व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवावर प्रेम करायला मला बालपणापासून शिकवण्यात आलं

देवावर प्रेम करायला मला बालपणापासून शिकवण्यात आलं

देवावर प्रेम करायला मला बालपणापासून शिकवण्यात आलं

अनातोली मेलनिक यांच्याद्वारे कथित

मला बरेचजण प्रेमानं आजोबा म्हणतात. हा शब्द ऐकला की मला भरून येतं. कारण मला माझ्या स्वतःच्या लाडक्या आजोबांची आठवण होते. त्यांचे माझ्यावर अनेक उपकार आहेत. त्यांच्याबद्दल आणि त्यांनी व माझ्या आजीने कशाप्रकारे आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या व इतरांच्याही जीवनावर उल्लेखनीय प्रभाव पाडला याविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो.

आज ज्याला आपण मोलडोव्हा या नावानं ओळखतो त्या देशाच्या उत्तरेकडील ख्लीना नावाच्या खेडेगावात माझा जन्म झाला. * १९२० च्या दशकात, त्याकाळी पिल्ग्रिम्स म्हणून ओळखले जाणारे प्रवासी सेवक, रोमानियाची सीमा पार करून आमच्या रम्य डोंगराळ परिसरात आले. बायबलमधून त्यांनी सांगितलेला संदेश माझ्या आईच्या आईवडिलांनी लगेच स्वीकारला. १९२७ साली ते यहोवाचे साक्षीदार म्हणजे त्याकाळचे बायबल विद्यार्थी बनले. १९३९ साली दुसऱ्‍या महायुद्धास प्रारंभ होईपर्यंत आमच्या लहानशा गावात यहोवाच्या साक्षीदारांची एक मंडळी देखील स्थापन झाली होती.

१९३६ साली माझा जन्म झाला तेव्हा, माझ्या बाबांना सोडून बाकीचे सर्व नातेवाईक यहोवाचे साक्षीदार होते. बाबा अजूनही ऑर्थोडॉक्स चर्चचे सदस्य होते. पण दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान त्यांनी जीवनाच्या उद्देशाविषयी गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली; कालांतराने त्यांनी निर्माणकर्त्या यहोवा देवाला आपले जीवन समर्पित केले व पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन हे जाहीर केले. आमच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक प्रगतीत माझ्या आजोबांचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे. त्यांना बायबलबद्दल विशेष प्रेम होतं आणि हजारो वचनं त्यांना तोंडपाठ होती. कोणत्याही संभाषणाला बायबलकडे वळवण्याचं कौशल्य त्यांना अवगत होतं.

मी सहसा आजोबांच्या मांडीवर बसून त्यांनी सांगितलेल्या बायबलच्या गोष्टी ऐकायचो. त्यांनीच मला देवावर प्रेम करण्यास शिकवलं. याबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. आठ वर्षांचा असताना मी पहिल्यांदा आजोबांबरोबर प्रचार कार्याला गेलो. यहोवा कोण आहे आणि त्याच्या जवळ आपण कसे येऊ शकतो हे आमच्या गावातल्या लोकांना आम्ही बायबलमधून दाखवत असू.

कम्युनिस्ट लोकांकडून छळ

१९४७ साली, कम्युनिस्ट धोरणाच्या व ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रभावात येऊन अधिकाऱ्‍यांनी मोलडोव्हातील यहोवाच्या साक्षीदारांचा छळ करण्यास सुरुवात केली. नंतर ज्यास केजीबी हे नाव पडलं, त्या संघटनेचे प्रतिनिधी स्थानिक पोलिसांसोबत मिळून आमच्या घरी यायचे आणि आमच्या प्रचार कार्यात कोण पुढाकार घेतात, आम्हाला साहित्य कुठून मिळतं, आणि उपासनेकरता आम्ही कुठं भेटतो यांसारखे प्रश्‍न विचारायचे. “देशात कम्युनिझमच्या विकासात अडथळा” आणणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांचं कार्य आम्ही बंद पाडू असं ते म्हणायचे.

एव्हाना, माझे बाबा देखील बायबल सत्यावर मनापासून प्रेम करू लागले होते. ते सुशिक्षित होते. आपल्या ख्रिस्ती बंधू भगिनींबद्दल कोणतीही माहिती न देता या तपास करणाऱ्‍यांना कसं उत्तर द्यायचं हे माझ्या बाबांना व आजोबांना चांगलं माहीत होतं. ते दोघंही निर्भीड स्वभावाचे व प्रेमळ होते आणि सहविश्‍वासू बांधव अडचणीत येणार नाहीत याची ते काळजी घ्यायचे. त्यांच्याप्रमाणेच आईसुद्धा न घाबरता नेहमी शांत राहायची.

१९४८ साली बाबांना अटक करून नेण्यात आलं. कोणत्या आरोपांच्या आधारावर त्यांना अटक करण्यात आली हे आम्हाला कधीच सांगण्यात आलं नाही. त्यांना उच्च सुरक्षेच्या कारागृहात सात वर्षांचा तुरूंगवास आणि त्यासोबत आणखी दोन वर्षं हद्दपारीत राहण्याची शिक्षा झाली. काही काळानंतर त्यांना रशियाच्या ईशान्येकडील मागादान या सुदूर प्रदेशात पाठवण्यात आलं. हे ठिकाण आमच्या घरापासून ७,००० किलोमीटर दूर होतं. आम्ही नऊ वर्षं एकमेकांना पाहिलं नाही. बाबांशिवाय राहणं कठीण होतं, पण आजोबांनी मला खूप आधार दिला.

हद्दपार

जून ६, १९४९ च्या रात्री दोन शिपाई व एक अधिकारी जबरदस्तीने आमच्या घरात घुसले. दोन तासांच्या आत आम्ही घर सोडावं व त्यांच्या गाडीत जाऊन बसावं असा आदेश त्यांनी केला. याव्यतिरिक्‍त त्यांनी आम्हाला काहीही स्पष्टीकरण दिलं नाही. आम्हाला हद्दपार करण्यात आलं असून आता आम्ही पुन्हा कधीही आमच्या गावी परतणार नाही एवढंच त्यांनी सांगितलं. अशारितीनं, आई, आजोबा, आजी आणि इतर बांधवांसोबत मला सायबेरियाला पाठवण्यात आलं. तेव्हा मी अवघ्या १३ वर्षांचा होतो. काही आठवड्यांनंतर आम्ही तैगा प्रदेशाच्या दाट जंगलातील पाणथळ जमिनी असलेल्या भागांत पोचलो. मला प्रिय वाटणाऱ्‍या माझ्या स्वतःच्या गावापेक्षा हा परिसर किती वेगळा होता! त्याच्या आठवणीनं, कधीकधी आम्ही अक्षरशः रडायचो. पण यहोवा आम्हाला कधीही सोडणार नाही याची आम्हाला खात्री होती.

आम्हाला ज्या लहानशा गावात नेण्यात आलं त्यात ओंडक्यांपासून बनवलेल्या दहा झोपड्या होत्या. इतर साक्षीदारांना तैगा प्रदेशाच्या इतर गावांत हद्दपार करण्यात आलं होतं. तेथे राहणाऱ्‍या मूळ रहिवाशांना घाबरवण्यासाठी, आणि आमच्याबद्दल त्यांची मनं कलुषित करण्यासाठी अधिकाऱ्‍यांनी त्यांना सांगितलं की साक्षीदार नरभक्षक आहेत. पण लवकरच हे खोटं असल्याची लोकांना जाणीव झाली, त्यांना आमच्यापासून कोणताही धोका नव्हता.

इथं आल्यावर पहिले दोन महिने आम्हाला एका जुन्या झोपडीत राहावं लागलं. पण हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडण्याअगोदर आम्हाला चांगलं, पक्कं घर बांधणं भाग होतं. आजोबा व आजीच्या मदतीनं आईनं व मी मिळून एक साधंसं घर बांधलं, जे अर्धवट जमिनीच्या खाली आणि अर्धवट वरती होतं. या घरात आम्ही तीन वर्षं काढली. आम्हाला परवानगीशिवाय गावाबाहेर जाण्याची मनाई होती आणि परवानगी कधीही देण्यात आली नाही.

काही काळानंतर मला शाळेत जाण्याची परवानगी देण्यात आली. माझे धार्मिक विश्‍वास शाळेतल्या मुलांपेक्षा वेगळे असल्यामुळे शिक्षक व मुलं मला बरेचदा निरनिराळे प्रश्‍न विचारायचे. मी त्यांना कशाप्रकारे आपल्या विश्‍वासांविषयी स्पष्टीकरण दिलं हे जेव्हा मी घरी येऊन आजोबांना सांगायचो तेव्हा त्यांचा आनंद मला त्यांच्या डोळ्यांत दिसायचा.

अधिक स्वातंत्र्य

१९५३ साली हुकूमशाह स्टालिन याच्या मृत्यूनंतर आमच्या परिस्थितीत थोडी सुधारणा झाली. आम्हाला गावाबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली. यामुळे ज्या गावांत बांधवांना हद्दपार करण्यात आलं होतं, त्या गावांत आम्ही आपल्या बांधवांना जाऊन भेटू लागलो आणि सभांना उपस्थित राहू लागलो. लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून आम्ही सहसा लहान लहान गटांत भेटायचो. तिथं जाण्याकरता आम्हाला जवळजवळ ३० किलोमीटर पायी चालावं लागायचं. कधीकधी बर्फ गुडघ्यांपर्यंत साचलेला असायचा आणि तापमान शून्यापेक्षा ४० डिग्री कमी असायचं. दुसऱ्‍या दिवशी आम्ही घरी परतण्यासाठी पुन्हा तोच लांबचा प्रवास करायचो. वाटेत आम्ही एकप्रकारचं लोणचं आणि साखरेचे तुकडे खायचो. पण पुरातन काळातल्या दावीदासारखेच आम्ही अत्यंत आनंदी होतो!—स्तोत्र १२२:१.

१९५५ साली मी यहोवाला माझं जीवन समर्पित केलं आणि बाप्तिस्मा घेतला. त्याच्या काही काळाआधी शेजारच्या खेड्यात, मंडळीतील एका सभेत माझी भेट काळेभोर केस असलेल्या, लीडीया नावाच्या एका शालीन मुलीशी झाली होती. आमच्यासारखेच ती व तिचे कुटुंबही यहोवाचे साक्षीदार होते आणि त्यांनाही मोलडोव्हाहून हद्दपार करण्यात आलं होतं. तिचा आवाज अतिशय गोड होता आणि तेव्हा आम्ही जे गीत पुस्तक वापरत होतो, त्यातील एकूण ३३७ गीतांपैकी जवळजवळ सगळीच गीतं तिला तोंडपाठ होती. याच गोष्टीमुळे मी तिच्याकडे आकर्षित झालो कारण मलाही संस्थेनं रचलेलं संगीत व गीतं खूप आवडायची. १९५६ साली आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मी बाबांना पत्र लिहून कळवलं. त्यांना मागादान इथं हद्दपार करण्यात आल्याचं एव्हाना आम्हाला कळलं होतं. त्यांची संमती मिळाल्यानंतरच लग्न करायचं आम्ही ठरवलं. त्यानंतर काही काळातच बाबांची सुटका करण्यात आली आणि त्यांना आम्ही जिथं हद्दपारीत राहात होतो तिथं येऊन राहण्याची परवानगी देण्यात आली. आल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांनी व इतर बांधवांनी कशाप्रकारे देवाच्या मदतीनं श्रम शिबिरांतील खडतर परिस्थितीला तोंड दिलं होतं. हे ऐकल्यावर आमचा विश्‍वास अधिकच बळावला.

बाबा परतल्यानंतर काही काळानंतरच एक भयानक दुर्घटना घडली. पेन्ट व वार्निश तयार करण्याकरता आम्ही एकप्रकारचं तेल वापरायचो. आई हे तेल तयार करत असताना, उकळत्या तेलाचं मोठं भांडं अचानक पडलं आणि त्यात असलेलं तेल तिच्या अंगावर सांडलं. इस्पितळात तिचा मृत्यू झाला. आम्ही सर्व दुःखाने हतबल झालो. हळूहळू बाबा या धक्क्यातून सावरले आणि कालांतराने त्यांनी शेजारच्या खेड्यातील तातान्या हिच्याशी विवाह केला.

सेवाकार्यात वाढ

१९५८ साली लीडीया व मी, जिथं आम्ही राहात होतो ते कीझाक गाव सोडलं आणि जवळजवळ १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या लिब्यीये या बऱ्‍याच मोठ्या गावी राहायला गेलो. इतर देशांतील ख्रिस्ती घरोघरी जाऊन प्रचार कार्य करतात असं आम्ही वाचलं होतं. तेव्हा आम्हीही आमच्या नव्या ठिकाणी हे करून पाहायचं ठरवलं. अर्थात, टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांवर बंदी होती पण तरीसुद्धा, इतर ठिकाणांहून चोरून आणलेल्या या नियतकालिकांच्या प्रती आम्हाला मिळायच्या. आम्हाला सांगण्यात आलं की यापुढे आम्हाला फक्‍त रशियन भाषेतच मासिकं मिळतील. तोपर्यंत मोलडेव्हियन भाषेतही मासिकांच्या प्रती येत होत्या. त्यामुळे आम्ही आमची रशियन भाषा पक्की करण्यासाठी मेहनत घेऊ लागलो. आजही मला केवळ त्या लेखांची शीर्षकंच नव्हे तर त्यांतला काही मजकूरही आठवतो.

उदरनिर्वाहाकरता, लीडीया एका धान्याच्या कोठारात काम करू लागली आणि मी गाड्यांमधून लाकूड उतरवण्याचे काम करू लागलो. काम कष्टाचं होतं आणि मजूरी अगदीच नावापुरती होती. आम्ही साक्षीदार अगदी मन लावून काम करत असल्यामुळे मालक आमच्यावर खुष होते पण आम्हाला कोणत्याही आर्थिक सवलती किंवा बक्षीसं दिली जात नसत. अधिकारी अगदी स्पष्टपणे म्हणायचे: “कम्युनिस्ट समाजात यहोवाच्या साक्षीदारांना थारा नाही.” पण येशूनं आपल्या अनुयायांबद्दल म्हटलं होतं: “जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” हे शब्द आमच्या बाबतीत खरे असल्यामुळे आम्ही आनंदी होतो.—योहान १७:१६.

नवी आव्हाने

१९५९ साली आमची मुलगी व्हॅलेन्टीना हिचा जन्म झाला. यानंतर काही काळातच छळाची लाट नव्याने उसळली. एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका यात म्हटल्याप्रमाणे: “पंतप्रधान नीकीता क्रुशेव्ह यांनी १९५९-६४ दरम्यान एक नवी धर्मविरोधी चळवळ सुरू केली.” सर्व धर्मांचं, विशेषतः यहोवाच्या साक्षीदारांचं नामोनिशाण मिटवायचं सोव्हिएत सरकारचं ध्येय आहे असं राष्ट्रीय सुरक्षा सदस्यांनी आम्हाला सांगितलं.

व्हॅलेन्टीनाला एक वर्ष पूर्ण होत आलं तेव्हा मला सैन्यात भरती होण्याकरता बोलावण्यात आलं. अर्थातच, मी गेलो नाही. तटस्थ राहण्याबद्दल मला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. एकदा लीडीया मला भेटायला आली होती, तेव्हा एक केजीबी अधिकारी तिला म्हणाला: “आम्हाला क्रेमलिनकडून सूचना मिळाल्या आहेत की दोन वर्षांच्या आत सोव्हिएत संघात एकही यहोवाचा साक्षीदार शिल्लक राहणार नाही.” मग त्यानं बजावून सांगितलं: “तुम्ही आपला विश्‍वास नाकारला नाही तर याद राखा, तुम्हाला तुरुंगात जावं लागेल.” अशा धमक्यांमुळे स्त्रिया घाबरून गप्प बसतील असा त्या अधिकाऱ्‍यांचा ग्रह होता. त्यांच्या मते आमच्या बहिणी “कमजोर” होत्या.

काही काळातच, बहुतेक पुरुषांची रवानगी एकतर तुरुंगांत किंवा श्रम शिबिरांत झाली होती. तरीसुद्धा निर्भीड ख्रिस्ती स्त्रियांनी प्रचार कार्य अखंड चालू ठेवलं. अतिशय धोक्याचं असूनही, अधिकाऱ्‍यांची नजर चुकवून त्या तुरुंगात व श्रम शिबिरांत असलेल्यांना बायबलचे साहित्य आणून द्यायच्या. लीडीयानं अशा अनेक परीक्षांना तोंड दिलं. तसेच बरेचदा, माझ्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेऊ पाहणाऱ्‍या काही पुरुषांनी तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. शिवाय, माझी कधीही सुटका होणार नाही असं तिला सांगण्यात आलं. पण शेवटी माझी सुटका झालीच!

सुटका आणि कझाकस्थानला जाणे

१९६३ साली कोर्टात माझा खटला पुन्हा चालू करण्यात आला. तीन वर्षे तुरुंगात काढल्यानंतर माझी सुटका करण्यात आली. पण प्रयत्न करूनही, आम्हाला कुठेही कायमचे निवासी होण्याकरता परवाना मिळाला नाही. त्यामुळे मला नोकरी मिळेनाशी झाली. “जो कायमचा निवासी नाही त्याला रोजगार नाही” असा कायदाच होता. आम्ही यहोवाला कळकळीने प्रार्थना केली. मग आम्ही कझाकस्तानच्या उत्तरेकडे असलेल्या पिट्रापावलला जाण्याचं ठरवलं. पण इथल्या स्थानिक अधिकाऱ्‍यांना आधीच आमच्याविषयी सूचित करण्यात आलं होतं; त्यामुळे त्यांनी आम्हाला तिथं राहण्याची किंवा काम करण्याची परवानगी दिली नाही. या शहरात जवळजवळ ५० साक्षीदारांना अशाचप्रकारच्या छळाला तोंड द्यावं लागलं.

दुसऱ्‍या एका साक्षीदार दांपत्यासोबत आम्ही दक्षिणेकडे श्‍चूचिंक्स या लहानशा गावी राहायला गेलो. इथं साक्षीदार नव्हते आणि अधिकाऱ्‍यांना आमच्या प्रचार कार्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. एक आठवडा आम्ही पुरुष, म्हणजे इव्हान व मी नोकरी शोधत होतो, आणि आमची बायकामुलं रेल्वे स्थानकावरच होती. रात्री आम्ही इथंच झोपायचो. शेवटी काचेच्या कारखान्यात आम्हाला नोकरी मिळाली. राहण्याकरता आम्ही एकच खोली भाड्याने घेतली. या खोलीत फक्‍त दोन पलंग ठेवण्यापुरती जागा होती, पण आम्ही समाधानी होतो.

इव्हान व मी प्रामाणिकपणे आपलं काम करत होतो, त्यामुळे मालक खूपच खुष होते. पुन्हा एकदा मला सैन्यात भरती होण्याकरता बोलावण्यात आले; पण तोपर्यंत माझ्या मालकाला कळलं होतं, की बायबल विश्‍वासांनुसार प्रशिक्षित असल्यामुळं माझा विवेक मला लष्करी प्रशिक्षणात सामील होण्याची परवानगी देणार नाही. आणि काय आश्‍चर्य! त्यानं स्वतः लष्करी अधिकाऱ्‍याशी संपर्क साधून त्यांना कळवलं की इव्हान व मी निपुण कामगार असल्यामुळे, आम्हाला पाठवल्यास कारखाना बंद पडेल. अशारितीने, आमचे इथून जाणे टळले.

मुलांचे संगोपन आणि बांधवांची सेवा

१९६६ साली आमची दुसरी मुलगी लील्या हिचा जन्म झाला. यानंतर एका वर्षानं आम्ही बीलीये वोदी या लहानशा शहरात राहायला गेलो. कझाकस्थानच्या दक्षिणेकडे, उझबेकिस्तानच्या सीमेवर असलेल्या या शहरात साक्षीदारांचा एक लहानसा गट होता. लवकरच इथं एक मंडळी स्थापन करण्यात आली आणि मला अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. १९६९ मध्ये आम्हाला एक मुलगा झाला, ओल्येक; आणि दोन वर्षांनंतर आमची सर्वात धाकटी मुलगी, नताशा हिचा जन्म झाला. लीडीया व मी नेहमी आठवणीत ठेवलं की मुलं म्हणजे यहोवानं दिलेलं धन आहे. (स्तोत्र १२७:३) त्यांनी यहोवावर प्रेम करायला शिकावं अशारितीनं त्यांचं संगोपन कसं करता येईल याविषयी आम्ही दोघं मिळून चर्चा करत असू.

१९७० च्या दशकातही बहुतेक साक्षीदार पुरुष अद्याप श्रम शिबिरांत होते. अनेक मंडळ्यांत पर्यवेक्षक म्हणून सेवा करण्याकरता व बांधवांना मार्गदर्शन करण्याकरता अनुभवी बांधवांची गरज होती. त्यामुळे आमच्या मुलांचं संगोपन करण्याची पुष्कळशी जबाबदारी लीडीयानं सांभाळली; प्रसंगी ती आई व बाबा या दोन्ही भूमिका निभावायची. तर मी प्रवासी पर्यवेक्षक या नात्यानं सेवा करू लागलो. कझाकस्तान, तसेच ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान व उझबेकिस्तान या शेजारच्या सोव्हिएत प्रजासत्ताक राष्ट्रांतील मंडळ्यांना मी भेटी देत असे. त्याच वेळी मी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागवण्यासाठी कामही करत असे; लीडीया व मुलांनी कुरकूर न करता मला नेहमी साथ दिली.

कधीकधी मला अनेक आठवडे घराबाहेर राहावे लागायचे. तरीपण मी आपल्या मुलांना वडिलांचं प्रेम देण्याचा आणि त्यांच्या आध्यात्मिक वाढीत हातभार लावण्याचा माझ्या परीनं प्रयत्न करायचो. यहोवानं नेहमी आमच्या मुलांना सांभाळावं म्हणून लीडीया व मी त्याला कळकळीनं प्रार्थना करायचो. यासोबतच आम्ही मनुष्याच्या भीतीवर मात करण्याविषयी आणि देवासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्याविषयी आमच्या मुलांशी चर्चा करायचो. माझ्या प्रिय पत्नीच्या निःस्वार्थ पाठिंब्याशिवाय, प्रवासी पर्यवेक्षक या नात्यानं माझ्या जबाबदाऱ्‍या मी नक्कीच पूर्ण करू शकलो नसतो. लीडीया व आमच्या इतर बहिणी त्या अधिकाऱ्‍याने म्हटल्याप्रमाणे “कमजोर” निश्‍चितच नव्हत्या. त्या कणखर होत्या व आध्यात्मिक अर्थानं त्यांच्याकडे असाधारण सामर्थ्य होतं!—फिलिप्पैकर ४:१३.

१९८८ साली, आमची सर्व मुलं मोठी झाल्यानंतर मला नियमित प्रवासी पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. माझ्या विभागात मध्य आशियाचे बहुतेक देश होते. १९९१ साली यहोवाच्या साक्षीदारांचं कार्य भूतपूर्व सोव्हिएत संघराज्यात कायदेशीररित्या नोंदणीकृत करण्यात आलं; त्यानंतर इतर सुयोग्य, आध्यात्मिकरित्या अनुभवी बांधव भूतपूर्व सोव्हिएत संघराज्याच्या आशियाई प्रजासत्ताक देशांत सेवा करू लागले. आज या देशांत १४ प्रवासी पर्यवेक्षक सेवा करतात; मागच्या वर्षी इथं ५०,००० पेक्षा जास्त लोक ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीला उपस्थित राहिले होते!

अनपेक्षित निमंत्रण

१९९८ सालाच्या सुरुवातीला मला रशियातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरातून अनपेक्षितपणे एक फोन आला. फोन करणाऱ्‍या बांधवाने मला विचारलं, “अनातोली, तुम्ही व लीडीयानं कधी पूर्ण वेळेच्या सेवेविषयी विचार केला आहे का?” अर्थात आमच्या मुलांनी ही विशेष सेवा करावी असा आम्ही बरेचदा विचार केला होता. किंबहुना, आमचा मुलगा ओल्येक हा जवळजवळ पाच वर्षांपासून रशियाच्या शाखा दफ्तरात सेवा करत होता.

आम्हाला देण्यात आलेल्या निमंत्रणाबद्दल मी लीडीयाला सांगितलं तेव्हा ती म्हणाली: “पण आपलं घर, बाग आणि सामानसुमानाचं काय?” प्रार्थनापूर्वक विचारविनिमय केल्यानंतर आम्ही हे निमंत्रण स्वीकारायचं ठरवलं. कझाकस्तानातील अल्मा-अता या मोठ्या शहराजवळ असलेल्या इसक या गावी यहोवाच्या साक्षीदारांची एक धार्मिक संस्था आहे; तिथं सेवा करण्याकरता आम्हाला बोलावण्यात आलं. इथं या सबंध प्रदेशात बोलल्या जाणाऱ्‍या भाषांतून बायबल साहित्याचं भाषांतर केलं जातं.

सध्याचं आमचं कुटुंब

आमच्या मुलांवर बायबलचे संस्कार करताना देवानं आम्हाला केलेल्या मदतीबद्दल आम्ही अतिशय कृतज्ञ आहोत! आमची सर्वात थोरली मुलगी व्हॅलेन्टीना हिचं लग्न झाल्यावर, १९९३ साली ती व तिचे पती जर्मनीत इन्गलहाइम इथं राहण्यास गेले. त्यांना तीन मुलं असून तिघांचाही बाप्तिस्मा झाला आहे.

आमची दुसरी मुलगी, लील्या हिचंही लग्न झालं असून तिलाही मुलं आहेत. तिचे पती बीलीये वोदी या शहरातल्या मंडळीत वडील म्हणून सेवा करतात आणि ते दोघं आपल्या दोन मुलांना लहानपणापासूनच देवावर प्रेम करण्यास शिकवत आहेत. ओल्येकचं लग्न मॉस्को येथे राहणाऱ्‍या नताशा नावाच्या एका ख्रिस्ती बहिणीशी झालं; ते दोघं आता सेंट पिटर्सबर्गजवळ असलेल्या रशियाच्या शाखा दफ्तरात सेवा करत आहेत. १९९५ साली आमची सर्वात धाकटी मुलगी नताशा हिचं लग्न झालं आणि ती आपल्या पतीसोबत जर्मनीतल्या एका रशियन मंडळीत सेवा करते.

अधूनमधून आम्ही सारेजण एकत्र येतो. आमची मुलं त्यांच्या मुलांना सांगतात की कशाप्रकारे “ममा” आणि “पपा” यांनी यहोवा बापाचं ऐकलं आणि आपल्या मुलांना त्याच्यावर प्रेम करायला आणि त्याचीच सेवा करायला शिकवलं. या कौटुंबिक चर्चांमुळे आमच्या नातवंडांना आध्यात्मिकरित्या वाढण्यास मदत होते असं मला दिसून आलं आहे. आमचा सर्वात धाकटा नातू, मी लहानपणी होतो अगदी तसाच आहे. कधीकधी तो येऊन माझ्या मांडीवर बसतो आणि गोष्ट सांगण्याचा हट्ट धरतो. तेव्हा, आपण कसे आजोबांच्या मांडीवर बसायचो आणि त्यांनी कसं आपल्या महान निर्माणकर्त्यावर प्रेम करायला आणि त्याची सेवा करायला आपल्याला शिकवलं हे मला आठवतं आणि आपोआप माझे डोळे पाणावतात. (g०४ १०/२२)

[तळटीप]

^ मोल्डेव्हिया किंवा मोल्डेव्हियाचे सोव्हिएत प्रजासत्ताक या जुन्या नावांऐवजी या सबंध लेखात, सध्याचे मोलडोव्हा हेच नाव वापरले आहे.

[११ पानांवरील चित्र]

बाबांना तुरुंगवास होण्याआधी मोलडोव्हातल्या आमच्या घरासमोर आईबाबांसोबत

[१२ पानांवरील चित्र]

अद्याप हद्दपारीत राहताना १९५९ साली लीडियासोबत

[१३ पानांवरील चित्र]

मी तुरुंगात असताना लीडिया आमची मुलगी व्हॅलेन्टीना हिच्यासोबत

[१५ पानांवरील चित्र]

लीडियासोबत अलीकडे घेतलेलं छायाचित्र

[१५ पानांवरील चित्र]

आमची सर्व मुलं व नातवंडं यहोवाची सेवा करत आहेत!