बहुपयोगी निलगिरी
बहुपयोगी निलगिरी
ऑस्ट्रेलिया येथील सावध राहा! लेखकाकडून
कधीकधी ९० मीटरपेक्षा उंच वाढणारे हे वृक्ष जगातल्या सर्वात उंच वृक्षांत गणले जातात. तर याच्या काही जाती ठेंगण्या, पीळदार व पसरट असून हे वृक्ष रखरखीत जमिनीपर्यंत वाकलेले असतात. या झाडाच्या पानांची रचना अतिशय आश्चर्यकारक आणि पुष्परचना आल्हाददायक असते. कदाचित या झाडाचा कोणता न कोणता भाग तुमच्याही उपयोगात आलाच असेल.
काही जातींना ॲल्पाईन ॲश व टास्मानियन ओक यांसारखी कुलीन नावे आहेत, तर बऱ्याच वृक्षांना फक्त सर्वसामान्य गम ट्री (डिंकाचे वृक्ष) म्हणतात. पण खरे पाहता डिंक हा पाण्यात विरघळणारा कर्बुदेयुक्त पदार्थ असतो आणि तो या वृक्षाच्या कोणत्याही जातींत तयार होत नाही. त्यामुळे डिंकाचे वृक्ष हे नाव तसे योग्य नाही. या वृक्षांच्या जातीला यूकॅलिप्टस (निलगिरी) हे शास्त्रीय नाव आहे. हा वृक्ष मुळात ऑस्ट्रेलियाचा. आणि या जातीत ६०० वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आहेत.
ऑस्ट्रेलियाचे उत्तर क्षेत्र तसेच ऑस्ट्रेलियन आऊटबॅकचे रूक्ष विस्तार यांसारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशांतील उबदार वातावरणात निलगिरी वृक्षांची झपाट्याने वाढ होते. पण टास्मानियाच्या दक्षिण भागात ॲन्टार्टिकाचे वारे आणि समुद्री तटावरील पर्वतरांगांतील सततचे धुके झेलूनही हे वृक्ष चांगले वाढतात. सर्वत्र आढळणाऱ्या या वृक्षांबद्दल १९ व्या शतकातील एका शोधकाने व प्राणीविज्ञान शास्त्रज्ञाने तर असे म्हटले की “कुठेही जा, हे डिंकाचे वृक्ष आहेतच. मैलोनमैल प्रवास करूनही या झाडांशिवाय काही दिसतच नाही.”
एकोणीसाव्या शतकात ऑस्ट्रेलियात युरोपियन लोकांचे लोंढेच्या लोंढे येऊन वसले तेव्हापासून मात्र निलगिरी वृक्षांना अवकळा आली. हे वृक्ष प्रगतीत बाधा आहेत असे ठरवून अंदाजे ३,००,००० चौरस किलोमीटरच्या प्रदेशांत हे वृक्ष समूळ नष्ट करण्यात आले. पण या बहुपयोगी नैसर्गिक संपत्तीची सर्वांनीच हेळसांड केली नाही. १९ व्या शतकादरम्यान निलगिरी वृक्षाने सबंध जगात आपले स्थान बनवले.
राजा आणि डॉक्टर
अबिस्सिनियाचा (आताचे इथियोपिया) सम्राट मेनेलिक दुसरा याने १८८० च्या दशकात अदिस अबाबा या रूक्ष शहराला आपली नवी राजधानी बनवले होते. या शहरात लावण्यासाठी, सावली देतील आणि इंधन म्हणूनही उपयोगी पडतील अशाप्रकारचे वृक्ष लावण्याची त्याला इच्छा होती. पण आफ्रिकेतील कोणतेही वृक्ष या वैराण प्रदेशात लावण्याकरता उपयुक्त नव्हते. त्यामुळे सम्राटाच्या खास नेमलल्या तज्ज्ञांनी जवळजवळ त्यांच्याचसारख्या उष्ण हवामानात विपुलतेने वाढणाऱ्या वृक्षांचा शोध घेण्यास सुरवात केली. “आदिस अबाबा” याचा अर्थ “नुकतेच उमललेले फूल” आणि हे नाव या शहराला कदाचित निलगिरी वृक्षांच्या सन्मानार्थ देण्यात आले असावे. कारण या बहुपयोगी वृक्षांची निर्यात केल्यापासून इथियोपियाच्या अर्थव्यवस्थेत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
निलगिरीच्या आधुनिक देशभ्रमणाला योगदान देणारी आणखी एक व्यक्ती म्हणजे डॉक्टर एड्मंडो नावारो दे आंड्राडे. ब्राझीलच्या झपाट्याने नाहीशा होत चाललेल्या जंगलांना पुनरुज्जीवन देण्याचा निर्धार करून त्यांनी १९१० साली ऑस्ट्रेलियाहून निलगिरी वृक्ष निर्यात करण्यास सुरवात केली. त्यांच्याच प्रयत्नांमुळे ३.८ कोटी निलगिरी वृक्षांची लागवड येथे करण्यात आली. आज ब्राझीलमध्ये दोन अब्ज पेक्षा अधिक निलगिरी वृक्षांची लागवड झाली आहे.
अशारितीने, निलगिरी वृक्षांची सर्वात जास्त संख्या असण्याचा बहुमान ऑस्ट्रेलियाच्या पाठोपाठ पर्जन्यारण्यांचे माहेरघर असलेल्या ब्राझीलला मिळाला आहे. निलगिरी वृक्षांमुळे ब्राझीलला
उल्लेखनीय आर्थिक फायदा झाला आणि यामुळे हे बहुपयोगी वृक्ष ब्राझीलला आणल्याबद्दल सरकारने डॉ. नावारो यांना खास समाजोपयोगी कार्य करणाऱ्यांना दिले जाणारे पदक बहाल केले.जीवनदायक वृक्ष
निलगिरीच्या काही प्रकारांतील वृक्ष, उदाहरणार्थ, मॅली हे दुष्काळग्रस्त कोरड्या जमिनीतही टिकून राहतात कारण ते आपल्या मुळांत मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवतात. ऑस्ट्रेलियाच्या रूक्ष जंगलांत राहणारे ॲबोरिजीन लोक व पूर्वी येथे येणारे शोधक या जमिनीखालच्या पाण्याच्या बाटल्यांचा उपयोग करून दुष्काळाचा सामना करायचे. जमिनीत असलेली लांब मुळे उपटून त्यांचे लहान तुकडे केले जात. या तुकड्यातून एका बाजूने हवा फुंकल्यास पिंगट रंगाचा द्रव निघतो. या द्रवाची चव फार चांगली नसली तरी हा द्रव जीवनदायक ठरू शकतो. ९ मीटर लांबीच्या मुळातून जवळजवळ दीड लिटर द्रव निघतो असे म्हटले जाते.
निलगिरी जातीचे वृक्ष पाणथळ प्रदेशांतही चांगले वाढतात. दलदलीतून शक्य तितके पाणी हे वृक्ष शोषून घेतात. निलगिरी वृक्षांच्या या क्षमतेचा इटॅलियन लोकांनी फायदा करून घेतला. पॉन्टाइन दलदलींच्या प्रदेशात डासांचा सुळसुळाट होता. पण दलदलीत झपाट्याने वाढणाऱ्या निलगिरीची लागवड करून त्यांनी येथील पाण्याचा निचरा केला. आज या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात शेतीकरता उपयोग केला जातो.
आफ्रिका, अमेरिका, आशिया, युरोप या सर्व खंडांतील ५० हून अधिक देशांत, व्यावसायिक आणि सौंदर्यदृष्टीने बहुपयोगी असलेल्या निलगिरीची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांच्या गर्द लाल व फिक्या सोनेरी रंगाच्या लाकडासाठी, फर्निचर तयार करणारे व्यावसायिक मोठी किंमत मोजायला तयार असतात. एका सूत्रानुसार: “निलगिरीचे लाकूड सर्वात जड, भरीव आणि सर्वात टिकाऊ लाकडांपैकी आहे. उच्च प्रतीचे असण्यासोबतच निलगिरी वृक्षांची भराभर वाढ होत असल्यामुळे . . . भरीव लाकडासाठी या जातीचे वृक्ष जगात सर्वात मोलवान समजले जातात.”
या वृक्षाचे काही प्रकार पाण्यातही टिकतात. त्यामुळे जहाज, समुद्रातील खांब, टेलिफोनचे खांब, कुंपण आणि फरशीसारख्या लाकडीपाट्या तयार करण्यासाठी हे लाकूड वापरले जाते. याशिवाय, येलो बॉक्स आणि आयर्नबार्क नावाच्या जातींच्या फुलांतील मधूर परागापासून मधमाश्या अत्यंत चविष्ट मध तयार करतात. अलीकडे ऑस्ट्रेलियातून
४५ लाख टन निलगिरी लाकडाच्या ढलप्या निर्यात केल्या गेल्या आहेत. यामुळे वर्षाला २५ कोटी डॉलरची मिळकत झाली आहे.किनो, तेल आणि टॅनिन
किनो नावाचा लाल द्रवपदार्थ निलगिरीच्या झाडाच्या सालीतून आणि लाकडातून झिरपतो. काहीप्रकारचे किनो जहाजांच्या लाकडाला कीड लागण्यापासून संरक्षण देण्यासाठी वापरले जातात. किनोचा वापर एक औषध तयार करण्यासाठी देखील केला जातो. हे औषध रक्तस्राव थांबवण्यासाठी वापरले जाते. इतर प्रकारच्या निलगिरीच्या सालीतून टॅनिन तयार होते. या पदार्थाचा उपयोग चामड्याच्या टॅनींगसाठी आणि कापडाला रंग देण्यासाठी देखील केला जातो.
निलगिरीच्या पानांची रचना अतिशय अद्भुत असते आणि यात भरपूर प्रमाणात तेल साठवलेले असते. हाताची बोटे खाली लोंबकळत असल्यासारखी ही पाने झुकलेली दिसतात. या रचनेमुळे निलगिरीची पाने मोठ्या नरसाळ्याप्रमाणे कार्य करतात. अत्यंत आवश्यक असलेली आर्द्रता या पानांच्या वरच्याभागावर कैद केली जाते आणि मग चामड्यासारख्या त्यांच्या जाडसर टोकांवरून पाण्याचे थेंब खाली तहानलेल्या मुळांपर्यंत आपोआप पडतात.
निलगिरीचे तेल पानांतून काढले जाते. यासाठी वाफवण्याची व उर्ध्वपातनाची प्रक्रिया केली जाते. तेलाचा उग्र पण उत्साहवर्धक सुवास असतो. या तेलाचेही बरेच उपयोग आहेत. अत्तर, साबणे, औषधे, गोड पदार्थ, आणि साफसफाईच्या साधनांसाठीही याचा उपयोग केला जातो. एका नैसर्गिक प्रक्रियेमुळे या तेलाचे अंश पानांच्या रोमांतून बाहेर पडून हवेत याचे लहान थेंब पसरतात आणि सूर्यप्रकाशात वक्रीभवन झाल्यामुळे निलगिरीच्या अरण्याला एक विशिष्ट प्रकारची निळसर छटा येते. सिडनीच्या पश्चिम टोकाला असलेल्या ब्लू माउन्टन्सचे हे आगळेवेगळे नाव याच प्रक्रियेमुळे पडले आहे.
चोखंदळ प्राण्यांचे घर
निलगिरी अरण्यातील सर्वात लोकप्रिय रहिवाशी म्हणजे गुबगुबीत, केसाळ कोआला. हा चोखंदळ शाकाहारी प्राणी निलगिरीच्या १२ प्रकारच्या वृक्षांचीच पाने खाणे पसंत करतो. केवळ निलगिरीच्या पानांचाच आहार, इतर कोणत्याही प्राण्याला घातक ठरला असता. पण कोआलाच्या बाबतीत असे घडत नाही. का बरे?
कारण कोआला प्राण्यांच्या पाचन संस्थेची अतिशय खास रचना असते. त्यांचे आंत्रपुच्छ एक ते दोन मीटर लांबीचे असते. मानवांचे आंत्रपुच्छ फक्त ८-१५ सेंटीमीटर इतकेच लांब असते. कोआलाच्या लांब आंत्रपुच्छामुळे या लहानशा प्राण्याला आपल्या आहारातून सर्व आवश्यक प्रथिने, कर्बुदे, आणि वसा शोषून घेणे शक्य होते.
कोआलासोबत ऑस्ट्रेलियात आढळणारा आणखी एक प्राणी निलगिरीच्या पानांचा चाहता आहे; हा म्हणजे सर्वात मोठा उडणारा ऑपसम. या केसाळ शिशूधान प्राण्याचा आकार पाळीव मांजराइतका असतो. त्याची मोठी केसाळ शेपटी जवळजवळ ४० सेंटीमीटर लांबीची असते आणि पुढचे व मागचे पाय त्वचेने जोडलेले असतात. या मांसल पंखांचा उपयोग करून ऑपसम एका फांदीवरून उडी मारतो, जवळजवळ १०० मीटरपर्यंत संथपणे उडत असतानाच ९० डिग्रीच्या कोनात दिशा बदलतो आणि मग अलगद दुसरी फांदी धरतो.
वणवा आणि नव्याने वाढ
ऑस्ट्रेलियामध्ये वणव्यांना बुशफायर म्हणतात. यांमुळे निलगिरी जंगलाला सतत धोका असतो. पण या झाडांची रचनाच अशी असते की ते या वणव्यांत पूर्णपणे नष्ट होत नाहीत. ते कसे?
झाडाच्या बुंध्यात आणि फांद्यांत सालीच्या अगदी खाली अक्रियाशील अंकुर असतात. आगीमुळे झाडाची साल आणि पाने जळून गेल्यावर या अंकुरांतून नवी पालवी फुटते. काळ्या झालेला झाडाचा बुंधा नवीन कोवळ्या हिरव्यागार पानांनी झाकला जातो. यामुळे मूळ झाड जिवंत राहते. शिवाय जमिनीत असलेले बी देखील बराच काळ तसेच राहून संधी मिळाल्यावर अंकुरतात आणि यामुळे नवीन वाढ होते.
निलगिरीचे मोल जाणणे
घशाच्या दुखण्यासाठी कधी तुम्ही निलगिरीपासून तयार केलेले औषध घेतले का किंवा याच्या मधापासून तयार केलेला एखादा गोड पदार्थ खालला आहे का? या झाडाच्या लाकडापासून तयार केलेल्या बोटीतून कधी तुम्ही प्रवास केला का? निलगिरीच्या लाकडापासून तयार केलेल्या घरात कधी राहिलात का किंवा या झाडाच्या लाकडांची शेकोटी करून त्याच्या ऊबेत कधी बसला का? कोणत्या न कोणत्या प्रकारे तुम्हाला या झाडापासून फायदा झालाच असेल. पुढच्यावेळी तुम्ही केसाळ कोआला पाहिलात किंवा त्याचे चित्र पाहिले तर या कोआलाचे घर असलेल्या अद्भुत निलगिरी वृक्षाची आठवण जरूर काढा.
खरोखर असंख्य वैशिष्ट्ये असलेला कणखर निलगिरी वृक्ष बहुपयोगी आहे.
(g०१ २/२२)
[२२, २३ पानांवरील चित्र]
निलगिरी वृक्ष जगातल्या सर्वात उंच वृक्षांपैकी आहेत
[२३ पानांवरील चित्र]
निलगिरीच्या फुलांतील परागापासून मधमाश्या अतिशय चविष्ट मध तयार करतात
[२४ पानांवरील चित्र]
निलगिरी वृक्षाचे लाकूड “सर्वात जड, भरीव आणि सर्वात टिकाऊ लाकडांपैकी आहे”
[२४ पानांवरील चित्रे]
निलगिरीची पाने कोआला (डावीकडे) आणि उडणारे ऑपसम (वरती) या प्राण्यांचे खाद्य आहे
[चित्राचे श्रेय]
© Alan Root/Okapia/PR
[२२ पानांवरील चित्राचे श्रेय]
Geoff Law/The Wilderness Society
[२३ पानांवरील चित्राचे श्रेय]
Courtesy of the Mount Annan Botanic Gardens