अश्लील साहित्य इतके प्रचलित का?
अश्लील साहित्य इतके प्रचलित का?
लैंगिक भावना उत्तेजित करण्याच्या उद्देशाने तयार केलेले कामुक साहित्य हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. पण गतकाळात असे हे अश्लील साहित्य निर्माण करणे कठीण होते आणि त्यामुळे ते केवळ श्रीमंत सत्ताधारी वर्गाच्या लोकांनाच उपलब्ध होते. पण मुद्रणतंत्र, तसेच छायाचित्रण व चलचित्राचा शोध लागल्यानंतर मात्र सर्वकाही बदलले. सामान्य माणसालाही हे अश्लील साहित्य परवडू लागले व सहज उपलब्ध होऊ लागले.
या प्रकारात भर घातली ती व्हिडिओकॅसेट रेकॉर्डरच्या अर्थात व्हीसीआरच्या आगमनाने. सिनेमा रील आणि जुनी छायाचित्रे यांच्या तुलनेत, व्हिडिओ कॅसेट्स साठवणे, त्यांच्या प्रती काढणे तसेच त्यांचे वितरण करणे देखील बरेच सोपे होते. शिवाय, आपल्या घरात बसून त्या पाहणे शक्य होते. अलीकडे, केबल टीव्ही आणि इंटरनेटच्या प्रसारामुळे तर अश्लील साहित्य अधिकच सहजपणे उपलब्ध होऊ लागले आहे. ‘व्हिडिओंच्या स्टोअरमध्ये फक्त प्रौढांसाठी असलेल्या भागात आपल्या शेजाऱ्याने आपल्याला पाहिले तर . . .’ अशी भीती वाटणारा आता “घरबसल्या आपल्या केबल सिस्टमवर किंवा डायरेक्ट टीव्हीवर एक बटन दाबून हवा तो व्हिडिओ ऑर्डर करू शकतो,” असे प्रसारमाध्यम विश्लेषक डेनिस मकॅल्पिन म्हणतात. अशाप्रकारचे प्रोग्रॅम्स सहज उपलब्ध झाल्यापासून मकॅल्पिन यांच्या मते अश्लील साहित्याप्रती, “अधिकाधिक लोक अनुकूल बनले आहेत.”
अश्लीलता रूढ झाली आहे
बरेच लोक आता अश्लीलतेप्रती तितकी नाखुशी व्यक्त करत नाहीत कारण आता ती समाजात रूढ झाली आहे. लेखिका जर्मेन ग्रिअर म्हणतात की “ऑपेरा, बॅले, रंगभूमी, संगीत व
ललित कला यांच्या एकंदर प्रभावापेक्षा, आज अश्लील साहित्याचा समाजावर अधिक पगडा आहे.” आजकाल अनेक सुप्रसिद्ध सामाजिक व्यक्ती ‘वेश्यांना शोभणारा’ पेहराव करून मिरवतात, संगीत व्हिडिओंमध्ये कामुक दृश्यांची भरमार आहे आणि जाहिरातींतही अश्लील चित्रण अधिकाधिक दिसू लागले आहे. मकॅल्पिन शेवटी म्हणतात: “चमच्याने तुम्ही जे भरवाल ते खाणाऱ्या बाळासारखा आज समाज झाला आहे . . . यामुळे, या सगळ्या प्रकारात काही गैर नाही अशी धारणा बळावत चालली आहे.” लेखिका ॲन्ड्रिया ड्वॉर्कन खेदाने म्हणतात, याचा परिणाम असा झाला आहे की, “लोकांना आजकाल काहीही धक्केदायक वाटत नाही. सगळे जणू बेफिकीर आहेत.”अश्लीलतेचे पृथक्करण
ड्वॉर्कन यांच्या टिप्पणीशी मिळता जुळता विचार निवृत्त एफबीआय अधिकारी रॉजर यंग यांनीही व्यक्त केला. त्यांनी म्हटले की लोक “अश्लील साहित्यामुळे होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांचा आणि त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या गंभीर समस्यांचा विचारच करत नाहीत.” अश्लील साहित्याच्या समर्थकांच्या कह्यात येऊन काहीजण असा दावा करतात की अश्लील दृश्यांचा लोकांवर अनिष्ट परिणाम होतो हे सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नाही. लेखक एफ. एम. क्रिस्टनसन लिहितात, “काही झाले तरी शेवटी ही अश्लील दृश्ये काल्पनिक असतात. अश्लील साहित्याचा विरोध करणाऱ्यांना मुळात हीच गोष्ट समजत नाही.” पण जर काल्पनिक दृश्यांचा लोकांवर परिणाम होत नाही तर मग जाहिरातींचा व्यवसाय कशाच्या भरवशावर चालतो? व्यावसायिक जाहिराती, व्हिडिओ आणि छापील स्वरूपातील जाहिरातींचा जर लोकांच्या मनावर दीर्घकाळ टिकणारा प्रभाव पडत नाही, तर मग उद्योजक कंपन्या या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये काय उगाचच खर्च करतात?
खरे म्हणजे, यशस्वी जाहिरातबाजी प्रमाणेच अश्लील साहित्याचाही मुख्य उद्देश हा अस्तित्वात नसलेल्या कामना जागृत करण्याचा आहे. “अश्लील साहित्याचा मुख्य उद्देश दुसरा तिसरा काही नसून केवळ नफा मिळवणे हाच आहे,” हे
स्पष्ट विधान संशोधक स्टीवन हिल आणि नीना सिलव्हर यांनी केले. आणि या नियंत्रणाबाहेर गेलेल्या बाजारपेठेत नफ्यासाठी कशाचाही वापर करणे ग्राह्य आहे; खासकरून स्त्रियांचे शरीर आणि मानवी लैंगिक संबंध.” ग्रिअर अश्लील साहित्याची तुलना, आहाराच्या दृष्टीने शून्य असलेल्या पण कृत्रिम पदार्थ घालून चविष्ट बनवलेल्या फास्ट फूडशी करतात. त्या म्हणतात, “प्रसारमाध्यमांद्वारे दाखवले जाणारे सेक्स वास्तविक नसतात . . . खाद्यपदार्थांची जाहिरात करणारे काल्पनिक खाद्यांची विक्री करतात आणि सेक्सची जाहिरात करणारे काल्पनिक सेक्सची विक्री करतात.”काही डॉक्टरांचे म्हणणे आहे की अश्लील साहित्य पाहण्याचे व्यसन लागल्यावर त्यातून सुटका मिळणे हे ड्रग्सच्या व्यसनातून मुक्त होण्यापेक्षा कठीण आहे. ड्रग्सच्या आहारी गेलेल्या व्यक्तींवर उपचार करताना सर्वप्रथम त्यांच्या शरीराला या अंमली पदार्थापासून मुक्त केले जाते; या प्रक्रियेला डिटॉक्सिफिकेशन म्हणतात. पण पेन्सिलव्हेनिया विद्यापीठाच्या डॉ. मेरी ॲन लेडन खुलासा करून सांगतात, की अश्लील साहित्य चाळण्याचे व्यसन लागल्यावर “व्यक्तीच्या मनात काही दृश्ये कायमची कोरली जातात आणि मेंदूच्या रासायनिक प्रक्रियांमुळे ती व्यक्तीच्या मानसिकतेत जणू शोषून घेतली जातात.” त्यामुळे काही व्यक्तींना कित्येक वर्षांआधी पाहिलेली अश्लील दृश्ये जशीच्या तशी आठवतात. डॉ. लेडन शेवटी म्हणतात: “हा पहिला अंमली पदार्थ आहे ज्याकरता डिटॉक्सिफिकेशन करणे शक्यच नाही.” पण याचा अर्थ अश्लील साहित्याच्या प्रभावातून मुक्त होणे अशक्य आहे का? आणि या अश्लील साहित्यामुळे नेमके कोणते अपाय घडतात? (g०३ ७/२२)
[५ पानांवरील चौकट]
इंटरनेटवरील अश्लील साहित्याविषयी वास्तविक माहिती
◼ इंटरनेटवरील अश्लील साहित्यापैकी सुमारे ७५ टक्के अमेरिकेत निर्माण केले जाते. जवळजवळ १५ टक्के युरोपात तयार होते.
◼ दर आठवडी अंदाजे सात कोटी व्यक्ती अश्लील वेब साईट्स चाळतात. यांपैकी सुमारे दोन कोटी कॅनडा व संयुक्त संस्थानांतील आहेत.
◼ एका अभ्यासानुसार अलीकडेच एका महिन्याच्या कालावधीत युरोपात अश्लील इंटरनेट साईट्स चाळणाऱ्या दर्शकांची सर्वाधिक संख्या जर्मनीत होती, यानंतर ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, इटली व स्पेन यांचा नंबर लागला.
◼ जर्मनीत, इंटरनेटवरील अश्लील साहित्य उपयोगात आणणारे दर महिन्यात सरासरी ७० मिनिटे अश्लील साईट्स चाळण्यात खर्च करतात.
◼ इंटरनेटवरील अश्लील दृश्ये पाहणाऱ्या युरोपियन दर्शकांपैकी ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे दर्शक प्रौढांसाठी असलेल्या वेब साईट्सवर सर्वाधिक वेळ खर्च करतात.
◼ एका सूत्रानुसार, इंटरनेटवरील अश्लील साईट्सचा ७० टक्के वापर दिवसाच्या वेळी होतो.
◼ काहींचा अंदाज आहे की इंटरनेटवरील १,००,००० साईट्सवर बालकांशी संबंधित असलेले अश्लील साहित्य आहे.
◼ इंटरनेटवर बालकांशी संबंधित असलेल्या अश्लील साहित्यापैकी जवळजवळ ८० टक्के जपानमध्ये तयार होते.
[४ पानांवरील चित्रे]
अश्लील साहित्य पूर्वीपेक्षा अधिक सहजगत्या उपलब्ध होऊ लागले आहे