किरणोत्सारी अवपात काळजीची बाब
किरणोत्सारी अवपात काळजीची बाब
एकोणीसशे पन्नासच्या दशकात झालेल्या अण्वस्त्र चाचण्यांनंतर, आण्विक क्रियांदरम्यान तयार होणाऱ्या स्ट्रॉन्टियम ९० (एसआर९०) या उपपदार्थाचे अंश लहान मुलांच्या दातांत आढळले असे वृत्त ग्लोब ॲन्ड मेल या दैनिकात प्रसिद्ध करण्यात आले. यामुळे मुलांमध्ये कर्करोगाचे अचानक प्रमाण वाढले असे त्या वेळी म्हटले गेले.
आता कित्येक दशके उलटल्यानंतर यु.एस. रेडिएशन ॲण्ड पब्लिक हेल्थ प्रोजेक्ट या प्रकल्पाशी संलग्न असलेले वैज्ञानिक पुन्हा चिंतेत बुडाले आहेत. या प्रकल्पावर काम करणाऱ्या डॉ. जॅनेट शेरमन या विशेषज्ञा असे सांगतात की “१९९० सालापासून जन्मलेल्या मुलांच्या दातांत, १९५० च्या दशकात झालेल्या जमिनीवरील आण्विक चाचण्यांनंतर आढळले होते, जवळजवळ तितक्याच प्रमाणात एसआर९० आढळते.”
हे एसआर९० पुन्हा कशामुळे आढळले? काही वैज्ञानिकांच्या मते हे गतकाळातील आण्विक दुर्घटनांमुळे, सुस्थितीत असलेल्या आण्विक केंद्रांतून होणाऱ्या किरणोत्सर्जनामुळे किंवा बऱ्याच वर्षांआधी घेण्यात आलेल्या बॉम्बच्या चाचण्यांमुळे असावे. * या अवपाताचे कारण यांपैकी काहीही असू शकते. जेव्हा मानव दूषित वनस्पतींपासून तयार झालले अन्न खातात किंवा दूषित गवत खाललेल्या गायीचे दूध पितात तेव्हा एसआर९० त्यांच्या शरीरात जाते. एसआर९० रासायनिक दृष्ट्या कॅल्शियमसारखे असते. त्यामुळे मानवी हाडांत हा किरणोत्सारी पदार्थ साठतो आणि यामुळे हाडांचा आणि रक्ताचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
भविष्यातील पिढ्यांनाही किरणोत्सर्जित पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे वेगवेगळे दुष्परिणाम भोगावे लागू शकतील याविषयीही ग्लोब दैनिकात चिंता व्यक्त करण्यात आली. त्यात असा खुलासा करण्यात आला की “अणूभट्टीतील गाभ्यातून आण्विक टाकाऊ पदार्थ काढले जातात तेव्हा, ते पूर्वीपेक्षा दहा लाख पटीने जास्त किरणोत्सारी झालेले असतात. आण्विक इंधनाचा एक बंडल वापरून झाल्यानंतर इतका घातक असतो की त्यापासून फक्त एक मीटर अंतरावर उभ्या असलेल्या व्यक्तीचा एका तासाच्या आत विषारी किरणोत्सर्गाने मृत्यू होऊ शकतो.”
मानवांच्या डोक्यावर किरणोत्सारी अवपाताची टांगती तलवार आहे. असे असताना आपले भविष्य अगदी सुरक्षित आहे असे धरून चालणे वास्तववादी आहे का? पृथ्वी व त्यावरील सजीव सृष्टी प्रथम निर्माण करण्यात आली तेव्हा बायबल सांगते की सर्व काही “फार चांगले” होते. (उत्पत्ति १:३१) बायबल आपल्याला आश्वासन देते की लवकरच या पृथ्वी ग्रहावर पुन्हा एकदा सुखदायक परिस्थिती येईल. या आश्वासनावर आपण पूर्ण विश्वास बाळगू शकतो. किरणोत्सर्गाने दूषित झालेले अन्न आणि पाणी यांची त्या वेळी आठवणही उरणार नाही.—स्तोत्र ६५:९-१३; प्रकटीकरण २१:१-४.
(g०१ २/२२)
[तळटीप]
^ युक्रेन येथील चर्नोबिलमध्ये १९८६ साली आण्विक शक्ती केंद्रात झालेल्या दुर्घटनेनंतर जर्मन मुलांच्या दातांतील एसआर९० चे प्रमाण दहापट वाढले होते.
[२१ पानांवरील चित्राचे श्रेय]
फोटो: U. S. Department of Energy photograph