पोलिस त्यांचे भविष्य काय?
पोलिस त्यांचे भविष्य काय?
पोलिस नसते तर कदाचित अंदाधुंदी माजली असती. पण पोलिस असूनही जग सुरक्षित आहे का? बऱ्याच ग्रामीण भागांप्रमाणेच बहुतेक शहरांतही आज सुरक्षिततेची भावना नाहीशी झाली आहे. संघटित गुन्हेगारी आणि निगरगट्ट गुन्हेगारांपासून पोलिस आपल्याला वाचवतील अशी खरेच अपेक्षा केली जाऊ शकते का? रस्त्यांवरून चालताना आपल्याला कसलीही भीती वाटणार नाही अशी परिस्थिती पोलिस निर्माण करू शकतील का? गुन्हेगारीविरुद्धच्या लढ्यात त्यांना यश मिळेल का?
भविष्यकाळाकरता पोलिस (इंग्रजी) या पुस्तकात डेव्हिड बेली यांनी यासंदर्भात आपले मत सादर केले आहे. ते म्हणतात: “पोलिस गुन्हे होण्यापासून थांबवत नाहीत. पोलिस म्हणजे जणू कॅन्सरच्या जखमेवर बॅण्ड-एडची पट्टी आहेत. . . . गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व समाजाला गुन्हेगारीपासून मुक्त करण्यासाठी
पोलिस कितीही समर्पित असले तरीसुद्धा आपण त्यांच्यावर विसंबून राहू शकत नाही.” अभ्यासांतून असे दिसून आले आहे की पोलिसांची मुख्य कार्ये अर्थात, रस्त्यांवर गस्त घालणे, आणीबाणीच्या स्थितीत हालचाल करणे आणि गुन्ह्याचे अन्वेषण करणे, हे गुन्हे न होण्याच्या दिशेने केलेले प्रयत्न नव्हेत. असे का म्हणता येते?प्रत्येक ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवून गुन्हे टाळण्याचा प्रयत्न करणे अत्यंत खर्चिक आहे. त्यापेक्षा गस्ती वाढवणे परवडण्यासारखे आहे, पण गुन्हेगार याची पर्वा करत नाहीत. लगेच हालचाल केल्यानेही गुन्हे टाळता येत नाहीत. पोलिस सांगतात की गुन्हा घडल्यानंतर एका मिनिटाच्या आत पोलिस घटनास्थळी पोचू शकले तरच गुन्हेगार पकडला जाण्याची शक्यता आहे. पण इतक्या वेगाने हालचाल करणे शक्य नाही हे गुन्हेगारांना माहीत असते. गुन्हा अन्वेषणही फारसे परिणामकारक ठरत नाही. गुन्हेगारांना दोषी शाबीत करून त्यांना तुरुंगात डांबण्यात यश आले तरीसुद्धा गुन्हेगारी काही थांबत नाही. अमेरिकेत इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक गुन्हेगारांना तुरुंगात टाकले जाते पण तरीसुद्धा या देशात गुन्हेगारीचे प्रमाण भयंकर आहे; दुसरीकडे पाहता, जपानमध्ये कारागृहात फार कमी गुन्हेगार असूनही तेथे गुन्हेगारीचे प्रमाण सर्वात कमी आहे. शेजार पहारा व यांसारख्या इतर योजना देखील काही दीर्घकालीन परिणाम घडवून आणू शकलेल्या नाहीत, खासकरून गुन्हेगारीचे उच्च प्रमाण असलेल्या भागांत. विशिष्ट गुन्हे उदाहरणार्थ ड्रग्स विक्रय किंवा दरोडे यांवर विधायक कारवाई करूनही याचे परिणाम फार काळ टिकत नाहीत.
भविष्यकाळाकरता पोलिस यात म्हटले आहे, “पोलिस गुन्ह्यांना आळा घालण्यात असमर्थ आहेत हे विचारवंत लोकांकरता फार आश्चर्याचे नाही. समाजातील गुन्ह्याच्या प्रमाणाकरता पोलिसांच्याच नव्हे तर सबंध न्यायालयीन यंत्रणेच्या नियंत्रणाबाहेरील सामाजिक परिस्थिती जबाबदार आहे हे सर्वांना ठाऊक आहे.”
पोलिस नसल्यास काय होईल?
पोलिस पाहात नसतात तेव्हा तुम्ही कसे वागता? त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा उचलून तुम्ही कायद्याचे उल्लंघन कराल का? आश्चर्याची बाब म्हणजे अनेक तथाकथित, मान्यवर मध्यम व उच्च वर्गीय लोक पांढरपेशी गुन्ह्यांतील आक्षेपार्ह फायदे मिळवण्याच्या मोहात आपली प्रतिष्ठा आणि भविष्यही धोक्यात घालण्याची जोखीम उचलतात. द न्यू यॉर्क टाईम्स यात अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तात ‘वाहनांचा विमा देणाऱ्या कंपन्यांत फसवेगिरीच्या एका योजनेत सामील झालेल्या ११२ लोकांचा उल्लेख होता ज्यांच्यावर अफरातफरीच्या या योजनेत सहभागी झाल्याचा आरोप करण्यात आला. आरोपींमध्ये वकील, वैद्यकीय डॉक्टर, कायरोप्रॅक्टर्स, एक फिसियोथेरपिस्ट, एक ॲक्युपंक्चरिस्ट आणि एक पोलिस खात्यातील प्रशासकीय सहअधिकारी देखील होत्या.’
मोठ्या प्रमाणात घोटाळ्याचे आणखी एक प्रकरण अलीकडेच घडले. न्यूयॉर्क येथील सथबी आणि लंडन येथील क्रिस्टी लिलावगृहांतील भूतपूर्व प्रशासकांना अवैधरित्या किंमती आधीच ठरवण्याबद्दल दोषी ठरवण्यात आले तेव्हा कलाजगताच्या श्रीमंत भोक्त्यांना धक्का बसला. या अधिकाऱ्यांना आणि या लिलावगृहांना दंड आणि भरपाई म्हणून ४०,४६,४०,००,००० रुपये भरावे लागत आहेत! पैशाची अनिवार हाव समाजाच्या सर्व थरांत पाहायला मिळते.
१९९७ साली ब्राझीलमधील रसीफा शहरात पोलिसांनी संप केला तेव्हा जे घडले त्यावरून हेच शाबित होते की कोणतीही प्रतिकारक शक्ती नसल्यास लोक गुन्हेगारीचा मार्ग पत्करायला मागेपुढे पाहात नाहीत. त्या वेळी त्यांचे धार्मिक विश्वास त्यांना या अयोग्य वर्तनापासून आवरण्यास असमर्थ ठरतात. ते आपल्या स्वार्थाकरता नीतीनियमांना व
तत्त्वांना सौम्य रूप देतात किंवा त्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. कधी लहान तर कधी मोठ्या प्रमाणातील बेकायदेशीर कृत्ये करण्याची सहजप्रवृत्ती असलेल्या या जगात, बहुतेक देशातील पोलिस यंत्रणेचे प्रयत्न फोल ठरत आहेत यात आश्चर्य ते काय!पण दुसरीकडे पाहता काही लोक कायद्यांचा मान राखतात कारण ते अधिकाराचा आदर करतात. प्रेषित पौलाने रोममधील ख्रिश्चनांना सांगितले की देवाने ज्यांना अस्तित्वात राहण्यास परवानगी दिली आहे त्या अधिकाऱ्यांच्या त्यांनी अधीन राहावे, कारण ते समाजात निदान काही प्रमाणात तरी सुव्यवस्था कायम ठेवतात. अशा या अधिकाऱ्यांविषयी त्याने लिहिले: “तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. . . . क्रोध दाखविण्याकरिता वाईट करणाऱ्याचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे. म्हणून क्रोधामुळे केवळ नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळेहि अधीन राहणे अगत्याचे आहे.”—रोमकर १३:४, ५.
बदलती सामाजिक परिस्थिती
पोलिसांचे कार्य सामाजिक परिस्थिती सुधारण्यात निश्चितच हातभार लावते. रस्त्यांवरून ड्रग्स विक्री आणि हिंसाचार हटवण्यात आला आहे हे पाहिल्यावर लोकांनाही ही सुधारित परिस्थिती कायम ठेवण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याची प्रेरणा प्राप्त होते. पण समाजात खऱ्या अर्थाने सुधार घडवून आणणे हे कोणत्याही पोलिस दलाच्या अवाक्याबाहेरचे काम आहे.
तुम्ही अशा एका समाजाची कल्पना करू शकता का, ज्यात लोकांना कायद्यांबद्दल स्वाभाविकतःच आदर असल्यामुळे त्यांना पोलिसांची गरजच नाही? लोकांना एकमेकांबद्दल इतकी काळजी वाटते की शेजारीपाजारी सदैव एकमेकांच्या मदतीला धावून यायला तयार असतात आणि त्यामुळे पोलिसांना मदतीसाठी बोलवण्याची गरजच पडत नाही अशा एका जगाची तुम्ही कल्पना करू शकता का? कदाचित हे स्वप्नवत वाटेल. पण येशूचे पुढील शब्द, वेगळ्या संदर्भात वापरलेले असले तरीसुद्धा ते इथे समर्पक आहेत. त्याने म्हटले: “माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे.”—मत्तय १९:२६.
बायबल अशा एका भावी काळाचे वर्णन करते जेव्हा सबंध मानवजात यहोवा देवाने स्थापन केलेल्या एका शासनाच्या अधीन असेल. “स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील . . . ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील.” (दानीएल २:४४) सर्व प्रामाणिक लोकांना देवाच्या प्रीतीचा मार्ग शिकवण्याद्वारे हे शासन गुन्हेगारीला कारणीभूत ठरणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बदल घडवून आणेल. “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यशया ११:९) यहोवाचा राजा, येशू ख्रिस्त सर्व प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालेल. “तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही. कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच तो निर्णय करणार नाही, तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील, पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील.”—यशया ११:३, ४.
गुन्हेगार किंवा गुन्हेगारी राहणार नाही. पोलिसांची गरज उरणार नाही. “सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही.” (मीखा ४:४) बायबलमध्ये वर्णन केलेल्या या ‘नव्या पृथ्वीवर’ तुम्हाला राहायचे असेल, तर देवाने आपल्या वचनात काय अभिवचन दिले आहे हे जाणून घेण्याची हीच वेळ आहे.—२ पेत्र ३:१३. (g०२ ७/८)
[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]
लोकांना स्वभावतःच कायद्यांबद्दल आदर असल्यामुळे पोलिसांची गरजच पडणार नाही अशा एका समाजाची तुम्ही कल्पना करू शकता का?
[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]
गुन्हेगार किंवा गुन्हेगारी राहणार नाही
[११ पानांवरील चौकट/चित्र]
पोलिस विरुद्ध अतिरेकी
विमान अपहरणकर्ते, ओलीस ठेवणारे, आणि अतिरेकी, पोलिसांसमोर जनतेचे संरक्षण करण्याच्या मार्गातील सर्वात मोठे आव्हान आणतात; न्यूयॉर्क सिटी व वॉशिंग्टन डी. सी. येथे सप्टेंबर ११, २००१ रोजी घडलेल्या घटनांवरून या गोष्टीचा प्रत्यय आला. तदनुषंगाने जगातल्या अनेक भागांत विशेष दलांना काही क्षणांत जमिनीवर थांबलेल्या विमानांत घुसून ते नियंत्रणात घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच त्यांना इमारतींमध्ये अचानक प्रवेश करण्याचे—छतावरून दोरांच्या साहाय्याने खाली उतरण्याचे, खिडक्यांतून उड्या टाकण्याचे आणि लोकांना तात्पुरते बेशुद्ध करणारे हातगोळे फेकण्याचे तसेच अश्रूधूर सोडण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे. ओलीसांना फारशी इजा न होता अतिरेक्यांना चकमा देऊन त्यांना ताब्यात घेण्यात या प्रशिक्षित अधिकाऱ्यांना अनेकदा यश आले आहे.
[चित्राचे श्रेय]
James R. Tourtellotte/U.S. Customs Service
[१२ पानांवरील चित्र]
देवाच्या नव्या जगात ज्यांची गरज नसेल अशा वस्तू