पोलिस संरक्षण आशा व आशंका
पोलिस संरक्षण आशा व आशंका
एकोणीसाव्या शतकाच्या सुरवातीला प्रशिक्षित, गणवेषधारी पोलिस दल उभारण्याच्या सर्व प्रस्तावांना इंग्लंडच्या रहिवाशांनी निकराचा विरोध केला. त्यांना अशी भीती होती की केंद्रिय सरकारच्या नियंत्रणाखाली एक सशस्त्र यंत्रणा निर्माण झाल्यास त्यांचे स्वातंत्र्य धोक्यात येईल. काहींना अशी भीती होती की फ्रान्सच्या जोसेफ फूशेने सुरू केलेल्या पोलिस हेरगिरी यंत्रणेसारखीच ही यंत्रणा होईल. पण शेवटी त्यांनाही प्रश्न पडला, की ‘पोलिस दलाशिवाय कसे चालेल?’
लंडन हे एव्हाना जगातले सर्वात विशाल आणि समृद्ध शहर म्हणून नावारूपास आले होते. गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालल्यामुळे लहानमोठे उद्योग धोक्यात आले होते. लोकांच्या जिवित-वित्तांचे संरक्षण करण्यासाठी काही स्वयंसेवी गस्त घालणारे आणि प्रशिक्षित बो स्ट्रीट रनर्स अर्थात खासगीरित्या कार्यरत असलेले चोरांना धरणारे शिपाई होते खरे, पण गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने त्यांचे काही चालेना. इंग्रज पोलिस: राजकीय व सामाजिक इतिहास (इंग्रजी) यात क्लाइव्ह एम्स्ले यांनी म्हटले: “गुन्हेगारीला आणि अव्यवस्थेला सुसंस्कृत समाजात थारा नसावा या कल्पनेला अधिकाधिक लोक दुजोरा देऊ लागले होते.” त्यामुळे शेवटी लंडनवासियांनी आशावादी मनोवृत्ती पत्करून, सर रॉबर्ट पील * यांच्या निर्देशनाखाली एक प्रशिक्षित पोलिस दल उभारण्याचे ठरवले. १८२९ साली सप्टेंबर महिन्यात मेट्रोपॉलिटन पोलिस दलाच्या गणवेषधारी शिपायांनी गस्त घालण्यास सुरवात केली.
पोलिसयंत्रणेच्या आधुनिक इतिहासाच्या सुरवातीपासून पोलिसांच्या संबंधाने लोकांच्या मनात अनेक आशा आणि त्याच वेळेस काही आशंका देखील उत्पन्न झाल्या. आशा ही की ते संरक्षण पुरवतील आणि आशंका अशी की ते आपल्या अधिकाराचा गैरवापर तर करणार नाहीत?
अमेरिकन कॉप्स रुजू
न्यूयॉर्क सिटी हे संयुक्त संस्थानातील प्रशिक्षित पोलिस दल असलेले पहिले शहर होते. या शहराची सुबत्ता वाढत गेली तसतशी इथे गुन्हेगारीचीही भरभराट होऊ लागली. १८३० सालापर्यंत प्रत्येक कुटुंबाने त्या काळच्या नवीनच प्रकाशित होऊ लागलेल्या पेनी प्रेस म्हटलेल्या स्वस्त बातमीपत्रांत वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या भीतीदायक बातम्या वाचल्या होत्या. साहजिकच लोकांनी याविरुद्ध ओरड केली आणि अशारितीने १८४५ साली न्यूयॉर्क शहरात पोलिस दल कार्यरत झाले. न्यूयॉर्क आणि लंडनच्या रहिवाशांना सुरवातीपासूनच एकमेकांच्या पोलिस यंत्रणेविषयी कुतूहल होते.
अमेरिकेच्या जनतेलाही इंग्लंडवासियांप्रमाणेच सरकारच्या नियंत्रणाखालील सशस्त्र दल अस्तित्वात येण्याविषयी मनात भीती होती. पण या दोन्ही देशांनी यावर वेगवेगळा तोडगा काढला. इंग्रजांनी गर्द निळ्या रंगाचा गणवेष धारण करणाऱ्या व उंच टोप्या घालणाऱ्या सुसभ्य पोलिसांचा दल पसंत केला. शस्त्रांच्या नावाखाली या पोलिसांजवळ गणवेषात लपलेले केवळ
एक लहानसे दंडुक असायचे. आजपर्यंत ब्रिटिश शिपाई (बॉबी) आणीबाणीच्या प्रसंगांशिवाय बंदुका बाळगत नाहीत. पण एका वृत्तानुसार: “परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे . . . नाईलाजास्तव ब्रिटिश पोलिस येत्या काळात पूर्णपणे शस्त्रधारी दल बनेल.”पण सरकार अधिकाराचा गैरवापर करेल या भीतीने अमेरिकेने आपल्या घटनेत सेकंड अमेंडमेंटचा समावेश केला. यात लोकांना ‘शस्त्र बाळगण्याच्या व धारण करण्याच्या हक्काची’ हमी देण्यात आली आहे. परिणामस्वरूप पोलिसांनी बंदुकांची मागणी केली. बंदुकांचा वापर सुरू झाल्यावर गुन्हेगारांवर गोळीबार करणे ही अमेरिकन कॉप्सची खासियत बनली, निदान लोकांच्या मनात त्यांची तशीच प्रतिमा निर्माण झाली. अमेरिकन लोकांच्या बंदुका बाळगण्याच्या मनोवृत्तीला कारणीभूत ठरणारी आणखी एक गोष्ट म्हणजे अमेरिकेतील पहिले पोलिस दल ज्याप्रकारच्या जगात उदयास आले ते लंडनपेक्षा खूप वेगळे होते. न्यूयॉर्कची लोकसंख्या वाढत गेली तसतसे तेथे अंदाधुंदीचे वातावरण निर्माण झाले. हजारोंच्या संख्येने येथे स्थलांतर करून स्थायिक झालेल्या युरोपियन व ॲफ्रो-अमेरिकन लोकांमुळे १८६१-६५ साली यादवी युद्ध सुरू झाल्यानंतर वंशवादी हिंसेला तोंड फुटले. त्यामुळे पोलिसांना अधिक कठोर पावले उचलण्याची गरज भासली.
अशारितीने लोक पोलिसांना जीवनातली एक अप्रिय वास्तविकता समजू लागले. कधीकधी त्यांची वर्तणूक कठोर असली तरीसुद्धा काही प्रमाणात सुव्यवस्था व सुरक्षा मिळवण्यासाठी लोक हे सहन करायला तयार झाले. पण जगातल्या काही भागात मात्र एक निराळ्याच प्रकारचे पोलिस दल उदयास येऊ लागले होते.
भीतीदायक पोलिस
एकोणीसाव्या शतकाच्या सुरवातीला आधुनिक पोलिस यंत्रणा विकसित होऊ लागल्या होत्या आणि तोपर्यंत जगाचा बराचसा भाग युरोपियन साम्राज्याच्या अंमलाखाली होता. खरे पाहता युरोपियन पोलिसांना लोकांपेक्षा शासकांचे संरक्षण करण्याकरता संघटित करण्यात आले होते. ब्रिटिश लोक सुद्धा स्वतःच्या देशात सशस्त्र लष्करवजा पोलिसांची कल्पना सहन करू शकत नव्हते पण वसाहतींतील लोकांना हाताखाली ठेवण्यासाठी लष्करी पोलिसदलांचा वापर करण्यासंबंधी त्यांना जराही हरकत नव्हती. जगाच्या विविध भागांत पोलिसांचे कार्य (इंग्रजी) या पुस्तकाचे लेखक रॉब मॉबी म्हणतात: “पोलिसांच्या निर्दयतेच्या, भ्रष्टाचाराच्या, हिंसेच्या, त्यांनी केलेल्या खूनांच्या आणि अधिकाराचा गैरवापर करण्याच्या घटना, वसाहतवादी पोलिस इतिहासाच्या प्रत्येक दशकात घडत होत्या.” वसाहतवादी पोलिस यंत्रणेचे काही फायदे नक्कीच होते याकडे लक्ष वेधल्यावर याच पुस्तकात असे म्हटले आहे की यामुळे, “सबंध जगात पोलिस यंत्रणेला सार्वजनिक सेवा म्हणून नव्हे तर सरकारी यंत्रणा म्हणून लेखण्याचे प्रोत्साहन मिळाले.”
जुलूमशाही सरकारांनी विद्रोहाच्या भीतीने नेहमीच गुप्त पोलिसांचा हेरगिरी करण्याकरता वापर केला आहे. हे पोलिस छळ करून माहिती काढतात आणि संशयित विद्रोहकांना जिवे मारून किंवा चौकशी न करता अटक करण्याद्वारे त्यांचे प्रयत्न निष्फळ करतात. नात्झींचे गेस्टापो, सोव्हिएत संघाचे केजीबी आणि पूर्व जर्मनीचे श्टाझी सर्वज्ञात आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्टाझींनी १.६ कोटी लोकसंख्येला नियंत्रणात ठेवण्यासाठी १,००,००० अधिकाऱ्यांना आणि अंदाजे पाच लाख खबऱ्यांना वापरले. हे अधिकारी चोवीस तास टेलिफोनवरील संभाषणे ऐकायचे आणि सबंध लोकसंख्येतील एक तृतियांश लोकांबद्दल गुप्त माहिती त्यांच्याजवळ होती. श्टाझी नावाच्या आपल्या पुस्तकात जॉन कोइलर म्हणतात, “श्टाझी अधिकाऱ्यांना काहीच मर्यादा नव्हत्या आणि जराही लाज नव्हती. प्रोटेस्टंट आणि कॅथलिक चर्चच्या पाळकांना व उच्च पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने गुप्त खबरी म्हणून भरती करण्यात आले. त्यांच्या कार्यालयांत आणि कबूली कक्षांत सर्वत्र गुप्त संभाषणे ऐकणारी ध्वनीग्राहके होती.”
पण भीतीदायक पोलिस केवळ जुलमी सरकारांतच नाहीत. बऱ्याच महानगरांतील पोलिसांवर देखील कायद्याच्या अंमलबजावणीकरता अतिशय उग्र पद्धती वापरल्यामुळे, खासकरून अल्पसंख्यांकांना आपले निशाण बनवल्यामुळे दहशत पसरविण्याचा आरोप करण्यात आला आहे. लॉस एंजेलीझ येथे घडलेल्या एका कुप्रसिद्ध घटनेविषयी एका बातमीपत्रिकेत असे म्हटले होते की “[या घटनेने] पोलिसांच्या गैरवर्तणुकीने बेकायदेशीरपणाची अभूतपूर्व पातळी गाठली असून, गुंड पोलिस, अशी एक नवीन संज्ञा यामुळे जन्मास आली आहे.
अधिकाऱ्यांना साहजिकच हा प्रश्न पडला आहे की, पोलिस खात्याला आपली प्रतिमा सुधारण्यासाठी काय करता येण्यासारखे आहे? लोकसेवेची त्यांची प्रतिमा अधिक प्रकाशात आणण्याकरता बऱ्याच पोलिस दलांनी त्यांच्या व्यवसायातील समाजसेवेशी संबंधित पैलूंवर भर देण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलिसांच्या कार्यात लोकांना सामील करण्याची आशा
जपानमधील पारंपरिक पोलिस सेवेने अनेक परदेशी लोकांचे लक्ष वेधले आहे. जपानी पोलिस स्थानके लहान लहान परिसरांपुरती असतात; यांत जवळजवळ एक डझन अधिकारी आळीपाळीने काम करतात. गुन्हेशास्त्राचे ब्रिटिश प्राध्यापक आणि बऱ्याच काळापासून जपानमध्ये स्थायिक असलेले फ्रँक
लाइशमन म्हणतात: “कोबान अधिकाऱ्यांची मैत्रिपूर्ण सेवा सुप्रसिद्ध आहे: कधी जपानच्या निनावी रस्त्यांवर विशिष्ट पत्ता शोधणाऱ्यांना वाट दाखवणे, कधी पावसात सापडलेल्या प्रवाशांना बेवारस छत्र्या देणे; कधी झिंगलेल्या सरारीमेनना घरी जाण्याकरता शेवटच्या ट्रेनमध्ये बसवून देणे तर कधी ‘नागरिकांच्या समस्यांवर’ त्यांना वैयक्तिक सल्ला देणे.” परिसरांत विभाजित असलेल्या या पोलिस सेवेमुळेच, जपानच्या रस्त्यांवर माणूस बेधडक चालू शकतो अशी ख्याती या देशाला मिळाली आहे.अशाप्रकारची पोलिस सेवा इतरत्र कार्यक्षम ठरेल का? गुन्ह्यांचा अभ्यास करणाऱ्यांनी यातून धडा घेतला आहे. संदेशवहनाच्या क्षेत्रातील आधुनिक प्रगतीमुळे पोलिस आणि ते ज्या लोकांची सेवा करतात त्यांमध्ये एकप्रकारचा दुरावा निर्माण झाला आहे. आज बऱ्याच शहरांत पोलिसांचे प्रमुख काम म्हणजे केवळ आणीबाणीच्या परिस्थितीत पावले उचलण्याचे आहे असे भासते. गुन्हे टाळण्यावर पूर्वी जो भर दिला जात होता तो आता महत्त्वाचा समजला जात नाही असे काही वेळा वाटते. या प्रवृत्तीला तोंड देण्याकरता शेजार पहारा घालण्याची प्रथा पुन्हा लोकप्रिय होऊ लागली आहे.
शेजार पहारा
वेल्समध्ये आपल्या कामाचे स्वरूप समजावून सांगताना ड्यूई नावाचे एक हवालदार सांगतात की “ही पद्धत खरोखर परिणामकारक आहे; यामुळे खरोखरच गुन्हेगारीचे प्रमाण कमी होते. शेजार पहारा म्हणजे आम्ही लोकांना एकमेकांच्या सुरक्षेबद्दल जागरूकता बाळगण्याचे प्रोत्साहन देतो. शेजाऱ्यांना एकमेकांची ओळख करून घेता यावी, एकमेकांची नावे आणि फोन नंबर लिहून घेता यावीत आणि गुन्हेगारीला कसा आळा घालता येईल याविषयी माहिती मिळावी म्हणून आम्ही सभा आयोजित करतो. मला याप्रकारचे काम आवडते कारण याद्वारे लोकांमध्ये शेजारधर्माची भावना निर्माण होते. नाहीतर, लोकांना आपल्या शेजारी कोण राहते हे देखील माहीत नसते. लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाल्यामुळे ही योजना कार्यक्षम ठरते.” तसेच पोलिस व जनता यांचे संबंधही सुधारतात.
याच दिशेने आणखी एक पाऊल म्हणजे गुन्ह्याला बळी पडलेल्यांशी अधिक सहानुभूतीने वागण्याचे पोलिसांना प्रोत्साहन देणे. गुन्ह्याला बळी पडणाऱ्यांचे सुप्रसिद्ध डच तज्ज्ञ यान वान देक यांनी असे लिहिले: “पोलिस अधिकाऱ्यांना शिकवले पाहिजे की रुग्णांना डॉक्टर जी वागणूक देतात, ती जितकी महत्त्वाची आहे तितकीच गुन्ह्याला बळी पडलेल्यांना पोलिसांकडून दिली जाणारी वागणूक महत्त्वाची आहे.” बऱ्याच ठिकाणी घरात होणारी मारहाण आणि बलात्कार यांना पोलिस अजूनही खरोखरचे गुन्हे समजत नाहीत. रॉब मॉबी म्हणतात: “घरात होणारी मारहाण आणि बलात्कार यांच्याप्रती पोलिसांची वृत्ती अलीकडील वर्षांत बरीच सुधारली आहे. पण तरीसुद्धा अजूनही सुधारणा करायला बराच वाव आहे.” प्रत्येक पोलिस दल आणखी एका क्षेत्रात सुधारणा करू शकतात आणि ते म्हणजे अधिकाराचा गैरवापर.
पोलिस खात्यातील भ्रष्टाचाराची भीती
पोलिस खात्यातील भ्रष्टाचाराबद्दलच्या बातम्या ऐकल्यावर पोलिसांकडून संरक्षण मिळण्याची कल्पना बालिश वाटू लागते. अशाप्रकारची वृत्ते पोलिसांच्या इतिहासाच्या सुरवातीपासूनच ऐकिवात आहेत. एनवायपीडी—एक शहर व त्यातील पोलिस (इंग्रजी) या पुस्तकात १८५५ सालाच्या संदर्भात अशी टिप्पणी
केली आहे: “न्यूयॉर्कच्या बऱ्याच रहिवाशांचे असे मत आहे की गुन्हेगार आणि पोलिस यांच्यात फरक करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.” लॅटिन अमेरिकेची विविध रूपे (इंग्रजी) या पुस्तकात लेखक डंकन ग्रीन असे म्हणतात की तेथील पोलिस खाते “भ्रष्टाचारी, अकार्यक्षम आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी भरले आहे.” १४,००० लॅटिन अमेरिकन पोलिसांच्या दलाचे प्रमुख अधिकारी म्हणतात: “[५,००० रु.] पेक्षा कमी मासिक वेतन मिळणाऱ्या पोलिसाकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता? लोक स्वतः त्याला लाच देतात, तेव्हा तो काय करेल?”भ्रष्टाचाराची ही समस्या किती गंभीर आहे? तुम्ही हा प्रश्न कोणाला विचारता यावर त्याचे उत्तर अवलंबून आहे. १,००,००० लोकसंख्या असलेल्या एका शहरात अनेक वर्षे गस्त घालण्याचे काम केलेल्या एका उत्तर अमेरिकी पोलिसाने असे म्हटले: “अर्थात, काही प्रमाणात बेईमान
अधिकारी आहेत पण बहुतेक अधिकारी प्रामाणिक आहेत. निदान मला तरी असाच अनुभव आला आहे.” पण दुसऱ्या एका देशात गुन्हे अन्वेषण विभागात २६ वर्षांचा अनुभव असलेले एक अधिकारी म्हणतात: “भ्रष्टाचार सर्वव्यापक आहे. पोलिसांमध्ये इमानदारी क्वचितच आढळते. घरफोडी झाल्यावर तपास करायला गेलेल्या पोलिसाला तेथे पैसे सापडले तर तो ते स्वतःच्या खिशात घालेल. चोरलेले दागदागिने सापडल्यास, त्यातले काही तो स्वतः पचवेल.” पण काही पोलिस अधिकारी भ्रष्टाचाराचा मार्ग का निवडतात?काहीजण अतिशय उदात्त हेतू बाळगून या क्षेत्रात पदार्पण करतात. पण नंतर भ्रष्ट सहकर्मी आणि गुन्हेगारी जगाच्या सततच्या संपर्कामुळे त्यातील नीच दर्जे हळूहळू त्यांच्यावर प्रभाव करू लागतात आणि कालांतराने ते याला बळी पडतात. व्हॉट कॉप्स नो या पुस्तकात शिकागोच्या एका गस्त घालणाऱ्या पोलिसाचे शब्द उद्धृत केले आहेत: “पोलिस अधिकाऱ्यांचा अनीतीशी इतका जवळून संपर्क येतो की काही आडपडदा राहातच नाही. ते सतत गुन्हेगारीने वेढलेले असतात. त्यातच उठतात बसतात . . . श्वास घेतात . . . सर्व इंद्रियांनी तिला अनुभवतात . . . [गुन्हेगारी] त्यांना हाताळावीच लागते.” साहजिकच त्यांच्यावर याचा नकारात्मक प्रभाव पडतो.
पोलिस समाजाकरता एक बहुमोल सेवा पुरवतात पण ही आदर्श मुळीच नाही. भविष्यात चांगल्या परिस्थितीची आपण आशा करू शकतो का? (g०२ ७/८)
[तळटीप]
^ ब्रिटिश पोलिस दलाची स्थापना करणाऱ्या सर रॉबर्ट (बॉबी) पील यांच्या नावावरून ब्रिटिश शिपायांना बॉबी हे नाव पडले.
[८, ९ पानांवरील चौकट/चित्रे]
ब्रिटिश बॉबींचे कौतुकास्पद कार्य
प्रशिक्षित पोलिस दलाची महागडी सुविधा ज्यांना परवडली त्यांपैकी पहिला देश ब्रिटन. त्यांना त्यांच्या समाजात सुव्यवस्था हवी होती—याचा एक पुरावा म्हणजे त्यांच्याकडची अतिशय सोयीस्कर व वक्तशीर स्टेजकोच यंत्रणा. १८२९ साली गृहमंत्रालयाचे सचीव सर रॉबर्ट (बॉबी) पील यांनी लंडन मेट्रोपॉलिटन पोलिस दल स्थापन करण्याच्या प्रस्तावाकरता कायदेमंडळाकडून मंजुरी मिळवली; या पोलिस दलाचे मुख्यालय स्कॉटलंड यार्ड येथे होते. सुरवातीला मद्यपान व जुगार याविरुद्ध कडक कारवाई केल्यामुळे हे पोलिस शिपाई तितकेसे लोकप्रिय नव्हते पण कालांतराने बॉबीज लोकांचे आवडते बनले.
१८५१ साली लंडनने एक भव्य प्रदर्शन भरवले आणि ब्रिटिश उद्योजकांनी साध्य केलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी साऱ्या जगाला याचे आमंत्रण दिले. हे प्रदर्शन पाहण्यास परदेशाहून आलेल्या पाहुण्यांनी इंग्रजांचे सुव्यवस्थित रस्ते पाहून तसेच येथे दारूडे, वेश्या किंवा बेघर लोक नाहीत हे पाहून आश्चर्य व्यक्त केले. या कार्यक्षम पोलिस शिपायांनी जमावांना शहरात मार्ग दाखवला, पाहुण्यांचे सामानसुमान वाहून नेले, लोकांना रस्ता ओलांडायला मदत केली, इतकेच काय, वयस्क स्त्रियांना टॅक्सीकॅब शोधून देण्यातही मदत केली. साहजिकच ब्रिटिश लोकांनीच नव्हे तर परदेशी पाहुण्यांनीही ब्रिटिश बॉबींचे तोंडभरून कौतुक केले.
गुन्हेगारीला आटोक्यात आणण्यात हे पोलिस इतके कार्यक्षम ठरले की १८७३ साली चेस्टर शहराच्या मुख्य हवालदाराने अशा काळाची कल्पना केली जेव्हा गुन्हेगारीचे पूर्णपणे उच्चाटन झालेले असेल! पोलिसांनी रुग्णवाहिका आणि अग्नीशामक सेवाही सुसंघटित केल्या. त्यांनी गरिबांसाठी बूट आणि कपडे पुरवणाऱ्या संस्थांची व्यवस्था केली. काहींनी मुलांसाठी क्लब्स, सहली आणि सुटीत जाण्याकरता शिबिरे आयोजित केली.
अर्थात भ्रष्टाचार आणि क्रूरता यांमुळे बऱ्याच नवीन पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पण बहुतेक अधिकारी कमीतकमी जोरजबरदस्तीचा वापर करून सुव्यवस्था राखत होते. १८५३ साली वायगन, लँकाशायर येथील पोलिसांना संप करणाऱ्या खाणकामगारांच्या दंगलीला आटोक्यात आणावे लागले. खाणीच्या मालकाकडे बंदुका होत्या पण दहा शिपायांचे नेतृत्व करणाऱ्या धैर्यवान सार्जंटने त्यांचा वापर करण्यास नकार दिला. १८८६ साली हेक्टर मॅक्लिअड यांनी आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून पोलिस खात्यात पदार्पण केले तेव्हा त्यांना आलेल्या या पत्रातून वरील मनोवृत्तीचे दर्शन घडते. या पत्राचा काही भाग इंग्रज पोलिस (इंग्रजी) यात प्रसिद्ध करण्यात आला: “निदर्यीपणे वागल्यास जनतेची सहानुभूती तुम्ही गमावून बसता . . . मी नेहमी जनतेला प्राधान्य दिले कारण काही झाले तरी शेवटी [पोलिस] समाजाचे सेवक असतात आणि तेसुद्धा तात्पुरत्या काळासाठी; त्याअर्थी लोकांची आणि दुसरीकडे वरिष्ठ अधिकाऱ्याचीही मर्जी राखणे हे [पोलिसांचे] कर्तव्य असते.”
मेट्रोपॉलिटन पोलिस दलाचे एक सेवानिवृत्त निरीक्षक हेडन सांगतात: “आम्हाला नेहमी संयमाने वागण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते कारण समाजाच्या पाठिंब्याशिवाय पोलिस खात्याचे काम यशस्वीपणे चालणे शक्य नाही. आमच्याजवळ असलेले लाकडी दंडुक खरेतर अगदी शेवटचा पर्याय म्हणून वापरण्याकरता होते; बहुतेक अधिकारी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत त्याचा एकदाही वापर करत नव्हते.” ब्रिटिश बॉबींच्या सकारात्मक प्रतिमेत भर पाडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे तब्बल २१ वर्षे चाललेली डिक्सन ऑफ डॉक ग्रीन नावाची एक टीव्ही मालिका. ही एका प्रामाणिक हवालदाराची गोष्ट होती जो त्याच्या गस्तीच्या परिसरातील सर्वांना ओळखत होता. या मालिकेने कदाचित पोलिसांना ही प्रतिमा कायम ठेवण्याचे प्रोत्साहन दिले असावे; पण ब्रिटनच्या मनात आपल्या पोलिस शिपायांबद्दल असलेले प्रेम या मालिकेमुळे निश्चितच वृद्धिंगत झाले.
एकोणीसशे साठच्या दशकात ब्रिटनमध्ये पोलिसांप्रती असलेली लोकांची मनोवृत्ती बदलू लागली. सबंध राष्ट्राला त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या अभिमानाची जागा अधिकाऱ्यांवर शंका घेण्याच्या प्रवृत्तीने घेतली. पोलिस खात्यातील भ्रष्टाचाराच्या व वंशभेदाच्या वृत्तांमुळे १९७० च्या दशकात पोलिसांची प्रतिमा डागाळली गेली आणि शेजार पहारा योजनेकरवी लोकांचा पाठिंबा पुन्हा मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. अलीकडील काळात वंशभेदाच्या आणि खोटा पुरावा सादर करून दोषी ठरवण्याच्या आरोपांनंतर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या वर्तणुकीत सुधारणा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
[चित्राचे श्रेय]
वरील छायाचित्र: http://www.constabulary.com
[१० पानांवरील चौकट/चित्र]
न्यूयॉर्कमध्ये चमत्कार?
पोलिस विधायक पावले उचलतात तेव्हा उल्लेखनीय परिणाम घडून येतात. बऱ्याच काळापासून न्यूयॉर्कला जगातले सर्वात भयानक शहर समजले जात होते; १९८० या दशकाच्या उत्तरार्धात पोलिसांनीही हाय खाल्ली आणि परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेली असे भासू लागले. आर्थिक दबावामुळे शहर प्रशासनाला, वेतनमान गोठवून पोलिस खात्यातील मनुष्यबलात कपात करणे भाग पडले. ड्रग्स व्यापाऱ्यांनी शहरात ठिय्या मांडला आणि हिंसाचाराने रौद्र रूप धारण केले. शहराच्या केंद्रिय भागात राहणारे रहिवाशी गोळीबाराच्या आवाजात झोपी जाऊ लागले. १९९१ साली वंशभेद टोकाला जाऊन भयंकर दंगली झाल्या आणि पोलिसांनी स्वतःची गाऱ्हाणी जाहीर करण्यासाठी आंदोलन केले.
पण यादरम्यान एका नव्या पोलिस आयुक्ताची नेमणूक झाली; त्यांनी आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्याकरता जातीने प्रयत्न केला आणि वरील समस्यांना प्रत्येक पोलिस हद्दीत कसे तोंड द्यायचे हे निश्चित करण्याकरता त्यांच्यासोबत नियमित सभा आयोजित केल्या. एनवायपीडी या पुस्तकात लेखक जेम्स लार्डनर आणि टॉमस रपेटो यावर खुलासा करतात: “गुप्त पोलिसांचे आयुक्त किंवा नार्कोटिक्स ब्युरोचे आयुक्त यांच्याविषयी इतर पोलिस अधिकारी बातमीपत्रात वाचायचे पण अमोरासमोर त्यांची भेट क्वचितच होत असे. आता मात्र ते सर्वजण तासनतास सोबत बसून चर्चा करत होते.” गुन्ह्यांच्या प्रमाणात कमालीची घट झाली. वृत्तानुसार खुनांच्या संख्येत क्रमशः घट झाली; १९९३ साली २,००० इतकी खुनांची संख्या असून १९९८ साली ती ६३३ इथपर्यंत घसरली—तब्बल ३५ वर्षांतील ही सर्वात कमी संख्या होती. न्यूयॉर्कचे रहिवाशी चमत्काराची भाषा करू लागले. मागील आठ वर्षांतील गुन्हेगारीच्या प्रमाणातील घट ६४ टक्के असल्याचे सांगितले जाते.
ही सुधारणा कशी घडून आली? द न्यू यॉर्क टाईम्स जानेवारी १, २००२ अंकात या यशाचे श्रेय काही प्रमाणात कॉम्पस्टॅटला देण्यात आले. ही “गुन्ह्यांवर पाळत ठेवण्याची यंत्रणा असून, याद्वारे प्रत्येक पोलिस हद्दीत दर आठवडी झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन समस्या निर्माण होताच तिचा नायनाट करण्याच्या दिशेने प्रयत्न केला जातो.” भूतपूर्व पोलिस कमिशनर बर्नार्ड केरिक यांनी म्हटले: “विशिष्ट गुन्हा कोणत्या भागात होत आहे, आणि तो का होत आहे याकडे आम्ही लक्ष देत होतो; मग या समस्येवर लक्ष केंद्रित करून तिचा नायनाट करण्याकरता [पोलिस] दल व साधने तेथे पाठवली जायची. अशारितीने गुन्हेगारी आटोक्यात आणली जाते.”
[७ पानांवरील चित्र]
जपानी पोलिस स्थानक
[७ पानांवरील चित्र]
हाँग काँग येथे वाहतूक पोलिस
[[८, ९ पानांवरील चित्र]
इंग्लंडमधील सॉकर सामन्याच्या वेळी जमावाला नियंत्रणात आणताना पोलिस
[९ पानांवरील मथळा]
दुर्घटनाग्रस्त व्यक्तींना मदत करणे पोलिसांच्या जबाबदाऱ्यांत सामील आहे