पूर्णतः यश मिळालेले नाही. उदाहरणार्थ, १९३५ साली, ऊसाचा नाश करणाऱ्या कीटकाचे निर्मूलन करण्यासाठी उत्तर क्वीन्सलंडमध्ये विशिष्ट प्रकारच्या हवायन बेडकांना सोडण्यात आले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, ऊसाला हानी पोचवणाऱ्या कीटकांचा फडशा पाडण्याऐवजी या बेडकांना दुसरेच खाद्य आवडू लागले. अशाने त्यांची जोमाने वाढ झाली आणि आता ईशान्य ऑस्ट्रेलियात हे बेडूकच अपायकारक बनले आहेत.
कापणीच्या आधी ऊस जाळतात?
रात्र झाल्यावर, एका शेतकऱ्याने ऊसाच्या उभ्या पीकाला आग लावली. आम्ही चकीत होऊन पाहतच राहिलो. काही सेकंदातच सगळ्या शेताने पेट घेतला. रात्रीच्या अंधारात आगीचे लोळ आकाशात झेपावत होते. या पद्धतीने, ऊसाची पाने आणि इतर अनावश्यक पालापाचोळा जाळूत टाकतात ज्यामुळे कापणी करताना किंवा नंतरच्या क्रियांमध्ये काही बाधा येत नाही. परंतु, अलीकडे ही पद्धत कमी करण्यात येत आहे. उभे पीक न जाळता केलेल्या कापणीला ऊसाची हिरवी कापणी म्हणतात. या पद्धतीमुळे ऊसाचे उत्पन्न वाढते शिवाय जमिनीवर पालापाचोळ्याचा एक थर राहतो आणि तेच खत म्हणून उपयोगी पडते. यामुळे जमिनीला एक सुरक्षित आवरण मिळते आणि जमिनीची धूप होत नाही तसेच तणवाढीला आळा बसतो.
जगातील बऱ्याच ठिकाणी ऊस हातानेच तोडला जातो, परंतु अधिकाधिक देशांमध्ये हल्ली यांत्रिक तोडणीची पद्धत रूढ होऊ लागली आहे. ऊसमळ्यातील ऊसाच्या उंच उंच कांड्यांची कापणी, वरच्या आणि कांड्यांवरील पानांची तोडणी तसेच कांड्यांचे तुकडे करत ही मोठमोठी यंत्रे पुढे सरकत जातात. मग हे पीक थेट कारखान्यात पाठवले जाते. हाताने प्रती दिवशी ५ टन ऊस तोडला जाऊ शकतो; पण यांत्रिक तोडणीने प्रती दिवशी ३०० टन पीकाची अगदी सहजासहजी कापणी केली जाऊ शकते. काही वर्षांपर्यंत एका लावलेल्या पिकापासून दोन तीन पिके एकापुढे एक घेतात. मग उत्पन्न कमी होऊ लागल्यावर पुन्हा नव्याने लागवड करतात.
ऊस तोडल्यावर पुढची क्रिया ताबडतोब करावी लागते कारण तोडलेल्या ऊसामधील शर्करेचे प्रमाण फार वेगाने घटत असते. कापणी केलेले पीक लवकरात लवकर कारखान्यात पाठवण्यासाठी क्वीन्सलंडमध्ये ४,१०० किलोमीटर अंतरापर्यंत छोट्या रूळमार्गी गाड्या केल्या आहेत. या रूळांवरून ऊसाची वाहतूक करणाऱ्या छोट्या गाड्या रंगीबेरंगी असतात; ऊसाने काठोकाठ भरलेले डबे खेचत या गाड्या गावांमधून जात असतात. नागमोडी वळणाने जाणाऱ्या या गाड्यांचा नजारा रम्य असतो.
कारखान्यात
साखर कारखान्याची सफर हा एक आगळावेगळा अनुभव आहे. आत गेल्या गेल्या सर्वात आधी ऊसाने भरलेल्या रूळमार्गी गाड्यांचे डब्बे एकामागोमाग उभे असलेले पाहायला मिळतात. मग मोठमोठ्या चरकांच्या साहाय्याने ऊसातून गोड रस काढला जातो. रस काढल्यानंतर राहिलेला चोथा किंवा चिपाड वाळवून कारखान्यात इंधनासाठी वापरले जाते. काही वेळा जास्त झालेले चिपाड कागद कारखान्यांना आणि बांधकाम साहित्य तयार करणाऱ्या कारखान्यांना विकले जाते.
त्यानंतर, रसामध्ये तरंगणारे किंवा विरघळलेले अनेक पदार्थ काढून रसाचे शुद्धीकरण केले जाते. हे अशुद्ध घटक खत करण्यासाठी वापरले जातात. आणखी एक महत्त्वाचा उपपदार्थ आहे मळी; मळीपासून गुरांचे खाद्य तयार केले जाते. किंवा रम आणि दारू बनवताना मळीचा उपयोग केला जातो. ऊसाचे विविध उपयोग आणि साखर कारखान्यातील या वेगवेगळ्या प्रक्रिया खरोखर विलक्षण आहेत.
त्यानंतर शुद्ध केलेला रस आटवून घट्ट केला जातो आणि त्यात साखरेचे बारीक स्फटिक रोवून ठेवले जातात. हे स्फटिक मग वाढून मोठे होतात. त्यानंतर त्यांना घट्ट द्रवातून काढून वाळवले जाते. ही अशुद्ध ब्राऊन शुगर (किंवा तपकिरी साखर) असते. त्यावर आणखी प्रक्रिया करून नंतर शुद्ध पांढरी साखर तयार करतात. याच पांढऱ्या साखरेचा आपण दररोज उपयोग करतो.
ऊसाच्या देशातून असा हा चित्तवेधक प्रवास केल्यावर आणि पुष्कळ माहिती मिळवल्यावर तुमच्या चहा आणि कॉफीचा गोडवा वाढला असेल. अर्थात, मधुमेह असला तर तुम्हाला साखर बंद करावी लागेल आणि दुसरा कोणतातरी पर्याय शोधावा लागेल.
ऊसाविषयी ही माहिती घेतल्यावर, ज्याने हे महाकाय गवत निर्माण केले आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ते उपलब्ध करून दिले आहे त्याच्या कौशल्याचे आणि हरहुन्नरीपणाचे कौतुक केल्याशिवाय राहवत नाही!
[२२ पानांवरील चौकट]
बीट की ऊस?
दोन मुख्य पीकांमधून साखरेचे उत्पन्न काढले जाते. ऊसाची लागवड मुख्यतः उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये केली जाते. जगातील जवळजवळ ६५ टक्के साखरेचे उत्पन्न या प्रदेशांमधूनच येते. उर्वरित ३५ टक्के साखर, एक प्रकारच्या बीटमधून काढली जाते; साखरेच्या बीटांची लागवड पूर्व तसेच पश्चिम युरोप आणि उत्तर अमेरिकासारख्या थंड हवामानाच्या ठिकाणी केली जाते. दोन्ही साखरेची रासायनिक घडण सारखीच आहे.
[२३ पानांवरील चित्र]
ऊसाची कापणी करणारे यंत्र. ट्रॅक्टरने ओढत असलेला ट्रेलर
[२३ पानांवरील चित्र]
कापणीआधी ऊसाचे उभे शेत जाळत असताना
[२१ पानांवरील चित्राचे श्रेय]
पृष्ठे २१-४ वरील सर्व चित्रे: Queensland Sugar Corporation