व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दृष्टीपलीकडील सृष्टीवर एक नजर

दृष्टीपलीकडील सृष्टीवर एक नजर

दृष्टीपलीकडील सृष्टीवर एक नजर

नवनवे शोध लागतात, तसतशा बऱ्‍याच गोष्टी ज्या आजवर अंधारात होत्या त्या अचानक प्रकाशात येतात. परिणाम? ज्या गोष्टींविषयी पूर्वी आपल्याला ज्ञान नव्हते, शंकाकुशंका होत्या त्या गोष्टींविषयी खात्रीलायक माहिती मिळते.—खाली दिलेली चौकट पाहा.

एकेकाळी लोकांचा असा समज होता की पृथ्वी ही विश्‍वाच्या मध्यभागी आहे. पण दुर्बिणींच्या उपयोगाने हे सिद्ध करण्यात आले की पृथ्वी व तिच्यासारखे इतर ग्रह खरे तर सूर्याभोवती आपापल्या कक्षेत परिभ्रमण करतात. अलीकडे अतिशय शक्‍तिशाली दुर्बिणींचा शोध लावण्यात आला आणि त्यांच्या साहाय्याने अणूचा अभ्यास करणे शक्य झाले. वेगवेगळ्या प्रकारचे अणू कशाप्रकारे जुळतात आणि त्यांपासून रेणू कसे तयार होतात याचे परीक्षण करणे शक्य झाले.

पाणी या जीवनावश्‍यक घटकाचा एक रेणू कसा तयार होतो याकडे लक्ष द्या. हायड्रोजनच्या दोन अणूंचा ऑक्सिजनच्या एका अणूसोबत विशिष्टप्रकारे संयोग होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो—पाण्याच्या प्रत्येक थेंबात कोट्यवधी रेणू असतात! पाण्याच्या एका रेणूचे परीक्षण केल्यास, आणि विविध परिस्थितीत पाण्याच्या गुणधर्मांचे परीक्षण केल्यास काय दिसून येते?

पाण्याचे अद्‌भुत गुणधर्म

पाण्याच्या एका थेंबाचा विचार केल्यास, त्याची रचना व गुणधर्म साधे व समजायला सोपे आहेत. पण मुळात, पाणी हा एक अत्यंत विलक्षण द्रवपदार्थ आहे. लंडनच्या इंम्पिरियल कॉलेजचे विज्ञान लेखक डॉ. जॉन एम्सली यांनी तर असे म्हटले की “सर्व रसायनांच्या तुलनेत पाण्याविषयी सर्वात जास्त प्रमाणात संशोधन करण्यात आले आहे पण तरीही या पदार्थाविषयी अतिशय कमी माहिती उपलब्ध आहे.” न्यू सायनटिस्ट नियतकालिकानुसार: “पाणी हे पृथ्वीवर आढळणारे सर्वसामान्य द्रव्य असूनही ते संशोधकांना सतत बुचकळ्यात पाडते.”

डॉ. एम्सली यांनी स्पष्टीकरण दिल्याप्रमाणे, पाण्याची रचना साधीसोपी असली तरीसुद्धा “त्याचे गुणधर्म अतिशय विलक्षण आहेत.” उदाहरणार्थ, “HO खरे तर वायूस्वरूपात असायला हवे . . . पण ते आहे द्रव्यरूपात. तसेच, पाणी गोठते तेव्हा . . . त्याचा बर्फ होतो, आणि खरे पाहता घनपदार्थ असल्यामुळे तो पाण्यात बुडायला हवा. पण बर्फ पाण्यावर तरंगतो.” पाण्याच्या या विचित्र स्वभावाविषयी अमेरिकन असोसिएशन फॉर दि ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे भूतपूर्व अध्यक्ष डॉ. पॉल ई. क्लॉपस्टेग यांनी असे म्हटले:

“पाण्याची ही विलक्षण रचना पाण्यात राहणाऱ्‍या जिवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. विचार करा, जर तळ्यातले किंवा नदीतले पाणी गोठल्यानंतर बर्फाच्या रूपात वरती तरंगले नसते तर? नदीतल्या सगळ्या पाण्याचा बर्फ झाला असता आणि पाण्यातले सगळे जीव गोठून मेले असते.” डॉ. क्लोप्टेग यांचे म्हणणे आहे की पाण्याचा हा विचित्र स्वभाव, “एका महान व विचारशील बुद्धिवंताने या विश्‍वाची रचना केल्याचा पुरावा आहे.”

न्यू सायन्टिस्ट नुसार संशोधकांचे असे म्हणणे आहे की पाण्याच्या विचित्र स्वभावामागचे कारण त्यांना उमगले आहे. गोठल्यानंतर पाण्याचे कशाप्रकारे प्रसरण होते हे अगदी बिनचूकपणे दाखवणारे पहिले मॉडेल संशोधकांनी तयार केले आहे. “पाण्याच्या व बर्फाच्या रेणूंतील ऑक्सिजन अणू एकमेकांपासून किती अंतरावर असतात यातच या कोड्याचे उत्तर आहे,” असे संशोधकांच्या लक्षात आले आहे.

हे अद्‌भुतच नाही का? अगदी साधासा दिसणारा पाण्याचा रेणू मनुष्यांच्या बुद्धीला आव्हान देतो हे निश्‍चितच अद्‌भुत म्हणावे लागेल. आणि आपल्या शरीराचा बहुतांश भाग याच पाण्यापासून बनला आहे, हे त्याहूनही अद्‌भुत! दोन मूलतत्त्वांच्या केवळ तीन अणूंपासून बनलेला पाण्याचा रेणू तुम्हालाही विलक्षण वाटत नाही का? “एका महान व विचारशील बुद्धिवंताने या विश्‍वाची रचना केल्याचा [हा] पुरावा आहे” असे तुम्हालाही वाटत नाही का? पाण्याचा रेणू तर केवळ एक लहानसे उदाहरण आहे; त्यापेक्षा कितीतरी मोठे आणि गुंतागुंतीचे रेणू अस्तित्वात आहेत.

गुंतागुंतीची रचना असलेले रेणू

काही रेणू पृथ्वीवर नैसर्गिक स्वरूपात आढळणाऱ्‍या ८८ मूलतत्त्वांपैकी कित्येक मूलतत्त्वांच्या हजारो अणूंपासून बनलेले असतात. उदाहरणार्थ, प्रत्येक सजीव वस्तूच्या आनुवंशिकतेची माहिती ज्यात असते त्या डीएनएच्या (डीऑक्सीरायबोन्युक्लीइक ॲसिडचे संक्षिप्त रूप) एका रेणूत कितीतरी मूलतत्त्वांचे लक्षावधी अणू असतात!

इतकी गुंतागुंतीची रचना असूनही डीएनए रेणूचा व्यास केवळ ०.०००००२५ मिलीमीटर इतकाच असतो. अतिशय शक्‍तिशाली मायक्रोस्कोपच्या साहाय्यानेच केवळ हा रेणू पाहता येतो. या डीएनए रेणूतच एका व्यक्‍तीचे आनुवंशिक गुण दडलेले असतात हे वैज्ञानिकांनी १९४४ साली शोधून काढले. हा शोध लागल्यापासून या विलक्षण डीएनए रेणूविषयी अतिशय मोठ्या प्रमाणात संशोधन केले जाऊ लागले.

डीएनए व पाणी ही केवळ दोन उदाहरणे आहेत. यांसारख्या कित्येक प्रकारच्या रेणूंपासूनच वेगवेगळ्या वस्तू बनतात. सजीव आणि निर्जीव या दोन्ही वस्तू रेणूंपासून तयार होत असल्यामुळे या वस्तूंत फार थोडा फरक असतो असा निष्कर्ष काढता येईल का?

बऱ्‍याच काळापर्यंत अनेक लोकांचा असा समज होता. मायक्रोबायोलॉजिस्ट मायकल डेन्टन यांनी सांगितले की “१९२० आणि १९३० च्या दशकांत बऱ्‍याच मान्यवरांना अशी आशा होती की जीवरसायनशास्त्राच्या अभ्यासात अधिक प्रगती झाल्यावर सजीव व निर्जीव यांतील फरक मिटवला जाईल. काहींनी तर आपले हे मत स्पष्टपणे व्यक्‍तही केले.” पण काळाच्या ओघात काय सिद्ध झाले?

जीवन इतके सर्वसामान्य नाही

सजीव व निर्जीव यांतील मधले टप्पे कोणते हे शोधून काढणे लवकरच शक्य होईल असे शास्त्रज्ञांना वाटत होते. पण डेन्टन नावाच्या एका शास्त्रज्ञाने स्पष्ट सांगितले की, “१९५० च्या दशकातील सुरवातीच्या वर्षांत मॉलिक्युलर बायलॉजीच्या क्षेत्रात जे अभूतपूर्व शोध लागले त्यानंतर हे सिद्ध झाले की निर्जीव व सजीव वस्तूंतील फरक फार मोठा असून तो भरून काढणे शक्य नाही.” आज शास्त्रज्ञांना एका वस्तूस्थितीची जाणीव झाली आहे. डेन्टन यांच्या शब्दांत:

“निर्जीव व सजीव सृष्टींत एक मोठा दरा आहे हे आम्हाला कळून चुकले आहे. निसर्गात वारंवार आढळणारा पण गोंधळून टाकणारा हा फरक आहे. निर्जीव वस्तूंतील सर्वात जटिल रचना क्रिस्टल किंवा हिमकणाची असते. पण एका हिमकणाची एका जिवंत पेशीसोबत तुलना केल्यास या दोन वस्तूंतला फरक इतका मोठा आहे की आपण चक्रावून जातो.”

याचा अर्थ एक रेणू तयार करणे सोपे आहे का? नाही. मॉलीक्यूल्स टू लिव्हिंग सेल्स या पुस्तकात सांगितल्यानुसार “फार जटिल नसणाऱ्‍या, साध्या प्रकारच्या मॉलिक्यूल्सची रचना तयार करणे अतिशय गुंतागुंतीचे काम आहे. पण पहिली जिवंत पेशी निर्माण करण्याआधीचे टप्पे याहीपेक्षा कितीतरी पटीने जास्त जटिल असावेत. त्यामानाने हे अगदीच सोपे वाटते.”

जिवंत पेशी कधी स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात, उदाहरणार्थ बॅक्टिरिया. तर कधी एकाच प्राण्यात हजारो पेशी कार्य करत असतात, जसे की मानवाचे शरीर. पूर्णविरामाइतका बिंदू तयार करण्यासाठी देखील सामान्य आकाराच्या जवळजवळ ५०० पेशी लागतील. तेव्हा पेशींचे कार्य व गुणधर्म शक्‍तिशाली मायक्रोस्कोप्सच्या मदतीशिवाय पाहण्याची कल्पना करताच येत नाही. मानवी शरीरातील एका पेशीचा मायक्रोस्कोपखाली अभ्यास केल्यास काय दिसून येते?

पहिली जिवंत पेशी कोठून आली?

जिवंत पेशींचा अभ्यास करणारा थक्क झाल्याशिवाय राहात नाही. एका विज्ञान लेखकाने असे म्हटले: “सर्वात साध्या जिवंत पेशीच्या सामान्य वाढीसाठी देखील हजारो रासायनिक प्रक्रिया अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने व्हाव्या लागतात.” ते पुढे म्हणतात: “एका लहानशा पेशीत २०,००० प्रक्रिया एकाच वेळी कशा नियंत्रित केल्या जात असतील?”

मायकल डेन्टन यांनी सर्वात सूक्ष्म जिवंत पेशीला “अगदी सूक्ष्म अशी फॅक्टरी म्हटले आहे. यात गुंतागुंतीची रचना असलेली हजारो सूक्ष्म मॉलीक्यूलर यंत्रे आहेत. आणि ही यंत्रे अब्जावधी अणूंपासून बनलेली आहेत. मनुष्याने आजवर तयार केलेल्या कोणत्याही यंत्रापेक्षा अधिक गुंतागुंतीची रचना एका जिवंत पेशीत पाहायला मिळते. निर्जीव वस्तूंपैकी कशाचीही तुलना जिवंत पेशीशी करता येत नाही.”

जिवंत पेशीच्या जटिलतेबद्दल वैज्ञानिक आजही कोड्यातच आहेत. द न्यू यॉर्क टाईम्स च्या फेब्रुवारी १५, २००० अंकात असे म्हटले होते: “जिवंत पेशींविषयी जीवशास्त्रज्ञांना जितकी जास्त माहिती मिळते, तितकेच त्यांच्या क्रिया समजून घेणे त्यांना जास्त कठीण जाते. सामान्य मानवी पेशी अतिशय सूक्ष्म असते. डोळ्यांनी ती पाहणे शक्य नाही. पण प्रत्येक क्षणी या पेशीतील ३०,००० ते १,००,००० जनुके कार्य करत असतात. पेशीचे संदेश इतर पेशींपर्यंत पोचवत असतात किंवा इतर पेशींच्या संदेशांना प्रतिसाद देत असतात.”

टाईम्स पत्रिकेने असा प्रश्‍न केला: “इतक्या सूक्ष्म आणि जटिल यंत्राचे कार्य समजून घेणे कसे शक्य आहे? आणि अथक प्रयत्नांनंतर मानवी पेशीबद्दल सर्व माहिती प्राप्त झालीच, तरीसुद्धा मानवी शरीरात काही एकाच प्रकारची नव्हे तर कमीतकमी २०० वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत.”

नेचर पत्रिकेत “सृष्टीतील खऱ्‍या एन्जिन्स” या शीर्षकाखालील लेखात असे म्हटले आहे, की शरीरातील प्रत्येक पेशीच्या आत अतिशय लहान मोटारीसारखे यंत्र असल्याचे आढळले आहे. या यंत्रांच्या क्रियेमुळे ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट तयार होते. या रसायनाच्या साहाय्यानेच पेशींतील सर्व क्रिया घडतात. एका शास्त्रज्ञाने म्हटले: “पेशींत असलेल्या या मॉलिक्यूल्सच्या यंत्रांसारखी यंत्रे तयार करण्यात आपल्याला यश आल्यास ती सर्वात मोठी सफलता ठरेल.”

मानवी शरीरातील पेशीच्या उत्पादन क्षमतेचा विचार करा! आपल्या शरीरातील केवळ एका पेशीत असलेल्या डीएनएमध्ये या मासिकाच्या आकाराचे जवळजवळ दहा लाख पानांचे पुस्तक लिहिता येईल इतकी माहिती असते. विशेष म्हणजे, एका पेशीपासून जेव्हा एक नवीन पेशी तयार होते, तेव्हा ही सगळी माहिती त्या नव्या पेशीत देखील येते. आपल्या शरीरातील शंभर दशलक्ष-दशलक्ष पेशींतील प्रत्येक पेशीत ही माहिती कोठून आली? हे आपोआप घडले असावे का? की एका बुद्धिमान रचनाकाराने त्यांची रचना केली?

रस्सल चार्ल्स आर्टिस्ट यांच्यासारख्याच निष्कर्षावर तुम्ही देखील आला आहात का? त्यांनी म्हटले: “[पेशींची] सुरवात आणि त्यांचे कार्य समजून घेणे अतिशय कठीण, कधीकधी अशक्यप्राय वाटते. याचे फक्‍त एकच तर्कशुद्ध उत्तर असू शकते आणि ते म्हणजे या पेशींच्या रचनेमागे एक बुद्धिमान व्यक्‍ती आहे व त्यानेच त्यांना अस्तित्वात आणले हे सिद्ध करणे.”

अद्‌भुत सुसंगती

कित्येक वर्षांपूर्वी, हारवर्ड युनिव्हर्सिटीचे जियॉलॉजीचे प्राध्यापक कट्‌र्ली एफ. मेथर यांनी हा निष्कर्ष काढला: “सृष्टीतील सर्व गोष्टींत संयोगशील किंवा लहरीपणाची चिन्हे नव्हेत, तर कायदा व सुव्यवस्था दिसून येते. निसर्गातील कायदा व सुव्यवस्था अतिशय अचूक आहे. त्याबद्दल विचार केल्यास मनात एकप्रकारचा आदर निर्माण होतो. निसर्गातील सर्व मूलद्रव्यांत अतिशय अद्‌भुत एकसूत्रीपणा असल्यामुळेच प्रत्येक मूलतत्त्वाची ॲटॉमिक संख्या निश्‍चित करणे शास्त्रज्ञांना शक्य झाले आहे.”

‘निसर्गातील या अद्‌भुत एकसूत्रीपणाविषयी’ थोडक्यात पाहूया. अगदी सुरवातीला सोने, चांदी, तांबे, टिन आणि लोखंड याच मूलतत्त्वांची * माहिती होती. आर्सेनिक, बिस्मथ, आणि ॲन्टिमनी या मूलतत्त्वांचा शोध मध्ययुगांत लागला आणि १७०० शतकात आणखी कितीतरी मूलतत्त्वे सापडली. १८६३ साली स्पेक्ट्रोस्कोप नावाच्या यंत्राच्या साहाय्याने, प्रत्येक मूलतत्त्वाच्या रंगाच्या आधारावर, ६३ व्या मूलतत्त्वाचा शोध लावण्यात आला.

त्यावेळीच रशियन रसायनशास्त्रज्ञ डमिट्री इव्हानोव्हिच मेन्देलियेव यांनी असा निष्कर्ष काढला होता की ही मूलतत्त्वे ठराविक व्यवस्थेशिवाय निर्माण करण्यात आलेली नाही. शेवटी, मार्च १८, १८६९ रोजी त्यांचा “मूलतत्त्वांच्या व्यवस्थेची रूपरेषा” या शीर्षकाखालील एक निबंध रशियन केमिकल सोसायटीला वाचून दाखवण्यात आला. यात त्यांनी असे म्हटले: ‘मला मूलतत्त्वांची निश्‍चित आणि अचूक अशी प्रणाली तयार करण्याची इच्छा आहे, पण निव्वळ अनुमानाच्या नव्हे तर निश्‍चित तत्त्वाच्या आधारावर.’

या प्रसिद्ध निबंधात मेन्देलियेव यांनी असे भाकीत केले होते: “अद्याप अज्ञात असलेल्या आणखी अनेक मूलभूत पदार्थांचा शोध लागण्याची आपण अपेक्षा करू शकतो; उदाहरणार्थ, ॲल्युमिनियम व सिलिकॉनशी मिळतीजुळती, ६५ ते ७५ ॲटॉमिक वजन असलेली मूलतत्त्वे.” मेन्देलियेव यांनी १६ नवीन मूलतत्त्वांसाठी रिकाम्या जागा ठेवल्या. कशाच्या आधारावर हे भाकीत करत आहात असे विचारले असता त्यांनी म्हटले: “मला पुरावा दाखवण्याची गरज नाही. निसर्गातील नियमांना व्याकरणातील नियमांप्रमाणे अपवाद नसतात.” पुढे त्यांनी म्हटले: “या अज्ञात मूलतत्त्वांचा शोध लागल्यावर लोक आमचे ऐकू लागतील असे वाटते.”

आणि अगदी असेच घडले! एन्सायक्लोपिडिया अमेरिकाना यात सांगितल्यानुसार, “पुढच्या १५ वर्षांत मेन्देलियेव यांनी भाकीत केलेल्या मूलतत्त्वांच्या गुणधर्मांशी अगदी मिळतेजुळते गुणधर्म असलेल्या गॅलियम, स्कॅन्डियम आणि जर्मेनियम या मूलतत्त्वांचा शोध लागला. यामुळे मूलतत्त्वांचा तक्‍ता म्हणजेच पिरियॉडिक टेबल शास्त्रशुद्ध आहे हे सिद्ध झाले आणि मेन्देलियेव यांना देखील खूप प्रसिद्धी मिळाली.” २० व्या शतकाच्या सुरवातीपर्यंत पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्व मूलतत्त्वांचा शोध लागला होता.

रसायनशास्त्राचे संशोधक एल्मर डब्ल्यू. मॉरर यांनी म्हटल्याप्रमाणेच, “ही सुरेख सुसंगती निव्वळ योगायोग आहे असे म्हणताच येणार नाही.” रसायनशास्त्राचे प्राध्यापक जॉन क्लीव्हलँड कॉथरन यांनी म्हटले: “मेन्देलियेव यांनी भाकीत केल्याप्रमाणेच सर्व मूलतत्त्वांचा शोध लागणे आणि या नव्या मूलतत्त्वांचे गुणधर्म मेन्देलियेव यांनी भाकीत केल्याप्रमाणेच असणे हे अतिशय आश्‍चर्यजनक आहे. मूलतत्त्वांतील सुसंगती केवळ एक योगायोग आहे अशी शक्यता यामुळे कायमची खोडून टाकण्यात आली आहे. म्हणूनच मेन्देलियेव यांच्या अभ्यासाला ‘द पिरियॉडिक चान्स’ म्हणजे योगायोग नव्हे तर ‘द पिरियॉडिक लॉ’ म्हणजेच नियम असे नाव पडले आहे.’”

मूलतत्त्वांचा आणि विश्‍वातील सर्व वस्तू या मूलतत्त्वांपासून कशा तयार झाल्या आहेत याचा सखोल अभ्यास केल्यानंतर केंब्रिज युनिव्हर्सिटीत पूर्वी गणिताचे प्राध्यापक असलेले पी.ए.एम. डायरक यांनी असे म्हटले: “शेवटी असे म्हणावे लागते की देव हा अतिशय उच्च प्रतीचा गणिततज्ज्ञ आहे. या विश्‍वाची निर्मिती करताना त्याने अतिशय प्रगत गणितशास्त्राचा उपयोग केला.”

खरोखर, दृष्टीपलीकडील सृष्टीचा वेध घेणे अतिशय रोमांचक आहे. अतिसूक्ष्म अणू, रेणू, जिवंत पेशी आणि अतिप्रचंड ताऱ्‍यांच्या आकाशगंगा डोळ्यांनी पाहणे अशक्य आहे! या सर्व गोष्टींचा आपण जितक्या खोलात जाऊन अभ्यास करतो तितकीच ही जाणीव होऊ लागते की सबंध विश्‍वात मनुष्याचे स्थान किती लहान आहे. तुम्हाला या दृष्टीपलीकडील सृष्टीकडे पाहिल्यावर कसे वाटते? तुम्ही स्वतः कोणत्या निष्कर्षापर्यंत पोचला आहात? निव्वळ डोळ्यांना दिसते, त्याहीपलीकडे तुम्ही पाहू शकता का?

[तळटीप]

^ एकाच प्रकारचे अणू असलेले मूळ पदार्थ. याप्रकारची केवळ ८८ मूलतत्त्वे नैसर्गिक स्वरूपात पृथ्वीवर आढळतात.

[५ पानांवरील चौकट/चित्रे]

डोळ्यांनी दिसणार नाही इतके वेगवान

घोडा किती वेगवान असतो हे सर्वज्ञात आहे. अतिशय वेगाने धावत असताना, एका विशिष्ट क्षणी घोड्याचा एकही पाय जमिनीवर नाही असे होत असेल का? १९ व्या शतकात या विषयावर बराच वाद सुरू होता. एडवर्ड मायब्रिज यांनी छायाचित्रांच्या आधारावर हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. शेवटी १८७२ साली त्यांना यश आले. अतिशय वेगवान क्रियेचे चित्रीकरण करण्याचे तंत्र त्यांनी शोधून काढले.

मायब्रिज यांनी थोड्या थोड्या अंतरावर २४ कॅमेरे ठेवले. प्रत्येक कॅमेऱ्‍याच्या शटरमधून एक बारीक दोरी ट्रॅकवर टाकण्यात आली. धावताना घोड्याचा पाय दोरीला लागेल आणि कॅमेऱ्‍याच्या शटरची उघडबंद होऊन चित्र घेतले जाईल अशी व्यवस्था करण्यात आली. या प्रयोगांतून जी चित्रे घेण्यात आली त्यांवरून असे दिसून आले की खरोखर एका विशिष्ट क्षणी घोड्याचे चारही पाय हवेत असतात.

[चित्राचे श्रेय]

Courtesy George Eastman House

[७ पानांवरील चित्र]

बर्फ पाण्यावर तरंगतो, बुडत का नाही?

[७ पानांवरील चित्र]

डीएनए रेणूचा व्यास केवळ ०.०००००२५ मिलीमीटर इतकाच असतो पण दहा लाख पानांचे पुस्तक लिहिता येईल इतकी माहिती त्यात असते

[चित्राचे श्रेय]

डीएनएचे कंप्युटराईज्ड मॉडल: Donald Struthers/Tony Stone Images

[८ पानांवरील चित्र]

शरीरात एकूण १०० दशलक्ष-दशलक्ष पेशी असतात आणि यांतील प्रत्येक पेशीत हजारो रासायनिक प्रक्रिया सूत्रबद्ध पद्धतीने होत असतात

[चित्राचे श्रेय]

Copyright Dennis Kunkel, University of Hawaii

[९ पानांवरील चित्रे]

मेन्देलियेव या रशियन रसायन शास्त्रज्ञाने केव्हाच असा निष्कर्ष काढला होता, की मूलतत्त्वे योगायोगाने निर्माण झाली नाहीत

[चित्राचे श्रेय]

Courtesy National Library of Medicine